Friday, August 15, 2014

बौद्धिक कुपोषणाचे पुरोगामी बळी



माओवादी वा नक्षलवादी हे शब्द आता सरसकट वापरले जातात. चार दशकापुर्वी ही काहीतरी दूर्गम भागार्तली भानगड आहे, असा लोकांचा समज होता. १९६७ सालात नऊ राज्यात कॉग्रेसने सत्ता गमावली आणि तिथे विविध विरोधी पक्षांच्या जुळवलेल्या आघाड्यांची सरकारे आली. तेव्हा प्रथम बंगालमध्ये असेच संयुक्त विधायक दलाचे सरकार आलेले होते. त्यात मार्क्सवादी गट मोठा असला, तरी आघाडीचे समिकरण जमवण्यासाठी बंगला कॉग्रेस नामक फ़ुटीर कॉग्रेस गटाच्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून स्विकारावे लागले होते. तर मार्क्सवाद्यांचे ज्योती बसू त्यात उपमुख्यमंत्री होते. वर्षभरातच हे सरकार कोसळले आणि तिथे मध्यावधी निवडणूका घ्याव्या लागल्या होत्या. त्यामुळे राजकीय समस्या सुटली नाही आणि पुन्हा एकमेकांच्या विरोधात लढलेल्या त्याच बिगर कॉग्रेसी पक्षांना एकत्र येऊन आघाडी सरकारच बनवावे लागले होते. मात्र अशा पद्धतीने सत्ता राबवताना मार्क्सवादी पक्षात मोठी उलथापालथ होऊन गेली होती. विरोधातले राजकारण करताना इन्किलाब झिंदाबादच्या घोषणा देणार्‍या डाव्यांना सत्ता हाती आल्यावरही राज्यघटनेच्या चौकटीतच आपली लालक्रांती बंदिस्त करावी लागली होती. त्यामुळे अशा कम्युनिझमने निराश हताश झालेला एक छोटासा गट बाजूला झाला. त्याने मार्क्सवादी लेनिनवादी असे नाव धारण केले होते. त्याने आपल्याच सहकारी कम्युनिस्टांच्या राज्यसरकारला आव्हान उभे केले. सशस्त्र क्रांतीचा पुकारा करून त्यांनी नक्षलबाडी या गावात बंडाचा झेंडा उभा केला. त्यातून मग नक्षलबाडीचे हिंसक तत्व मानणार्‍यांना नक्षलवादी संबोधले जाऊ लागले. त्या क्रांतीकारी गटाचे नेतृत्व भूमिगत राहून करणार्‍या नेत्याचे नाव होते, कॉम्रेड चारू मुजूमदार. त्याच्याखेरीज तेव्हा त्या चळवळीत पुढे असलेली मोजकी नावे होती, जंगल संथाळ, कोंडापल्ली सीतारामय्या, इत्यादी.

ह्यातला मुजूमदार किरकोळ व नाजूक प्रकृतीचा नेता होता. त्याच्या मागावर कायम पोलिस असायचे. त्यामुळे भूमिगत असूनही त्याला सतत वास्तव्याच्या जागा बदलाव्या लागत होत्या. १९७० च्या दशकात केव्हातरी हा फ़रारी नक्षलवादी नेता पोलिसांच्या हाती लागला, तेव्हा अनेकांना धक्काच बसला होता. कायम आजारी व हृदयविकाराचा रोगी असून तो भूमिगत जीवन जगत होता. त्याच्यासोबत कायम आरोग्याची काळजी घेणारी शुश्रूषा सेविका व औषधांचे साहित्य असायचे. त्यामुळे अटक झाली तरी त्याला तुरूंगात डांबणे अशक्य होते. अटकेनंतर त्याला म्हणे थेट इस्पितळात दाखल करावे लागले होते. दुर्दैव कसे असते बघा. अनेक वर्षे व दिवस सतत विपरित परिस्थितीशी झुंजत परागंदा भूमिगत अवस्थेत जगलेल्या या नेत्याला इस्पितळात तेव्हाची आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र कष्टाची व धावपळीची सवत जडलेल्या त्याच्या शरीराला ती चैन मानवली नाही. अटक होऊन सुखरूप आरोग्यसेवेत ठेवलेल्या कॉम्रेड मुजूमदार यांनी अवघ्या आठवड्याभरात इहलोकीची यात्रा संपवली. कुणालाही थक्क करून सोडणारीच ही बाब आहे. ज्याची प्रकृती नाजूक होती आणि खरेच त्याच्या आरोग्याची काळजी घेतली जाणे आवश्यक होते, त्याला तीच सोसली नाही. त्याच आरोग्यसेवेच्या सुविधांनी त्यांचा बळी घेतला होता काय?

कधीकधी सुखदायी वाटणार्‍या गोष्टी कष्ट उपसणार्‍या देहाला सोसत नसतात. अपायकारक ठरू शकतात. आपल्या देशातील राजकीय अभ्यासक विचारवंत यांची काहीशी अशीच अवस्था गेल्या काही वर्षात झाली आहे. त्यांचे गैरलागू गोष्टी व चुकीच्या अनुभवाने इतके कुपोषण झालेले आहे, की वैचारिक सकस खाद्य मिळाले तर त्यांना तेच अपायकारक वाटू लागते. नाकर्ते सरकार व राज्यकर्ते यांच्या नालायकीला झाकण्यासाठी सातत्याने सेक्युलॅरिझम वा पुरोगामी पाखंड जोजवत बसायची अशी घातक सवय या लोकांना जडली आहे, की काम करणारा निर्णय घेणारा राज्यकर्ता बघून त्यांचा जीव घाबराघुबरा होऊन गेला आहे. तब्बल तीन दशकांनी एक पंतप्रधान जाहिर सभेत बुलेटप्रूफ़ कवच नाकारतो किंवा विकास कार्यात जनतेला सहभागी करून घेण्याची शुद्ध निखळ लोकशाही भूमिका मांडतो, तर या शहाण्यांना त्यात घातक हुकूमशहा दिसू लागतो. इतकी वर्षे सत्ता उबवणारे राज्यकर्ते कुठलीही योजना यशस्वीरित्या राबवू शकले नाहीत, पण मोठमोठ्या योजनांच्या थापा मारत होते. त्याबद्दल याच लोकांना किती कौतुक होते ना? नरेंद्र मोदी नावाचा पंतप्रधान असल्या भव्यदिव्य योजनांचे बुडबुडे उडवण्यापेक्षा सामान्य जनतेलाही साध्य करणे शक्य आहे, अशा काही कल्पना मांडतो, तर त्याच शहाण्यांना त्यात निरर्थकतेचा धोका दिसू लागला आहे. बौद्धिक कुपोषणाचेच हे परिणाम नाहीत काय?

पंतप्रधान म्हणून मोदींनी काय काय बोलयला हवे होते, याची मोठी यादीच असे लोक नंतर वाचत होते. सवाल इतकाच, की जगातल्या आणि देशातल्या सर्वच प्रश्नांचा व विषयांचा उहापोह पंतप्रधानाने त्या एकाच भाषणातून करायचा असतो काय? स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करताना कुठल्या मुद्दे व विषयांना पंतप्रधानाने स्पर्श करावा आणि कुठले विषय टाळावे? मुळात असे देशाला उद्देशून करायचे भाषण जनतेला स्फ़ुर्ती देणारे व आशा जागवणारे हवे. तोच त्यामागचा हेतू असतो. बौद्धिक खाद्य म्हणून शहाण्यांना चर्चांचे फ़ड गाजवायला खुराक म्हणून असे भाषण योजलेले नसते. किंबहूना सामान्य जनतेला धीर देणारे व प्रोत्साहित करणारे शब्द त्यात असावेत अशीच अपेक्षा असते. म्हणूनच आपल्या बौद्धिक भुक व भिकेचा वाडगा घेऊन त्या भाषणाच्या दारात उभे रहाणार्‍यांची निराशा अपरिहार्यच असते. विविध समस्यांनी गांजलेली सामान्य जनता व सीमेवर प्राण पणाला लावून देशाची सुरक्षा करणारा सैनिक; यांना हिंमत देण्यासाठी देशाच्या सर्वोच्च नेत्याने हे भाषण करायचा प्रघात आहे. त्यात अर्थकारण, परराष्ट्र धोरण वा तत्सम गंभीर राजकीय अजेंडा शोधणारे निव्वळ मुर्ख असतात. जत्रेतल्या जनसागराला रमवण्यासाठी पोवाडे वा तत्सम गीते सादर होतात, त्यात शास्त्रीय संगीताचे तराणे घराणे शोधणार्‍यांना दुसरे काय म्हणायचे? हे बौद्धिक कुपोषणाचे परिणाम आहेत. कुपोषिताला सकस पौष्टीक आहार मानवत नाही, त्याचेच हे लक्षण आहे. टिव्हीवरल्या निर्बुद्ध चर्चेमुळे तो चारू मुजूमदारचा मृत्यू आठवला, आणि आजच्या बौद्धिक यातनांचे निदान झाले.

No comments:

Post a Comment