Saturday, September 13, 2014

कुमारस्वामींचे ‘ब्रह्म सत्य जगन मिथ्या’



कोणीतरी फ़ेसबुकवर ‘मी मराठी’ कार्यक्रमात कुमार केतकर यांच्या सहभागाविषयी लिहीले होते. कुमार माझा आवडता पत्रकार असल्याने विधानसभा निवडणूकीबद्दल कुमारच्या मताविषयी मला स्वारस्य होते. आताच तो कार्यक्रम पुन्हा लागला असताना मुद्दाम बघितला. त्यात कुमारनी योग्य विश्लेषण केलेले दोन मुद्दे आहेत. पहिला म्हणजे मोदी किंवा भाजपाची लाट वगैरे काहीच नाही, तर राज्यात कॉग्रेस विरोधी लाट नक्कीच आहे. दुसरा मुद्दा राष्ट्रवादी व कॉग्रेसवाले मुळात लढायलाच सज्ज नाहीत. सत्ताधार्‍यांनी आपला पराभव मतदानापुर्वीच स्विकारला आहे. म्हणूनच राज्यात सत्तांतर अपरिहार्य आहे. कुमारचे विश्लेषण नेमके आणि वास्तवाशी निगडित असेच आहे. पण हे वास्तव कुमार स्वत:ला किती पटवू शकलेत, त्याचे उत्तर मात्र नकारार्थी आहे. वास्तव दिसते पण ते मान्य करणे किती अवघड असते, त्याचा हा अप्रतिम नमूना आहे. ही कुठली मानसिकता असते? त्याचेही उत्तर खुद्द कुमारनीच १५ वर्षापुर्वी दिलेले होते. राज्यात सत्तांतर होऊन छगन भुजबळ उपमुख्यमंत्री व गृहमंत्री झाले होते आणि त्यांनी एका प्रकरणात बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेच्या पोलिसी जुन्या मागणीवर सही ठोकली होती. त्यातून अजब पेचप्रसंग उभा ठाकला होता. पोलिस ठाकरेंना अटक कसे करणार ही समस्या होती. कारण त्या नुसत्या कल्पनेनेच शिवसैनिक गुरगुरू लागले होते. त्यावेळी कुमार महाराष्ट्र टाईम्सचे संपादक होते. भुजबळांपेक्षा केतकरांना झालेला आनंद तेव्हा त्यांच्या संपादकीय लिखाणातून लपून राहू शकला नव्हता. पण त्याच कुमारनी तेव्हाच त्याच विषयावर ‘मिड-डे’ या इंग्रजी दैनिकात लिहीलेला लेख अतिशय सुंदर विश्लेषण होते. मी मराठी वाहिनीवरचे त्यांचे आजचे राजकीय मतप्रदर्शन बघितल्यावर त्या ‘मिड-डे’मधील लेखात त्यांनीच रंगवलेला शिवसैनिक मला कुमारमध्येच दिसला.

त्या इंग्रजी लेखात कुमारने लिहीले होते, ‘अशा अटकेने फ़ारसे काही होणार नाही, जामीनही दिला जाईल. खटला इतका लांबेल, की त्याचा कधीही निकाल सुद्धा लागण्याची शक्यता नाही. म्हणूनच अटकेविषयी खुद्द शिवसेनाप्रमुख थोडेही विचलीत असणार नाहीत. पण आपल्या साहेबांच्या अटकेची नुसती कल्पनाही शिवसैनिकाला सहन होणार नाही. समस्या ठाकरे यांच्यासाठी नसून त्यांच्या अनुयायांसाठी आहे.’ इतके सुंदर त्या घटनाक्रमाचे विश्लेषण तेव्हा कोणीच केले नव्हते. आपल्याला आवडणार्‍या वा आपले श्रद्धास्थान असलेल्या गोष्टीला धक्का लागलेला भक्ताला कधीच सहन होत नाही. मध्यंतरी चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्मा याने गणपतीविषयक काही अपमानास्पद लिहीले होते. त्याबद्दल त्या दैवताने कुठली तक्रार केली नाही. पण भडकला होता तो गणेशभक्त. तशीच काहीशी शिवसेनाप्रमुखांची गोष्ट होती. त्यांच्यापेक्षा त्यांचा भक्त शिवसैनिकच खवळला होता. पण मग आज कॉग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी पराभूत होणार आणि त्याचे कारण ते लढायला सुद्धा तयार नाहीत, यासाठी शीरा ताणून कंठशोष करणारे कुमार केतकर तरी वेगळे कुठे असतात? ज्यांना ही निवडणूक गमवायची आहे किंवा ज्यांच्या हातून सत्ता जाणार आहे, ते कॉग्रेसजन वा पवार समर्थक जितके बेचैन नाहीत, त्याच्या अनेकपटीने कुमारच रडकुंडीला आलेले दिसत नाहीत काय? त्या वाहिनीवरल्या चर्चेत केतकरांचा आक्रोश त्यापेक्षा वेगळा होता काय? उद्या होऊ घातलेल्या निवडणुकात भाजपा-सेना नक्कीच विजयी होणार व सत्तांतर होणार याची ग्वाही देतानाच केतकरांनी महाराष्ट्र मोठेच काही गमावणार असल्याचा फ़ोडलेला टाहो, कुणा खर्‍या सत्ताधार्‍यापेक्षाही अजब वाटेल असा आहे. पृथ्वीराज चव्हाण किंवा अजितदादा जितके रडकुंडीला आलेले दिसत नाहीत, तितके केतकर बोटे कडकडा मोडत आहेत.

त्याची मिमांसा म्हणूनच मोलाची आहे. महायुती सत्तेवर येणार याची ग्वाही देतानाही तो महाराष्ट्रासाठी शापच असेल; असा आशय केतकरांच्या बोलण्यातून ओसंडून वहाताना जाणवतो. त्यांना कॉग्रेसने सत्ता गमावण्याचे दु:ख नाही, त्यापेक्षा अधिक युती सत्तेवर येण्याचे अस्वस्थ करून सोडले आहे. आजही कुठला कॉग्रेस नेता वा प्रवक्ता जितक्या धारदारपणे युतीवर हल्ला करणार नाही, तितका भेदक हल्ला केतकर युतीवर करताना दिसतील. तेव्हा त्यांच्यातला विचारवंत, पत्रकार, अभ्यासक, जिज्ञासू कुठल्या कुठे अंतर्धान पावतो आणि शिवसेनाप्रमुखांच्या निष्ठावान शिवसैनिका इतकाच निष्ठावान नेहरूनिष्ठ सरसावून अंगावर येतो. आपण पत्रकार, अभ्यासक म्हणून चर्चेत सहभागी झालोय, याचेही त्यांना भान रहात नाही. सहाजिकच तोंडून निघणारे युक्तीवाद व शब्द भरकटत गेल्यास नवल नसते. कॉग्रेस कितीही नाकर्ती असेल, सतालोभी असेल, पण तिच्याकडे धोरणे आहेत. भले ती राबवण्यात कॉग्रेस नालायक ठरली असेल आणि भ्रष्टाचाराचे पहाड उभे राहिले असतील. पण निदान धोरणे तर आहेत. युती वा भाजपापाशी त्यातले काहीच नाही. युतीच्या सत्ताकाळात पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या असल्या तरी तो अपवाद होता. त्याला रोडमॅप म्हणता येत नाही. अपवाद म्हणजे काय? तर ५५ उड्डाणपूल, मुंबई पुणे जलदमार्ग, कृष्णाखोरे विकास हे अपवाद. जे आपण डोळ्यांनी बघू शकतो असे वास्तव. आणि आघाडी सरकारने पंधरा वर्षात हजारो कोटी ओतून बांधलेली धरणे बंधारे आपल्या डोळ्यांना दिसत नाही, शेतकर्‍यांना सिंचन देऊ शकत नाहीत. ती मायावी विकासाची धोरणे. किती चमत्कारीक युक्तीवाद आहे ना? ज्यांच्यापाशी दूरगामी धोरण नाही, त्यांनी पायाभूत सुविधांचा राज्यात पाया घातला आणि ज्यांनी सहा दशकांची प्रदिर्घ सत्ता उपभोगताना पायाभूत सुविधा उभारणे दूर; सगळाच बट्ट्याबोळ करून टाकला होता, त्यांचे कल्पनेतले धोरण महत्वाचे. थोडक्यात धोरण असायला हवे, त्याची अंमलबजावणी झाली नाही तरी बेहत्तर. ताटात अन्नाचा कण नसला तरी चालेल. पण ताट असायला हवे, पंगत मांडलेली असायला हवी. पण कोणी पंगत, ताटाशिवाय हातातच वडापाव-भेळ खाऊ घालत असेल, तर त्याच्यापासून उपाशी माणसाला जीवाचा धोका असतो. यापेक्षा केतकरांचा युक्तीवाद बुद्धीवाद किंचित तरी वेगळा आहे काय?

एप्रिल महिन्यात राहुल गांधी यांची एकमेव मुलाखत ‘टाईम्स नाऊ’ वाहिनीवर झालेली होती आणि त्या संबंधाने इतर वाहिन्यांनी चर्चा केलेल्या होत्या. तशीच एक चर्चा ‘एबीपी माझा’वर झालेली होती. त्यात सगळेच राहुल कुठे चुकला त्यावर बोट ठेवत होते आणि कुमार मात्र चुकलेला राहुल कसा योग्यच आहे; त्याचा युक्तीवाद करत होते. अखेरीस भाजपाचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी टोमणा मारला, की राहुलने मुलाखती देण्यापुर्वी केतकरांची शिकवणी घेतली पाहिजे होती. संपादक राजू खांडेकरांनीही तेव्हा भातखळकरांना दुजोरा दिला होता. केतकरांची नेहरू-गांधी खानदानावरील श्रद्धा कमालीची अढळ आहे. ती इतकी अटळ आहे, की उद्या चुकून सोनिया किंवा राहुल यांनी केतकरांच्या उपस्थितीत आपली एखादी चुक कबुल केलीच; तर तिथल्या तिथे कुमार त्यांचे थोबाड फ़ोडून काढायला मागेपुढे बघणार नाहीत. कारण त्यांच्या मते त्या खानदानातील कोणी कधी कुठलीच चुक करू शकत नाहीत. कदाचित तोच धोका असल्याने सोनिया राहुल आपल्या या निष्ठावंताला जवळपास फ़िरकू देत नसावेत. असो. शाहू फ़ुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातला हा नवा सेक्युलर जानव्यातला पुरो(गामी)हितवाद आहे. ज्यात निष्क्रीय धोरणाचे ब्रह्म, हे सत्य असते आणि वास्तव जगातली कार्यवाही, मायावी म्हणून मिथ्या असते.

‘मी मराठी’ वाहिनीवर कुमार केतकरांनी मांडलेली ही भूमिका आजच्या प्रलयग्रस्त काश्मिरशी ताडून बघता येईल. आज तिथे फ़सलेल्या व मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या लाखो काश्मिरी जनतेला शेवटी तीच भारतीय सेना आणि जवान वाचवायला पुढे सरसावली आहेत. कालपर्यंत ज्यांनी त्याच सेनेवर अन्याय अत्याचाराचे आरोप चालविले होते, त्यातला कोणी आझादीवाला काश्मिरींना वाचवायला पुढे गेलेला नाही. आझाद काश्मिरची भाषा बोलणार्‍यांकडे काश्मिरच्या भवितव्याचे भव्यदिव्य धोरण तयारच आहे. पण तिथे बंदोबस्ताला गेलेल्या भारतीय सेनेपाशी कुठलेही राजकीय आर्थिक विकासाचे धोरण नाही. म्हणूनच तेव्हा जे कोणी काश्मिरी सेनेवर आरोप करीत दगड मारीत होते, त्यांचे वागणे (कुमार तर्कानुसार) योग्यच होते. आजही असे काही दिवटे आहेत जे मदतीला गेलेल्यांवर धोंडे मारतच आहेत. पण जीवावरच्या संकटात सापडल्यावर त्याच काश्मिरींना आझाद काश्मिरचे धोरण वाचवू शकलेले नाही. तर ज्यांच्यापाशी धोरणच नाही, त्या सेनेच्या कृतीशीलतेने जगवले आहे. समजा भारतीय सेनेने तिकडे जायचेच नाही म्हणून ठरवले असते आणि तिथली काश्मिरी जनता हुर्रीयत वा आझादीच्या धोरणावर अवलंबून राहिली असती, तर त्यातले कितीजण आज जिवंत दिसले असते? काश्मिरी जनता आणि कॉग्रेसी नाकर्तेपणाने जीव मुठीत धरून जगणारी भारतीय जनता मोदी वा बिगर कॉग्रेसी पर्यायी पक्षांकडे नेमकी त्या गांजलेल्या फ़सलेल्या काश्मिरी जनतेसारखीच आशेने बघते आहे. तिचा जीव धोक्यात असून आज तिला धोरणाची गरज नाही तर नुसते सुखरूप जगायची अपेक्षा आहे. म्हणून तिथे सेनेचे जवान आल्यावर त्यांची मदत घेऊन सुखरूप जागी लोक घरदार सोडून जात आहेत आणि इथेही महाराष्ट्रात लोकांना कॉग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या तावडीतून सुटायची घाई झालेली आहे. कुमार केतकर म्हणतात, त्या धोरणापेक्षा अराजक सुद्धा परवडले अशी लोकांची मानसिकता झालेली आहे. काश्मिरला निसर्गाने पाण्यात बुडवले, इथे सत्ताधारी आघाडीने कर्जात बुडवले आहे.

3 comments:

  1. Evdhe chhan vishleshan.,..aani koniha vachun reply sudhha kela nahi ?? Kay ha Dalbhadripana??? Bhau Khup Chhan Lekh..Dolas pane aani tatashta pane lihine mhanje kay te vachayla milale...!!!

    ReplyDelete