Monday, January 19, 2015

साक्षी महाराजांचा सेक्युलर अजेंडा?



गेल्या काही महिन्यात अनेक सेक्युलर मंडळींना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भवितव्याची चिंता वाटू लागल्याचे दिसत आहे. कारण गेल्या लोकसभा निवडणूकीत मोदींनी विकासाचा नारा देऊन लोकांची मते मिळवली होती. चुकूनही मोदी यांनी आपल्या भाषणात वा प्रचारात हिंदूत्व शब्द येऊ दिलेला नव्हता. फ़ार कशाला निवडणूकीच्या काही महिने अगोदर कुंभमेळ्याचे आयोजन झाले, तेव्हा तिथे साधूसंतांच्या मेळाव्यातही मोदींना आमंत्रित केले होते. पण कुठले तरी कारण देऊन मोदींनी तिकडे जायचे कटाक्षाने टाळले होते. तिथेच साधूसंत मोदींना पंतप्रधान होण्यासाठी आशीर्वाद देणार होते. इतके होऊनही कोणा सेक्युलर विचारवंत पत्रकाराने मोदी हिंदूत्ववादी नसल्यावर विश्वास ठेवला होता काय? उलट अशोक सिंघल वा अन्य कोणी काय बोलतात, त्याचा जाब मोदींचा विचारण्याची सेक्युलर स्पर्धाच चालली होती. अशा कुणाच्याही विधानांचा अर्थ मोदींची छुपी चाल, असाच लावला जात होता आणि मोदी म्हणजेच कडवे हिंदूत्व असा सेक्युलर प्रचाराचा धुमधडाका चालू होता. भाजपाच्या सरचिटणिसपदी मोदींचे निकटवर्ति अमित शहांची नेमणूक होऊन, त्यांना उत्तर प्रदेशचे प्रभारी करण्यात आल्यावर काय परिस्थिती होती? कामाला आरंभ करण्यापुर्वी अमित शहांनी अयोध्येला भेट दिली व रामलल्लाचे दर्शन घेतले. तर त्यांचा मनसुबा राममंदिर उभारण्याचाच असल्याचा किती तावातावाने सेक्युलर प्रचार चालू होता? शहांनी कुठेही मंदिराचा उल्लेख आपल्या भाषणात वा अजेंड्यात केला नव्हता. अयोध्येत एका पत्रकाराने रामलल्लाकडे कोणते मागणे केले म्हटल्यावर; शहा इतकेच म्हणाले की लौकरात लौकर तिथे रामाचे भव्य मंदिर उभे रहावे, अशीच इच्छा व्यक्त केली होती. पण तेच विधान शहांचा व पर्यायाने मोदींचा अजेंडा असल्याचा प्रचार धुमधडाक्यात कोणी चालविला होता? तमाम सेक्युलर माध्यमेच असा प्रचार करीत होती ना?

मग असा प्रश्न येतो, की हिंदूत्व असो, हिंदू राष्ट्र असो, किंवा अयोध्येतील भव्य राममंदिर असो, तो नेमका कोणाचा अजेंडा आहे? अमित शहा किंवा नरेंद्र मोदींसह त्यांच्या भाजपा पक्षासह मित्र पक्षापैकी कोणाचाच असा अजेंडा नाही. कारण त्यांनी त्याचा निवडणूकीत प्रचार केला नव्हता. तसा विषयही चर्चिला नव्हता. पण त्यांचे सेक्युलर विरोधक मात्र सातत्याने मोदी व भाजपा यांच्या माथ्यावर हिंदूत्वाचा अजेंडा मारत होते. त्यांनी कितीही नाकारले तरी सेक्युलर मंडळी अगत्याने हिंदूत्व भाजपाच्या व मोदींच्या माथी मारत होती. सबका साथ सबका विकास असे मोदी म्हणत होते आणि सेक्युलर त्यांच्यावर हिंदूत्वाचा अजेंडा लादत राहिले होते. मोदी विकासासाठी लोकांकडे मते मागत होते आणि मोदींना मत म्हणजे हिंदूत्वाला मत; असा प्रचार सेक्युलर पक्षांसह पत्रकार करत होते. म्हणजेच हिंदूत्व हा भले मोदींचा अजेंडा नसेल आणि त्यांनी विकासासाठी लोकांकडे मते मागितली असतील. पण म्हणून जी काही मते भाजपा व मोदींना मिळाली; ती कुठल्या कारणास्तव मिळाली, त्याचा कुठेही खुलासा होऊ शकलेला नाही. भाजपाचा दावा मान्य करायचा, तर त्यांना मोदींच्या विकासाच्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. पण निकालानंतरही सेक्युलर मंडळींनी ते सत्य मानले होते काय? प्रत्येक सेक्युलर पक्ष, विचारवंताच्या मते मोदींनी धृवीकरणातून मते मिळवली होती. म्हणजेच मोदींना विकासासाठी लोकांनी मते दिल्याचे सेक्युलर लोकांनी मान्य केले नव्हते. हिंदू मतांचा गठ्ठा तयार करून व मुस्लिम अल्पसंख्यांकाना अलग पाडून, मोदींनी तो भव्यदिव्य विजय संपादन केला असा सर्व सेक्युलर शहाण्यांचा निष्कर्ष होता. म्हणजेच मोदी वा भाजपाला मिळालेली मते विकासासाठी नव्हती, असाच सेक्युलर निष्कर्ष होता. मग तो मोदींना मान्य असो किंवा नसो. लोकांनी मोदींला कौल दिला, तो हिंदूत्वाच्या उन्मादातून दिला हेच सेक्युलर सत्य होते ना?

आता असा मुद्दा उभा रहातो, की गेल्या दोनतीन महिन्यापासून ही सेक्युलर मंडळीच आपला तो शास्त्रशुद्ध निष्कर्ष कशाला विसरून गेली आहेत? त्यांच्बा तोंडी नरेंद्र मोदी यांना विकासासाठी मते मिळाली, अशी भाषा कशामुळे आलेली आहे? मोदींनी विकासासाठी मते मागितली आणि आता त्यांचेच सहकारी हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन धुमाकुळ घालत असल्याच्या तक्रारी कशाला चालू आहेत? खरेच मोदी विकासासाठी मते मागत होते, तर त्यावर याच सेक्युलरांनी तेव्हा सात आठ महिन्यापुर्वी विश्वास का ठेवला नव्हता? तेव्हा मोदींच्या विकासात हिंदूत्वाचा छुपा अजेंडा हे सेक्युलर कशाला शोधत होते? त्यांना त्याचीच खात्री होती, तर त्यांनी आज आपलीच पाठ थोपटून घ्यायला नको काय? भाजपाचे ठराविक भगवे लोक हिंदूत्व किवा घरवापसीचे कार्यक्रम करत असतील, तर सेक्युलर शहाण्यांनी आपले भाकित खरे ठरल्यामुळे स्वत:ची पाठ थोपटायला हवी. उलट तेच पंतप्रधानांना आवाहन करतात, की मोदींनी या अतिरेकी हिंदूत्ववादी भाजपावाल्यांना रोखायला हवे. ह्या चोराच्या उलट्या बोंबा नाहीत काय? कारण जे कोणी साक्षी महाराज किंवा साध्वी निलांजना चार मुले जन्माला घालण्याची वा हिंदूराष्ट्र करण्याची मुक्ताफ़ळे उधळत आहेत, त्यांनी मोदींना झुगारलेले आहे. मते मागताना मोदींनी दिलेला शब्द पाळण्यापेक्षा सेक्युलरांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार हे भगवे भाजपाई कार्यरत झाले आहेत. त्यांनी मोदींच्या विकासाच्या अजेंड्याला झुगारून सेक्युलरांनी लादलेल्या हिंदूत्वाचा अजेंड्यावर काम चालू केले आहे. तो सेक्युलर विजय नाही काय? कारण लोकसभा मतदानापुर्वी मोदी सतत विकासाची भाषा बोलत होते आणि सेक्युलर त्या विकासात हिंदूत्वाचा अजेंडा शोधत होते. भगव्या भाजपाईंनी सेक्युलरांचा शब्द प्रमाण मानला असेल तर तो सेक्युलरांचा विजय नाही काय? तमाम सेक्युलर शहाण्यांनी साक्षी महाराजांची पाठ थोपटायला नको काय?

एक गोष्ट यातून स्पष्ट होते, की भाजपा किंवा रा. स्व. संघाचा हिंदूत्वाचा अजेंडा असो किंवा नसो. नरेंद्र मोदी यांचा विकासाचा अजेंडा असो किवा नसो. पण सेक्युलर मंडळींचा अजेंडा मात्र पक्का हिंदूत्ववादी आहे. तो अजेंडा पुर्णत्वास नेण्याची ताकद सेक्युलरांपाशी नसेल. म्हणून त्यांनी तो अजेंडा भाजपा व संघाच्या माथी मारलेला आहे. मग भाजपा वा मोदींची इच्छा असो किंवा नसो, त्यांना सेक्युलर मंडळी हिंदुत्वाच्या मार्गापासून विचलीत होऊ देणार नाहीत. मोदींनी कितीही जंग जंग पछाडले तरी बिघडत नाही. सेक्युलर मंडळी भाजपाला व त्यातल्या अतिरेकी गटांना चिथावण्या देऊन हिंदूत्वाचा अजेंडा पुढे रेटल्याशिवाय रहाणार नाहीत. लोकसभा निवडणूकीचे वेध लागण्या आधीपासून सेक्युलरांनी मोदी हा भाजपाला नवा चेहरा मिळवून दिला आणि त्याला देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचवण्याचे महत्कार्य पार पाडलेले होतेच. लोकसभेत भाजपाला व मोदींना यश मिळाल्यावर विकासाच्या दिशेने चाललेला कारभार यशस्वी झाला, तर मग हिंदूत्वाचे काय याची संघालाही भ्रांत नव्हती, इतकी या सेक्युलर विचारवंतांना चिंता पडलेली होती. म्हणूनच त्यांनी मोदींच्या विकास अजेंड्याला शह देणार्‍या घरवापसी, हिंदू लोकसंख्येची वाढ असल्या विषयांना प्राधान्य देऊन भाजपातील हिंदूत्ववादी प्रवृत्तीला खतपाणी घालण्याचे महत्कार्य हाती घेतले आहे. त्याला फ़ळेही येऊ लागली आहेत. मात्र तो अजेंडा भाजपाचा वा संघाचा नक्कीच नाही. साक्षी महाराज व तत्सम लोकांना आपण विकासाच्या नावाने निवडून आलो, हेच ठाऊक नाही. त्यांचा विश्वास मोदींपेक्षा अशा सेक्युलर प्रचारावर असावा. म्हणून त्यांनी विकासाकडे पाठ फ़िरवून सेक्युलर मंडळींनी ज्या आवया उठवल्या होत्या, त्यानुसार झपाट्याने काम आरंभले आहे. म्हणूनच भारताला हिंदूराष्ट्र बनवणे हा संघ वा मोदींचा अजेंडा म्हणता येत नाही. तो सेक्युलर अजेंडा म्हणणे भाग आहे.

No comments:

Post a Comment