Thursday, October 16, 2014

राजकारणातल्या धुर्तपणाचा इतिहास



राजकारण हा दगाबाजीचा खेळ असतो, तसाच हुलकावण्यांचाही खेळ असतो. म्हणून तर त्यात कोणी कायमचा दुष्मन नसतो, की कोणी कायमस्वरूपी मित्रही असत नाही. प्रसंग व सुविधेनुसार मित्र व शत्रू बदलत असतात. पण तरीही काही प्रमाणात सभ्यतेचा मुखवटा पांघरलेला असल्याने, राजकीय नेत्यांना आपल्या दगाबाजीला मैत्रीची पराकाष्टा असल्याचा देखावा जनतेसमोर उभा करावा लागत असतो. सहाजिकच कोणी कोणाला त्यात दगाबाज म्हणून खिजवण्याचे कारण नाही. पण कुठल्याही कारणास्तव धुर्तपणा करून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्याला राजकारण म्हणत नाहीत. म्हणूनच हा असा जुगार असतो, की ज्यात कमालीची सावधानता पाळली जात असते. तरीही अनेकजण धुर्तपणाच्या आहारी जाऊन आत्मघात करून घेतातच. त्यातूनच मग राजकीय इतिहासाला वेगळे वळण मिळत असते. त्यामुळेच खरे धुर्त राजकारणी स्वत: कुठला धुर्तपणा करण्यापेक्षा इतरांच्या मुर्खपणाची प्रतिक्षा करीत असतात, किंवा इतरांना धुर्तपणाच्या झाडावर चढवून आपला डाव साधायची खेळी इतरांकडून करून घेतात. त्यासाठी अशा हरभर्‍याच्या झाडावर चढायला उतावळ्या झालेल्यांना चढवण्याचे कष्ट मात्र खरे धुर्त लोक घेत असतात. त्यात अर्थातच कॉग्रेसी नेते विलक्षण वाकबगार आहेत. भल्या भल्या अभ्यासू बुद्धीमान राजकारण्यांना कॉग्रेसी चाणक्यांनी असे जमीनदोस्त करून टाकले आहे, की त्या शहाण्यांना आपलाच कपाळमोक्ष करून घेण्यात धन्यता वाटलेली आहे. अलिकडचे उदाहरण म्हणजे ज्या डाव्यांच्या राजकीय प्रभावक्षेत्रात भाजपाचे कुठलेही आव्हान नसताना त्यांनी सेक्युलर प्रवचनाला फ़सून आपल्या खर्‍या प्रतिस्पर्ध्याशी हातमिळवणी केली आणि डावेच आपल्या बालेकिल्ल्यात संपून गेले. पण आजपर्यंत त्यांनी त्यासाठी कॉग्रेसवर कुठलाही आरोप केलेला नाही. सत्ता राबवताना डाव्यांची मदत घेत कॉग्रेसने ममताशी मैत्री राखली आणि गरज संपल्यावर डाव्यांना संपवताना कॉग्रेस ममताच्या सोबत होती. पण डाव्या ढुढ्ढाचार्यांना अजून आपल्या आत्मघातकी धुर्तपणाचा शोध लागला आहे काय?

कॉग्रेसच्या विरोधात एक एक राजकीय पक्ष उभा राहिला व त्यांनी आपापले प्रभावक्षेत्र निर्माण केले. त्यातूनच मग बिगर कॉग्रेस राजकारणाला सुरूवात झाली. परंतू भाजपाकडून आपल्या अस्तित्वाला देशव्यापी आव्हान उभे राहिल्यावर कॉग्रेसने सेक्युलॅरिझमचा राग आळवून डाव्यांना आपल्या पाठीशी येऊन उभे रहायला भाग पाडले. त्यातून त्यांचा बिगर कॉग्रेसवाद रसातळाला गेला आणि आपल्या बालेकिल्ल्यात डावे संपले. महाराष्ट्रात सेना-भाजपा युतीला रोखण्यासाठी पुरोगाम्यांना हाताशी धरून शरद पवार यांनी ज्या खेळी खेळल्या, त्यात भाजपा सेनेला रोखणे शक्य झाले नाही, मात्र कॉग्रेस व पवारांना जीवदान देऊन पुरोगामी अंतर्धान पावले. पण एकदा तरी कुणा पुरोगाम्याने पवार किंवा कॉग्रेसला आपल्या ‘हत्याकांडाचा आरोपी’ ठरवले आहे काय? याला खरे धुर्त राजकारण म्हणतात. उलट आज जुने कालबाह्य व दुर्बळ झालेले पुरोगामी कॉग्रेसची टिमकी वाजवून अजून सेना भाजपाला संपवण्याच्या गमजा करीतच असतात. याला धुर्तपणा म्हणतात. आपल्या एका शत्रूला दुसर्‍या विरुद्ध लढवून त्यांना क्षीण करायचे आणि आपण परस्पर सुरक्षित रहायचे. त्यासाठी कधीकधी आपणच पार मरणासन्न झाल्याचे अप्रतिम नाटक रंगवून आपल्या शत्रूमध्ये झुंज लावायची. ही खरी राजकीय रणनिती असते. आणि त्याचे प्रत्यंतर गेला अर्धशतकात वारंवार येत राहिले आहे. म्हणूनच तितका काळ मरगळलेल्या कॉग्रेसला सतत जीवदान मिळत राहिले आहे. १९७७ सालात चार राजकीय पक्ष विसर्जित होऊन त्यांनी कॉग्रेसला, इंदिरा गांधींचे समर्थ नेतृत्व असतांना पराभूत केले होते. पण मरगळल्या कॉग्रेसला मूठमाती देण्याच्या आधीच जनता पक्षातले समाजवादी आपल्याच जनता पक्षातल्या सहकारी जनसंघाला संपवायला उतावळे झाले. त्यातून मग जनता पक्षात फ़ुट पडली आणि पुन्हा फ़ुटलेली इंदिरा कॉग्रेस मुसंडी मारून पुढे आली. तिला रोखण्यासाठी त्याच जुन्या विरोधकांना विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या नेतृत्वाखाली एकत्र यावे लागले. तेव्हा तेच दहा वर्षापुर्वीचे कट्टर वैरी भाजपा व समाजवादी (जनता दल नावाने) एकत्र आले होते.

एकोणिस महिने तुरूंगात एकत्र कैद भोगलेल्यांनी दिड वर्षात एकमेकांशी वैर करताना पुन्हा इंदिरा गांधींना सत्तेवर आणून बसवले. त्यांच्या पुत्राला देशाच्या पंतप्रधानपदी बसवण्याची संधी तयार करून दिली. जनता पक्षाचे सरकार व बहूमत असताना एकमेकांचे पंख छाटण्याचा धुर्तपणा कोणी कशासाठी केला होता? त्यातून सर्वांनाच दहा वर्षे राजकीय वनवासात जाण्याची पाळी कोणी आणली होती? कॉग्रेसने नव्हेतर जनसंघ व समाजवाद्यांच्या धुर्तपणाने तशी अवस्था त्या दोघांवर आलेली होती. जनता पक्ष व त्याची लोकप्रियता एकट्या आपल्यालाच मिळावी; म्हणून जे धुर्त डावपेच या दोन्ही राजकीय गटांनी त्यावेळी खेळले, त्याचा तो परिणाम होता. पण जिंकलेल्या निवडणुकांची इतकी जबरदस्त नशा होती, की कॉग्रेस संपलेली नाही, तर एक निवडणूकीत सत्ता गमावून बसलीय; याचे भान कुणाला उरले होते? तेव्हा अर्थातच समाजवादी फ़ाटाफ़ूट घडवण्यात आघाडीवर होते. त्यांना कॉग्रेस आपला खरा शत्रू आहे याचे स्मरणही राहिलेले नव्हते. चरणसिंग यांना पंतप्रधान व्हायची घाई झाली होती आणि त्यासाठी मग थेट इंदिरा गांधी यांचा पाठींबाही घ्यायला काही वाटले नाही. तेव्हा चरणसिंग यांच्या शपथविधीनंतर इंदिराजींनी बोललेले शब्द आजही पक्के स्मरणात आहेत. तेव्हा फ़क्त दुरदर्शनच होते आणि चरणसिंगांच्या शपथविधीला उपस्थित राहून घरी निघालेल्या इंदिराजींना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली. इंदिराजी सूचक शब्दात म्हणाल्या, ‘निवडणूका जवळ आल्यात’. दोन महिने सरकार चालले आणि जेव्हा संसदेत बहूमत सिद्ध करायची वेळ आली, तेव्हा इंदिराजींनी पाठींबा काढून घेतला. मग पाठीबा दिलाच कशाला होता? त्यावर इंदिराजींचे उत्तर साधे सरळ होते. ‘पाठींबा सरकार बनवण्यासाठी होता, सरकार चालवण्यासाठी नव्हे.’ थोडक्यात ज्या इंदिराजींना पराभूत करण्यासाठी मतदाराने इतके मोठे बहूमत दिले होते, त्याच इंदिराजींच्या हातचे खेळणे होऊन जनता पक्षातले विविध गट खेळले आणि अवघे राजकारण उलथेपालथे होऊन गेले. आपल्या शत्रुंना आपण पराभूत व खच्ची झाल्याचे भासवून इंदिराजींनी त्यांनाच आपसात खेळवले, लढवले आणि लोळवले. धुर्तपणाचे भ्रम व भास असेच धुर्तपणाला उध्वस्त करून टाकत असतात.

ज्या शत्रूला संपवण्यासाठी आपण एकत्र आलेलो असतो, त्याला पुरता संपवल्याखेरीज एकत्र आलेल्यांनी आपसात लढायचे नसते आणि एकजुटीने रहायचे असते. त्याचे भान तेव्हा नव्हते आणि दुष्परिणाम बिगर कॉग्रेस पक्षांनी भोगलेच. पण म्हणुन त्यापासून त्यांना कुठलाच धडा शिकता आला नाही. म्हणूनच त्याची पुनरावृत्ती १९९० सालात पुन्हा झालीच. राजीव गांधी यांना पराभूत करून सत्ता मिळवणारे जनता दल आणि भाजपा यांच्या हाणामारीत पुन्हा कॉग्रेसला जीवदान मिळाले. अशा पक्षांना एकमेकांना इतकेच संपवायचे असेल, तर त्यांनी कॉग्रेसच्या विरोधात एकजुटीचे प्रयत्न तरी कशाला करावेत? त्यांनी आधी आपसात लढून एकमेव बिगर कॉग्रेसी पक्ष बनावे. मगच थेट कॉग्रेसशी लढायचा पवित्रा घ्यावा. म्हणजे निदान मतदाराची फ़सगत होणार नाही. कारण मतदार कॉग्रेस विरोधात कौल देतो आणि नंतर राजकीय पक्ष कॉग्रेसच्या मदतीने आपल्याच मित्राला संपवायचे डाव खेळू लागतात. त्यातून अर्धशतकात काय साधले आहे? तोच प्रयोग वारंवार राज्यातही यशस्वी होत राहिला आहे. कर्नाटकात त्यामुळेच जनता दल व त्याचा दिग्गज नेता देवेगौडा यांना खच्ची व्हायची वेळ आली. असल्याच डावपेचांनी चंद्राबाबूंनी आंध्रप्रदेशात आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला. महाराष्ट्रातले पुरोगामी पक्ष स्वत:ला संपवून गेले आणि ती जागा सेना-भाजपाने व्यापली. पण अजून कॉग्रेस पुरती नामोहरम झालेली नाही. अशावेळी सेना भाजपा यांनी एकमेकांच्या उरावर बसण्याचे राजकारण पवार आणि कॉग्रेसच्या पथ्यावर पडणारे आहे. पण धुर्तपणाच्या आहारी गेलेल्यांना ते कोणी कसे समजवायचे? स्वबळावर उभे रहाण्याची आकांक्षा चुकीची वा गैर नाही. पण त्यासाठी निवडलेली वेळ चुकीची असू शकते. त्याचे परिणाम दिसतीलच. कारण युती मोडून आपले बळ दाखवण्यासाठी युतीतल्या मित्रांना सोबत घ्यावी लागली आहे; ती अस्सल कॉग्रेसजनांची. मग धुर्त कोणाला म्हणायचे?  

4 comments:

  1. एकदम सही भाऊ...
    अतिसुंदर विश्लेषण...

    ReplyDelete
  2. Punha sangto,ya sarva vishleshanat "modi factor" nahi.yuti todnyachi idea kothlyahi marathi bjp netyachi nahi. Tumcha itihaas barobar ahe.parantu mala ase vaatate ki kahitari vegle ghadel

    ReplyDelete
  3. भाऊ, भाजपला बहुमत नाही मिळाले तर त्यांची खुप फरफट होणार आहे. शिवसेना त्यांना नाक घासत मदत मागायला लावेल. शिवसेनेच्या सर्व गोष्टी मान्य कराव्या लागतील. काँग्रेस बरोबर जाता येणार नाही. राष्ट्रवादी बरोबर गेलेतर लोक तोंडात शेण घालतील. मनसे बरोबरही आघाडी करता येणार नाही. राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे यूपी- बिहारची भीती. अपक्ष तेवढे निवडून येतील हे संगता येणार नाही. भाजपकडे बहुमताशिवाय दूसरा पर्यायच दिसत नाही.

    ReplyDelete
  4. Why are people suddenly carrying flags of the United Socialist Soviet Republic ?

    ReplyDelete