Friday, September 26, 2014

लवचिकता नव्हे लवजिहाद

अवघ्या महिनाभर आधी उत्तरप्रदेशच्या विधानसभा पोटनिवडणूका रंगात आलेल्या होत्या. तेव्हा राजकारणापासून माध्यमांपर्यंत एकच विषय सार्वत्रिक गाजत होता, तो लव्ह जिहादचा. भाजपाचे गोरखपूरचे खासदार महंत आदित्यनाथ यांच्यावर त्यावेळी प्रचाराची धुरा भाजपाने सोपवली होती. त्यांनी हिंदू मुलींना प्रेमात पाडून त्यांचे विवाहाच्या रुपाने धर्मांतर केले जाते, अशी झोड उठवली होती. पण तिथले निकाल लागले आणि आठवडाभरातच सगळेच लोक लव्ह जिहाद विसरून गेलेत. दरम्यान हरयाणा व महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका लागल्या आणि त्या रणधुमाळीत कोण जिंकणार वा कुठल्या युत्या आघाड्या टिकणार; अशा चर्चांचे पेव फ़ुटले. मग कुणाला लव जिहादची आठवणही राहिलेली नाही. पण याच दोन्ही राज्यात राजकीय बाबतीत लव्ह जिहादची संकल्पना यशस्वीरित्या राबवली गेली. ती कोणाच्याच लक्षात आलेली दिसत नाही. लव्ह जिहादच्या बाबतीत मोठा आक्षेप काय आहे? मुस्लिम तरूण हिंदू मुलींशी गोडीगुलाबीने जवळीक साधतात. मैत्रीतून प्रेमसंबंध प्रस्थापित करतात आणि लग्नाची वेळ आली; मग त्यांचे धर्मांतर करतात. काही बाबतीत आधी लग्न करायचे आणि नंतर धर्मांतरासाठी बळजबरी करायची, असा आरोप आहे. त्यात मुलीने आढेवेढे घेतले, तर तिला तलाक देऊन वार्‍यावर सोडायचे. म्हणजे तिची आयुष्यभराची फ़सगत होते, असा मूळ आक्षेप आहे. हरयाणा व महाराष्ट्रात भाजपाने आपल्या मैत्रीपुर्ण संबंधातून वेगळे काय केले आहे? हरयाणात जनहित कॉग्रेस आणि महाराष्ट्रात शिवसेना यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून लोकसभा जिंकण्यापर्यंत भाजपाने लाडीगोडीने काम केले. कुठे म्हणुन वितुष्ट येणार नाही याची काळजी घेतली. पण आता आपल्या तालावर मित्र वागायला तयार नाहीत, तर तलाक ऐवजी ‘चलाख’ खेळी करून मित्रांना वार्‍यावर सोडले आहे.

युती मोडल्याची अखेरची घोषणा गुरूवारी झाली, तेव्हा भाजपाकडून करण्यात आलेला युक्तीवाद किती फ़सवा आहे? शिवसेनेने पहिल्यापासूनच मान्य होणार नाहीत असे प्रस्ताव पाठवले आणि सेनेला लवचिक धोरण अजिबात घेता आले नाही, असा भाजपाचा दावा आहे. मित्र पक्षांना महायुतीत आणले, तर त्यांनाही सामावून घ्यायला हवे. पण शिवसेना त्याला तयारच नाही, असाही भाजपाचा आरोप आहे. त्यात कितीसे तथ्य आहे? आजवर युतीमध्ये दोनच पक्ष होते आणि पाच निवडणूका त्यांच्यात जागांचे वाटप होत राहिले आहे. आता आणखी चार लहान पक्ष सहभागी झाले, तर त्यांना एकूण २८८ पैकीच जागा द्याव्या लागणार. म्हणजे आजवरचे जागावाटप होते, त्यातून पहिल्या भागिदारांनी थोड्या जागा उदारपणे नव्या मित्रांना द्यायला हव्यात. त्यालाच समावेशक वृत्ती म्हणता येईल ना? मग आधी सेनेकडे १६९ जागा होत्या. त्यातून सेनेने १८ जागा सोडल्या. भाजपाकडे आजवर ११९ जागा होत्या. नव्या मित्रांना सामावून घेण्यासाठी भाजपाने किती जागा सोडल्या? सोडायची गोष्ट दुरची झाली. भाजपा आधीच्या ११९ जागा कायम ठेवून आणखी १६ जागा वाढवून घेण्याचा हट्ट धरून बसला होता. मग जागा सोडणार्‍याला हट्टी म्हणायचे, की जागा अधिक मागून अडवणूक करणार्‍याला लवचिक म्हणायचे? भाजपाच्या चाणक्यांच्या शब्दकोषात लवचिक शब्दाचा नेमका अर्थ तरी काय आहे? माझे ते माझे आणि तुझे तेही माझे, असे वागण्याला लवचिकता म्हणतात काय? उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या खात्यातून नव्या मित्रांना सर्व जागा सोडायच्या आणि अधिक भाजपाला वाढीव जागा द्यायच्या, ह्याला गोडीगुलाबीने बोलून फ़सवणे नाही, तर काय म्हणायचे? लव्ह जिहाद यापेक्षा वेगळा असतो काय? म्हणजे प्रेमात पडलीस ना, मग तुझ्या घर कुटुंबाला सोडायचेच, पण अधिक तुझा धर्म श्रद्धाही सोडुन यायचे. नाहीतर प्रेम वगैरे समाप्त.

आपल्या खात्यातून एकही जागा सोडणार नाही आणि तशीच अट असेल तर बोलणीच होऊ शकत नाहीत, असे भाजपाने आधीपासून सांगितले असते; तर इतका विलंब व्हायची गरज नव्हती. मात्र चर्चेचे गुर्‍हाळ लावून भाजपाने चालविलेला युक्तीवाद कुठल्याही पाकिस्तानी राजकारण्याला शोभणारा असाच आहे. पाकिस्तानशी सहासष्ट वर्षात झालेल्या सर्वच वाटाघाटी व बोलणी फ़सली आहेत. त्याचे कारण पाकिस्तान सातत्याने काश्मिरचा मुद्दा पुढे करीत असते. आणि त्यातला काश्मिरचा विषय असा, की पाकव्याप्त काश्मिरबद्दल बोलायचेच नाही. नियंत्रण रेषेच्या अलिकडे जो प्रांत भारताच्या ताब्यात आहे, त्यावर पाकिस्तानचा हक्क भारताने मन्य करावा, असा पाकचा आग्रह असतो. तो मान्य होणारा प्रस्ताव असेल तर पाक बोलणी करायला तयार असतो. यात पुन्हा पाकिस्तानने व्याप्त काश्मिरचा काही प्रदेश थेट चीनला देऊन टाकला आहे. अधिक चीन लडाखवर डोळा ठेवून आहे. मग पाकिस्तान म्हणतो, की भारताने लडाख चीनला द्यावा आणि उर्वरीत काश्मिर पाकिस्तानला देऊन टाकावा. मग बघा काश्मिरात व दोन्ही देशात कशी शांतता नांदू शकेल. पण भारताला शांतताच नको आहे. म्हणून मान्य होऊ शकेल असा प्रस्तावच भारताकडून येत नाही. हीच पाकिस्तानची भूमिका असते ना? आज महाराष्ट्रातली युती तुटतानाचा भाजपाचा आक्षेप वेगळा आहे काय? म्हणे शिवसेनेने लवचिकता दाखवली नाही. सेनेने आपल्या १८ जागा सोडून १५१ जागांवर समाधान मानायची तयारी दर्शवली होती. त्या जागा नव्याने युतीत आलेल्या मित्रांना द्यायच्या होत्या. पण त्यातल्या अकरा जागा बळकावून भाजपा म्हणतो सेनेने अजून जागा मित्रांना सोडायला हव्यात. आणि नव्या मित्रांसाठी भाजपाने आपल्यातल्या किती जागा सोडल्या? त्याबद्दल भाजपा अवाक्षर बोलत नाही. कशी गंमत आहे ना?

लव्ह जिहाद हे काय प्रकरण असते? तमाम शहाणे सांगतात, प्रेमात धर्माचा संबंध काय? खरेच आहे. पण प्रेमात पडलेल्यांना लग्न करण्यासाठी धर्मांतर करायची वेळ येत असेल, तर तिथे प्रेमाचा धर्माशी संबंध येतो. एकाने प्रेमाच्या अटी म्हणून दुसर्‍याला धर्मांतराची सक्ती करण्याला प्रेम म्हणत नाहीत. त्याला बळजबरी म्हणतात. प्रेमात पाडताना धर्माच्या गोष्टी नसतात. पण जेव्हा प्रेमाच्या व्यवहारी पुर्ततेचा विषय येतो, तेव्हा अटी घालणे ही म्हणूनच फ़सवणूक असते. आणि प्रामुख्याने जेव्हा त्या अटी एकतर्फ़ी घालून अडवणूक केली जाते, तेव्हा त्याला लबाडी म्हटले जाते. लोकसभा जिंकण्यापर्यंत अशा कुठल्या अटी युतीमध्ये नव्हत्या. कारण तेव्हा जागांचा मोठा हिस्सा भाजपाकडे होता. पण तो डाव साधल्यावर अटी घालणे सुरू झाले. धर्म बदलायचा किंवा आपल्या श्रद्धा सोडायच्या तर ते सर्व एकाच बाजूने करायचे. दुसरा मात्र कुठलाच त्याग वा बदल मानणार नाही. याला प्रेम वा नाते म्हणता येईल काय? फ़सवणूक नाही तर याला दुसरे काय नाव देता येईल? राज्यातील भ्रष्ट कॉग्रेस राष्ट्रवादी सरकार हाकलून लावायचे आहे. त्यासाठी त्याच पक्षातून कालपरवा आलेल्या नेत्यांना भाजपातून उमेदवारी देण्यासाठी भाजपाला अधिक जागा हव्या आहेत. मग त्यासाठी शिवसेनेने त्याग केला पाहिजे. पंधरा वर्षे ज्यांनी भ्रष्ट घोटाळेबाज सरकार चालवण्यासाठी आपली शक्ती राबवली, त्यांना आता भाजपामध्ये घेतले. अशा नेत्यांसाठी पंचवीस वर्षे जुन्या मित्राला लाथ मारण्याला काय म्हणायचे? पाचपुते किंवा गावित अशा लोकांवर भाजपानेच विधानसभेत भ्रष्टाचाराचे आरोप केलेले होते. आता त्यांना पवित्र करून घेताना किंमत मात्र शिवसेनेने मोजली पाहिजे. याला लवचिकता नव्हे लव्ह जिहाद म्हणतात. अगदी महंत आदित्यनाथ यांच्याच व्याख्येत याला लव्ह जिहाद म्हणतात. मतदारच त्यावर आपला कौल तीन आठवड्यांनी देतील.2 comments:

  1. भाऊ, सोडा तो लवजीहाद अन हिदुत्व! कोणी कोणाच्या पाठीत खंजिर खुपसला ते तो खंजिरच जाणे.
    आता जे करायचे ते करुन सारे मोकळे झाले आहेत. आमच्यासाठी दोघे सारखेच, ह्याला वा त्याला लपविण्यात स्वारस्य नाही. आम्ही हेच जाणु इच्छितो ज्याच्यासाठी हा अव्यापारेषुव्यापार चालला होता, त्याच्या छातीतल्या खंजिराचं काय? नेहमी नाडला तोच जातो, तोडला तोच जातो. हे पक्ष व त्याचे लिडर्स गाड्या अन् पार्ट्या उडवतातच.
    मराठी बाण्याची ग्वाही देणारे अन् राष्ट्राभिमानाचा टेंभा मिरवणा-यांच्या ह्या दोघांच्या अजेड्यात अनुक्रमे सीमाप्रश्नाचा निकाल आणि अनधिकृत बांगलादेशी बांडगुळांची हकालपट्टी ह्या बाबी आलेल्या दिसल्या नाहीत.

    ReplyDelete
  2. भाऊ, बरे झाले या लव्हजिहाद मधे शिवसेना फसली नाही. नाहीतर महाराष्ट्र तोडण्याचे धर्मांतर करावे लागले असते. आता सर्व मतदान पूर्वीच्या मतचाचण्या असे सांगत आहेत की भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला तरी बहुमत मिळनार नाही. युती पुन्हा करावीच लागेल. भाऊ, आपण हे खुप अगोदरच सांगीतले होते. लय भारी!

    ReplyDelete