Tuesday, September 16, 2014

चाणक्य चंद्रगुप्त होत नसतो

काल सकाळी योगायोगाने काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना टिव्हीवर बघितले. पंधरा दिवसापुर्वीच्या अतिवृष्टीने जम्मू काश्मिरला प्रलयात ढकलले होते. आता परिस्थिती कशी आहे, त्याचा तपशील सांगताना अब्दुला यांनी एक महत्वाचा फ़रक सांगितला. राज्याच्या दोन प्रमुख विभागात पुर आलेला होता. पण जितकी वाताहत काश्मिरची झाली, तितकी जम्मूची झालेली नाही. जम्मूतला पुर लौकर ओसरला आणि लोकांचे कमी हाल झाले. पण काश्मिरमध्ये अजून पुराचे पाणीच ओसरलेले नाही. सहाजिकच लाखो फ़सलेल्या लोकांना त्यातून बाहेर काढण्याचे व मदत पुरवण्याचे काम अजून चालूच आहे. एकाच राज्यात अशी तफ़ावत कशामुळे आहे? तर ती नैसर्गिक वस्तुस्थिती आहे. जम्मूच्या भागात पुराचे पाणी घुसायला वेळ लागत नाही. पण जितक्या वेगाने तिथे पुराचे पाणी येते, तितक्याच वेगाने तिथून निघूनही जाते. काश्मिरची भौगोलिक स्थिती वेगळी आहे. तिथे पुराची स्थिती असली, तर पाण्याचा लोट भूप्रदेशात घुसायला खुप अवधी लागतो. आणि घुसलेले पाणी उताराला लागून जमीन मोकळी व्हायलाही उशीर होतो. म्हणूनच अजून काश्मिरची पुरातून मुक्तता होऊ शकलेली नाही. ही त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली समस्या आहे. मग त्यात योगायोग कुठला? तर काल सकाळीच विविध राज्यात झालेल्या पोटनिवडणूकांची मतमोजणी झाली आणि तिचे निकाल येत असताना राजकीय मोदीलाट वा पुराची चर्चाही चालली होती. पाच महिन्यांपुर्वी लोकसभा निवडणूकीत आलेली मोदींची लाट आता ओसरली, अशी चर्चा सगळेच जाणकार करीत होते. लाटेचे वा पुराचे वर्णन दोन राजकीय लोकांनीच वेगळ्या संदर्भात केले होते, पण त्यातले साम्य कितीजण ओळखू शकतील? मोदी लाट अशी उपमा दिली जाते, तेव्हा लाटेचा अर्थ कितीजण समजू शकले आहेत? कितीजणांना लाट येते वा ओसरते, याचा अर्थ उमगला आहे?

पाच महिने झाले आणि आता मोदी लाट ओसरली, असे म्हटले जाते. पण अजून तरी भाजपावाले त्या लाटेवरून खाली उतरायला तयार नाहीत. त्यांना देशाच्या सर्वच भागात अजून मोदीलाट असल्याचे भास होत असतात. त्यामुळेच महाराष्ट्रातही तीच लाट आपल्याला सहज स्वबळावर विधानसभेत बहूमत मिळवून देईल, असे अनेक भाजपानेत्यांना वाटते आहे. पण लाट वा पूर एकाच प्रकारचे असले तरी कुठल्या भूभागात येतात, त्यानुसार त्याचे परिणाम संभवतात. याचा अशा नेतेमंडळींना विसर पडलेला दिसतो. मोदीलाट गुजरातमध्ये यायला दोनतीन वर्षे लागली होती. पण ती अजून तेरा वर्षानंतरही ओसरलेली नाही. आता मोदी पंतप्रधान झाले आणि गुजरातमध्ये नवा मुख्यमंत्री विराजमान झाला आहे. पण अजून तिथली मोदी लाट ओसरलेली नाही. म्हणूनच पाच महिन्यानंतरही झालेल्या मतदानात भाजपाला तिथे चांगले यश मिळाले. पण शेजारच्या राजस्थान वा पलिकडल्या उत्तरप्रदेशात पाच महिन्यापुर्वीच्या भव्य यशाचा मागमूस ताज्या निकालात दिसत नाही. असे कशामुळे झाले आहे? त्याचे विश्लेषण म्हणूनच आवश्यक आहे. मोदी लाट आली वा ओसरली, हे सोपे उत्तर झाले. गुजरातमध्ये मोदींनी आपला ठसा उमटवल्यानंतरही अनेक वर्षे तिथे सत्ता राबवली आहे. तिथल्या पक्षसंघटनेवरही त्यांचाच प्रभाव कायम असल्याने नऊपैकी सात जागा सहज जिंकता आल्या. पण अवघ्या नऊ महिन्यापुर्वी राजस्थानात अवाढव्य विजय संपादन केलेल्या भाजपाला तिथल्या चार जागांपैकी तीन जागा गमावण्य़ाची पाळी आली. उत्तरप्रदेशातील दहा जागी लोकसभा मतदानात भाजपा अव्वल जागी होता. पण पाच महिन्यानंतर आपलेच बालेकिल्ले असलेल्या आठ जागी भाजपाला पराभव स्विकारावा लागला होता. जमीन जितकी उथळ तितके तिथले पुराचे पाणी लौकर ओसरते आणि जमीन जितकी सखल, तितके तिथले पुराचे पाणी दिर्घकाळ तुंबून रहाते.

उत्तर प्रदेशात मोदींनी सहा महिने मेहनत घेऊन पोषक स्थिती निर्माण केली. त्यामुळे मोदीलाट उत्तरप्रदेशात घुसली, ती बाकीच्या पक्ष व नेत्यांचे बालेकिल्ले उध्वस्त करीत गेली. भूईसपाट करत गेली. त्या यशानंतर तिथे आपले बालेकिल्ले व प्रभावक्षेत्र बनवून लाट टिकवून धरणे पक्षाच्या स्थानिक व अन्य नेत्यांचे काम होते. तिथले उथळ नेते नुसत्याच वल्गना करण्यात गर्क झाले आणि बघताबघता मोदी लाटेचे पाणी वाहून गेले. बिहार व उत्तर प्रदेशात मतविभागणीचा फ़ायदा भाजपाला मिळालेला होता. ती विभागणी मागल्याच महिन्यात बिहारमध्ये लालू-नितीश यांनी हातमिळवणी करून टाळली, तर भाजपाला तिथे धक्का बसला होता. त्यापासून धडा शिकायची गोष्ट बाजूला राहिली आणि भाजपावाले कल्पनेतल्या मोदीलाटेत जलविहार करण्यातच रमलेले होते. जसे इथे महाराष्ट्रात भाजपा नेत्यांना स्वबळावर बहुमत मिळवायची स्वप्ने पडू लागली होती, तशीच उत्तर प्रदेशच्या नेत्यांना मोदींची छायाचित्रे लावून सहज जिंकायची झिंग चढली होती. ताज्या निकालांनी ती उतरवली. पण असे कशामुळे घडू शकले आहे? बलात्कार व दंगलीने बदनाम झालेल्या समाजवादी पक्षाच्या सरकारवर लोकांनी विश्वास दाखवलेला नाही. तर मतविभागणी टाळल्याने तसा चमत्कार घडला आहे. मायावतींनी या पोटनिवडणूकीतून अंग काढून घेतल्याने मुलायमचे काम सोपे झाले होते. लागोपाठ दुसरा पराभव नको, म्हणून मायावतींनी माघार घेतली होती. पण त्यांचे मतदार विभागले जाताना मुस्लिमांचा ओढा आपोआप मुलायमकडे वळला. दुसरीकडे लोकसभेपेक्षा मतदानाची टक्केवारी घसरल्यानेही समाजवादी उमेदवारांचे काम सोपे झाले. लोकसभेपेक्षा आठ-नऊ टक्के मतदान कमी झाले. अमित शहा यांनी बुथ पातळीपर्यंत बांधलेली संघटना पुढे चालवण्याचे कष्टच कोणी घेतले नाहीत. मग मतदान घटून आपल्याच बालेकिल्ल्यात विरोधी मतांच्या एकजुटीने भाजपाला दणका बसला आहे.

राजस्थानची कथा वेगळी नाही, विधानसभा व लोकसभा अशा दोन्ही वेळी वाढलेल्या मतदानाने मोठे यश दिले होते. पोटनिवडणूकीत मतदान घटले आणि भाजपाला तीन जागा गमावण्य़ाची पाळी आली. महाराष्ट्राची कहाणी तशीच आहे. आजवरच्या मतदानापेक्षा गेल्या लोकसभेत मतदान वाढलेले होते आणि त्याच्या परिणामी मोदीलाट निर्माण झाली होती. त्यात भाजपाइतकाच शिवसेना व मित्रपक्षांचा सहभाग कारणीभूत होता. पण २३ जागा जिंकल्यावर भाजपाला आपले पक्षीय बळ वाढल्याचा साक्षात्कार झाला आणि विनोद तावडे थेट गृहमंत्री होऊन अजितदादांना तुरूंगात टाकण्यासाठी पुढे सरसावले. इथे अजून भाजपाची जमीन उथळ आहे आणि मोदीलाटेचे पाणी टिकून रहावे, इतकी भाजपाची भूमी सखल झालेली नाही. याचे पक्षाच्या नेत्यांना भान राहिलेले नाही, म्हणूनच अशा वल्गना करण्यापर्यंत मजल गेली होती. आता काही राज्यातल्या पोटनिवडणूकांचे निकाल नेमक्या मुहूर्तावर आल्याने जागावाटपातले रुसवेफ़ुगवे संपतील अशी अपेक्षा आहे. उत्तर प्रदेशात मोदीलाटेचे ताजे परिणाम दिसून आल्यावर अमूकच जागांचा आग्रह धरणार्‍यांना आपण महाराष्ट्रात अजून स्वबळावर कधीच का लढलो नव्हतो, त्या इतिहासाची आठवण व्हायला हरकत नाही. आपल्या बळावर पक्षसंघटना उभारून मग युती-आघाडी झुगारता येत असते. पण नेहमीच नुसत्या जागावाटपात अधिक जागा पदरात पाडून घेण्य़ाच्या डावपेचांनी स्वबळाची मजल मारता येत नसते. म्हणून पवारांसारखा दांडगा नेताही राज्यात आघाडीचे राजकारण करत राहिला आहे. नको त्यावेळी, म्हणजे कालच्या निकालापूर्वी मातोश्रीला दुखावून कोणता शहाणपणा भाजपाच्या चाणक्यांनी केला होता? उद्धवनी अधिक जागा शक्य नसल्याचे जाहिर केल्यावर, दुसर्‍या दिवशी असे निकाल आल्यामुळे, आता भाजपाने स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. कारण या निकालामुळे स्वबळाची भाषा पोकळ ठरवली असून, युतीसाठी भाजपाच गरजवंत असल्याचे दाखवून दिले आहे. चाणक्यनिती खेळणार्‍यांनी स्वत: चंद्रगुप्त व्हायची महत्वाकांक्षा बाळगायची नसते, एवढे यातून शिकता आले तरी खुप झाले

2 comments:

  1. माझ्या मताने राजकीय संख्याबळात जिथे काडीचा फरक पडणार नाहीये, जिथे सत्ताबदल होणारच नाहीये, किंवा मी मत दिलेल्या पक्षाच्या ताकदीत काही फरक पडणार नाही दणकून जागा आधीच मिळाल्या आहेत तिथे मी मत द्यायला बाहेर पडलो काय नाही पडलो काय... काय फरक पडणार आहे?

    पोटनिवडणुकीत मतदारांची ही मानसिक स्थिती नसते काय? याचा मतदारांच्या संख्येवर आणि निकालावर परिणाम होणारच.

    १) या निवडणुका मोदींना पंतप्रधान करायला नव्हत्या. ते काम झाले आहे. त्यासाठी आता मतदान करायची गरज नव्हती

    २) या विधानसभेवरही त्याचा परिणाम होणार नव्हता. उदा: जर भाजपला उत्तर प्रदेशात ११ पैकी ११ जागा जरी मिळाल्या असत्या तरी सत्ताबदल होणार नव्हता

    ३) विधानसभेचे मुद्दे वेगळे असतातच

    ४)बंगालमध्ये ममता आणि युपीमध्ये अखिलेश याच्या विरोधात लाट नाही. लोकसभेतली लाट काँग्रेस विरोधातली होती. ममता तर तेंव्हाही खमक्या होत्या.

    ५) सर्वात महत्वाचे म्हणजे भाजपला नाकारले म्हणजे काँग्रेसला स्वीकारले असे झालेले नाही. काँग्रेस तर इतरमध्येही नाही.

    ६) क्षणभर मोदी प्रभाव ओसरला हे मानू. पण राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी विरोधी लाट आहे त्याचे काय?

    ६) पोटनिवडणुकीत टोटल मतदान ३०% तरी झाले काय?

    ReplyDelete
  2. भाऊ तुम्ही छान विश्लेेषन करतात

    ReplyDelete