Thursday, February 19, 2015

भारत-पाक यांच्यातली सेक्युलर समस्या

mohmed shami साठी प्रतिमा परिणाम

भारत पाकिस्तान यांच्यातले क्रिकेट हा नाही म्हटले तरी राजकारणाचाच विषय आहे आणि होतो. त्याला अर्थातच इथले मुस्लिम वा हिंदू जबाबदार नसून, विकृत सेक्युलर राजकारण जबाबदार आहे. त्याची साक्ष उत्तरप्रदेशच्या एका मुस्लिमानेच दिली आहे. मोहंमद तौसिफ़ असे त्याचे नाव असून, ते भारतीय क्रिकेटपटू मोहंमद शमी याचे अब्बाजान आहेत. विश्वचषक स्पर्धेत रविवारी खेळल्या गेलेल्या भारत विरोधी पाकिस्तान या सामन्यात, त्यांच्या मुलने भेदक गोलंदाजी करून पाकिस्तानी फ़लंदाजी मोडून काढली. त्यामुळे भारताला मोठा विजय मिळवता आला. सहाजिकच त्याचा आनंद प्रत्येक भारतीयाला झाला, तसाच तो शामीच्या अब्बाजानला झाला तर नवल नाही. पण माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू वा त्यांच्यासारख्या काही सेक्युलरांना मात्र त्याच्या अतोनात वेदना झाल्या. त्यांना दोन्ही देशातील सौहार्दासाठी भारताने असा आनंद साजरा करू नये असेच वाटते. दुसरीकडे काही सेक्युलरांना तर भारताने पराभव स्विकारायला हवा होता असेही वाटले. मात्र तसे महंमद तौसिफ़ यांना वाटत नाही. आणि तसे न वाटण्याचे कारणही त्यांनी सुस्पष्ट शब्दात मांडले आहे. ते सेक्युलर डोळ्यात अंजन घालणारे आहे. अर्थात सेक्युलर डोळे तेवढ्यासाठी उघडे ठेवायची हिंमत असेल तर त्याचा उपयोग असेल ना? भारताच्या वतीने आपला मुलगा सैनिकासारखा लढला. कारण पाकिस्तानशी क्रिकेटचा सामना म्हणजे युद्धच असते आणि माझा मुलगा मायदेशासाठी लढला, असे अब्बाजान यांना वाटते. त्याच्या तशा लढण्याचा मुस्लिम असण्याशी संबंध नाही. भारतीय मुस्लिम आधी भारतीय म्हणजे राष्ट्रवादी आणि नंतर मुस्लिम असतो, अशीही ग्वाही तौसिफ़ यांनी दिलेली आहे. सेक्युलर शहाण्यांना मात्र भारतीय मुस्लिम नंतर भारतीय आणि आधी मुस्लिम असतो असेच वाटते.

अर्थात असेही वाटायला एकवेळ हरकत नाही. पण हे तर्कट पुढे इतके भरकटत जाते, की भारतीय मुस्लिम आधी मुस्लिम असल्यामुळे, त्याचा ओढाही पाकिस्तानकडेच असतो अशीही अशा सेक्युलर शहाण्यांची समजूत आहे. म्हणूनच त्यांना पाकिस्तानला दुखावणे वा पराभूत करणे, म्हणजे भारतीय मुस्लिमांच्या भावना दुखावणेच वाटते. मात्र तशी मानसिकता भारतातल्या मुस्लिमांची नाही, याची शेकडो उदाहरणे देता येतात. पण त्या बिचार्‍यांना कधी समोर आणले जात नाही. प्रत्येक वेळी भारतीय मुस्लिम हा धर्माचा निष्ठावान म्हणून भारतापेक्षा धर्माशी एकनिष्ठ असल्याचे दाखवण्याचा अट्टाहास चालतो. त्यांच्यामागे शमीच्या पित्यासारखे अस्सल भारतीय मुस्लिम जाणिवपुर्वक लपवले जातात. लोकसभा निवडणूकीपुर्वी १९६५ च्या भारत-पाक युद्धातला महापराक्रमी योद्धा अब्दुल हमीद याची वृद्ध पत्नी मुद्दाम गुजरातला नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद द्यायला गेलेली होती. एक मुस्लिम वृद्धा पाकला धडा शिकवण्याची भाषा बोलणार्‍या मोदींना आशीर्वाद द्यायला जाते, याला किती प्रसिद्धी मिळू शकली होती? पण जेव्हा कोणी पाकिस्तानची वकीली करणारा मुस्लिम असतो, त्याला ठळक प्रसिद्धी देऊन त्याचे अगत्याने कोडकौतुक चालते. त्यातून भारतीय मुस्लिम पाकधार्जिणाच असल्याचे चित्र उभे करण्याचा कटाक्ष असतो. पण वास्तव असे अजिबात नाही. मुठभर तसे मुस्लिम असतीलही. पण बहुतांश भारतीय मुस्लिम कडवे राष्ट्रवादी आहेत. म्हणूनच कुठलीही तमा न बाळगता शमीचे अब्बाजान आपला मुलगा सैनिकासारखा लढला असे अभिमानाने सांगतात आणि त्याच्या पुढे जाऊन भारत-पाक सामना म्हणजे युद्धच असते असेही सांगतात. मग सेक्युलरांना तो खेळ कशाला वाटतो? तर ही वास्तवात सेक्युलर समजूतीची समस्या आहे. सेक्युलर मानसिकतेची समस्या आहे. त्यात मुस्लिमाचा कसलाही संबंध नाही.

सेक्युलर असणे म्हणजे हिंदू संस्कृती, धर्म वा हिंदू म्हणून जे काही असेल, त्याचा द्वेष अशी समजूत काही लोकांनी करून घेतली आहे आणि तशाच लोकांना आजकाल सेक्युलर मानले जाते. मग अशा लोकांनाही तसेच वागावे लागत असते. तुम्ही कितीही धर्मनिरपेक्ष असा वा सहिष्णू असा, त्यामुळे तुम्ही सेक्युलर मानले जाऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला हिंदू शब्दाचा द्वेष करावा लागतो. आताही बघा, भारताने पाकला पराभूत केल्यावर इथले मुस्लिमही खुश झालेले असताना सेक्युलर मात्र कमालीचे विचलीत झाले आहेत. कारण अर्थातच इथल्या हिंदू संघटना वा संस्थांनी त्याबद्दल आनंद व्यक्त केला. हिंदूंचा आनंद म्हटला, की सेक्युलर असेल त्याला पोटदुखी व्हायलाच हवी. सुदैवाने इथले बहुतांश मुस्लिमही त्या अर्थाने सेक्युलर नाहीत. म्हणूनच त्यांना पाकिस्तान व भारत यापैकी कशाशी निष्ठावंत असावे हे नेमके कळते. महंमद शामी वा त्याचे अब्बाजान तसेच असल्याने त्यांना दोन देशातील क्रिकेट म्हणजे काय ते कळू शकते. मात्र सेक्युलर लोकांना खेळातला हा उत्साह म्हणजे धार्मिक उन्माद वाटतो. यामागची मानसिकता लक्षात घेण्यासारखी आहे. आपल्या देशात तसा हिंदू-मुस्लिम भेदभावही तसा मुलभूत नाही, ती एक सेक्युलर समस्या आहे. देशातला बहुसंख्य समाज हिंदू आहे आणि सर्वात मोठा अल्पसंख्य समाज मुस्लिम आहे. त्यांच्यात भिंत घालून उभा आहे त्याला सेक्युलर विचार म्हणता येईल. अशा दोन समाज वा श्रद्धावान वर्गामध्ये लढाई संघर्ष झालाच नाही, तर सेक्युलर या शब्दाला अर्थच उरणार नाही. हिंदीत म्हणतात ना? घाससे दोस्ती करेगा तो घोडा खायेगा क्या? घोड्याला गवताशी, चार्‍याशी दोस्ती करता येत नाही. त्यामुळे सेक्युलर नेहमी भिन्न समाजातल्या सौहार्दाच्या गप्पा मारतात. पन हे सौहार्द कसे बिघडेल यासाठी झटत असतात.

सेक्युलर दुकानदारांना दोन समाजात सख्य वा सौहार्द झालेले चालत नाही. त्यांच्यात सामंजस्य निर्माण झाले तर सेक्युलर राजकारणाच्या पोळ्या कशावर भाजायच्या? त्यासाठी मग सेक्युलर राजकारणात भिन्न श्रद्धा व धर्माच्या नावावर लोकांना लढवावेच लागत असते. नसलेले दुखणे शोधून त्याचे भय निर्माण करावे लागते. तरच यांचे दवाखाने चालतील ना? जिथे सेक्युलर नसतात, तिथे भिन्न धर्मियातला संघर्ष कमी असतो आणि धर्माच्या नावाने होणारा रक्तपातही कमीच असतो. गुजरातमध्ये दंगलीचे काहूर माजवण्यात बारा वर्षे खर्ची पडली. पण त्याच काळात त्या राज्यात हिंदू-मुस्लिम दंगली जवळपास थांबल्या आहेत. उलट त्याच काळात जिथे म्हणून सेक्युलर सरकारे होती, तिथेच अधिक हिंसक दंगली होऊ शकल्या आहेत. जर सेक्युलर सरकार आहे तर दंगली झाल्याच कशाला? आणि धर्मांध सत्ता आहे, तिथे दंगली कशाला होऊ शकल्या नाहीत? कारण गुजरातसारख्या राज्यात सेक्युलर नामोहरम होऊन गेले आहेत. तीस्ता सेटलवाड यांच्यासारख्या आगलाव्या सेक्युलर आदर्शाची पापे आता चव्हाट्यावर येत आहेत. बारा वर्षे इतरांना कोर्टात खेचणार्‍या या महिलेला आता कोर्ट व कायद्यापासून तोंड लपवून बसायची पाळी आलेली आहे. तिने केलेल्या प्रत्येक आरोप व खटल्यात मोदी निर्दोष ठरण्यापर्यंत कोर्ट व कायद्याला सामोरे गेले. आज तीच महिला कायद्यापासून फ़रारी झाली आहे. कारण ज्यांना सहाय्य देण्याच्या वल्गना केल्या जात होत्या, त्यांनीच आपली फ़सवणूक केल्याचा आरोप तिच्यावर केला असून त्यापासून तीस्ताला पळ काढावा लागतो आहे. यातून सेक्युलर हा देशातील किती किफ़ायतशीर चिथावणीखोर व्यापार झालेला आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. शामी वा त्याच्या अब्बाजानसारखे भारतीय मुस्लिम अशा सेक्युलर भामट्यांची डाळ शिजू देत नाहीत, हीच भारतीय एकात्मतेची हमी असते.

5 comments:

 1. Secularists mhanjey Gandhin chi pillaval aahey....Pakistan-dhaarjeeney aani akaley chey kande!

  ReplyDelete
 2. एकदम खरे आहे भाऊ! सेक्युलर लोकांनाच धार्मिक सौहार्द नको असते असे वाटते.

  ReplyDelete
 3. राजेश कुलकर्णीFebruary 20, 2015 at 1:06 AM

  माझ्या मते, त्याच्या वडलांचे उदाहरण चुकीचा पायंडा पाडणारे आहे. किंबहुना अनावश्यक आहे. ज्यांचे प्रामाणिक प्रयत्न पुढे येत नाहीत त्यांनी काय करायचे? याच धर्माचे अनेक खेलाडु याअाधीही आपल्याकदून खएळलेले आहेत आणि त्यांनी असे विधान केलेले स्मरणात नाही, त्याची गरजही नाही. दुसरी बाजू म्हणजे संघभावनेविरुध्द खेळणारेही दोन्ही धर्मातले आहेत. त्यातला एक धर्माच्या आधारावर पुढे भलत्याच राज्यातून खासदारही झाला ते वेगळे.
  एरवी सेक्युलर हा शब्दप्रयोग भाजपव्यतिरिक्त इतर सर्वांसाठी वापरला जातो. आपण त्यांना त्यांची खरी जागा दाखवली आहे.

  ReplyDelete
 4. भाऊ, शामी च्या वडीलांनी हे ही कबूल केलच की, की शामी भारताकडून खेळायला लागायच्या अगोदर त्याच्या गावातील मुसलमान पाकीस्तान च्या बाजुला असायचे

  ReplyDelete