Monday, September 22, 2014

भाजपासमोर कुठला पर्याय आहे?रविवारी ठरल्याप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रंगशारदा येथे आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांची सभा घेऊन आपला निर्णय जाहिर केला. शुक्रवारी भाजपा नेत्यांना सेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई व युवा नेते आदित्य ठाकरे जाऊन भेटले होते आणि दोघांनी महायुती टिकली पाहिजे असा निर्वाळा दिला होता. त्यानंतरही बोलताना उद्धव यांनी आपल्या तमाम नेत्यांना लगाम लावला होता आणि जाहिरपणे जागावाटपाशी संबंधित बोलण्यास प्रतिबंध घातला होता. तेव्हाच रविवारी त्यावर आपला पवित्रा जाहिर करण्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी कार्यकर्त्यांची बंदिस्त जागी सभा घेतली आणि त्यांच्यासह जगासमोर जागावाटपाचा आपला प्रस्ताव मांडून टाकला. त्यानुसार भाजपाने आजवर त्याच्याकडे असलेल्या ११९ जागा लढवाव्यात आणि सेनेकडे असलेल्या जागांपैकी १८ जागा महायुतीमध्ये आलेल्या मित्रांना देऊन शिवसेना १५१ जागा लढवील, असा फ़ॉर्म्युला घोषित केला. भाजपा नेत्यांशी कुठलीही बातचित केल्याशिवाय ठाकरे यांनी आपला निर्णय घोषित केला, म्हणजे आपल्या विश्वासू नेते व उमेदवारांशी त्यांनी त्याबद्दल खातरजमा करून घेतलेली असणार. त्याचा अर्थ कालपर्यंत सेनेकडे असलेल्या १६९ जागांपैकी नव्या मित्र पक्षांना हव्या असलेल्या जागांविषयी सुद्धा उद्धव यांनी चाचपणी केलेली असणारच. थोडक्यात भाजपाच्या जुन्या ११९ जागा सोडुन उर्वरित जागांचे वाटप ठाकरे यांनी उरकून टाकले आहे. त्याचा गर्भित अर्थ असा, की नव्या मित्र पक्षांना सोडलेल्या जागा वगळून उर्वरीत १५१ जागी सेनेचे उमेदवार आपापले अर्ज दाखल करायला मुखत्यार झाले आहेत. ते उद्यापासूनच अर्ज भरायला सुरूवातही करतील. भाजपाला वाटप मान्य असायचा प्रश्नच शिल्लक ठेवलेला नाही. त्याला भाजपाने मान्यता दिली नाही तर उरलेल्या ११९ जागाही खुल्या होतील आणि त्याजागी मित्रांना हव्या असलेल्या आणखी जागा सेना देऊ शकेल व बाकीच्या लढवू शकेल.

यात एकच तिढा आहे, की उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेल्या वाटपानंतर नव्या मित्रांनी १८ जागा मान्य केल्यात काय? अठरा जागांवर मित्रपक्ष खुश आहेत, पण युती टिकवा, असे दोन दिवसांपुर्वी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी जाहिरपणे म्हटलेले होते. त्यांची मागणी ठाकरे यांनी पुर्ण केलेली दिसते. याचाच अर्थ त्यांना हव्या असलेल्या १८ जागा सेनेने आधीच समजून घेतलेल्या असाव्यात आणि तिथून आपले उमेदवार काढून घेण्याचा पवित्रा घेतलेला असावा. त्यानुसारच अशी घोषणा उद्धव यांनी केलेली असावी. तसे नसेल, तर या मित्रपक्षांना आता खुलेपणाने स्विकार वा नकार द्यावा लागणार आहे. त्यापैकी रामदास आठवले यांना भाजपाने आपल्या कोट्यातून राज्यसभेवर घेतले आहे. म्हणूनच त्यांना शिवसेनेच्या सोबत जाऊन भाजपाची साथ सोडता येणार नाही. त्यांनी तसे करणेही नैतिकतेला धरून होणार नाही. सहाजिकच बाकीचे तीन मित्र पक्ष सेनेसोबत जाऊ शकतात. याचे कारण शेतकरी संघटनेचे प्राबल्य असलेल्या भागात भाजपाला स्थान कमी आणि सेनेचा थोडा तरी प्रभाव आहे, शिवाय दुसरा मित्रपक्ष जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष. त्याचे प्रमुख महादेव जानकर यांनी आपल्या लोकसभा अपयशाचे खापर अप्रत्यक्षरित्या मोदी व भाजपा यांच्यावरच फ़ोडलेले आहे. बारामतीत प्रचाराला येऊ नका अशी विनंती शरद पवारांनीच केल्याने तिकडे सभेसाठी आलो नाही, असे मोदींनीच आपल्याला सांगितल्याचे जानकर यांनी एका वाहिनीच्या गप्पांमध्ये साफ़ केले. त्यामुळे जानकर भाजपासोबत जाण्यापेक्षा सेनेकडे जातील. राहिला मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष. त्याची नाळ कार्यशैलीनेच सेनेशी जोडलेली आहे. ही स्थिती बघितली, तर युतीत आपल्या ११९ जागांचा प्रस्ताव भाजपाने स्विकारला नाही, तर रिपाईसह भाजपा वेगळा होईल आणि तीन छोटे पक्ष सेनेसोबत जातील. कदाचित तशी आधीच यशस्वी बोलणी उद्धव यांनी उरकलेलीही असतील.

पण ज्या प्रकारे परिस्थितीने वळण घेतले आहे, त्या आगीत तेल ओतण्याचे डावपेच कॉग्रेस पक्षही अत्यंत धुर्तपणे खेळत आहे. एकूण युतीतली फ़ुट ही मराठी विरुद्ध गुजराती अशी भासू लागते आहे. भाजपाचे पक्षाध्यक्ष अमित शहा गुजराती आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तर सातत्याने गुजराथी अस्मितेचीच भाषा बोलत आलेले आहेत. त्याला महाराष्ट्रात तसे वळण देण्याचा डाव कॉग्रेस खेळत असेल, तर तो पुन्हा भाजपाला महागात पडू शकतो. राज्यातील कॉग्रेसच्या नेत्यांनी मुंबई परिसरात शक्यतो मराठी उमेदवारांनाच प्राधान्य द्यावे, अशी मागणी हायकमांडकडे केल्याची एक बातमी महत्वाची ठरावी. तसे कोणी या बातमी वा माहितीला महत्व दिलेले नाही. पण त्यातून एक संदेश अप्रत्यक्षरित्या धाडला जात आहे, शिवसेना म्हणजे मुंबईतील मराठी माणसाची अस्मिता आणि तिलाच खच्ची करून भाजपाचे गुजराथी नेतृत्व महाराष्ट्राच्या अस्मितेलाच पायदळी तुडवते आहे, असा आभास कॉग्रेसला उभा करायचा आहे. ज्याप्रकारे भाजपाने मागल्या आठवड्यात मोदींचा अवमान सहन केला जाणार नाही अशी भाषा वापरली होती, तिला असा शह दिला जातो आहे. मोदींचा सन्मान आणि मराठी माणसाचा स्वाभिमान जपणार्‍या शिवसेनला झिडकारणे, अशी भाजपाची निती भासवण्याचा प्रयास कितीसा लाभदायक होऊ शकतो? एकदा युती तुटली, मग शिवसेनेचे प्रचारक अत्यंत आगलाव्या भाषेमध्ये त्याचीच पुनरावृत्ती करतील आणि भाजपाला ती महागात पडू शकते. आधीच एका बाजूला कर्नाटकात भाजपाचे नेतृत्व मराठी नागरिकांच्या विरोधात आहे आणि त्यातच मुंबई परिसरात मोदी हा चेहरा बनवला गेल्यास, भाजपाला त्रासदायक ठरू शकेल. अर्थात त्याला भाजपाचे दिल्लीतील नेते वा शहा-मोदी जबाबदार नाहीत, इतके राज्यातील उथळ नेते कारणीभूत होत आहेत. त्यांनी आपल्या उतावळेपणातून शिवसेनेच्या हाती कोलित देण्याची घोडचुक केली आहे.

एक गोष्ट कुठलाही राजकीय निरिक्षक वा पत्रकार साफ़ मान्य करील. बाळासाहेबांची उंची उद्धव ठाकरे यांनी गाठलेली नाही. त्यामुळेच साहेबांची जितकी हुकूमत युतीमध्ये चालत होती, तितके उद्धव यांच्या शब्दाला वजन असायची शक्यता नव्हती. अगदी निष्ठावान शिवसैनिकही ते मान्य करतील. म्हणूनच लोकसभेचे निकाल लागेपर्यंत उद्धव ठाकरे यांनी आपले पत्ते अतिशय संयमाने व जपून खेळलेले आहेत. माध्यमातून त्यांना चिथावण्या देण्याचा कितीही प्रयास होऊन, त्यांनी संयमाने वाटचाल केली. राज ठाकरे यांचे आव्हान पेलताना चार मित्रपक्षांना सोबत घेऊन संभाळले. पण लोकसभेच्या निकालाने मनसेचा अडसर पार केल्यावर शिवसेनेवर आणि सेनेच्या निष्ठावंतांवर त्यांनी हुकूमत निर्माण केली आहे. ती सिद्ध झाल्यावर त्यांनी बाकीच्या लोकांना आपली कुवत दाखवायचा पवित्रा घेतलेला आहे. बाळासाहेबांची जनमानसावर असलेली छाप उद्धव यांच्यापाशी नाही. पण दुसरीकडे बाळासाहेबांचा राजकीय भोळेपणाही उद्धवपाशी नाही. पिता उदारपणे मित्रपक्षांना जागा वा अधिकारपदे देऊन टाकायचा. ते औदार्यही उद्धवपाशी नाही, हे विसरून चालणार नाही. हा नेता अत्यंत व्यवहारी आहे. म्हणूनच मनसेला निष्प्रभ करण्यापर्यंत मान खाली घालून राजकारण केले आणि आता तो धोका संपल्यावर मराठी माणसाचे हुकूमी प्रतिनिधीत्व म्हणून नखे दाखवायला आरंभ केला आहे. ते भाजपाच्या स्थानिक नेत्यांच्या अजून लक्षात आलेले नाही. अल्पशी कुवत असेल. पण तिचा अतिशय धुर्तपणे उद्धवनी वापर केला आहे आणि आपल्या उतावळेपणात भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी उद्धवला त्यात यशस्वी व्हायला अनभिज्ञपणे हातभार लावला आहे. थोडक्यात आपल्याच आगावुपणाने भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी युतीच्या राजकारणात आपल्याच पक्षाला अड़चणीत आणून ठेवले आहे. युती होवो किंवा न होवो, या भाजपा नेत्यांचा खुजेपणा चार आठवड्यात मतमोजणीतूनच सिद्ध होईल.

1 comment:

  1. भाऊ, आता युती टिकलीतरी तिचा काहीही फायदा होणार नाही, असे वाटायला लागले आहे. इतर सर्व पक्ष आता हाच प्रचार करतील की शिवसेना-भाजप यांच्यात निवडणुकी अगोदरच एवढी दुही माजली आहेतर निवडून आल्यावर ते एकमेकांशी कसे वागतील, हे सांगायची आवश्यकता नाही. यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होणार आहे. राज ठाकरे यांत उभारून येऊ शकतात. ते इतक्या दिवस शांत आहेत. त्यांचे दारुगोळा तयार करण्याचे काम चालू आहे ज्याचा स्फोट ते प्रचारात करतील. त्यांच्या प्रचाराला उत्तर देणे आघाडी आणि महायुती असे दोघांनाही अवघड जाणार आहे. भाजपला सर्वात जास्त त्रास होणार आहे.

    ReplyDelete