Monday, January 5, 2015

झोपेचे सोंग संपवायचे कोणी? कसे?

'देशात हिंदुत्ववादी व पुरोगामी असेच दोनच वर्ग आहेत. मुंबईवर दहशतवादी हल्ला होणार हे माहीत असतानाही करकरेंच्या हत्येसाठी ही माहिती हिंदुत्ववादी पोलिस यंत्रणेने गोपनीय ठेवली. लोकशाहीचे चारही स्तंभ ब्राह्मण्यवाद्यांच्या ताब्यात आहेत. राजर्षी शाहू महाराजांना छळणाऱ्या विचारांचे लोक कोल्हापुरात मोठ्या संख्येने निवडून येतात हे दुर्दैव आहे.' असे उदगार माजी न्यायमुर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी कोल्हापूरच्या एका सभेत काढल्याचे प्रसिद्ध झाले आहे. ही सभा अर्थातच एका पुरोगामी म्हणवणार्‍या गटाने योजलेली होती. सहाजिकच त्यातून यापेक्षा भिन्न मतप्रदर्शन होण्याची अपेक्षा करता येत नाही. कारण आजवर आपण कोणत्या भूमिकांचा पाठपुरावा केला व त्याचे परिणाम काय झाले, याचेही आत्मपरिक्षण करण्याची ज्यांना गरज वाटत नाही, त्यांना हल्ली पुरोगामी म्हणून ओळखले जाते. कोळसे पाटिल यांचे दुखणे चुक नाही. कारण मागल्या निवडणूकीत ज्या शक्तींचा कोल्हापूर व सभोवतालच्या परिसरात दारूण पराभव झाला, त्यांना महाराष्ट्रात पुरोगामी असे संबोधले जाते. पण शाहू महाराजांच्या पावनभूमीत असा जो पराभव झाला, तो महाराजांच्या प्रगतीशील विचारांचा झालेला नसून, त्याचे मागल्या कित्येक वर्षात जे विकृतीकरण झाले आहे, त्याचा हा पराभव झालेला आहे. कोल्हापूर भोवतालाच्या जनतेने कृतीतून दाखवून दिले आहे, की जे आजकाल शाहू महाराजांचे विचार म्हणून मांडले जातात, त्या भामटेगिरीला लोकांची मान्यता नाही. त्या प्रगत विचारांचे काही भामट्यांनी विकृतीकरण व पाखंड केले आहे. लोकांनी महाराजांचे विचार नाकारलेले नाहीत, तर त्याबाबतीत माजलेले थोतांड नाकारले आहे. तेव्हा आपल्या पराभवाचे श्रेय वा खापर अशा लोकांनी शाहू महाराजांच्या विचारावर मारण्याची गरज नाही. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणतात, त्याचीच ही प्रचिती आहे.

स्वत: शाहू महाराज सुशिक्षित वा साक्षर नव्हते. पण त्यांच्यापाशी जी विचार करण्याची कुशाग्र बुद्धी होती, त्यामुळेच त्यांनी आपल्या आसपासच्या परिसरातील अजाण सामान्य लोकांना प्रगत विचार देण्याची किमया करून दाखवली होती. पुढे कधी काही लोक आपल्या विचार व कृतीचे विकृतीकरण करून त्याचेच पाखंड बनवतील, ही त्यांची अपेक्षा नव्हती. महाराजांचे विचार अतिशय सोपे व कुणालाही उमजण्याइतके साफ़ होते. त्यासाठी त्यांना शब्दांची कधी कसरत करावी लागली नव्हती. उलट आज त्यांच्याच नावाने जोगवा मागणार्‍यांची अवस्था बघता येईल. मागल्या दोन दशकात शाहू फ़ुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून जो तमाशा चालला होता, त्याचे बळी कोण आहेत? कोणी ब्राह्मणवादी वा उच्चभ्रू सवर्ण नाहीत. गरीबातल्या गरीब दलित पिडीत यांच्यावर आत्महत्येची पाळी आणणारे कोण आहेत? महाराष्ट्रातल्या बळीराजाला देशोधडीला लावून आपल्या तुंबड्या भरणारे कोण आहेत? त्यांनी शाहू महाराजांच्या नावाची अखंड जपमाळ ओढत असे अन्याय व गैरकारभार केल्यावर त्यांना जाब विचारायला किती पुरोगामी शहाणे पुढे आले होते? आज कोळसे पाटिल कोल्हापुरात कोण निवडून आले, त्यावर चिंता व्यक्त करतात. पण त्याच कोल्हापुरातून मागल्या कित्येक वर्षात जे लोक निवडून आले, त्यांनी शेतकर्‍यांचे किती कल्याण केले? त्यात मुश्रीफ़ यांचे बंधूच आमदार मंत्री होते. सातत्याने कागलमधून राजकीय सत्ता उपभोगलेल्या व्यक्तीचा सख्खा भाऊ बाजूला बसलाय, त्याला जाब विचारण्याची कोळसे पाटलांना कशाला गरज वाटू नये? त्याच पक्षाचे नेते निवडणूक निकाल लागण्यापुर्वीच (शाहू महाराजांना त्रास देणार्‍यांच्या) मदतीला धावले, त्याचा जाब कोणी विचारायचा? मुश्रीफ़ही महाराजांचा सतत उल्लेख करतात आणि जगाला शहाणे करायचा आव आणतात. त्यांनी कधी तो उपदेश घरातल्या भावाला केला आहे काय?

कोण निवडून आला, त्यावरून समाजाच्या प्रगत वा मागास असण्याचे निकष शोधता येत नाहीत. कशामुळे कुठला पक्ष वा विचारांचा उमेदवार निवडून येतो, त्यावर चिंता करायची असते. जे कोणी निवडून आले, ते शाहू महाराजांना छळणार्‍या विचारांचे लोक निवडून आले असे म्हणताना, आजवर निवडून येणार्‍यांची झाडाझडती कोणी घ्यायची? की नुसताच सामान्य माणसाच्या मनात दिलेल्या मतांविषयी अपराधगंड, पापगंड उभा करायचा? ज्यांनी गेल्या तीनचार दशकात कोल्हापुर वा अन्य महाराष्ट्रामध्ये राज्यकारभार केला, त्यांनी शाहू महाराजांच्या जनतेला सुखसमाधानात जगायची व्यवस्था उभी केली, असे म्हणायचे आहे काय? शाहू महाराजांना फ़क्त आपल्याच सुखासमाधानाची चिंता असती, तर गोष्ट वेगळी होती. पण हा जाणता राजा आपल्यापेक्षा आपल्या अजाण रयतेच्या दु:ख वेदनांनी अस्वस्थ होता आणि त्या जनतेला किमान सुसह्य जीवन जगता यावे, म्हणून ऐषाराम सोडून झगडला होता. त्याच्याच नावाचे भांडवल करून ज्यांनी सत्ता बळकावली आणि त्याच रयतेला कंगाल गरीब ठेवून वार्‍यावर सोडून दिले, त्यांना आजवर कशाला निवडून दिलेत, असा सवाल आजवर कशाला विचारला गेला नाही? महाराज स्वत:च्या न्यायासाठी नव्हेतर रयतेच्या न्यायासाठी लढले झगडले होते. याचे तरी भान आजच्या पाखंडी पुरोगाम्यांना आहे काय? असते, तर त्यांनी मतदाराला गुन्हेगार ठरवण्यापेक्षा आपणच शाहू महाराजांना समजून घेण्यात कुठे चुक केली, त्याचे आत्मपरिक्षण केले असते. त्यासाठी आजवर ज्यांनी त्या प्रगत विचारांचा विचका कोणी व कसा केला, त्याचाच शोध घेतला असता. पण इथे कोळसे पाटिल व अन्य वक्ते सामान्य रयतेमध्ये कोणाला निवडून आणलेत असा अपराधगंड निर्माण करण्यात धन्यता मानत आहेत. त्यातून मग खरे दुखणे उघड्यावर येते.  

गेल्या निवडणूकीत मतदाराने कोल्हापुर व भोवतालच्या परिसरार ब्राह्मणवाद्यांना निवडून दिलेले नाही. तर महाराजांच्या प्रगत विचारांचे पाखंड माजवणार्‍यांना नाकारले आहे. त्याचा परिणाम म्हणून अन्य कोणी निवडून आलेले आहे. ती लोकांची निवड वा आवड नाही. एका नावडीचा तो परिणाम आहे. अशा पाखंडी पुरोगाम्यांपेक्षा सरळ सरळ प्रतिगामी परवडले, असा कौल रयतेने दिला आहे. म्हणूनच पुरोगामी प्रामाणिक असते तर एव्हाना त्यांनी रयतेच्या नाराजीचा सुक्ष्म विचार केला असता. आपण कुठे चुकलो, वा चुकतो आहोत, त्याचा आढावा घेतला असता. पण विचारच करायचा नाही आणि त्याच त्याच चुका अगत्याने पुन्हा करत रहायचा हट्ट असेल, तर दुसरे काय व्हायचे? ज्या ब्राह्मणी संकटावर मागल्या दशकात पुरोगामी पिंड व पाखंड पोसला गेले आहे, त्याचे वर्णन हिटलरनेच केलेले आहे. या सभेत वा अन्यत्र चाललेल्या ब्राह्मणवादी बागुलबुवाचे वर्णन हिटलर छान करतो. एकदा हिटलरला विचारण्यात आले, की ज्य़ु जमातीचा संपुर्ण नि:पात करण्यात यावा असेच तुझे मत आहे का? त्यावर त्याने दिलेले मत डोळ्यात अंजन घालणारे आहे. तो म्हणाला, ‘ छे छे, ज्य़ु नावाचा कुणी अस्तित्वात नसेल तर तो अस्तित्वात आहे असे दाखवावे लागेल. खरा ज्य़ु नसेल तर काल्पनिक ज्य़ु तरी हवाच. चळवळ उभी करायची तर ज्याचा द्वेष करावासा वाटेल, ज्याच्या नावाने द्वेषाची चिथावणी देता येईल, असा कोणीतरी हाडामासाचा, खराखुरा शत्रू आवश्यक असतो. असा शत्रू नसेल तर लोकंना चिथावता येत नाही. केवळ अमुर्त कल्पना पुढे करून ही गोष्ट साध्य होत नाही.’ काही काळ असा बागुलबुवा उपयोगी ठरतो. पण त्यातले थोतांड कधीतरी उघडे पडतेच. अर्धशतकानंतर तेच झाले आहे. कोल्हापुरात शाहू महाराजांचा छळ करणार्‍यांचा विजय झालेला नाही किंवा त्यांच्या प्रगत विचारांचा पराभव झालेला नाही. त्याच्या आडून जे थोतांड माजवण्यात आले व चिथावण्याचे डाव खेळण्यात आले. त्या पाखंडाला रयतेने झुगारले आहे. पण झोपेचे सोंग आणणार्‍यांना कोणी जागवायचे?

No comments:

Post a Comment