Saturday, January 3, 2015

उंदिर पोखरून डोंगर कसा काढावा?



(मृत्यूच्या जबड्यातून बचावल्यानंतरही मृत्यूशी झुंज देताना पोलिस शिपाई अरुण जाधब)

‘हू किल्ड करकरे’ या आपल्या पुस्तकात माजी पोलिस महानिरिक्षक एस एन मुश्रीफ़ यांनी करकरे यांची हत्या हिंदुत्ववादी संघटना व ब्राह्मणवाद्यांच्या प्रभावाखाली असलेल्या भारतीय गुप्तचर खात्यांनी घडवून आणली, असा सिद्धांत मांडला आहे. यातील पहिला भाग असा, की त्यासाठी त्यांनी कुठला तपास केलेला नाही अथवा एकूण घटनाक्रमाचा आपल्या पोलिसी कारकिर्दीच्या अनुभवाच्या आधारे शोधही घेतलेला नाही. त्यांनी एकूण वृत्तपत्रिय बातम्यांचा क्रम तपासला आणि त्यावर त्यांचा एक सिद्धांत तयार झाला. मग त्या सिद्धांताला आवश्यक अशा बातम्या शोधल्या आणि त्यावर आधारीत पुस्तकाची रचना केलेली आहे. या हत्येचा कोणी साक्षीदार नसावा, अशी त्यांची समजूत असेल तर गोष्ट वेगळी. अन्यथा त्यांनी निदान अरूण जाधव नामक प्रथमदर्शी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराशी सल्लामसलत तरी केली असती. कारण ज्या गाडीमध्ये करकरे यांच्यासह अशोक कामथे व साळसकर अशा दोन ज्येष्ठ पोलिस अधिकार्‍यांची एकाच वेळी हत्या झाली, त्याचा आयविटनेस त्यांना मिळाला असता. कारण ज्या वहाना्वर गोळ्या झाडल्या गेल्या आणि या अधिकार्‍यांची हत्या झाली, त्या प्रसंगाचा खटल्यातला महत्वाचा साक्षीदार म्हणून अरूण जाधव याची साक्ष झालेली आहे. कोर्टानेही मृत्यूच्या जबड्यातून बचावलेल्या त्या पोलिस शिपायाचा प्रत्येक शब्द आंधळेपणाने ग्राह्य धरलेला नाही. अरूण जाधवच्या साक्षीला जिथे खुद्द कसाबने आक्षेप घेतला, तिथे त्याची साक्ष तपासण्या्ची चिकित्सक वृत्तीही कोर्टाने दाखवलेली आहे. म्हणजेच कोर्टातही हल्लेखोर व साक्षीदार यांना कुठलेही झुकते माप देण्यात आलेले नाही. यात जाधवची साक्ष वा प्रत्यक्ष अनुभवच मुश्रीफ़ यांचे संपुर्ण पुस्तक खोटे पाडतो. तितकेच नाही तर कुरकर्मा कसाबची साक्षही मुश्रीफ़ना खोटे पाडते.

अरुण जाधव हा साळसकर यांना कायमस्वरूपी सहकारी होता. कुठल्याही कारवाईत जाधव त्यांच्यासोबत असायचा आणि २६/११ च्या रात्रीही तो त्यांच्याच सोबत होता. जेव्हा शिवाजी टर्मिनस येथून हे तिघे अधिकारी कामा इस्पितळाकडे रवाना झाले, तेव्हाही जाधव त्यांच्याच गाडीत म्हणजे टोयोटा क्वालिसमध्ये होता. त्यावरच जिहादी हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. त्याबद्दल साक्ष देताना जाधव याने कसाबवरच गोळ्या झाडल्याचा आरोप केला होता. पण कसाबने त्याचा साफ़ इन्कार करून आपला अन्य सहकारी इस्माईल खान याने क्वालीसवर गोळ्या झाडल्याचे कोर्टात सांगितलेले आहे. म्हणजेच जाधवपेक्षा कसाबची साक्ष मोलाची ठरते. त्याने आपण वा आपला सहकारी यांनी क्वालिसवर गोळ्या झाडल्याच नाही, असा अजिबात दावा केलेला नाही. आपण क्वालिसवर गोळ्या झाडल्या नाहीत, कारण आपण तेव्हा जखमी होतो व मरगळलो होतो. आपल्या जोडीदार इस्माईलने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, हा कसाबचा कोर्टातला दावा आहे. म्हणजे जाधव आणि कसाब दोघेही करकरे बसलेल्या गाडीवर इस्माईल वा कसाब यांनी गोळ्या झाडल्याचा दावा करतात. पण मुश्रीफ़ यांना मात्र ते दोन्ही दावे मान्य नाहीत. त्यांच्या मते करकरे यांच्यावर पाकिस्तानातून आलेल्या अतिरेक्यांनी गोळ्या झाडलेल्याच नाहीत. करकरे यांना भलत्याच दुसर्‍या हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार मारलेले आहे. आणि ते हल्लेखोर अर्थातच मुश्रीफ़ यांच्यानुसार भारतीय गुप्तचर खात्याचेच होते. मग वाचकांनी कोणावर विश्वास ठेवायचा? घटनास्थळी तेव्हा हजर असलेल्या अरूण जाधव आणि अजमल कसाववर, की मुश्रीफ़ यांच्या कल्पनाविलासावर? आणि कशासाठी विश्वास ठेवायचा? तर मुश्रीफ़ यांचे बालपण राजर्षी शाहु महाराजांच्या कोल्हापुर जवळच्या कागलमध्ये गेले म्हणून? एकूणच पुस्तकात गुन्हेतपास व त्याची सुसंगत मांडणी करण्यापेक्षा मुश्रीफ़ शाहू महाराजांच्या मागे लपतात कशाला?

यातील अरूण जाधव याची कहाणी हृदयद्रावक आहे. आधी त्याला कसाब वा इस्माईलने झाडलेल्या गोळ्यांनी जखमी व्हावे लागले, सोबतचे इतर लोक ठार झालेले असताना, जाधवच्या अंगात धुगधुगी होती. मात्र त्याने आपल्या सहकार्‍यांच्या मृतदेहाच्या सहवासात मेल्याचे नाटक रंगवले. मग करकरे, कामथे अ साळसकर यांचे मृतदेह ओढून बाहेर फ़ेकल्यावर क्वालिसचा ताबा त्या दोघा जिहादींनी घेतला आणि मागच्या भागातल्या मृतदेहांसह चौपाटीच्या दिशेने प्रयाण केले. तेव्हाही त्यापैकी कोणाच्या तरी मोबाईलचा आवाज आला, म्हणून कसाबने गाडीतच मागे गोळ्या झाडल्या होत्या. पुढे त्या गाडीचा टायर फ़ुटला म्हणून त्या अतिरेक्यांनी वाटेत दिसलेली एक स्कोडा गाडी अडवून क्वालिस सोडून दिली. तेव्हा जाधवने कंट्रोल रुमला आपल्या मोबाईलवर कुठे जखमी पडलोय, त्याची खबर दिली. इथे अन्य पोलिस पोहोचले तेव्हा त्यांनीही बंदुका रोखलेल्या होता. त्यांनी नुसत्या शंकेसाठी गोळ्या झाडण्याचे भय होते. अशा स्थितीत जाधव जीवंतपणी पोलिसांच्या हाती लागला. या सगळ्या घटनाक्रमात मुश्रीफ़ कुठे होते? घटनास्थळापासून धेकडो मैल दुर कोल्हापूर वा पुण्यात बसले होते आणि जाधव घटनाक्रमापासून अवघा दिडदोन फ़ुटावर होता. त्याचा अनुभव जाणुन घ्यावा, असेही या अनुभवी व सामाजिक बांधिलकी मानणार्‍या अधिकार्‍याला वाटू नये? त्यापेक्षा आपले तर्कट लढवून नसत्या शंकांच्या वावड्या उडवण्याचा खेळ मुश्रीफ़ यांनी करण्याला सामाजिक कार्य म्हणायचे की काय? सामान्य पत्रकार लेखकांची गोष्टच वेगळी असते. त्यांना अशा प्राणघातक घटनांचे गांभिर्य कळत नसते. परंतू पोलिस खात्यात दिर्घकाळ काम केलेल्या व्यक्तीला यातली गुंतागुंत व क्लिष्टता समजू नये? सामान्य पत्रकारापेक्षाही पोरकट अशा शंका काढून त्यांनी भारतीय गुप्तचर खाते व मुंबई गुन्हे अन्वेषण विभागावर इतके बेछूट बेताल आरोप करावेत?

करकरे व अन्य जखमींना विनाविलंब तिथून हलवण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न झाला. पण मृत घोषित झाल्यावर जी शवचिकित्सा झाली, त्यात त्यांच्या देहातून काढण्यात आलेल्या जीवघेण्या गोळ्या गहाळ झाल्या. हा हलगर्जीपणा नक्कीच निषेधार्ह आहे. पण तेवढ्या सुताचा आधार घेऊन स्वर्गात जाण्याचा प्रयत्न हा शहाणपणा असतो काय? गोळ्या सापडत नाहीत, म्हणूनच त्य झाडणारा पाकिस्तानी जिहादी नव्हेतर भारतीय गुप्तचर असावा आणि त्याला वाचवण्यासाठीच गोळ्या गहाळ करण्यापर्यंत बारकाईने कारस्थान रचलेले होते. त्यानुसार करकरे यांचा बळी घेतला गेला, असा दावा करणे कितपत शहाणपणाचे मानावे? कुठल्याही कारस्थानात बारकाईने नियोजन केलेले असते. पण त्यातला प्रत्येक माणुस त्यासाठी आधीपासून पढवलेला व शिकवलेला असतो. इथे घटनाक्रमच उलगडत गेलेला आहे. त्यात करकरे यांना मारायचे म्हणून इतका मोठा हल्ला होऊ देण्यात आला आणि त्याचा आडोसा घेऊन करकरे यांचा काटा काढण्यात आला, असा मुश्रीफ़ यांचा सिद्धांत आहे. ज्यांना कारस्थान म्हणजे काय ह्याची समज आहे, त्यांना इतके कळू शकते, की कितीही महत्वाच्या एका व्यक्तीला मारण्यासाठी शेकडो लोकांचे हकनाक बळी पडतील, असे कारस्थान शिजवले जात नसते. कडेकोट सुरक्षेत असलेल्या इंदिरा गांधींची हत्या करताना आणखी किती लोकांचा बळी घ्यावा लागला होता? राजीव गांधी यांची हत्या भर गर्दीत झाली, तरी कमीत कमी लोकांचा बळी पडेल, असे कारस्थान उरकले गेले. पण मुश्रीफ़ यांची बुद्धी इतकी अचाट आहे, की करकरे यांचा बळी घेण्यासाठी दिडदोनशे लोकांना ठार मारण्याचे व त्याच्याही दुप्पट लोकांना जखमी करण्याचे हे कारस्थान होते, असा त्यांनी शोध लावला आहे, म्हणूनच त्याला उंदिर पोखरून डोंगर काढण्याची किमया म्हणावे लागेल.

No comments:

Post a Comment