Saturday, September 6, 2014

पक्षांतराने शरद पवार संपत नाहीत



सध्या राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेस यातल्या अनेक नेत्यांची भाजपा वा कॉग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी झुंबड उडालेली आहे. त्यामुळे अर्थातच युती पक्षांचा किती राजकीय फ़ायदा होईल, ते आताच सांगता येणार नाही. कारण ज्यांना आपल्या मतदारसंघाची व बालेकिल्ल्याची खात्री असते, त्यांना अशी पळापळ करायची गरज नसते. अपक्ष लढूनही त्यांना आपली जागा राखता येते. शरद पवारसारखे मुरब्बी राजकारणी ते जाणतात. म्हणूनच अनेकांनी पक्षांतर केल्याने इतर नेत्यांनी आगपाखड केली असली तरी पवार मात्र शांत आहेत. कारण पवार जितकी पळपूट्या नेत्यांची कुवत ओळखून आहेत, तितकीच स्वत:ची व मतदाराची क्षमता जाणून आहेत. मात्र त्यांच्या अनेक सहकार्‍यांना आपल्या नेत्याची खरी ताकद अजून ओळखता आलेली नाही. पवार कितीही बदनाम असले व अप्रिय झालेले असले, तरी त्यांची एक किमान राजकीय ताकद महाराष्ट्रात मुरलेली आहे. आणि त्याची साक्ष अनेकदा यापुर्वीही मिळालेली आहे. अनेक पाळीव वा भाट पत्रकारांनी पवारांना स्ट्रॉग मराठा म्हणून प्रतिमा रंगवण्याचे उद्योग केलेले असले, तरी तितके पवार राज्यात कशीच शक्तीमान नव्हते. पण यशवंतराव, वसंतराव नाईक व वसंतदादा अशा नेत्यांच्या नंतर कॉग्रेसला मिळालेला राज्यव्यापी चेहर्‍याचा पवार हाच एकमेव नेता आहे. म्हणूनच त्यांची स्वत:ची अशी एक पसरलेली ताकद आहे. त्या बळावर बहूमत खेचण्याची मजल पवार कधीच मारू शकले नाहीत. कारण त्यांनी कधीच राजकीय संयम राखून आपली संघटनात्मक शक्ती विकसित केली नाही. झटपट यश संपादण्याच्या घाई वा उतावळेपणात त्यांनी आपली विश्वासार्हता कायम शंकास्पद करून ठेवली. पण त्यांच्यावर प्रेम करणारा एक वर्ग त्यांनी उभा केलेला आहे. त्याखेरीज राजकीय बेरीज वजाबाकीत मिळू शकणारे लाभ उठवून ४०-५० आमदार निवडून आणायची शक्ती त्यांच्यापाशी कितीही विपरीत परिस्थितीत राहिली आहे. त्यामुळेच मोदीचा झंजावात असला, तरी तितक्या किमान जागा पवार निवडून आणू शकतात, हीच बाब त्यांना पक्षांतराने विचलीत करू शकलेली नाही.

१९७८ सालात शरद पवार यांनी अवघ्या १८ आमदारांना सोबत घेऊन कॉग्रेसला रामराम ठोकला होता. मग सत्ता हाती आल्यावर अनेक आमदार त्यांच्याकडे ओढले गेले. पण सत्तेचे पारडे फ़िरल्यावर अनेक निकटचे मित्र सहकारी पवारांना सोडून गेले. दिल्लीत इंदिराजींची सत्ता आल्यावर पवारांचा पुलोद प्रयोग धुळीस मिळाला आणि तरीही पवारांनी १९८० साली पन्नासच्या आसपास आमदार निवडून आणले होते. त्यातले बहुतांश आमदार वर्षभरातच यशवंतराव यांच्यासोबत कॉग्रेसमध्ये गेले आणि चारपाच आमदार पवारांसोबत राहिले. तेव्हा कॉग्रेसमध्ये जाण्याचा खुप दबाव पवार यांच्यावर होता. पण त्यांनी एकाकी लढत देत, आपला वेगळा समांतर कॉग्रेस पक्ष कायम ठेवला होता. मग १९८४ सालात इंदिरा हत्या झाल्यावरही त्यांनी राजीव लाटेत दोन खासदार निवडून आणले होते. लगेच आलेल्या विधानसभा निवडणूकीत दत्ता सामंत व शिवसेना असे दोन गट सोडल्यास इतर सर्वच पक्षांना सोबत घेऊन पवारांनी शेवटचा पुलोद प्रयोग करून बघितला. पण त्यातही ५४ जागांच्या पलिकडे त्यांची मजल गेली नाही, की पुलोदला सव्वाशेचा पल्ला ओलांडता आला नाही. त्यानंतर मात्र पवार विरोधी राजकारणाला विटले, सत्तेचा हव्यास त्यांना कॉग्रेसपासून अलिप्त ठेवू शकला नाही. पण या दोन विधानसभा निवडणूकीत पवारांनी दोनदा आपले पन्नास निष्ठावान आपल्या बळावर निवडून आणले हे विसरता कामा नये. त्यात आणखी एक मजेशीर तपशील लक्षात घेण्यासारखा आहे. १९७८ सालात पवारांसोबत असलेले बहुतांश ज्येष्ठ सहकारी सोडून गेले, तरी पवारांनी नवे तरूण हाताशी धरून नव्या दमाचे नेतृत्व उभे केले. वल्लभ बेनके, आर आर आबा, दिलीप वळसे पाटिल, सुनील तटकरे, मधूकर पिचड अशी ती नवी नेतृत्वाची पिढी म्हणून दाखवता येईल. जेव्हा सोकावलेले जुनेजाणते सोडून जातात, तेव्हा त्यांच्यामुळे ज्यांची संधी अडून राहिलेली असते, अशा तरूणामधून नवे नेतृत्व निर्माण करायची नवी संधी उपलब्ध होत असते. हे धुर्त पवार जाणतात, म्हणूनच इतके नेते बाहेर पडत असताना ते शांत आहेत.

दुसर्‍या बाजूनेही विचार करता येईल. आज ज्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे, त्यापैकी कितीजण स्वबळावर जिंकू शकणारे आहेत? पण सत्तेची मस्ती दाखवल्याने तेच पक्षाच्या अपयशाचेही कारण आहेत. त्यांना सहजासहजी बाजूला करणे व नवोदितांना तिथून उमेदवारी देणे, पवारांना शक्य झाले असते काय? बबनराव पाचपुते यांना आपल्या मतदारसंघात पक्षाच्या उमेदवाराला लोकसभेत मताधिक्य देता आलेले नाही. असा माणूस तिथे राष्ट्रवादीला उमेदवार म्हणून घ्यावाच लागला असता. ते स्वत:च पक्ष सोडून गेल्याने आता तिथला नवा उमदा चेहरा पुढे आणता येईल. भले तो आमदार होणार नाही. पण नव्याने पक्षाची उभारणी करायला राबेल तरी नक्की. हेच नेमके वारंवार झालेले आहे. आधी पवारांचे सहकारी असलेल्यांनी पक्षांतर केले आणि त्यांच्या जागी ज्यांना नव्याने संधी देण्यात आली, त्यांनी बाजी मारलेली आहे. अशा तरूणांना सोबत घेऊन नवी उभारणी करता येते, हा पवारांचा अनुभव आहे. म्हणुनच त्यांना पक्षांतराने विचलीत व्हायचे कारण नाही. त्यांनी पक्ष सो्डणार्‍यांविषयी एका शब्दानेही प्रतिक्रिया दिलेली नाही. नारायण राणेंच्या सोबत पक्ष सोडलेल्या व शिवसेनेत परत आलेल्या अनेक कोकणी नेत्यांना आज त्यांच्या पुढल्या पिढीतल्या तरूणांच्या मागे रांगेत उभे रहावे लागते आहे. नेमकी तीच स्थिती राष्ट्रवादी पक्षात अनेकांची यापुर्वी झालेली आहे. मात्र त्यांचे जे नेते कार्यकर्ते आज भाजपा सेनेत जातील, त्यांना उद्या राजकारण बदलले तर चुचकारून सेना भाजपाच्या विरोधात वापरायलाही पवार कमी करणार नाहीत. युतीच्या सरकार स्थापनेत ३०-३५ अपक्षांना पाठवून आठदहा मंत्रीपदे पवारांनी आपल्याच साथीदारांकडे राखली होती. शेवटी राष्ट्रवादीची वेगळी चुल १९९९ सालात मांडली, तेव्हा बहुतांश अपक्ष मंत्री राजिनामे देऊन त्या पक्षात दाखल झालेच होते ना? रामराजे निंबाळकर, अनील देशमुख, विजयकुमार गावित अशी कितीतरी नावे सांगता येतील. म्हणूनच पक्षांतराची झुंबड उडाली, म्हणून कोणी शरद पवार राजकारणातून संपले, असे मानायचे कारण नाही. उलट अशा विपरीत परिस्थितीत संधी शोधणारा असा हा मुरब्बी नेता आहे. मात्र त्यामुळेच त्यांना कधी सकारात्मक राजकारण करून आपला ठसा भारतीय राजकारणावर उमटवता आला नाही. कुरापतखोर टवाळ पोराप्रमाणे राजकीय उचापती करताना पवारांचा उमेदीचा कालखंड गेला आणि आता उतारवयात अस्तित्वाची लढाई करायचे दुर्दैव त्यांच्यावर ओढवले आहे.

3 comments:

  1. शरद पवार म्हणजे टघ्या आणि बेरक्या राजकारणी आहे. कधी काय करेल खरच काहीच सांगता येत नाही. कधीकधी वाटते की युतीची सत्ता येणार आहे हे जाणून अगोदरच आपली मानसे तिथे पेरून ठेवली आहेत असे.
    शरद पवार म्हणजे 'मैद्याचे पोते' आहे, कितीही दाबले तरी ते सरळ होणारच!

    ReplyDelete
  2. शरद पवार म्हणजे टघ्या आणि बेरक्या राजकारणी आहे. कधी काय करेल खरच काहीच सांगता येत नाही. कधीकधी वाटते की युतीची सत्ता येणार आहे हे जाणून अगोदरच आपली मानसे तिथे पेरून ठेवली आहेत असे.
    शरद पवार म्हणजे 'मैद्याचे पोते' आहे, कितीही दाबले तरी ते सरळ होणारच!

    ReplyDelete
  3. पवार म्हणजे गामिनी कावा आणि कात्रज चा घाट आणि सर्वे भुइसपाट.

    ReplyDelete