Saturday, October 25, 2014

ठाकरे बंधूंनी समंजसपणा दाखवला तर?



(कोणाच्या हाती कोणते पत्ते?  -उत्तरार्ध)

या निवडणूक निकालांनी सर्वात मोठे प्रश्नचिन्ह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर लावले आहे. खरे तर विधानसभेचे पत्ते पिसले जाण्याआधीच मनसेला खरा डाव खेळता आला असता. लोकसभेने त्यांना धडा शिकवला होता आणि एकूण वातावरण युती तुटण्याचे निर्माण झाले होते. मनसेचे काही नेते व आमदार अन्य पक्षात जाऊ लागले होते. त्यांना मोकळीक देऊन राज ठाकरे यांनी विधानसभा न लढवण्याचा व संघटना बळकट करण्याचा पवित्रा घेतला असता, तर मोठी खेळी होऊ शकली असती. मराठी अस्मिता पणाला लागल्याने एकतर्फ़ी सेनेला पाठींबा देऊन उमेदवारच उभे केले नसते, तर सेनेच्या जागा वाढल्या असत्या आणि राजमुळे पानिपत व्हायचे टळले, असे म्हणत सेनेचा मोठा वर्ग राजच्या बाजूला झुकला असता. बहूमत गमावणार्‍या उद्धव यांच्यावर मग राजला परत आणण्याचे दडपण आतूनच वाढले असते. एकीकडे सेनेला बळ मिळाले असते आणि त्यातला हिस्सा मान्य करायची वेळ एकाकी पडलेल्या उद्धववर आल्याने राजचे पुनर्वसन सोपे होऊन गेले असते. निकालानंतर पक्षाची जी वाताहत झाली आहे, त्यातून सावरण्याची चिंताही भेडसावली नसती. भाजपालाही दोन भावांची एकत्रित शक्ती नाकारण्याइतके बळ मिळाले नसते. पण आता ती वेळ निघून गेली आहे. पत्ते पिसण्यापुर्वीच खेळायची संधी राजनी गमावली होती. आता वरमलेल्या शिवसेनेत उद्धव एकाकी असताना मनसे विलीन करायचा पवित्रा राजना उंचीवर घेऊन जाऊ शकतो. कारण बहुतांश लढवय्ये शिवसैनिक भाजपाशी युतीवर नाराज आहेत आणि त्यांना उद्धव जवळ लढावू सहकारी बघायला आवडणारे असेल. म्हणूनच शिवसेनेत मनसेच्या विसर्जनाचा विचार लाभदायक ठरू शकतो. अर्थात सेना व मनसेच्या विसर्जनाला राजची लाचारी समजण्याचे कारण नाही. ती उद्धवचीही गरज मानावी. दोघांच्या मतांची बेरीज २२.४० टक्के होते. त्याचा अर्थ सोपा नाही. सेनेला विपरित परिस्थितीत १९.३० टक्के मते मिळाली, तेव्हाच मनसेची मते ३.१० टक्के आहेत. त्यांची बेरीज २२.४० टक्के असून भाजपाची ‘मोदीलाटे’तली मते २७.८० टक्के आहेत. पुन्हा दोन्ही कॉग्रेसनी एकत्र यायचे ठरवले, तर त्यांची बेरीज ३५ टक्क्यावर आहे. या तुलनेत स्वबळावर दोन्ही भाऊ २२ टक्क्यांच्या वर असतील, तर झेपावणारी शक्ती होते. २००७ मध्ये २४ टक्के मतांवर असलेल्या मुलायमनी २०१२ मध्ये पाच टक्के मते वाढवली आणि मायावतींना सत्ताभ्रष्ट व्हावे लागले होते. मोदीजादू संपल्यावर भाजपासाठी २७ टक्के टिकवणे सोपे काम नसेल. कारण तेव्हा भाजपा सत्तेवर असेल. सहाजिकच दोन भावांची सेना हे मोठे राजकीय आव्हान होऊ शकते. जर दोघांनी समजूतदारपणा दाखवला तर.

राष्ट्रवादी पक्षाची गेल्या काही महिन्यांपासूनच धोरणात्मक वाटचाल सुरू होती. पवारांना एनडीएत खुप आधीपासून यायचे होते. त्यासाठी राज्यातील कॉग्रेसचे खच्चीकरण आवश्यक होते. म्हणूनच आपले विश्वासू सहकारी आधीच भाजपामध्ये पाठवून, मग पवारांनी आघाडी मोडण्याचा पवित्रा घेतला. त्यात कॉग्रेसला गाफ़ील पकडून गोत्यात घालण्याची खेळी होती. पण कॉग्रेसनेही सुगावा लागल्याने सर्वच जागा लढवायची सज्जता आधीपासून केली होती. आघाडी असती तरी राष्ट्रवादीकडून उमेदवारांना दगा दिला जाण्याचे भय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उघडपणे बोलून दाखवत होते. पवारांचा त्यात दुहेरी हेतू होता. मागल्या पंधरा वर्षात त्यांनी सेक्युलर विचारांची जपमाळ ओढून पुरोगामी पक्षांना संपवले आणि राज्यातली अशा पक्षांची जागा व्यापलेली होती. उरलेली बिगर कॉग्रेसी जागा भाजपा सेनेने व्यापलेली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचा विस्तार व्हाय़चा तर कॉग्रेसला संपवणे व ती जागा व्यापणे, इतकाच पर्याय पवारांपुढे होता. त्यासाठीच त्यांनी निवडणूकीपुर्वी आघाडी मोडली आणि निकाल लागल्यावर कॉग्रेस शिवसेनेला सरकार बनवायला पाठींबा देणार होती अशी आवई उठवून दिली. त्याचा हेतू साफ़ आहे. पुरोगामी व अल्पसंख्य वर्गात कॉग्रेसची जितकी पुण्याई आहे, तिला खिंडार पाडायचे. तसे त्यांनी केले. कारण पवारांपाशी कुठलाच महत्वाचा पत्ता शिल्लक उरलेला नाही. भाजपात पाठवलेले अनुयायी व भाजपातील मित्र यांच्या सहाय्याने त्यांना सत्तेच्या उबेत रहायचे आहे. उमेदीचा काळ संपलेला आहे. पण शक्य असेल तितकी जागा व्यापण्याचा मर्यादित हेतू आहे. मुरब्बी खेळाडू असूनही त्यांच्या हाती किरकोळ डाव खेळायचेही पत्ते आलेले नाहीत. राहिला एकमेव शेवटचा खेळाडू कॉग्रेस. त्याला काय मिळाले व त्याने कोणती खेळी करावी?

तसे बघितले तर पृथ्वीराज चव्हाण हे लोकप्रिय नेता नाहीत वा नव्हते. पण त्यांनी विधानसभा निवडणूकीचे शिवधनुष्य हिंमतीने पेलले आहे. शरद पवार यांच्याशी झुंज देणारा विलासराव देशमुखांच्या नंतरचा हाच एकमेव नेता आहे. म्हणूनच इतक्या दारूण पराभवानंतरही पक्षाच्या हाती लागलेला तोच एकमेव महत्वा़चा पत्ता अहे. १८ टक्क्याहून अधिक मते आणि पृथ्वीराज यासारखा नेता असलेल्या पक्षाला, नव्याने पाच वर्षात आपले पाय रोवून महाराष्ट्रात उभे रहाणे अशक्य अजिबात नाही. अर्थात कॉग्रेसने श्रेष्ठीपणा सोडून नव्या दमाचा पक्ष राज्यात उभारण्यासाठी या नेत्याला मुक्तहस्त दिला पाहिजे. तोच आजच्या राजकारणातला कॉग्रेसचा प्रभावी जुगार असू शकतो. मात्र त्यात खुशालचेंडू माणिकराव ठाकरे वा आत्मकेंद्री नारायण राणे, यांच्यासारख्या बेड्या पृथ्वीराज यांच्या पायात अडकवून ठेवता कामा नयेत. दिर्घकाळानंतर सत्तेत येणार्‍या भाजपा सेना सरकारकडून उतावळेपणाने अनेक चुका होऊ शकतात. शिवाय त्यांच्यात असलेली कटूता सुखनैव सरकार चालण्याची हमी देत नाही. त्याचा राजकीय लाभ उठवण्याची कुवत पृथ्वीराज यांच्यापाशी नक्कीच आहे. एकत्र सत्तेत असतानाही त्यांनी राष्ट्रवादीच्या अनेक दांडग्या नेते मंत्र्यांना वठणीवर आणायची हिंमत दाखवली होती, हे विसरून चालणार नाही. अभ्यासू व सभ्य अशा या नेत्याला विधीमंडळात आपली चमक दाखवून नव्याने कॉग्रेसची प्रतिमा उजळण्यासाठी संधी दिली गेली पाहिजे. त्याच्या जोडीला कष्ट करू शकणारे निरपेक्ष कार्यकर्ते दिले, तर दोनचार वर्षात कॉगेसचे भवितव्य सुधारू शकेल. कारण राष्ट्रवादीचा मुळचा कॉग्रेसी पाठीराखा सत्तेशिवाय सैरभैर होणार आहे. त्याला संघटित करण्याचाही प्रयास करायची प्रयत्नशीलता चव्हाणांपाशी असू शकते. म्हणूनच या निवडणूक व निकालांनी पिसलेल्या पत्त्यातून कॉग्रेसच्या हाती लागलेला मोलाचा पत्ता, म्हणजे एक कष्टाळू प्रामाणिक व उजळ चेहर्‍याचा नेता पृथ्वीराज चव्हाण हाच आहे.

अशी एकूण दिवाळीतली राजकीय स्थिती आहे. दिवाळी संपताच सरकार बनवण्याच्या धावपळीला वेग येणार आहे. त्यात आघाडीचे खेळाडू म्हणजे सेना, भाजपा व राष्ट्रवादी कोणते डाव कसे खेळतात, ते दिसेलच. पण सत्ता स्थापनेनंतरही हे पक्ष आपल्या भवितव्याच्या बाबतीत कुठल्या खेळी करतील, त्याला अधिक महत्व आहे. कारण पुढले पत्ते पिसले जाण्यापुर्वीच अनेकांना आपापली बाजू मजबूत करायची तीव्र इच्छा असणारच. उलट भाजपासारख्या यशस्वी पक्षाला मिळालेले यश टिकवून अधिक मोठी झेप घेण्य़ाची इच्छा असायलाच हवी. कारण राजकारण हा अतिशय निर्दयी खेळ असतो. आज डोक्यावर घेतलेल्या पक्ष वा नेत्याला पुढली संधी मिळताच पायदळी तुडवायला तोच सामान्य मतदार तितकीच संधी शोधत असतो. पत्त्याच्या खेळात जसे आताचे आपल्या हाती असलेले हुकूमाचे पत्ते नंतर प्रतिस्पर्ध्याच्या हाती जाण्याची कायम शक्यता असते, त्यापेक्षाही हा राजकारणाचा खेळ अधिक जिव्हारी भिडणारा असतो. कारण तो मनोरंजनाचा खेळ नसतो, तर अवघे जीवन व प्रतिष्ठाच इथे पणाला लागलेली असते आणि प्रत्येक क्षण अळूवरचे पाणी असते. (समाप्त)

1 comment:

  1. मनसेला शिवसेनेत विलीन व्हायला पाहिजे

    ReplyDelete