Thursday, January 29, 2015

सगळे सेक्युलर लढवय्ये पळाले कुठे?संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भारताच्या सुरक्षा यंत्रणा व सज्जतेविषयी जे खुले आव्हान दिले, त्यावर पहिले दोन दिवस काहूर माजवणारे तमाम सेक्युल्रर लढवय्ये नंतर कुठे शेपूट घालून पळाले आहेत? पहिल्या दोन दिवसात आक्रमक भाषेत दगाबाज गाफ़ील पंतप्रधानांची नावे पर्रीकरांना विचारण्याची शर्यतच चालली होती. परंतु लौकरच डाव आपल्यावरच उलटणार असे दिसल्यावर; या लढवय्यांनी पळ काढला आहे. कारण पर्रीकर यांनी अतिशय सावधपणे टाकलेल्या सापळ्यात हेच भंपक लोक आयते येऊन फ़सले होते. त्यांची अशी अपेक्षा होती, की पर्रीकर हे भाजपाचे, म्हणजे पर्यायाने संघाचे आहेत. सहाजिकच त्यांनी नेहरू-गांधी खानदानाच्या विरोधात आपले मतप्रदर्शन केलेले आहे. पण ते गृहीतच फ़सवे होते. कारण ज्या पंतप्रधानांच्या संबंधात व धोरणाच्या बाबतीत पर्रीकरांनी विधान केले, ते मोरारजी व गुजराल होते. पण त्यांच्या एकूण वागण्याचे व कृतीचे संदर्भ तमाम सेक्युलर दिवाळखोरीच्या मुळाशी येऊन भिडणारे आहेत. म्हणूनच विनाविलंब पर्रीकरांना जाब विचारणार्‍यांनी धुम ठोकली आहे. पण अनाय़से हा विषय निघाला आहेच, तर सेक्युलर विचार व राजकारणाने आपल्या खंडप्राय देशाचा कसा व किती घात केला आहे, त्यावरचा पडदा उचलायला अजिबात हरकत नसावी. आज आपल्या देशात जो जिहादी हिंसेचा धुमाकुळ चालू आहे आणि घातपाताचे कायमचे सावट पडले आहे, त्याला पाकिस्तानची रणनिती कारणीभूत असण्यापेक्षा इथले दिवाळखोर सेक्युलर राजकारण जबाबदार आहे. त्याच राजकारणाने देशाच्या सुरक्षेला सुरूंग लावला आहे. त्याची पाळेमुळे थेट समाजात उजळमाथ्याने वावरणार्‍या अनेक विचारवंतांपर्यंत येऊन भिडणारी आहेत. कोणाला वेदप्रकाश वैदिक नावाचे पात्र आठवते काय? सहासात महिन्यापुर्वी मीडियात हा माणूस खुप गाजत होता.

एका कुठल्या सेमिनारला हा माणूस पाकिस्तानात गेलेला होता. तिथे त्याने जमात उद दावा आणि लष्करे तोयबाचा म्होरक्या संस्थापक सईद हाफ़ीज, याच्या घरी जाऊन भेट घेतली. म्हणून त्याचा खुप गाजावाजा झालेला होता. तेवढेच नाही. पाकिस्तानच्या एका बृत्तवाहिनीला वैदिकने प्रदिर्घ मुलाखतही दिली आणि त्याला भारतात यायचे आमंत्रणही दिलेले होते. हे उद्योग वैदिकला कोणी सांगितले होते? वैदिक तिथे गेलाच कशाला? त्याला कोणी तिथे बोलावले होते? जेव्हा अशा गोष्टींचा गवगवा होऊ लागला, तेव्हाही आताप्रमाणेच बहुतेक सेक्युलर लढवय्यांनी मैदानातून पळ काढला होता. कारण हे वैदिक महाशय त्याच तथाकथित सेक्युलर शहाण्यांच्या सोबत पाकिस्तानला गेलेले होते. त्यांना तिकडे कोणी बोलावले होते? ‘रिजनल पीस इन्स्टीट्युट’ या पाकिस्तानी संस्थेने या शिष्टमंडळाला आमंत्रण दिलेले होते. अर्थात त्याचा सगळा खर्चही त्याच संस्थेने केला हे वेगळे सांगायला नको. विविध देशाच्या मान्यवर व्यक्तींचा त्या संस्थेच्या संचालक मंडळात समवेश आहे. पण त्यांना फ़ारसे महत्व नाही. त्यातला एक संचालक लक्ष वेधून घेणारा आहे. त्याचे नाव लेप्टनंट जनरल असद दुर्रानी. हे महाशय पाकिस्तानी निवृत्त सेनाधिकारी आहेत आणि त्यांनी कोणती कामगिरी बजावलेली होती? तर ते आय एस आय नामक पाक हेरसंस्थेचे म्होरके म्हणून दिर्घकाळ कार्यरत होते. भारतातल्या प्रत्येक घातपात व जिहादी हिंसेसाठी ज्या संस्थेकडे कायम बोट दाखवले जाते, अशा संघटनेचा माजी प्रमुख संचालक असलेली संस्था शांती प्रतिष्ठान चालविते आणि त्याद्वारे योजलेल्या परिषदेत भारतातले काही ज्येष्ठ पत्रकार बुद्धीमंत हजेरी लावतात, त्याचा अर्थ काय होतो? हे तिथे दाऊदला भारताच्या हवाली करायची मागणी घेऊन गेले होते, की सईद हाफ़ीजने त्याच्या कारवाया थांबवाव्यात सांगायला तिथे गेले होते?

ज्याची हयात भारतामध्ये जिहादी घातपाताच्या योजना आखण्यात गेली आणि अफ़गाणिस्तानात जिहादी मुजाहिदीन पाठवण्यात खर्ची पडली; असा माणुस शांती परिषद भरवतो यावर कोणी, किती व कसा विश्वास ठेवायचा? अशा माणसाने आमंत्रण दिल्यावर गेलेल्या शिष्टमंडळाकडून कोणत्या अपेक्षा आपण बाळगू शकतो? भारतासाठी सुरक्षा घेऊन ही माणसे माघारी येतील, की भारताची सुरक्षा आय एस आयच्या हवाली करून माघारी येतील? या शिष्टमंडळात कोणाचा समावेश होता? वेदप्रकाश वैदिक हे त्यात अपवादात्मक नाव होते. अन्यथा त्यात नेहमीची ठरलेली मंडळी सहभागी होती. सलमान खुर्शिद, बरखा दत्त, दिलीप पाडगावकर, मणिशंकर अय्यर, सुधींद्र कुलकर्णी, सिद्धार्थ  वर्दराजन असे एकाहून एक नामचिन सेक्युलर पत्रकार शहाणे त्या शिष्टमंडळाचे सदस्य होते. आणि किती योगायोग ना? यातला प्रत्येकजण भाजपाचा, संघाचा वा मोदींचा, हिंदूत्वाचा अघोषित शत्रू असावा, यालाही योगायोग म्हणावा काय? यांनी तिथे जाऊन अशी काही शांतीपुर्ण पावले उचलली, की भारतीय सीमेवर अखंड गोळीबाराच्या फ़ैरी झडू लागल्या आहेत? असे कोणते महत्कार्य करायला ही मंडळी तिकडे गेली आणि त्यांचा खर्च पाकिस्तानी संस्थेने कशाला करावा? पाकिस्तानात असा खर्च कोण उचलतो? तो खर्च पाकिस्तान सरकार करते काय? ज्या संस्थेमध्ये पाक हेरसंस्थेचा माजी प्रमुख संचालक असतो, त्या संस्थेचे काम अर्थातच पाकिस्तानी सुरक्षेशीच संबंधित असणार आणि म्हणूनच ते भारतविरोधी असणार, हे वेगळे सांगायला नको. म्हणजेच जे कोणी भारतातले सेक्युलर शहाणे तिथे गेले होते, ते तिथे मायदेशाचे कल्याण करायला नक्कीच गेलेले नव्हते. तर पाकिस्तानचे ‘मित्र’ म्हणून गेलेले होते. हेरखात्याच्या व्यवहारी भाषेत अशा ‘मित्रांना’ असेट म्हणजे मूल्यवान वस्तू मानले जाते. पर्रीकर ज्याला डीप असेट म्हणतात ते असेच असेट असतात.

आपल्या शत्रू देशातील महत्वाच्या व्यक्तींना आपले ‘मित्र’ करून करणे व प्रसंगोपात त्यांना स्वदेशाच्या विरोधात कामाला जुंपणे; हेच तर हेरखात्याचे काम असते. त्यासाठी जे मित्र सहकारी व हस्तक बनवले जातात, त्याला असेट म्हटले जाते. भारत-पाक संबंध किंवा काश्मिरसारखा कळीचा मुद्दा घ्या, अशा वादाग्रस्त प्रश्नात जे कोणी भारतीय महत्वाच्या पदावर असतात, त्यांचा भारताच्याच जाहिर भूमिकेला सुरूंग लावण्यासाठी वापर करणे, पाकसाठी लाभदायक असते. ज्यांची उपरोक्त यादीत नावे आलेली आहेत. त्यांनी अशा विषयात आजवर घेतलेल्या भूमिका वा मांडलेली मते तपासली, तरी ते कोणाचे असेट आहेत, त्याचा अंदाज येऊ शकतो. सीमेवर भारतीय जवानांची मुंडकी कापून नेली किंवा भारतीय जवानांची हत्या झाली, तर यातला एकही शहाणा अवाक्षर बोलणार नाही. पण चुकून जरी भारतीय सेनेकडून काश्मिर भागात सामान्य नागरिक वा कोणी घुसखोर मारला गेला, तर ‘खोटी चकमक’ म्हणून आक्रोश करणार्‍यात हेच तमाम (दुर्राणी आमंत्रित) सेक्युलर शहाणे आघाडीवर लढताना दिसतील. त्यांची भूमिका भारतीय सेना किंवा भारत सरकारच्या विरोधातील व पाकिस्तानला पुरक असल्याचे आढळून येईल. अशा लोकांना हेरखात्याच्या भाषेत (पाकिस्तानी) असेट म्हटले जाऊ शकते. असेच भारताचेही पाकिस्तानात ‘असेट’ असू शकतात. पण हे असेट प्रकरण काय, ते स्पष्ट व्हावे म्हणून इथे हा वैदिक प्रकरणाचा उहापोह केला. ‘डीप असेट’ म्हणजे अत्यंत मोक्याच्या जागी बसलेला वा प्रभावशाली हस्तक होय. वैदिकला सोबत घेऊन पाकिस्तानला जाणार्‍या या उपरोक्त ‘महत्वपुर्ण’ भारतीयांना पाकिस्तान असेट का म्हणू शकते व त्यांची आजवरची कामगिरी कोणती; हा खरेच संशोधनाचा विषय आहे. पण त्याचाच गवगवा व्हायला नको, म्हणून पर्रीकरांच्या त्या विधानावर उठलेले वादळ घाईगर्दीने शमवण्यात आले.

5 comments:

 1. Khup dhadasi vidhan kelat bhau apan ani te khare dekhil aahe.....
  khup rokhthok bolta aapan........apanas manacha mujara!

  ReplyDelete
 2. बरखा दत्त माझ्या माहिती प्रमाणे पत्रकार असून काश्मीर मधील पूरपरिस्थिती च्यावेळी याच्ञा भेटीनंतर श्रीनगर मध्ये मदतकार्य करणाऱ्या जवानांवर स्थानिक रहिवाशांकडून हल्ला करण्यात आला होता . त्यावेळची स्टेटमेंटस तपासून पाहायला हवी आहेत. तसेच कांग्रेस, NCP, वाले कधीही हिंदू अथवा भारताचे सार्वभौमत्व यासाठी काम करताना दिसलेले नहित. सर्वधर्म समभावाच्या बेगडी बुरख्याखाली गांधी नेहरूंपासून सर्वांनीच या देशाची प्रचंड फसवणूक केली आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. हे सगळे भारताला एक इस्लामिक राष्ट घोषित करूनच शांत होतील. त्यांच्या जीवनाचे ध्येय दुसरे काहीच नाही.

   Delete
 3. मर्मभेदी लेख ! कोन्ग्रेस आणि इतर देशहितविघातक शक्तींना वादळ उठविता येते आणि ते अंगाशी आले की लीलया शमविताही येते कारण त्यांनी वर्षानुवर्षे पत्रकार, पेपर्स, टीव्ही वाहिन्या समाजात प्रतिष्ठा असलेले लोक (Opinion leaders) निगुतीने सांभाळले आहेत, पाळले आहेत. महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याने तर कित्येकांचा गळ्यात पट्टेच बांधून टाकले आहेत. परंतु काहीच शिकायला तयार नसलेल्या या दीड शहाण्यांना साधे मतदारही सांभाळता आले नाहीत. एका वर्षातच गळती सुरु झाली यांच्या कर्माने ! बिहार, गेला, दिल्ली गेली, मध्य प्रदेश आणि गुजराथ मध्ये झेड पी गेल्या, आता यांना कोण वाचविणार देवच जाणे. बिहारची किंमत देऊन आरक्षणाचा फेरविचार रद्द केला तर त्यांना आता मंदिराचे डोहाळे लागले. यांना मंदिरच काय खुद्द रामही वाचवू शकत नाही स्वत:पासून !

  ReplyDelete