Wednesday, January 7, 2015

सुनंदा पुष्करचे मारेकरी कोण?



सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूविषयी आता नव्याने तपास करण्याच्या निर्णयाचे स्वागतच करायला हवे. याचे कारण त्यांचा मृत्यू पहिल्या दिवसापासूनच शंशयाच्या भोवर्‍यात होता. पण त्याविषयी गवगवा करायचा नाही, असे जणू दिल्लीच्या एकूणच राजकीय वर्तुळात ठरलेले असावे. म्हणूनच जितक्या लौकर त्यावर पांघरूण घातले जाईल, त्याची प्रत्येकानेच कळजी घेतली होती. त्या घटनेतली महत्वाची बाब म्हणजे, तो मृत्यू वा आजच्या परिस्थितीत मानला जाणारा खुन अनपेक्षित नव्हता. त्याची चाहुल पुष्कर यांना आधीपासून लागलेली होती. तसे त्यांनी अनेकप्रकारे सुचितही केलेले होते. पण प्राणप्रिय प्रेयसी म्हणून तिचा उल्लेख मिळेल तिथे करणार्‍या पतीने, म्हणजे शशी थरूर यांनी, त्याबद्दल काडीमात्र उत्सुकता दाखवलेली नव्हती. उलट सुनंदाने जाहिरपणे बोलून दाखवलेल्या शंका व संशयांवर पडदा टाकण्यातच शशी थरूर यांनी धन्यता मानली. त्यांनीच नव्हेतर त्यांच्या पक्षाने व त्याच्या सरकारनेही पडदा टाकण्यालाच प्राधान्य दिले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, सतत शोधपत्रकारितेचे दावे करणार्‍या दिल्लीतल्या माध्यमांनीही या संशयास्पद मृत्यूवर पांघरूण घालण्यातच पुढाकार घेतला. सुनंदाचा मृत्यू म्हणूनच नुसता अनैसर्गिक नाही, तर त्याच्याशी संबंधित अनेकांचे वागणेही अनैसर्गिक आहे. त्याची सुरूवात माध्यमांपासून होते. कुणाच्याही खाजगी आयुष्यात नाक खुपसून त्याची जाहिरात करणार्‍या माध्यमांना, ही घटना घडली तेव्हा काय झाले होते? कुठल्याही बाबतीत शंकाच घेण्याचा स्वभाव असलेल्या अशा पत्रकारांनी सुनंदा पुष्करांचा संशयास्पद मृत्यू वार्‍यावर कशाला सोडून दिला? तिथून मग अशा प्रकरणांचा शोध घेतला गेला पाहिजे. या टाळाटाळ वा शांततेविषयी शंका निर्माण होते. या सार्वत्रिक शांततेमागे कुठे शिजलेले कारस्थान होते काय, अशी शंका घ्यायला जागा निर्माण होते.

त्याहीपुर्वी वर्षभर आधी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी सुनंदा पुष्कर यांच्याबद्दल ओझरते वाक्य बोलले होते. हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणूक प्रचार सभेत बोलताना नाव न घेता मोदींनी कॉग्रेसचे नेते व मंत्री असलेल्या शशी थरूर यांना टोमणा मारलेला होता. ‘पचास करोड की गर्लफ़्रेन्ड’ असा तो उल्लेख होता. तेव्हा मोदींना सर्वच माध्यमांनी धारेवर धरले होते. एका राजकीय नेत्याच्या प्रख्यात पत्नीचा असा उल्लेख म्हणजे असभ्यतेचा कळस असल्यावा हलकल्लोळ माजवण्यात आला होता. अशी ही महिला होती. तेव्हा तिच्याच पतीने आपली पत्नी (गर्लफ़्रेन्ड) पन्नास लाखापेक्षा अनमोल असल्याचाही दावा केला होता. कारण तत्पुर्वी सुनंदाच्याच एका व्यवहारामुळे थरूर यांना मंत्रीपद गमवावे लागले होते. आयपीएलच्या कोची संघाच्या मालकीच्या खरेदी व्यवहाराचा तो मामला होता. अशा वादग्रस्त जोडप्यातील पत्नीचा आकस्मिक अनाकलनीय मृत्यू; म्हणूनच दिल्लीतल्या व राष्ट्रीय माध्यमांसाठी कळीचा विषय होतो. ज्या महिलेबद्दल टोमणेबाजी केल्यानंतर टिकेची झोड उठली, तिची हत्या झाल्याचा ओरडा कशाला होत नाही? नरेंद्र मोदी यांचा बालविवाह आणि आजही त्यांच्या पत्नीने विभक्त जगण्यावरून गदारोळ करणार्‍यांनी पुष्करच्या मृत्यूकडे किती काणाडोळा करावा? बडोदा व वाराणशी अशा दोन्ही मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरताना मोदींनी पत्नी म्हणून जशोदाबेनचा उल्लेख केल्यानंतर, माध्यमांचे कित्येक तास व मथळे खर्ची पडले होते. विभक्त पतीपत्नीविषयी इतकी संवेदनाशील असलेली माध्यमे व पत्रकारांना एका मंत्रीपत्नीच्या शंकास्पद मृत्यूविषयी इतकी उदासिनता कशाला ग्रासते? की कोणी सत्तेतील बलदंडाने माध्यमांच्या मुसक्या बांधल्या, म्हणून सुनंदा विषयी सर्वांनी गप्प रहाणे पसंत केले होते? म्हणूनच जर तपास करायचा असेल, तर शोधपत्रकारितेच्या त्या मौनाचाही तपास व्हायला नको काय?

जशोदाबेन व सुनंदा यांची तुलना होऊ शकत नाही, असेही अनेकांना वाटेल आणि ते रास्त आहे. एका बाजूला एक पतिपत्नी असे आहेत, ज्यांनी कधीच वैवाहिक जीवन अनुभवले नाही, तरी व्रतस्थ असल्याप्रमाणे नाते कायम राखले. दुसर्‍या संबंधाचा विचारही दोघांच्या मनाला शिवला नाही. तर दुसरीकडे थरूर-सुनंदा असे जोडपे आहे त्यांनी आधीचे संबंध विस्कटल्यावर दुसर्‍यांना वैवाहिक संबंधात शिरणे पसंत केले आहे. म्हणूनच या दोन्हीत तुलना होऊ शकत नाही, असे वाटण्यात गैर काहीच नाही. पण सवाल तुलनेचा नसून पत्रकारी कुतूहलाचा आहे. ज्यांना अज्ञातवासातल्या जशोदाबेनच्या व्रतस्थ जगण्याचे इतके कुतूहल होते, त्यांना खुलेआम आपल्या वैवाहिक जीवनाविषयी जाहिर भाष्य करणार्‍या सुनंदाविषयी कुतूहल का नसावे? नुसती जशोदाबेनच नव्हे. गुजरातमधल्या कुणा आर्किटेक्ट तरूणीचा पोलिसांनी पाठलाग करून पाळत ठेवली व तिच्या हालचालीची माहिती गृहखात्याला दिली, तर शोधपत्रकारांचे होश उडाले होते. त्या पोलिसांच्या ध्वनिमुद्रीत फ़िती वाजवून दोनतीन महिने धुमाकुळ घातला गेला. त्यातील एका पत्रकाराला (आशिष खेतान) तर आम आदमी पक्षाने दिल्लीत लोकसभेचा उमेदवारही बनवले होते. अशा तमाम पत्रकारांना सुनंदा पुष्करचा आकस्मिक शंकास्पद मृत्यू दुर्लक्षणिय कशाला वाटतो? त्या ध्वनीफ़ित प्रकरणात तर त्या मुलीने वा तिच्या कुटुंबियांनी तक्रार केली नव्हती. जाहिरपणे काही भाष्य केले नव्हते. उलट तिच्या पित्याने अशा जाहिर चर्चेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तरीही त्याच प्रकरणाची चिवडाचिवड करणार्‍यांना सुनंदाने खुलेआम फ़ोडलेला टाहो ऐकू कसा आला नव्हता? पुष्कर यांचा शंकास्पद मृत्यू होण्याच्या दोनचार दिवस आधी त्यांनी ट्विटर वा अन्य माध्यमातून व्यक्त केलेली मते, आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. कुठल्याही शोधपत्रकारासाठी आव्हान होते. पण सार्वत्रिक मौनच सुनंदाच्या वाट्याला आले.

आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगण्यापासून, आपण बोलू लागलो तर अनेकांच्या भानगडी चव्हाट्यावर येतील, असेही सुनंदाने दोनचार दिवस आधी म्हटले होते. तिथेच न थांबता आपल्या पतीला पाकिस्तानी महिला पत्रकार प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न करीत असल्याचा दावा करतानाच सुनंदाने ही पाक महिला तिथल्या हेरखात्याची हस्तक असल्याचाही गौप्यस्फ़ोट केला होता. अशा पार्श्वभूमीवर सुनंदाचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे. मग त्यामागे कुठले तरी रहस्य असणार ना? अगदी शेंबड्या पोरालाही तेवढे कळू शकते. मग चाणाक्ष बुद्धीच्या दिल्लीतल्या डझनावारी पत्रकारांना सुनंदाच्या मृत्यूचे रहस्य खोदून काढण्याची वर्षभर इच्छा कशाला झाली नाही? रहस्य उलगडणे दूरची गोष्ट झाली. त्याविषयी प्रश्न व शंका विचारण्याची इच्छाही इतक्या वेगाने कशामुळे मेली? आठवडाभरात माध्यामातून सुनंदा पुष्कर यांना ‘कायमचा निरोप’ देण्यात आला. की तशी कोणी माध्यमांवर पत्रकारांवर सक्ती केली होती? नेमक्या त्याच कालखंडात आशिष खेतानने उकरून काढलेल्या गुजरातच्या स्नुपगेट म्हणजे पोलिसी संभाषणाचा गवगवा मात्र माध्यमे करीत होती. एका महिलेवर पाळत ठेवण्याने महिला सुरक्षा धोक्यात आल्याचा दावा मांडणार्‍या तमाम चाणाक्ष पत्रकारांना, एका मंत्र्याच्या पत्नीचा तारांकित हॉटेलात झालेला अनैसर्गिक मृत्यू मात्र नि:संशय नैसर्गिक म्हणून अदखलपात्र मरण वाटावे, ही अनैसर्गिक पत्रकारिता नाही काय? म्हणूनच सुनंदा पुष्कर प्रकरणात तपास करायचा असेल, तर नुसता खटल्यापुरता होता कामा नये. दिल्लीच्या राजकीय व सार्वजनिक वर्तुळात वावरणार्‍यांच्या अशा अनैसर्गिक टोळीबाज बुद्धीवादाचाही तपास व्हायला हवा. कारण नुसते प्रशासन वा राजकारणीच सुनंदाच्या हत्येवर पांघरूण घालून गप्प राहिलेले नाहीत. अशा पडदा टाकणार्‍यांचा पर्दाफ़ाश करण्याची जबाबदारी नाकारून त्यांनाच सामील झालेली माध्यमेही तितकेच गुन्हेगार आहेत.

1 comment:

  1. बलदंड याही वेळी लावणार नाहीत हे कशावरून ? ज्या प्रकारे थरुर सरकार ची री ओढत आहेत त्यावरून शंका घेण्यास पूर्ण वाव आहे. प्रश्न केवळ एखाद्या व्यक्ति च्या आकस्मिक मृत्यु चा नसून देशाच्या सुरक्षेचा आहे.

    ReplyDelete