Friday, August 15, 2014

१६ ऑगस्टच्या जखमेवरची खपली



आज १६ ऑगस्ट २०१४, बरोबर तीन वर्षापुर्वी आज सकाळपासून किती धमाल उडालेली होती. त्याच्या आदल्या दिवशी स्वातंत्र्यदिन म्हणून लालकिल्ल्यावरील पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे भाषण जितके गाजले नव्हते, त्याच्यापेक्षा दुसर्‍या दिवशी त्याच राजधानी दिल्लीत जनलोकपाल कायद्याची मागणी करणारे अण्णा हजारे काय करणार, याची उत्सुकता देशवासियांना होती. त्यामुळेच काल जशी पंतप्रधान मोदींच्या भाषणाची अपरात्रीपर्यत चर्चा चालू होती, तशी तीन वर्षापुर्वीची परिस्थिती नव्हती. उलट मनमोहन सिंग यांचे भाषण विसरून लोक व वाहिन्यांचे पत्रकार अण्णांच्या मागे होते. त्यामुळेच दुपार उलटताच सगळे कॅमेरे अण्णा टिमवरच रोखलेले होते. स्वातंत्र्यदिनाच्या संध्याकाळी अण्णांनी अचानक राजघाटचा रस्ता धरला आणि सगळे पत्रकार तिकडे धावले. तिथे पोहोचलेले अण्णा व त्यांचे जनलोकपाल सहकारी महात्माजींच्या समाधीसमोर मौन धारण करून तासभर तरी बसून होते. समोर एकटेच अण्णा व त्यांच्या मागे पाच पावलावर ‘मै अण्णा हू’ अशी टोपी धारण केलेले मनिष शिसोदिया बसलेले होते. अण्णांच्या हालचालीवर शिसोदियांचे बारीक लक्ष होते. बाकीची गर्दी त्यांच्याही मागे पाचदहा पावलावर पसरली होती. राजघाटावर पुर्ण शांतता होती. पण आपल्या घरात पोहोचणार्‍या चित्रासोबत वाहिन्यांच्या बातमीदारांचा गोंगाट यथेच्छ चालू होता. मग अकस्मात अण्णा तिथून उठले आणि गर्दी पांगली. पण रात्री लोक झोपले तोपर्यंत स्वातंत्र्यदिन विसरून सर्वत्र अण्णा व त्यांची टिम उद्या काय करणार, अशीच कुजबुज चालू होती.

सकाळ उजाडली तीच मुळी अण्णा जिथे मुक्कामाला होते तिथे पोलिस येऊन पोहोचल्याची बातमी घेऊन. स्वातंत्र्यदिनाच्या दुसर्‍या दिवशी रामलिला मैदानावर अण्णा टिमने जनलोकपाल कायद्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाची घोषणा केली होती आणि त्याला पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती. तरीही अण्णा तिथेच उपोषणाचा हट्ट धरून बसले होते. त्यातून उदभवणारी परिस्थिती टाळण्यासाठी पोलिसांनी अण्णांना ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला होता. अण्णांप्रमाणेच त्यांच्या टीमच्या इतर सहकार्‍यांनाही पोलिसांनी उचलले होते. त्यांच्यात कुठला संपर्क होऊ नये अशीही काळजी घेतली होती. त्या घटनेने इतकी उत्कंठा देशभर निर्माण केली, की क्षणोक्षणी सरकणार्‍या घटनाक्रमाचे विविध ठिकाणाहून अथक प्रक्षेपण सुरू झाले होते. आधी अण्णांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले, तिथून मग सुरक्षेच्या कारणास्तव तिहार तुरूंगात आणले गेले. त्यामुळे दिल्लीत एकूणच काहूर माजले. अण्णांच्या उपोषणाने वा आंदोलनाने जितके दिल्लीचे जनजीवन विस्कळीत होऊ शकले नसते, त्याच्या अनेकपटीने पोलिस व सरकारी धोरणाने दिल्लीत अराजक व अनागोंदी माजली. कारण अण्णांच्या अटकेने जनमत क्षुब्ध झाले. हजारो लोक अण्णांना पाठींबा द्यायला रस्त्यावर उतरले. ज्या तिहारमध्ये अण्णांना ठेवलेले होते, तिथे लोकांचा लोंढाच येऊ लागला. आरंभी त्यातल्या काहींना अटक करण्यात आली, त्या गर्दीला एका स्टेडीयममध्येच डांबण्यात आले. त्यातच दिवस मावळायला आला आणि अखेरीस सरकारची तारांबळ उडाली. तेव्हा अण्णांना मुक्त करायचा निर्णय घेतला गेला. पण अण्णांनी तुरूंगाच्या बाहेर पडायलाच नकार दिला. रामलिला मैदानावर जायची परवानगी नसेल आणि तिथे गेल्यावर पुन्हा अटक होणार असेल, तर तिहारलाच आणले जाणार ना? मग तिहार सोडूच कशाला, अशी अण्णांची भूमिका होती. त्यातून मग तिथल्या तुरूंगाधिकार्‍याची कोंडी झाली. आपल्या कार्यालयातच त्याला उपोषणकर्त्या अण्णांची व्यवस्था लावावी लागली होती. पुढे दुसर्‍या दिवशी सरकारी खर्चाने व पोलिसांच्या पुढाकाराने रामलिला मैदानावर अण्णांची व्यवस्था लावली गेली. तेरा दिवस मग तिथून थेट प्रक्षेपणाचा ‘पिपली लाईव्ह’ नावाचा सिनेमा लोक घरबसल्या बघत होते.

तीन वर्षे होत आली त्या घटनेला आणि आपण सर्वकाही विसरून गेलोत. आपणच कशाला त्या आंदोलनाचे म्होरके नेते अरविंद केजरीवाल, मनोज शिसोदिया, शांती भूषण, प्रशांत भूषण वा कुमार विश्वास अशा कुणालाच आज जनलोकपाल आठवतही नाही. केजरीवाल तर भ्रष्ट राजकारणाच्या चिखलात उतरून इतके माखले आहेत, की त्यांना निवडणूकीखेरीज कशाचेच स्मरण उरलेले नाही. अण्णा पदरात पडलेल्या जनलोकपाल कायद्याने समाधानी आहेत आणि त्याच कायद्याला ज्योकपाल म्हणणारे ‘केजरी’वाले दिल्लीची सत्ता पुन्हा कशी मिळवायची त्या विवंचनेत गुंग आहेत. दरम्यान तेव्हा लाईव्ह ‘रामलिला’ रंगवणारे आशुतोष यांच्यासारखे अनेकजण राजकारणात आलेत आणि अण्णांसह शांतीभूषण यांनाही दूषणे देण्यात गर्क आहेत. ती चळवळ व आंदोलन गुंडाळले गेल्यावर त्यात उडी घेऊन राजकीय पक्ष स्थापन करताना त्यात आलेले योगेंद्र यादव यांच्यासारखे स्वयंभू नेते देशाच्या विभिन्न समस्यांवर बहुमोल मतप्रदर्शन करणारे चिंतक बनलेले आहेत. तीन वर्षापुर्वी अण्णा टिम म्हणून आपण देशाच्या स्वातंत्र्यदिनालाही झाकोळून टाकले होते, याचे स्मरण त्यापैकी कोणालाच आज उरलेले नाही. अण्णांचा कल्याणशिष्य भासवणारे मनिष शिसोदिया आता तितक्याच अगत्याने केजरीवाल यांच्या मागेमागे फ़िरत असतात. एखादी घटना वा प्रसंग तेव्हा किती मोठा व ऐतिहासिक भासतो ना? पण काळाच्या ओघात असा प्रसंग कुठल्या कुठे विस्मृतीत लुप्त होऊन जातो, त्याचा हा ताजा नमूना. विवाह समारंभात वा लग्नमंडपात सर्वांचे लक्ष वधूवरांनी आपल्याकडे आकर्षित केलेले असते. पण आठवडाभरात तेच नवदांपत्य दुसर्‍या कुणा आप्तस्वकीयांच्या विवाह समारंभाला हजेरी लावते, तेव्हा त्यांच्याकडे कोणी ढुंकून बघत नसते, तसाच हा प्रकार नाही काय? अवघ्या तीन वर्षापुर्वी तिरंगा घेऊन जागोजागी फ़डकवणारे अण्णा टिमचे तेच म्होरके नेते आज कुठे आहेत? ‘मै हू अण्णा’ म्हणून मिरवणार्‍या त्या टोप्या कुठे आहेत?

आज १६ ऑगस्ट आहे आणि तीन वर्षापुर्वीच्या त्या सनसनाटी वा ऐतिहासिक घटनाक्रमाचे साधे स्मरणही कोणाला होऊ नये, ही जनलोकपाल आंदोलनाची शोकांतिका म्हणावी काय? कारण आता त्यातले म्होरके व सहकारी अनेक गटात विखुरले आहेत. त्यात उडी घेताना आपल्या भवितव्यालाही लाथा मारणारे शेकडो तरूण कुठल्या कुठे गायब होऊन गेलेत? राजकीय वा सामाजिक चळवळ आणि आंदोलन यांच्यामागे वैचारिक वा संघटनात्मक पाया नसेल, तर त्यातून एक तात्कालीन उद्रेक निर्माण होतो, पण साध्य काहीच होत नाही. जखमेच्या खपलीसारख्या त्याच्या आठवणी तेवढ्या शिल्लक उरतात. एकच वर्षापुर्वी नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या पाक सीमेवर लालकिल्ला देखावा म्हणून उभा करून भाषण केले होते आणि आता खर्‍या लालकिल्ल्यावरून पंतप्रधान म्हणून भाषण केले. गतवर्षी देखावा उभा केल्यामुळे मोदींची यथेच्छ टिंगल झाली होती. आज ती टिंगल त्याच टवाळखोरांना आठवत नाही. तीन वर्षापुर्वी अण्णा टिमचे अवास्तव कौतुक करणार्‍यांना त्यातले काही आठवत नाही. म्हणून तर काळाला सर्वात निस्पृह न्यायाधीश म्हणतात.

No comments:

Post a Comment