Tuesday, August 5, 2014

प्रियंका हे राहुल विरोधी बंडाचे निशाण?



   कॉग्रेस पक्षात आता पुन्हा एकदा प्रियंका गांधी यांना नेतृत्वाचा आग्रह धरला जाऊ लागला आहे. खरे तर चार विधानसभांच्या निवडणूकीत पक्षाची धुळधाण उडाली, तेव्हा गेल्या डिसेंबर महिन्यातच अशी मागणी पुढे आलेली होती. कारण चार राज्यात नुसताच कॉग्रेसचा पराभव झाला नव्हता, तर ज्यांनी सर्वच निर्णय एकहाती घेतले, त्या राहूल गांधींचा तो स्पष्ट पराभव झाला होता. ज्यांना त्या पराभवाचे प्रत्यक्ष परिणाम भोगावे लागत असतात, त्यांनी त्याबद्दल तक्रार करणे स्वाभाविक होते. पण अशा तक्रारींना त्या पक्षात स्थान नसते. गांधी घराण्याचा वारस चुकतो, असे म्हटल्यास कॉग्रेस पक्षात तुम्हाला थांबता येत नाही. म्हणूनच त्या प्रत्येक पराभवाचे खापर दुसर्‍या कुणाच्या तरी डोक्यावर फ़ोडण्यात आलेले होते. ही प्रक्रिया तशी नवी नव्हती. उत्तरप्रदेश व बिहारच्या विधानसभा निवडणूकांपासून राहुल गांधी यांनी कॉग्रेस पक्षाचा बट्ट्याबोळ उडवण्याची मोहिम हाती घेतली होती. त्याप्रमाणे त्या दोन्ही मोठ्या राज्यात असलीनसली कॉग्रेस राहुलनी मुळासकट उपटून टाकण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसले, हे कोणी नाकरू शकत नाही. राहुल पक्ष बुडवत आहेत व त्याला कडेलोटाकडे घेऊन जात आहेत, हे अनेक जाणत्या कॉग्रेस नेत्यांनाही कळत होते आणि त्यांनी वेळोवेळी आपले तसे मत व्यक्त केलेले होते. पण त्याची कोणी दखल घेतली नव्हती. खुद्द राहुलचे सल्लागार म्हणून प्रसिद्ध असलेले जयराम रमेश यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तसे स्पष्टच सांगितले होते. राहुल २०१९ सालच्या निवडणूकीसाठी पक्षाची संघटनात्मक बांधणी करीत आहेत आणि आम्ही कॉग्रेसजन २०१४ च्या लोकसभा निवडणूकीसाठी बेजार झालो आहोत, असे रमेश म्हणाले होते. त्याचा अर्थच आपल्या तरूण नेत्याला लोकसभा निवडणूक दार ठोठावते आहे, त्याचा थांगपत्ता नाही, असेच रमेश यांना म्हणायचे होते ना?

   आता त्याचे परिणाम समोर आलेले आहेत आणि राहुल पक्षाला बहूमत किंवा सत्ता मिळवून देऊ शकत नाहीत, याची अनेकांना खात्री पटली आहे. म्हणूनच त्यांना जिंकून देणारा कुणी नेता हवा आहे व त्याने पक्षाचे नेतृत्व करावे, ही कॉग्रेसजनांची अपेक्षा आहे. ती चुकीची म्हणता येणार नाही. सोळा वर्षापुर्वी याच कॉग्रेसजनांनी सीताराम केसरी या वयस्कर नेत्याला धोपटून पक्षातून हाकून लावले होते आणि त्याच्या जागी सोनिया गांधींना पक्षाच्या अध्यक्षपदी बसवले होते. त्यामागे त्यांना नेहरू गांधी घराण्याविषयी आस्था असल्याचे सांगितले गेले. पण ते अर्धसत्य होते व आहे. कुणाही कॉग्रेसजनाला नेहरू वा गांधी घराण्याविषयी काडीची आस्था आपुलकी नाही. कॉग्रेसवाला सत्तालंपट असतो. म्हणूनच त्याला सत्तेपर्यंत घेऊन जाणार्‍या नेत्याविषयी आस्था व निष्ठा असते. सोनियांमध्ये ती शक्यता होती, म्हणूनच त्यांना अध्यक्ष पदावर बसवताना केसरींना पळवून लावण्यात आलेले होते. मात्र जोपर्यंत सोनिया त्याकरीता पुढे आल्या नाहीत, तोपर्यंत प्रत्येक कॉग्रेसजन नरसिंहराव किंवा सीताराम केसरी यांच्याशी तितकीच एकनिष्ठा दाखवत होता. आजही गेली काही वर्षे आपण सोनियानिष्ठा वा राहुलनिष्ठा बघतो, ती व्यक्तीगत नसून पक्षाला यश मिळवून देण्याशी त्या निष्ठा जोडलेल्या आहेत. राहुल गांधींना त्याचा कधीच थांगपत्ता लागला नाही. म्हणूनच पक्षाला रसातळाला घेऊन जातानाही त्यांच्या विरोधात बोलायची कोणाला हिंमत झाली नव्हती. आता त्याचे परिणाम समोर आल्यावरही दोन महिने झाले, पण कोणी कसली तक्रार केलेली नव्हती. मग आता उशीरा प्रियंका गांधी यांना पक्षाचे नेतृत्व देण्य़ाच्या मागणीचा मामला अकस्मात कुठून पुढे आला? त्याचा अर्थच असा, की आजवर त्यापासून स्वत:ला अलिप्त ठेवणार्‍या प्रियंकाने राजकारणात येण्य़ाला मान्यता दिलेली असावी आणि त्यातूनच त्यांचे नाव पुढे आलेले असावे.

   अर्थात एक गोष्ट साफ़ आहे, प्रियंका राजकारणात आल्याने त्या पक्षाचा कितीसा उद्धार करू शकतील व पक्षाला याचा खरोखरच कितीसा लाभ होईल, देवजाणे. पण जितकी त्या पक्षाला प्रियंकासारख्या नव्या चेहर्‍याची गरज आहे, तितकीच प्रियंकाला अधिकृतपणे कॉग्रेस नावाचे राजकीय चिलखत अंगावर चढवण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे. कारण देशात जे सत्तांतर झाले आहे, त्यानंतर गांधी खानदानाने आजवर सत्तेच्या आडोशाने जे आर्थिक खेळ केले, त्याला संरक्षण मिळायची शक्यता कमी झाली आहे. दोन वर्षापुर्वी केजरीवाल यांनी प्रियंकाचा पति रॉबर्ट वाड्रा याच्या जमीनविषयक घोटाळ्याच्या खुलासा केला होता. त्याला हरयाणातील स्थानिक अधिकार्‍याने दुजोराही दिलेला होता. पण सत्तेच्या पाठबळावर ते प्रकरण दाबण्यात आले. आता ते प्रकरण उकरून काढल्यास कोणाचा आडोसा घ्यायचा, असा वाड्रा व प्रियंका यांच्यासमोरचा गहन प्रश्न आहे. म्हणून तर अकस्मात वाड्रा यांनी महिन्याभरापुर्वी आपल्या सहा कंपन्याच बंद करून टाकल्या. वास्तविक त्या कंपन्या कुठलाही व्यापार उद्योग करीतच नव्हत्या. नुसत्या कागदावर असलेल्या या कंपन्यांच्या माध्यमातून काळ्या पैशाचे व्यवहार चालवले जात होते. यापुढे दिल्ली सरकार त्याला आश्रय देण्याची शक्यता नसल्याने वाड्रांना त्यांचा कारभार गुंडाळावा लागला आहे. पण म्हणून आधी झालेले व्यवहार व भानगडीतून सुटणे अवघड आहे. तेच नव्या राजकीय घडामोडीचे कारण दिसते. प्रियंकाचे राजकारणात येणे सोनियांना मान्य नाही, तिथेच सगळे घोडे अडकले आहे. म्हणून आजवर प्रियंकाचे नाव पुढे आणणार्‍याला बाहेरचा रस्ता दाखवला जात होता. पण यावेळी त्यांचे नाव पुढे आणणारे जनार्दन द्विवेदी यांनी केलेले विधान मोठे सूचक व इशारेवजा आहे. त्यांनी त्या विधानातून आपण प्रियंकाला नेतृत्वात आणायच्या गटाचे असल्याचेच सांगून टाकले आहे.

   ‘नुसतेच भाषण करणे वा सुनावणे पुरे झाले. यापुढे कार्यकर्त्याकडून येणारे आवाजही ऐकावे लागतील’ असे जनार्दन द्विवेदी कोणाला व कुठल्या संदर्भात सांगत आहेत? राहुल कोणाचे ऐकत नाहीत आणि नुसते उपदेश करून निघून जातात. त्यांनी ऐकायची सवय लावावी आणि प्रियंकाला पक्ष सावरण्यासाठी आणावे, ही अशीच कॉग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे. ती नाकारता येणार नाही, ‘ऐकावीच’ लागेल, असेच द्विवेदी यांनी खुलाआम सांगून टाकलेले नाही काय? प्रियंकाला पक्षात आणायचे किंवा नाही, त्याचा निर्णय राहुल वा सोनियांनी करू नये, तर पक्षाला तो अधिकार असावा, असेच द्विवेदी यांनी म्हटलेले आहे. त्यांचा शब्द व स्वर इतका कठो्र उगाच झाला असेल काय? आई व भावाच्या संमतीखेरीज प्रियंका राजकारणात येण्यास सज्ज नसत्या, तर द्विवेदी अशी भाषा बोलू शकले असते काय? आजवर अनेकांनी प्रियंकाचे नाव पुढे आणले आहे आणि नंतर शेपूट घातले आहे. पण द्विवेदी यांनी त्याविषयी ठामपणा दाखवताना आजच्या अध्यक्ष उपाध्यक्षांना खडे बोल ऐकवले, त्यामागचे राजकारण म्हणूनच गहन स्वरूपाचे वाटते. आई वा भावाला झुगारून आता प्रियंका राजकारणात यायला सज्ज असल्याचा तो संकेत असू शकेल. कदाचित त्यांच्या विरोधात जाऊनही पक्षाची सुत्रे हाती घेण्य़ाची मानसिक तयारी प्रियंकाने केलेली आहे काय? कारण प्रियंकाला पक्षात आणून संघटनात्मक सचिव पदावर नेमायची भाषा सुद्धा झाली आहे. ती जागा सध्या नेमक्या जनार्दन द्विवेदी यांचीच आहे. म्हणजेच प्रियंकाचे नाव पुढे आणण्यामागची प्रेरणा काय आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. कॉग्रेस पक्षात सध्या जो सत्तेचा संघर्ष व घुसळण चालू आहे, त्यातला एक उतावळा गट प्रियंकाच्या नावावर मोठा जुगार खेळण्याच्या तयारीत असू शकतो. त्याला अर्थात खुद्द प्रियंकाचीच संमती असल्याशिवाय इतकी मजल मारली गेली नसती.

1 comment:

  1. आता प्रियंका नक्कीच राजकारणात येईल असे वाटते. परंतू सध्याच्या परीस्तिथित काहीही फरक पडणार नाही. मोदी सरकारने चूका केल्या (अडीच महिन्यात एकही नाही) तरच काँग्रेसला पुन्हा संधी मिळू शकते अन्यथा नाही.

    ReplyDelete