Sunday, November 16, 2014

बाळासाहेबांचे स्मारक कसे असावे?

 

आता त्या घटने्ला दोन वर्ष पुर्ण झालीत. ऐन दिवाळीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची प्रकृती खालावली व ढासळत गेली. मग देशभरच्या महत्वपुर्ण नेते व्यक्तींची मातोश्री या ठाकरे निवासस्थानी रीघ लागली होती. दोन दिवस कलानगरच्या परिसरात पोलिसांना वाहतूक व गर्दीचे नियंत्रण करण्यात नाकी दम आला होता. कारण काही बडे लोक मातोश्रीपर्यंत पोहोचू शकत असले, तरी बाळासाहेबांवर प्रेम करणारा हजारोच्या संख्येतला शिवसैनिक मात्र रस्त्यावर बाहेरच खोळंबला होता. मग त्या दिपोत्सवात मुंबईच्या बहुतेक भागातले आकाशकंदिल व रोषणाई विझली होती आणि त्यांच्या अखेरच्या झुंजीत मदत करणार्‍या डॉक्टरांनी हात टेकले होते. प्रदिर्घकाळ मुंबईवर आपला प्रभाव पाडणारे शिवसेनाप्रमुख मृत्य़ूच्या स्वाधीन झाले होते. दुसर्‍या दिवशी त्यांची अंत्ययात्रा निघाली आणि त्यासाठी अभूतपुर्व जनसागर लोटला होता. त्याची अपेक्षा होतीच. म्हणूनच वाहतुक फ़िरवण्यात आली, तशीच अंत्यसंस्काराची जागाही अपवादात्मक निवडण्यात आलेली होती. स्मशानभूमी सोडुन अन्यत्र याप्रकारचे विधी होऊ शकत नाहीत. पण लोटणार्‍या गर्दीचे भान ठेवून सरकारने अखेरच्या क्षणी शिवाजीपार्क या स्थळी अपवाद म्हणून अंत्यसंस्कार करण्याचा घाट घातला. तशी सज्जता अल्पावधीत केली. खरेच मुंबईच्या इतिहासात असा अंत्यविधी व अंत्ययात्रा कोणाची झाली नव्हती. पण मग ज्यांना त्यात वेळीच येऊन सहभागी होता आलेले नव्हते, त्यांची पुढले दोनतीन दिवस तिथे रीघ लागलेली होती. जिथे अंत्यसंस्काराचा चौथरा उभारला होता, तेच मग माथा टेकण्याचे स्थळ झाल्याचे चित्र उभे राहिले. पण त्यातून मग एक नवाच वाद उदभवला होता. जिथे अंत्यसंस्कार झाले, तेच साहेबांचे स्मारक असल्याचा दावा काही आगावू तोंडाळ लोकांनी सुरू केला आणि नसतीच भानगड उभी राहिली होती. त्यातून मग बाळासाहेबांचे स्मारक हा विषय काही दिवस गाजत होता.

आता त्या घटनेला दोन वर्ष पुर्ण होत आहेत आणि अजून कुठे त्यांचे स्मारक उभे राहू शकलेले नाही. त्या दिवसानंतर काही महिन्यांनी तशा हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यात शिवाजीपार्क हेच स्मारक करावे, अशीही आवई उठवली गेली आणि अखेर त्यात वारस म्हणून उद्धव ठाकरे यांना हस्तक्षेप करून तो विषय संपवावा लागला होता. मात्र तिथून जवळच पार्कातच एक छोटा भूभाग उद्यानासारखा राखून त्यात पालिकेनेच साहेबांच्या स्मृतीचे जतन केलेले आहे. आजही अनेकजण तिथेच जाऊन त्यांना श्रद्धांजली देतात. शिवसैनिक तर जातातच. पण त्यांच्याखेरीज अनेकजण त्या स्थळाला भेट देतात. पक्षाध्यक्ष झाल्यावर भाजपाचे अमित शहा मुंबईत प्रथम आले, तेव्हा त्यांनीही तशी भेट दिलेली होती. पण त्याला बाळासाहेबांचे स्मारक असे कोणी म्हटलेले नाही आणि अधूनमधून त्यांच्या भव्य स्मारकाच्या कल्पना मांडल्याही जात असतात. पण अजून त्याला कुठलेही नेमके स्वरूप येऊ शकलेले नाही. त्यावेळी तोंडपाटिलकी करणारेही आता स्मारकाच्या गोष्टी विसरून मंत्रीपदांच्या गप्पात रमलेले आहेत. असो, आज बाळासाहेबांचा स्मृतीदिन आहे आणि म्हणूनच त्यांच्या स्मारकाचा विषय बोलायला हरकत नाही. त्यांचे स्मारक कुठे व किती भव्य असावे, याला फ़ारसा अर्थ नाही. त्यापेक्षा शिवसेनाप्रमुखांचे स्मारक कसे असावे, हा प्रश्न महत्वाचा आहे. हे स्मारक चुना विटा वा सिमेन्टच्या साहित्याचे असावे काय? की त्यांनी आपल्या हयातीतच ज्या असंख्य स्मृती लक्षावधी मराठी माणसे व चहात्यांच्या मनात निर्माण करून ठेवल्यात, त्यांचे स्मारकात जतन व्हायला हवे? त्यांच्या चहाते व अनुयायांना त्याचाच निर्णय करावा लागणार आहे. स्मारक म्हणजे काय असते? पुतळा वा इमारत हे स्मारक असते काय? की अशा मोठ्या व्यक्तीने उभारले त्या कामाचे विचारांचे वा भूमिकेचे जतन म्हणजे स्मारक असते?

शिवसेनाप्रमुख हे योगायोगाने राजकीय नेता बनले. अन्यथा हा माणूस उत्तम कलाकार व्यंगचित्रकार होता. सहाजिकच त्यांच्या व्यावसायिक गुणवत्तेचे स्मारक इमारतीच्या स्वरूपात होऊ शकते, आर्ट गॅलरी वा व्यंगचित्र शिक्षण देणार्‍या संस्थेच्या रुपाने स्मारक होऊ शकेल. तिथे त्यांनी वापरलेल्या वस्तूंसकट साहित्याचेही छान प्रदर्शन मांडता येईल. पण आपला पेशा व कलेने त्यांना इतके प्रसिद्धीच्या झोतात आणले नव्हते. त्यांच्या राजकीय कर्तबगारीने त्यांना जनमानसावर सत्ता गाजवणारी व्यक्ती बनवले होते. म्हणूनच त्यांचे स्मारक इमारत वा पुतळ्यातून होऊ शकत नाही. वस्तुसंग्रहालयातून होऊ शकत नाही. त्यांनीच लावलेल्या शिवसेना नावाच्या रोपट्याचा बहरलेला वृक्ष करण्यातून हे स्मारक कायम स्वरूपी उभे राहू शकते. त्याला आवश्यक भूखंड पृथ्वीतलावरच्या जमीनीचा तुकडा असून भागणार नाही. तो भूखंड त्यांनी आधीच मिळवलेल्या जनमानसातील स्थानात वसलेला आहे. शिवसेनाप्रमुख म्हणून त्यांच्याविषयी जी आत्मियता, आस्था वा प्रेम कोट्यवधी लोकांच्या मनात आहे, त्याची जोपासना हेच मग त्यांचे स्मारक असू शकते आणि त्याचे दृष्य स्वरूप शिवसेनेची मजबूत दणदणित संघटना हेच असू शकते. गांधी-नेहरू यांची देशभर शेकडो स्मारके आहेत आणि आज त्यांच्या विचारांचा देशभर संपुर्ण पराभव होऊन जाताना आपण बघत आहोत. कारण त्यांच्या अनुयायांनी विचारांची व त्यांच्या संघटनेची जोपासना करण्यापेक्षा त्यापासून मिळणारे लाभ उकळण्यात धन्यता मानली. बदल्यात त्या महनीय व्यक्तींना पुतळे व स्मारकात चिणून गाडून टाकले. आज त्यांची कॉग्रेस देशोधडीला लागली आहे. पण सगळीकडली स्मारके उभी आहेत आणि अधिक उभी रहात आहेत. अशी स्मारके ही त्या महान व्यक्तीची अवहेलनाच ठरू लागली आहे. शिवसैनिकांना बाळासाहेबांचे असे काही भव्य स्मारक हवे आहे काय?

२०-३० लाख लोक दोन वर्षापुर्वी याच दिवशी लोटले, त्यांनी कोणाकडे बघून तिथे धाव घेतली होती? शिवसेनेचे किती मंत्री सत्तेत होते? किती आमदार आणि खासदार सेनेच्या खात्यात होते? कुठल्या राज्यात शिवसेनेच्या हाती सत्ता होती? किती दिवस महाराष्ट्रात तरी सेना सत्तेवर होती? स्वत: बाळासाहेब कधी कुठल्या सत्तापदावर बसलेले होते? त्यांनी कधी निवडणुक तरी लढवली होती काय? त्या दिवशी उन्हातान्हात, चेंगरणार्‍या गर्दीत, कित्येक तास घुसमटलेल्या तहानेलेल्या लाखो लोकांपैकी कितीजणांना सत्ता वा मंत्रीपदाची अपेक्षा होती? कोणी तिथे उमेदवारी मागायला आला नव्हता, की सत्तेत सहभागी व्हायचे दडपण आणायला आलेला नव्हता. त्यापैकी कितीजणांना खरेच त्यांचे अंत्यदर्शन तरी घेता आले? त्यातले बहुतेकजण दर्शन घ्यायला आलेलेच नव्हते. आपापल्या मनात दाटलेल्या भावभावनांचे दर्शन घडवायला तिथे गर्दी लोटली होती. तितके अभूतपुर्व स्मारक कुठल्या नेत्याचे क्वचितच झाले असेल. ती घटनाच एक स्मृती व स्मारक होऊन गेली. ते शिवसेनेचे खरे स्वरूप होते. बाळासाहेबांनी जी संघटना उभारली, तिने साक्षात अवतार घेतला होता आणि तिचे जतन हे़च त्यांचे भव्यदिव्य स्मारक असू शकते. शिवसेनेचा बाणा किंवा ताठ कणा, अशी त्यांचीच घोषणा होती आणि त्याचे सेनेने सतत प्रदर्शन घडवणे, हेच त्यांच्यासाठी खरे स्मारक असू शकते. मंत्रीपदे किंवा निवडणूकीतल्या जागा मागणारी अगतिक संघटना, ही शिवसेना असू शकत नाही की बाळासाहेबांचे स्मारकही असू शकणार नाही. तसे झाले आणि सत्तेच्या मागे धावत सुटलेली संघटना झाली, तर शिवसेनाच संपून जाईल. मग शिवसेनाप्रमुखांचे कुठलेही स्मारक शिल्लक उरणार नाही. नेहरू गांधींसारखे त्यांचे पुतळे शिल्लक उरतील. आज प्रत्येक शिवसैनिकाने त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना आपापल्या मनाला प्रश्न विचारावा. सत्ता हवी की बाळासाहेबांची शिवसेना हवी? साहेबांचे कसे स्मारक असायला हवे?

3 comments:

  1. भाऊ,कोणतीही संघटना निश्चित उद्दिष्ट,कार्यक्रम किंवा राजकीय ध्येयाशिवाय किती काळ टिकणार ?बाळासाहेब हे वेगळेच रसायन होते.त्यांचे वारस त्यांच्यासारखे नाहीत.शिवाय जगही झपाट्याने बदलते आहे.ताठ कण्याचे सतत प्रदर्शन घडवणे हेच बाळासाहेबांचे खरे स्मारक ठरेल असे तुम्ही म्हणता.सध्या बिनकण्याच्या माणसांची पैदास जोरात आहे.कसे जुळवायचे हे गणित शिवसेनेने ?

    ReplyDelete
  2. Really great article. Please support Shivsena. Shivsena work from heart........

    ReplyDelete
  3. शिवसेनेचा बाणा आणि ताठ कणा हेच बाळासाहेबांचे स्मारक!

    ReplyDelete