Wednesday, August 27, 2014

लव्ह जिहाद ही काय भानगड?



जिहाद म्हणजे हिंसाचार हे गेल्या काही वर्षात जगभरच्या घटनांनी आपल्या डोक्यात फ़िट्ट बसले आहे. त्यामुळेच एखादी दहशतवादी घटना घडली, मग त्याला इस्लाम धर्म जोडला जातो. मग इस्लामी धर्माचे जाणकार व सेक्युलर विचारवंत जिहादचे अन्य अर्थ समजावू लागतात. दहशतवादाला धर्म नसतो वगैरे प्रचवनांची रेलचेल होते. सहाजिकच जिहादमध्ये लव्ह, म्हणजे प्रेम कुठून आले, असे अनेकांना वाटणे स्वाभाविक आहे. प्रेमाचा व हिंसेचा संबंध काय? धर्माचा प्रेमाशी संबंध काय? असे प्रश्न पुढे आले, मग जाणकार त्यात नाक खुपसणरच. त्यामुळेच आठवडाभर हा विषय ऐरणीवर आलेला आहे. मात्र त्यावरील चर्चा व विवेचन बघितले, तर असली काही गोष्ट अस्तित्वात नसल्याचे दावे करण्याचीच स्पर्धा दिसते. त्याहीपेक्षा नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यामुळे जाणिवपुर्वक संघ परिवाराने आपला हिंदूत्वाचा छुपा अजेंडा पोतडीतून बाहेर काढल्याचा कांगावा सुरू झालेला आहे. अर्थात भाजपाच्या उत्तरप्रदेशातील नेत्यांनी आपल्या बैठकीत हा विषय घेऊन उहापोह केला, यात शंका नाही. पण कुठल्याही राजकीय पक्षाने समाजात घडणार्‍या गोष्टींची आपल्या व्यवहारात दखल घ्यायचीच असते. तसे नसते तर बाकीच्या तमाम पक्ष वा माध्यमांनी बाबरी मशिद पाडली जाण्याचा किंवा गुजरातच्या दंगलीचा उहापोह करायचे काहीच कारण नव्हते. कुणा एका इशरत जहान नावाच्या मुलीच्या चकमकीत मारल्या जाण्यावरून इतका गहजब व्हायचेही कारण नव्हते. त्यात सर्वांनी नाक खुपसणे योग्य असेल व आवश्यक असेल, तर लव्ह जिहाद म्हणून काही भानगड समाजाच्या कुठल्या घटकाला अस्वस्थ करीत असताना कोणीतरी त्याची दखल घ्यायलाच हवी. भाजपाच कशाला, इतर प्रत्येक पक्षाने घ्यायला हवी. पण इतर कोणी तशी दखल घेतली नाही आणि भाजपाच्या नेतृत्वालाही दखल घ्यायची हिंमत झाली नाही.

हा सगळा विषय तारा शहादेव नावाच्या एका मुलीची दिशाभूल करून लग्न लावण्यातून समोर आला आहे. अर्थात तेवढीच त्या विषयाची व्याप्ती नाही. महिनाभर आधी उत्तरप्रदेशच्या सहारनपूर येथे मदरश्यात इंग्रजी शिकवायला जाणार्‍या हिंदू शिक्षीकेचे अपहरण, बलात्कार व नंतर धर्मांतर असल्या खळबळजनक बातम्या आल्या आहेत. तेव्हा हा आंतरधर्मिय विवाहाचा विषय नसून फ़सवून वा जबरदस्तीने विवाह करण्याचा गुन्हेगारी प्रकार आहे. त्यातून बळजोरीने धर्मांतर घडवण्याचा प्रकारही त्यात आहे. थोडक्यात ज्याला फ़ौजदारी कायद्यातील कलमे लागू होतात, अशा या घटना आहेत. कुणी प्रेमात पडून विवाह करण्याइतके हे प्रकार सरळ नाहीत. आणि जिथे कायद्याच्या तरतुदींना बाधा येते, तिथे कुठलाही विषय सार्वजनिक होऊन जात असतो. त्यात समाजाला दखल घ्यावी लागते. समाजाच्या वतीने पुढाकार घेणार्‍यांना त्यात नाक खुपसावेच लागते. म्हणूनच सर्वच पक्षांनी लव्ह जिहाद म्हणजे काय दुखणे आहे त्याचा खुप आधीच उहापोह करायला हवा होता. अर्थात आपल्या देशात सेक्युलर राजकारण असल्याने त्यात हिंदूंची तक्रार असेल, तर दखल घेणे पापमूलक असल्याचा बुद्धीमान समज आहे. त्यामुळेच अशा तक्रारींकडे काणाडोळा झाला तर तर नवल नाही. पण लव्ह जिहाद विरोधात पहिला आवाज उठवला तो ख्रिश्चनांनी. सेक्युलर पक्ष व पत्रकारांनी म्हणूनच त्याची दखल भाजपाच्या आधी घ्यायला हवी होती. तसे झाले नाही. पाच वर्षापुर्वी प्रथम केरळमध्ये हा विषय थेट हायकोर्टात जाऊन पोहोचला. तिथून त्याचा दबल्या आवाजात गाजावाजा सुरू झाला. पण उत्तरप्रदेश भाजपाने त्यावर चर्चा केली, तोपर्यंत किती वाहिन्यांनी या विषयाला प्रसिद्धी दिली होती? म्हणजे यातून भाजपावर हिंदूत्वाच्या अजेंड्याचा आरोप करायचा नसता, तर आजही लव्ह जिहाद असाच बासनात गुंडाळून ठेवला गेला असता.

लोकसभा निवडणूकीची मोहिम सुरू होण्यापुर्वी नरेंद्र मोदींनी केरळचा दौरा केला होता. त्याविषयी खुप चर्चा झाली. पण त्याच दौर्‍यात तिथल्या कॅथलिक चर्चने पुढाकार घेऊन मोदींना आमंत्रित केल्याच्या बातम्या कोणी किती दिल्या? नसतील तर कशाला देऊ नये? एका कडव्या हिंदू नेत्याला कॅथलिक चर्चचा भारतातील म्होरक्या थेट फ़ादर्सच्या परिषदेत भाषणाला का आमंत्रित करतो? त्याचे कारण नेमक्या याच लव्ह जिहादमध्ये सामावलेले आहे. केरळमध्ये राजकारण हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन अशा तीन गटात विभागले गेलेले आहे. आजवर ख्रिश्चन समाज कॉग्रेस सोबत राहिला आहे. पण गेल्या काही वर्षात तिथल्या मुस्लिमांच्या आक्रमकतेने ख्रिश्चन गडबडून गेले आहेत. त्यांच्या हुशार मुलींना प्रेमात पाडून विवाहाला प्रवृत्त करायचे आणि त्यामार्गे धर्मांतराने मुस्लिम बनवायचे; अशी एक मोहिम चालवली जाते. ही फ़ादर्सची तक्रार होती. पण त्याची कोणी राजकारणी दखलच घ्यायला तयार नाही. केरळात भाजपा बलवान नाही आणि संघ परिवाराची मुळे अजून चांगली रुजलेली नाहीत. पण तरीही संघाच्या लोकांनी ख्रिश्चनांची दखल घेतली. भारताच्या अन्य भागात मुस्लिम आक्रमकतेविषयी ज्या तक्रारी संघाकडून केल्या जातात, नेमक्या तशाच तक्रारी केरळात ख्रिश्चन समाजाकडून सुरू झाल्या आहेत. त्याला नेमके हे लव्ह जिहाद प्रकरण कारणीभूत झाले आहे. जिथे सर्वधर्मिय मुले एकत्र शिकतात, तिथे पद्धतशीर प्रयत्न करून वयात येणार्‍या बिगर मुस्लिम मुलींना जाळ्यात ओढले जाते आणि त्यामार्गे त्यांचे धर्मांतर केले जाते असा आरोप आहे. त्याला जिहाद का म्हणायचे? एक मुलगा व एक मुलगी प्रेमात पडले तर धर्माचा संबंध कुठे येतो? येत नाही हे खरे असले, तरी असे प्रेमसंबंध जुळवून आणायची मोहिम राबवली जात असेल, तर त्याला प्रेमात पडणे म्हणत नाहीत, जाळ्यात ओढणे म्हणतात. तिथेच खरी समस्या सामावलेली आहे.

पहिली गोष्ट म्हणजे असे विवाह भावनेच्या भरात होतात आणि बहुतेकदा आधी मुलीचे धर्मांतर करून मगच इस्लामी पद्धतीने निकाह विधी होतो. तसे झाले म्हणजे मुलीला त्या सापळ्यातून बाहेर पडणे शक्य नसते. कधीही तलाक देऊन हाकलून लावले, तरी तिला कोणी वाली नसतो. कारण विवाहपुर्व धर्मांतरामुळे तिला सामान्य कायद्याने न्याय मागायची सोय उरलेली नसते. त्यात गुंतलेल्या मुलींचे प्रकरण वेगळे असते. त्यात गुंतलेल्या मुली सामान्य घरातील असतात आणि त्यावर चर्चा करताना सुशिक्षित वा अभिजन वर्गातील उदाहरणे देण्यात अजिबात अर्थ नाही. कारण त्या उच्च स्तरात जगणार्‍यांच्या समस्या वेगळ्या असतात आणि वास्तवात सामान्य जीवन अनुभवणार्‍यांच्या गोष्टी वेगळ्या असतात. एका अमेरिकन महिलेच्या अशाच दाहक अनुभवाचे विदारक चित्रण करणारी आत्मकथा खुप गाजलेली आहे. त्यावर तिने लिहीलेले पुस्तक व चित्रपटही खुप गाजला आहे. ‘नॉट विदाऊट माय डॉटर’ असे त्या पुस्तक व चित्रपटाचे नाव आहे. त्यामुळेच लव्ह जिहाद विषयी आपापली नसती अक्कल पाजळणार्‍यांनी निदान हे पुस्तक वाचून बघावे. मग खरी समस्या लक्षात येईल. अर्थात त्याचीही गरज नाही. भोवताली वास्तविक जगात जगणार्‍यांचे अनुभव तिथेच जाऊन अभ्यासले, तरी आपल्या ऐकीव बुद्धीमत्तेच्या मर्यादा लक्षात येऊ शकतील. प्रेमविवाह आणि लव्ह जिहाद यांची सांगड घालण्याचा मुर्खपणा मग कोणाला सुचणार नाही. प्रत्येक घटना वा विषय संघ-हिंदूत्व यांच्याविषयीच्या पुर्वग्रहातूनच बघायच्या मुर्खपणातून लव्ह जिहाद बाबतचे अज्ञान चव्हाट्यावर येत आहे. त्यासाठी मग भाजपाच्या कुठल्या नेत्याच्या मुलीने मुस्लिमाशी विवाह केल्याचे गौप्यस्फ़ोटही केले जातात. कारण ह्या दिवट्यांना अशा मोहिमा पाश्चात्य देशातही कशा राबवल्या गेल्या त्याचे संपुर्ण अज्ञान आहे.

1 comment: