Sunday, October 12, 2014

मुंग्याही मेरू पर्वत गिळतात



लोकसभा निवडणूका जिंकण्यासाठी भाजपाने आटोकाट प्रयत्न केले. तेव्हा त्यांना शिवसेनेशी असलेली युती पुरेशी वाटत नव्हती, की पंतप्रधान पदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेवर याच भाजपा नेत्यांचा विश्वास नव्हता. असता तर त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष वा विनायक मेटेंच्या शिवसंग्राम गटाला आपल्या सोबत आणले नसते. निवडणूक भरात आलेली असताना नितीन गडकरी यांनी मतविभागणी टाळण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरच्या पायर्‍या झिजवल्या नसत्या. पण ते सर्व केल्यावर निकाल आले आणि भाजपाच्या इथल्या नेत्यांना आपले बळ प्रचंड वाढल्याचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी युती मोडण्यापर्यंत मजल मारली आहे. तितके बळ पक्षात असते तर त्यांनी राष्ट्रवादी वा कॉग्रेसच्या आपापल्या विभागातील दिग्गजांना आणून विजयाची बेगमी केली नसती. लोकसभेचे निकाल लागण्यापर्यंत ज्यांनी मोदींच्या नावाने शंख केला, त्यांना आता भाजपात आणुन पक्षाचे बळ वाढले असे म्हणायचे असेल, तर गोष्ट वेगळी. असे बळ भाजपाचे वाढते, तसेच ते यापुर्वी अनेकांचे वाढले आहे व कसोटीची वेळ आली तेव्हा जमीनदोस्त झाले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातही असे प्रथमच घडलेले नाही. युतीच्या इतिहासातही ते प्रथमच घडत नाही.

बबनराव पाचपुते व डॉ. विजयकुमार गावित अशा दोन राष्ट्रवादी नेत्यांना पक्षात आणल्याबद्दल खुप गाजावाजा झाला. कारण त्यांच्यावर विधानसभेत भाजपाचेच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भ्रष्ट्राचाराच्या तोफ़ा डागल्या होत्या. आज त्यांना पवित्र शुद्ध करून घेतले गेले आहे. त्यांच्या तोंडीही मोदींचा नामजप ऐकू येतो आहे. अलिकडल्या त्या तपशीलात जायची गरज नाही. पण यातले डॉ. गावित कोण? १९९५ सालात युतीला बहूमताला सहासात जागा कमी पडल्या, तेव्हा ज्या अपक्षांनी पाठींबा देऊन बहूमत सिद्ध केले, त्यात हेच गावित होते. त्यामुळे त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली होती. पुढे साडेचार वर्षांनी शरद पवारांनी वेगळी चुल मांडून राष्ट्रवादी कॉग्रेस स्थापन केली, तेव्हा युतीच्या मंत्रीपदाला लाथ मारून पवार गोटात पोहोचलेले हेच गावित होते ना? पंधरा वर्षानंतर त्याचीच पुनरावृत्ती होत नाही काय? जेव्हा १९९९ सालात पुन्हा सेना भाजपा युतीला जनतेच्या कसोटीला उतरायचे होते, तेव्हा साथ सोडून गेलेल्यांवर भाजपा आज विश्वास ठेवते आहे. फ़रक इतकाच, की तेव्हा गावित पक्षात आलेले नव्हते तर बाहेरून पाठींबा देत सत्तेतले भागिदार झालेले होते. पाचपुतेही जनता दलातून कॉग्रेसमध्ये जाऊन मंत्री झाले आणि राष्ट्रवादीच्या मार्गे आता भाजपात आलेले आहेत. अशीच १९७८ सालात शरद पवारांनी समांतर कॉग्रेस स्थापन केली होती आणि सत्तेला आसुसलेल्या जनता पक्षाने त्यावर गंगाजल शिंपडून शुद्धीकरण केलेले होते. इंदिरा कॉग्रेस व कॉग्रेस अशा आघाडीचे सरकार पाडून, तेव्हा पवार प्रथमच मुख्यमंत्री झाले ते अवघ्या २० आमदारांच्या बळावर. त्यांनी वसंतदादांच्या २० आमदारांना व चार मंत्र्यांना सोबत घेऊन पक्षांतर केले आणि ९९ जनता आमदारांच्या पाठींब्याने पवार मुख्यमंत्री झाले. कॉग्रेसला सत्ताभ्रष्ट करण्याचा शॉर्टकट जनता पक्षाने असा मारला. त्यातले जुने समाजवादी व जनसंघिय मंत्री सुद्धा झाले. पण अडीच वर्षानंतर लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार झालेल्या जनता पक्षाचे शिल्लक काय उरले? त्यातला एक गट म्हणून भाजपा आज पुन्हा फ़ॉर्मात आलेला आहे. पण तेव्हा कॉग्रेस सत्ताभ्रष्ट केल्याची शेखी मिरवणार्‍या जुन्या समाजवाद्यांचे नामोनिशाण शिल्लक उरले आहे काय?

अर्थात तेव्हा पवार जनता पक्षात आलेले नव्हते, तर त्यांनी आपला गट वेगळा ठेवला होता आणि पुढल्या काळात बहुतांश जनता आमदारही त्यांच्याच गोटात दाखल होऊन जनता पक्ष रोडावला. आता तर नामशेषही झाला. निवडणूकीत कॉग्रेसचे दोन तट पडलेले असतानाही तेव्हाच्या जनता पक्ष व मित्रांना बहूमताचा पल्ला गाठता आलेला नव्हता. १९९९ प्रमाणेच दोन्ही कॉग्रेस गट एकत्र येऊन बहूमत सिद्ध करून त्यांनी जनता पक्षाला सत्तेपासून वंचित ठेवले होते. ती सत्ता मिळवण्याच्या हव्यासाने मग शरद पवारांना मुख्यमंत्री करण्यापर्यंत मजल मारली गेली. पण जनता पक्षात सहभागी असलेले जनसंघ, समाजवादी वा त्यांचे मित्र शेकाप-डावे आपले राजकीय पावित्र्य पुर्णतया गमावून बसले. त्यातून सावरायला १९८० ते १९९५ अशी पंधरा वर्षे गेली. तोच वैफ़ल्यग्रस्त कार्यकर्ता पांगला आणि नव्या पिढीतला उत्साही कार्यकर्ता राजकीय स्थित्यंतरासाठी कटीबद्ध होऊन, राजकारण बदलायला १९९५ साल उजाडले. तोपर्यंत १९७८ सालात नगण्य कार्यकर्ते असलेले प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंडे अशी नेतृत्वाची नवी फ़ळी पुढे आलेली होती. राम नाईक, उद्धवराव पाटिल, हशू अडवाणी मागे फ़ेकले गेले होते. समाजवाद्यांची तर पुढली पिढीच उभी राहिली नाही आणि महाराष्ट्रात जणू डावी पुरोगामी चळवळ खालसाच होऊन गेली. त्यांना कोणी मारले नाही, की मारावे लागले नाही. तात्पुरत्या यशाची नशा व सत्तेची हाव त्यासाठी पुरेशी ठरली. ज्या कॉग्रेसला संपवायचे मनसुबे अशा लोकांनी रचले होते, त्यांनी त्याच कॉग्रेसी प्रवृत्तीला दत्तक घेऊन वा आत्मसात करून आपल्यातच ती बाणवली. नावे वगळता राजकारणातली भिन्नता पुसट होत गेली. त्यामुळेच पुन्हा पुन्हा कॉग्रेस पुनरुज्जीवित होत राहिली. आता तर कॉग्रेस नाव नसलेले अनेक पक्ष प्रत्यक्षात कॉग्रेसी राजकारणच पुढे चालवित आहेत. अशा वेळी भाजपाने घाऊक प्रमाणात जी आयात केली, त्यानंतर त्याच्यातले वेगळेपण कितीसे शिल्लक उरलेले आहे? १९७८ सालात पवार जनता पक्षाच्या जवळ आले आणि अडीच वर्षांनी अनेक आमदार कार्यकर्ते कॉग्रेसमध्ये घेऊन गेले. १९९५ सालात युतीला पाठींबा देणार्‍या अपक्षांनी कसोटीच्या वेळी पवारांकडे धाव घेत युतीला वार्‍यावर सोडले होते. आता तर तसेच लोक घाऊक संख्येने भाजपात आलेले आहेत. त्यांच्या निष्ठांविषयी नव्याने काही सांगायची गरज आहे काय?

आज भाजपा तेजीत आहे आणि म्हणूनच अशा सत्तालंपटांना भाजपात येण्याचेही सोयरसुतक नाही. उद्या भाजपाला लाथ मारून शाहु फ़ुले आंबेडकरांचा नामजप करायला तेच पुढे सरसावलेले दिसतील. कारण अशा लोकांना कशाशीच कर्तव्य नसते. ना शाहू फ़ुल्यांच्या विचारांशी बांधिलकी असते, ना भाजपाच्या हिंदूत्वाशी. त्यांना भाजपावाले बळ समजत असतील, तर विषयच संपला. १९ आक्टोबरच्या निकालानंतर जी काही आमदार संख्या असेल, त्यात खरेखुरे भाजपावाले किती असतील? आणि हाच क्रम राहिला, तर यात दिडदोन वर्षानंतर हुसेन दलवाई वा भालचंद्र मुणगेकरही सहभागी झाले, तर मला अजिबात नवल वाटणार नाही. संघाचा सांस्कृतिक राष्ट्रवाद हुसेन वा मुणगेकर समजावून सांगतानाचे दृष्य़ किती मनोहारी असेल? फ़ार कशाला, खुद्द शरद पवारच भाजपामध्ये सहभागी झाले तरी आश्चर्य वाटायला नको. पाकिस्तान हुलकावण्या देतोच आहे आणि चीन घुसखोरी करतोय, म्हणून यावेळी पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडायला पवारांनी आपला पक्ष भाजपात विसर्जित करायचे ठरवले तर नवल नाही. १९८६ सालात ४०० हून अधिक जागा राजीव गांधींकडे असताना व त्या जागा जिंकताना राजीवना कसून विरोध करणार्‍या पवारांनी, दिड वर्षात राष्ट्रीय गरज म्हणून आपला पक्ष इंदिरा कॉग्रेसमध्ये विलीन केला़च होता. त्या कॉग्रेसला ओहोटी लागली असताना पवार उद्या भाजपात दाखल व्हायला काय हरकत आहे? त्यांनी आधीच आपली फ़ौज तिकडे रवाना केलेलीच आहे. तसे घडेल तेव्हा़चा भाजपा कसा असेल? त्याचा चेहरामोहरा कोणता असेल? खरेच जातियवादी मुखवटा उतरलेला ‘राष्ट्रवादी’ भाजपा आपल्याला बघायला मिळेल ना? त्याची चाहुल या निवडणूकांनी लागली आहे. कॉग्रेसच्या अस्तासाठी उभ्या ठाकलेल्यांना माझ्यासारख्यांनी गेल्या कित्येक वर्षात समर्थन दिले, त्या प्रत्येकाची याच दिशेने व अशीच वाटचाल झालेली आहे. लक्षणे जेव्हा तशी दिसतात, तेव्हा मनात पाल चुकचुकणारच. कॉग्रेसमुक्त महाराष्ट्रासाठी राष्ट्रवादीयुक्त भाजपा ही कल्पना निदान मला तरी पटणारी नाही. तसे होऊ नये अशी अजूनही मनातली खुळी अपेक्षा आहे. पण आजवरच्या चारपाच दशकात तशा अपेक्षा प्रत्येकवेळी खुळ्याच ठरल्या असतील, तर आज मनात वेगळे काय विचार येऊ शकतील? अशा मुंग्यांनी मेरू पर्वत गिळल्याचाच अनुभव असल्यावर काय करायचे?

3 comments:

  1. भाऊराव,

    मोदींनी काँग्रेसमुक्त भारत अशी हाक दिली आहे. आता गंमत बघा, ज्या काँग्रेसला मोदी संपवायचं म्हणताहेत, नेमकी तीच काँग्रेसी वृत्ती महाराष्ट्र भाजपमध्ये ठळकपणे दिसून येत्येय. शिवसेनेला मत देऊन तिला जनतेनेच ठेचून काढायला हवी. म्हणूनच मोदी शिवसेनेवर टीका करत नाहीयेत. परस्पर महाराष्ट्र भाजपचा काटा निघत असेल तर मोदींसाठी चांगलंच आहे की ! या बदल्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री येवो वा न येवो, मोदींना काय फरक पडतो? म्हणूनच केंद्रातली भाजप-शिवसेना युती टिकून आहे. हे सर्व राजकारण मोदींना आणि उद्धव ठाकऱ्यांना व्यवस्थितपणे माहीत आहे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  2. दीड वर्षा पूर्वीचा हा लेख आजही अंतर्मुख करतो. भाजपला महाराष्ट्राच्या राजकारणाची नाडी समजली नाही. सेना भाजप युती तुटावी व भाजपने स्वबळावर मुंबई महापालिका लढवावी यासाठी मराठी पत्रकार उतावीळ झाले आहेत.
    लोकसत्तेने तर आपले प्रयत्न अग्रलेखापासून सुरु केले आहेत. काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे वर अग्रलेखात टीका करताना त्यांची जात काढण्यापर्यंत लोकसत्ता संपादकाची मजल गेली होती . परवाच्या द्विवार्ष पुर्ती निमित्त काढलेल्या पुरवणी मध्ये महाराष्ट्रात कोन्ग्रेस संपविण्यासाठी राष्ट्रवादीची साथ घ्यावी असा सल्ला देण्यात आला . मुंबईचे स्वतंत्र राज्य करावे असा किलोत्पाती सल्ला लोकसत्तेच्या दीड शहाण्या संपादकाने दिला होता, त्याला म्हणे मराठी अस्मिता वगैरे गोष्टीची अल्लेर्जी आहे .

    ReplyDelete
  3. दीड वर्षा पूर्वीचा हा लेख आजही अंतर्मुख करतो. भाजपला महाराष्ट्राच्या राजकारणाची नाडी समजली नाही. सेना भाजप युती तुटावी व भाजपने स्वबळावर मुंबई महापालिका लढवावी यासाठी मराठी पत्रकार उतावीळ झाले आहेत.
    लोकसत्तेने तर आपले प्रयत्न अग्रलेखापासून सुरु केले आहेत. काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे वर अग्रलेखात टीका करताना त्यांची जात काढण्यापर्यंत लोकसत्ता संपादकाची मजल गेली होती . परवाच्या द्विवार्ष पुर्ती निमित्त काढलेल्या पुरवणी मध्ये महाराष्ट्रात कोन्ग्रेस संपविण्यासाठी राष्ट्रवादीची साथ घ्यावी असा सल्ला देण्यात आला . मुंबईचे स्वतंत्र राज्य करावे असा किलोत्पाती सल्ला लोकसत्तेच्या दीड शहाण्या संपादकाने दिला होता, त्याला म्हणे मराठी अस्मिता वगैरे गोष्टीची अल्लेर्जी आहे .

    ReplyDelete