Wednesday, September 24, 2014

भाजपातले आडवाणी आणि पाडवाणी

लोकसभा निवडणूकीपुर्वी याच सदरातून सातत्याने मोदी विरोधकांना एक सल्ला आम्ही देत होतो. मोदींना पराभूत करायचे असेल तर हरकत नाही. पण निदान ज्याला पराभूत करायची इतकी हौस आहे, त्याला नेमका समजून तरी घ्या. पण कोणाला तशी गरज वाटली नाही आणि त्यांनी आपला पराभव ओढवून घेतला. आज महाराष्ट्र भाजपाच्या नेत्यांना मोदीलाटेची झिंग चढली आहे आणि पंतप्रधानांची नुसती लोकप्रियताच आपल्याला राज्यात थेट सत्तेपर्यंत घेऊन जाईल, अशा नशेने त्यांना पछाडले आहे, तेव्हा त्याच मोदी अनुयायांना जरा मोदी समजून घ्या, म्हणायची वेळ आली आहे. मोदीनिती जितकी कठोर आहे, तितकीच संयमी आहे. नुसत्याच उतावळेपणाला मोदीनितीमध्ये स्थान नाही आणि राज्यातील भाजपाचे नेतृत्व नेमके त्याच्याच आहारी गेले आहे. मोदींनी दोन वर्षे जे प्रयास केले, त्यात त्यांनी आधीच्या पंधरा वर्षात पक्षाने व नेतृत्वाने ज्या चुका केल्या, त्याची पुनरावृत्ती होऊ दिली नाही. पण इथले भाजपा नेते मात्र एक एक जुन्या चुका शोधून, त्यांचेच अनुकरण हट्टाने करताना दिसतात. राज्यातील शिवसेना भाजपा युती पंचवीस वर्षे जुनी आहे. त्यापेक्षा ओडिशामधली बीजेडी भाजपा युती अल्पवयीन होती. १९९८ सालात तेव्हाच्या जनता पक्षातला बिजू पटनाईक समर्थक वर्ग होता, त्याने बिजूपुत्र नविन यांना हाताशी धरून नव्या पक्षाची स्थापना केली होती. तोपर्यंत जनता दलात आलेल्या या गटाने जुन्या धोरणाला तिलांजली देऊन थेट भाजपाशी हातमिळवणी केली आणि नव्याने आपला संसार उभा केला. १९८९ सालात सेना भाजपा युती प्रथमच झाली, तशीच नऊ वर्षानंतरच्या ओडीशामधील त्या युतीची सुरूवात होती. बीजेडी खरे तर भाजपाच्या मदतीनेच राज्यात नव्याने उभा राहणारा पक्ष होता. अर्थात तिथे भाजपा पुर्वापार सुदृढ पक्ष नव्हता. पण परस्परांच्या सहाय्याने दोघेही मोठे यश मिळवू शकले. पुढे काय झाले?

१९९८ पासून २००४ पर्यंत सर्व निवडणूका दोघांनी एकत्र लढवल्या आणि त्यात चांगले यश मिळवले होते. तेव्हा नविन पटनाईक राजकारणात नवे होते आणि मुख्यमंत्री त्यांनाच करण्यात आले होते. पण आपल्याच मेहरबानीवर पटनाईक उभे राहिले आणि आपण कधीही त्यांना संपवू शकतो, अशा भ्रमात तिथले भाजपानेते मस्तीतच राहिले. वाजपेयी व तात्कालीन परिस्थितीचा लाभ उठवत नविन पटनाईक यांनी आपले बस्तान बसवण्यावर लक्ष केंद्रित केले होते. त्या नव्या पक्षाने आपली संघटना वाढवली, तितके भाजपाने तिथे काम उभे केले नाही. तर वाजपेयी-अडवाणी यांच्याच पुण्याईवर तिथला पक्ष अवलंबून राहिला. पुढे एकत्र नांदण्यातल्या समस्या उभ्या राहू लागल्या, तसतसे खटके उडू लागले. त्यातून युती तुटण्यापर्यंत मजल गेली. विधानसभेत पटनाईक यांना भाजपाच्या पाठींब्यावर सत्ता टिकवणे भाग होते. पण एका क्षणी त्यांनी धोका पत्करला आणि भाजपाला खुले आव्हान दिले. भाजपाने पाठींबा काढून घेतल्यावर थोडा काळ कॉग्रेसने मुद्दाम नविन सरकार कोसळू दिले नाही. पण लौकरच विधानसभा निवडणूका होऊन पटनाईक यांनी स्वबळावर संपुर्ण बहूमत प्राप्त केले. भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने स्वबळाचा उतावळेपणा केलाच नसता, तर ओडीशामधली झाकली मूठ कायम राहिली असती. पटनाईक भाजपाच्या पाठींब्यावर अवलंबून राहिले असते आणि भाजपाला आपले बळ वाढवण्य़ाला अधिक अवधीही मिळाला असता. पण तो उतावळेपणा नडला आणि अजून दहा वर्षे व चार निवडणूकानंतर भाजपाला स्वबळावर तिथे कुठलेही लक्षणिय यश संपादन करता आलेले नाही. अगदी ताज्या मोदी लाटेचाही लाभ उठवून ओडीशामध्ये भाजपा चांगले यश मिळवू शकलेला नाही. मुद्दा इतकाच, की आठदहा वर्षापुर्वी तिथल्या नेत्यांनी आगावूपणा केला नसता, तर तिथे आजही भाजपा प्रभावशाली पक्षच दिसला असता.

ओडीशामध्ये जो प्रकार झाला, तसे प्रसंग महाराष्ट्रात अनेकदा आलेले आहेत. पण हिंदूत्व किंवा अन्य कारणांनी इतकी युती नेहमी वादग्रस्त होऊनही टिकली होती. ती किती दुबळी होती, त्याचे प्रत्यंतर मागल्या दोनचार निवडणूकीत आलेच होते. पण मोदीलाट देशभर उसळत असतानाही इथल्या भाजपा नेत्यांनी चार लहानसहान पक्षांना सोबत घेतले होते. कारण महाराष्ट्रात नुसती मोदीलाट किंवा शिवसेनाही पुरेशी नाही, याविषयी स्थानिक भाजपाला खात्री होती. मग आता अकस्मात आलेला स्वबळाचा आत्मविश्वास कितीसा खरा मानायचा? त्यालाच उतावळेपणा म्हणतात. सापशिडीच्या खेळात जसा शिडीवरून थेट उंची गाठण्याचा उतावळेपणा सापाच्या तोंडी देऊन तळाला घेऊन जातो, त्यापेक्षा असला जुगार वेगळा नसतो. ओडीशामध्ये तोच जुगार नडला होता. गुजरातच्या यशाची कहाणी तशा उतावळेपणाची नाही. जनता दलाशी आघाडी करून, तिथे जम बसवताना भाजपाने जनता दलाला बाहेरून पाठींबा दिला. पण सत्तेचा हव्यास केला नव्हता. महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांनी सत्तेचा हव्यास सातत्याने दाखवताना मिळालेल्या यशाचा पाया विस्तारण्याचा प्रयास केला नाही, की मेहनत घेतली नाही. अन्य पक्षातून नेते आणून तेव्हापुरत्या निवडणूका व जागा जिंकण्याचा खेळ अनेकदा झाला आणि त्यामुळेच भाजपाला इथे दिर्घकाळ उलटूनही स्वबळावर उभे रहाणे लढणे शक्य झालेले नाही. सत्तेच्या वा जिंकण्याच्या जागांवर डोळा ठेवण्याच्या धुर्तपणाने, इथे हंगामी यश अनेकदा भाजपाच्या पदरात पडलेले असेल. पण पक्षाचा व्यापक पाया घातला गेलेला नाही. म्हणूनच सेनेला अनेक प्रसंगी हुलकावणी देऊनही स्वबळावर लढायची मजल मारता आलेली नाही. अडवणूक करणारे आडवाणी व मित्राला पाडणारे पाडवाणी राज्य भाजपात भरपूर आहेत. पण स्वबळावर पक्षाला मोठ्या यशाच्या शिखरावर घेऊन जाणारे मोदी कुठे आहेत?

लोकसभेतील अपुर्व यशानंतर राष्ट्रवादी वा कॉग्रेसमधून प्रचंड प्रमाणात नेत्यांची भरती भाजपाने आपल्या पक्षात करून घेतली आहे. आजवर जिथे भाजपा वा शिवसेनेला आपला प्रभाव निवडणूकीत पाडता आला नाही, तिथल्याच लोकांची अशी भरती व्हावी, हा योगायोग मानता येणार नाही. आपल्या किंवा सेनेच्या आवाक्याबाहेरील जागी अशी भरती करून त्या जागांवर जिंकू शकणारे उमेदवार जमवण्याने तात्पुरते यश कदाचित मिळूही शकेल. पण त्यातले कितीजण पक्ष म्हणून दिर्घकाळ भाजपासोबत टिकतील? जनता पक्षातून, कॉग्रेसमधून, राष्ट्रवादीत पोहोचलेले आणि आता भाजपात आलेले बबनराव पा़चपुते; याला भाजपा वाढलेले बळ समजणार असेल, तर त्याला मोदी अजून उमगला नाही असेच मानावे लागेल. उत्तरप्रदेश बिहारमध्ये असे घाऊक पक्षांतर करून मोदींनी यश मिळवलेले नाही, तर पुर्वापार शिथील पडलेल्या पक्षाच्या कार्यकर्ता व यंत्रणेला वर्षभर आधी कामाला जुंपून यशाचे शिखर गाठले आहे. आजची राज्य भाजपा नेत्यांची भाषा मोदींची नव्हेतर आडवाणींची वाटते. तेव्हा हरयाणातील चौटाला यांची मैत्री मोडून स्वबळावर लढताना आडवाणींनी मतदाराला आवाहन केले होते, की प्रादेशिक पक्ष पुरे झाले. भाजपाला मते द्या, नाही दुसर्‍या कुणाला, पण प्रादेशिक लोकदलाला नको. त्यामुळे चौटाला व बन्सीलाल असे नेते दूर फ़ेकले गेले आणि भाजपाऐवजी कॉग्रेसला पुन्हा डोके वर काढता आले. लोकसभेच्या वेळी तिसरा प्रादेशिक पक्ष म्हणून भजनलाल यांच्या सुपुत्राला भाजपाला सोबत घ्यावे लागले होते. घटना अन्य राज्यातल्या असतील. पण त्यापासून भाजपाने इथेही धडा शिकायला हरकत नाही. कधीतरी स्वबळावर उभे रहायचेच असते. मात्र आपल्या पायात वा पंखात तितके बळ येईपर्यंत असलेला आधार लाथाडायचा नसतो. अन्यथा कपाळमोक्ष अपरिहार्य होऊन जातो. तीन आठवड्यात कुठल्या इतिहासाची पुनरावृत्ती भाजपाला करायची, ते येत्या दोनतीन दिवसात निश्चीत होईल.

1 comment:

  1. उत्तम कानउघाडणी भाऊ, भाजपच्या लक्षात या गोष्टी येतील तो सुदिन !

    ReplyDelete