Wednesday, January 14, 2015

अपवादाचा नियम होत नसतो



गेल्या दोनचार दिवसात अनेक शहाण्या पुरोगाम्यांची तारांबळ बघून हसावे की रडावे, त्याचा अंदाजच येत नाही. कारण त्यांनी कुठले कुठले मित्र वा आदर्श शोधून इस्लामच्या बचावासाठी एखाद्या कडव्या मुस्लिमापेक्षा अधिक झुंज चालविली आहे. प्रत्येक मुस्लिम दहशतवादी नसतो, इथपसून हमीद दलवाईपर्यंत कुठली उदाहरणे शोधलीत हे बघून आपल्याला थक्क व्हायची पाळी येते. पण यापैकी कितीजण हमीद दलवाईंना त्यांच्याच धर्मबांधवांनी कोणती वागणूक दिली त्याचे स्मरण कशाला होत नसेल? हरकत नाही. ज्यांना हमीदचा चेहरा मुस्लिम म्हणून पुढे आणायचा असेल त्यांचे स्वागतच आहे. पण जेव्हा कधी असाच प्रसंग ओढवतो तेव्हा त्यापैकी कुणा पुरोगाम्याला गांधी वा तत्सम चेहरे कशाला आठवत नाहीत? तेव्हा त्यांनाच नेमका गोडसे हा चेहरा वा उदाहरण कशाला आठवते? आपण जेव्हा पॅरिसमधल्या भीषण हिंसा व हत्याकांडाविषयी बोलत असतो, तेव्हा अविचारी कृतीच्या निमीत्ताने चर्चा चालू असते. सहाजिकच सुविचारी शहाण्याप्रमाणे वागणार्‍या व्यक्तींबद्दल तिथे बोलण्याचे कारण असते काय? नसेल तर तसली उदाहरणे देण्याचा मतलब काय असतो? अर्थात त्यातून त्यांना सगळेच मुस्लिम असे हिंसाचारी वा दहशतवादी नाहीत असेच सुचवायचे असते. तो युक्तीवादही खोटा नसतो. जगात दोनशे कोणी मुस्लिम असतील आणि यातले दोनपाच हजार अतिरेकी कृत्ये करत असतील, तर एकूणच दोनशे कोटी मुस्लिमांना जिहादी ठरवण्याचा अट्टाहास गैरलागू आहे. म्हणूनच हमीदचे उदाहरण गैरलालू म्हणता येत नाही. पण अल्ला हो अकबर अशा घोषणा देत ज्यांनी बेछूट गोळ्या झाडल्या तेव्हा हल्लेखोरांचा इस्लामशी संबंध नाही असा दावा करीत हमीदचे नाव पुढे आणणार्‍यांची म्हणूनच कीव करावीसे वाटते. कारण नेमकी हीच भूमिका त्यांना मालेगावचा विषय आला मग कशाला घेता येत नाही?

जेव्हा कधी हिंदूत्वाचा धर्मांतर वा घरवापसीचा विषय येतो, तेव्हा त्यात किती संख्येने हिंदू गुंतलेले असतात. शंभर कोटी हिंदू जगात आहेत असे मानले जाते. त्यातला एक कोणी नथूराम गोडसे असतो किंवा मालेगावच्या घटनेचा आरोप असलेल्या कोणी पुरोहित वा साध्वी प्रज्ञा असतात. त्याच्यापलिकडे नाव आठवत सुद्धा नाही. पण त्यापैकी कुठले नाव किंवा प्रसंग आला की तात्काळ असे सेक्युलर पुरोगामी मंडळी गांधींचा उल्लेख का करत नाहीत? गोडसे वा साध्वी यांच्यावेळी हिंदू तर गांधी सुद्धा होते असे उदाहरण कशाला आठवत नाही? इस्लामिक दहशतीची हिंसक घटना घडल्यावर हमीद आठवणार्‍यांना मालेगावचा विषय आला मग त्याचा युक्तीवादी भूमिकेत हिंदूमधले महात्मे कशाला आठवत नाहीत? किती चमत्कारिक गोष्ट आहे ना? प्रत्येक मुस्लिम वक्ता प्रवक्ता, मग तो धर्मानुयायी असो किंवा पुरोगामी असो, विनाविलंब आपल्या धर्माचे शांतीप्रवचन सुरू करतो. पण तिथेच चर्चेत सहभागी झालेला जन्माने हिंदू प्रवक्ता हिंदूधर्माच्या शांततावादी तत्व वा सुत्राचा चुकीनही उल्लेख करत नाही. सेक्युलर हिंदू असेल तर त्याला हे आठवत नाहीच. पण अगदी किती हिंदूत्ववाद्यांना अशावेळी गांधींचा शांतीमार्ग आठवतो? गोडसेवर खुनाचा आरोप असेल, पण जितका गोडसे हिंदू होता तितकेच महात्मा गांधी सुद्धा हिंदू धर्माचे अनुयायी होते. मग अशा चर्चा होतात, तेव्हा कोणी गोडसेपेक्षा गांधींकडे बोट कशाला दाखवत नाही? उलट हिरीरीने हिंदु दहशतवाद असा शब्द वापरण्याचा अट्टाहास होतो. म्हणूनच ही सेक्युलर विकृती होऊन बसली आहे. त्यातून विषयाला बगल द्यायची आणि वाचणार्‍या ऐकणार्‍यांची दिशाभूल करण्यापेक्षा अशा युक्तीवादात अन्य कुठला हेतू असू शकतो? वाहिन्या असोत किंवा छापा माध्यमात असो, असल्या चर्चा नेहमी म्हणूनच फ़सव्या व दिशाभूल करणार्‍या असतात आणि लोकांचा त्यावरचा विश्वासच उडाला आहे.

बारकाईने कोणी अशा चर्चा ऐकत असेल, तर त्यातला दिशाभूल करण्याचा हेतू लपत नाही. विषय हिंसा व घातपाताचा असेल, तर कुठल्याही धर्माच्या अनुयायांनी केली त्या हिंसेचा विषय चर्चिला गेला पाहिजे. त्यात मग हिंसात्मक कृती वा हिंसाचारी व्यक्ती यांचीच उदाहरणे समोर आणली गेली पाहिजेत. त्याला छेद देणार्‍या व्यक्तींची वा कृतीची उदाहरण निव्वळ फ़सवणुक असते. याचे कारण हमीद दलवाई किंवा तत्सम मुस्लिमांचा अशा चर्चेत उल्लेख अपवादात्मक असतो. हमीद दलवाई हा अपवाद असतो. म्हणूनच तो नियम नसतो. कुठलाही नियम मुळात बहुतांश खरा ठरणारा अनुभव असतो. त्या अनुभवात क्वचितच बदल होत असेल, तर त्याला अपवाद म्हणतात. म्हणूनच तो नियम नसतो. किंबहूना अपवादाने नियम सिद्ध होतो असे म्हणूनच म्हटले जाते. त्याचा अर्थ इतकाच की अपवाद असतो, तसे नेहमीच घडत नसते, तर त्याच्याच नेमके उलत घडणार असते. म्हणूनच अपवाद बघितला की त्याचे उदाहरण नियम म्हणून देता येत नाही. जेव्हा आपण अपवाद दाखवतो, तेव्हा जग त्यानुसार चालत नाही, अशीच ग्वाही देत असतो. म्हणूनच पॅरिसची घटना घडल्यावर कोणी हमीद वा तत्सम शांतीप्रिय मुस्लिमाच्या वर्तनाचे उदाहरण देत असेल, तर त्याचा खरा अर्थ असा की इस्लाम शांततावादी नसल्याचा नियमच सिद्ध होत असतो. त्याचे पुरावे सातत्याने समोर येत असतात. प्रत्येक हिंसेच्या वेळी जिहादी धर्माच्या घोषणा देतात, बहुतेकदा मशिदीत कारस्थाने शिजवली जातात. अशा घटनाक्रमात धर्ममार्तंडांचा पुढाकार असतो. प्रत्येक राजसत्तेला आव्हान देणार्‍या इस्लामिक चळवळीत धर्माचेच आव्हान असते आणि परिणामी हिंसाचार घडलेला असतो. म्हणूनच मग हमीद दलवाई हा अपवाद असतो, ज्याने प्रत्यक्षात नियम सिद्ध होतो. पण बोलणार्‍यांचा आवेश असा असतो की अपवाद हा नियम असून ‘नियमित; येणारा अनुभव हा अपवाद आहे.

काही काळ सामान्य माणसे अशा वाचाळतेचे बळी होतात. पण शेवटी लोकही अपवाद व नियम समजू शकतात. कारण नियम म्हणजे सातत्याने येणारा अनुभव असतो. कधीतरी येणार्‍या अनुभवाने नियम तयार होत नाहीत. आणि जगात जगताना सातत्याने येणार्‍या अनुभवाला सामोरे जावे लागत असते. जाणते पुरोगामी वा सेक्युलर सांगतात, तसाच जर अपवाद म्हणजे नियम मानला तर लोकांना जगणे शक्य होत नाही. म्हणूनच लोकांना अशा पोपटपंचीचा कंटाळा आलेला आहे. पॅरीस येथे जो हिंसाचार झाला त्यानंतर तिथे अकारण अन्य मुस्लिमांवर किंवा मशिदीवर हल्ले झाले, ती कशाची प्रतिक्रिया होती? सततच्या दिशाभुलीला कंटाळलेले लोक आता प्रत्येक मुस्लिमाला जिहादी समजू लागणार आहेत आणि त्याला कुठल्याही घातपात्यापेक्षा पुरोगामी पोपटपंची कारणीभूत आहे. कारण ज्यांनी लोकांना अपवादच नियम असल्याची फ़सवी हमी दिली, त्याची ही प्रतिक्रिया आहे. याच वाचाळतेने भारतात हिंदू मुस्लिम असे राजकीय सामाजिक धृवीकरण घडवून आणण्यास हातभार लावला आहे. भारतातच नव्हेतर जगभरच्या सेक्युलर पुरोगामी पोरकटपणाने इस्लामिक जिहादी मानसिकतेला खतपाणी घातले आहे. दुर्दैव असे की त्याचे दुष्परिणाम सामान्य शांतीप्रिय मुस्लिमाला मात्र भोगावे लागत असतात. कालपरवा फ़्रान्सच्या विविध भागात मुस्लिमांवर जे हल्ले झाले ती ‘शार्ली हेब्दो’वरील हल्ल्यापेक्षा सेक्युलर दिशाभूलीवर व्यक्त झालेली नाराजी अधिक आहे. अपवादाला नियम ठरवण्याच्या अतिरेकातून आता लोक शहाण्यांना नियम शिकवू लागलेले आहेत. मात्र त्याचे चटके असल्या कुठल्याही वादात नसलेल्या व सामान्य जीवन जगणार्‍या मुस्लिम नागरिकांना बसत असतात. म्हणूनच जिहादी वा अतिरेकी धर्मांध हे असण्यापेक्षा अशा कृत्यावर बौद्धिक पांघरूण घालून नियमाचा अपवाद करणारे दिडशहाणे ही यातली खरी समस्या आहे.

2 comments:

  1. टीप : मी एक मालेगाव चाच एक हिन्दू रहिवासी आहे

    ReplyDelete
  2. Or watch this (Alternate link) :
    https://www.youtube.com/watch?v=iI74lOgfxk4

    ReplyDelete