Monday, February 23, 2015

लहान तोंडी मोठा घास घेणे भाग आहेपोर लाडावलेले असले, मग त्याला वेळीच वठणीवर आणावे लागते. अन्यथा असे पोर शेफ़ारत जाते आणि अतिरेक करू लागते. आपल्यालडे पुरोगामीत्व किंवा सेक्युलर नावाचे पोर असेच दिवसेदिवस खुप शेफ़ारले आहे. ते ओळखण्याची अक्कल स्वत:ला बुद्धीमंत मानणार्‍यांना नसली, तरी सामान्य जनतेला पुरेशी आहे. म्हणूनच कुठल्याही शेफ़ारत जाणार्‍या पोराला वेळीच वठणीवर आणायचे कौशल्य आजवर सामान्य बुद्धीच्या भारतीयांनी दाखवले आहे. अलिकडेच दिल्लीच्या निकालातून त्या जनतेने भाजपाच्या शेफ़ारत चाललेल्या मस्तवालपणाला वठणीवर आणले. पण ते भाजपाचे पोर तरी कशामुळे शेफ़ारले होते? आठ महिने आधी लोकसभेच्या निवडणूका झाल्या, त्यात जो पुरोगामीपणाचा अतिरेक झालेला होता, त्याचे पाय जमीनीला लागावेत म्हणूनच मतदाराने देशभरात सर्वाधिक बदनाम असलेल्या जातियवादी हिंदूत्ववादी ठरवल्या गेलेल्या नरेद्र मोदी यांनाच देशाच्या पंतप्रधान पदावर बसवले होते. त्याचा अर्थ सेक्युलर धर्मनिरपेक्षतेचे जे भयंकर थोतांड मागल्या दहा बारा वर्षात चालले होते, त्यालाच वठणीवर आणायचे होते. पण दुसरीकडे भाजपावाल्यांना आपल्याला मतदार जनतेने अढळपदाचा ताम्रपट बहाल केल्याची स्वप्ने पडू लागली आणि दिल्लीपासून थेट गल्लीपर्यंतचा भाजपावाला कुठल्याही दगडाला शेंदूर फ़ासून ‘पाया पडा’ असे आदेशच देत सुटला. मग त्याला कोणी वठणीवर आणायचे? ती नैतिक ताकद पुरोगामीत्वाचे उपरणे पांघरून निषेधाची होमहवने करण्यात गर्क असलेल्यांना शक्यच नव्हते. त्यामुळे आठ महिन्यात भाजपाला दिल्लीतल्या जनतेने त्याची औकात दाखवून दिली. याचा अर्थ आता भाजपा वा मोदींचा शेवट सुरू झाला, असल्या धुंदीत पुन्हा तथाकथित सेक्युलर पुरोगामी शेफ़ारल्यासारखे वागू लागले तर नवल नाही. आजकालच्या पुरोगाम्यांची अवस्था तर आधीच मर्कट त्यात मद्य प्याला, अशीच असते.

अशा एकूण धुंदीतल्या पुरोगाम्यांना पुन्हा शेफ़ारून जायला नुसती संधीच हवी होती. दिल्लीने तो मोका दिला आणि कालपरवाच्या कोल्हापुरातील एका हिंसक घटनेने तर हे लाडावलेले पोर पुन्हा शेफ़ारल्यागत भरकटू लागले. अजून कुठला पुरावा हाती नाही की तपासाला दिशाही मिळालेली नाही, अशा स्थितीत बेलगाम आरोपांची बरसात सुरू झाली. जगातल्या कुठल्याही दुर्घटनेला हिंदूत्ववादी वा हिंदू संघटनाच जबाबदार असतात, असा त्यांचा एक आवडता सिद्धांत आहे. त्यामुळे मग विनाविलंब कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचे खापर हिंदू संघटनावर फ़ोडण्याची स्पर्धाच सुरू झाली. इथपर्यंतही ठिक म्हणता येईल. कुठेही असे बेछूट आरोप आपल्या प्रतिस्पर्ध्यावर होतच असतात. पण त्यासाठी थेट नथूरामपर्यंत जाणे आणि आपण कसे अहिंसेचे पुजक असल्याचा आव आणणे; म्हणजे डोक्यावरून पाणी झाले. ज्यांच्या अशा वल्गना चालू आहेत, त्यांना त्यांचीच वंशावळ मग सांगणे भाग होते. पण दुर्दैवाने स्वत:ला जाणकार व विश्लेषक म्हणवून घेणारी मोठमोठी तोंडे अशावेळी मुग गिळून गप्प बसतात, हाच आजवरचा अनुभव आहे. मग ते काम कोणी तरी करायला हवे ना? आज जे कोणी अहिंसेचे गोडवे गात आहेत आणि विचारांचा संघर्ष हा विचारांनीच व्हायला हवा, असे हिरीरीने सांगत आहेत, त्यांचा इतिहास कितीसा ‘निरमा’ पावडरने धुतलेला आहे? की त्यांच्या घरात सर्फ़ वापरले जाते आणि म्हणूनच त्यांच्या अंगासह कपड्यांवर असलेले रक्ताचे-हत्येचे ‘डाग अच्छे’ असतात? नथूरामसाठी सगळा रा. स्व. संघ खुनी प्रवृत्तीचा म्हणायचा असेल, तर प्रत्येक कम्युनिस्ट वा त्या विचारांचा पुरस्कर्ताही रक्तलांच्छितच असणार ना? जो नियम संघाला लावाल, त्यापासून कम्युनिस्ट वा पुरोगम्यांची सुटका कशी होईल? गेल्या काही वर्षात केरळमध्ये डझनावारी हत्या कोणाच्या झाल्या व कोणी केल्या?

आपल्या विचारांशी व भूमिकेशी सहमत नसतील त्यांना खुन पाडून संपवायची लढाई कम्युनिस्टांनी गेल्या शतकात जगभर अंमलात आणलेली आहे. त्याला भारत सुद्धा अपवाद नव्हता. त्यामुळे जो कोणी कम्युनिस्ट तत्वज्ञानाचे गोडवे गातो, त्याने उगाच विचारांचा संघर्ष विचारांनीच करायवी मानभावी भाषा करण्यात अर्थ नाही. मजेची गोष्ट म्हणजे असे आज कोणी म्हटले, मग तमाम पुरोगामी एकाच बापाचे वारस असल्यासारखे अंगावर येतात. पण वास्तवात ते एकाच पित्याची संतान नाहीत आणि कालपरवा त्यांचेच पुर्वज एकमेकांवर असेच अरोप करत होते. दाभोळकरांनी ज्यांचा वारसा चालविला, ते एस एम जोशी, नानासाहेब गोरे किंवा बॅरिस्टर नाथ पै यांनी अर्धशतकापुर्वी कोणाकडे खुनी व रक्तपिपासू म्हणून बोटे दाखवली होती? त्याचा त्यांच्याच आजच्या वंशजांनी शोध घेतला आहे कधी? नथूरामची वंशावळ आणि पिलावळ शोधण्यापेक्षा अशा पुर्वाश्रमीच्या समाजवाद्यांनी स्वत:चाच वारसतपास करून घ्यावा. ज्या ट्रॉटस्की, केरेन्स्की वा इम्रे नाझ यांच्या सांडलेल्या रक्ताने तेव्हाचे समाजवादी आक्रंदून रडत होते, ते रक्त सांडणारे कुठले हिंदूत्ववादी होते? त्यांनी गोळवलकर गुरूजी यांची पुस्तके वाचली होती, की लेनीन-स्टालीनचा वारसा पत्करला होता? छत्तिसगडच्या सुकमा भागात विद्याचरण शुक्ला यांच्यासह दोन डझन कॉग्रेसच्या नेत्यांचे सामुहिक हत्याकांड करणारे माओवादी संघाच्या शाखेतले स्वयंसेवक होते, की दास कॅपिटल या धर्मग्रंथाचे पठण करणारे होते? तेव्हा त्यांनी चोखाळलेला मार्ग हिंदुत्ववादाचा व धर्माचा होता, की वैचारिक लढाईचा होता? वैचारिक संघर्ष विचारांनी करायचा अशी पोपटपंची करणार्‍यांनी तेव्हा कम्युनिस्ट हिंसक तत्वांचा हिरीरीने निषेध केला होता काय? केरळात एका मार्क्सवादी नेत्याने विरोधकांना ठार मारण्याचा जो ‘विचार’ मांडला, त्याचे चित्रणही प्रसिद्ध आहे. त्याचा निषेध यापैकी कितीजणांनी केला होता?

संवेदनाशील असणे म्हणजे काय असते बुवा? चित्त्याची वा सिंहाची मादी आपल्या पिलांचे पोट भरण्यासाठी हरण व झेब्र्याच्या पिलावी निर्घृण शिकार करते. तिची ती ममता असते काय? त्यापेक्षा आपल्या हिंसाचाराला वैचारिक दागिने घालणार्‍यांच्या मिरवण्याला कुठला वेगळा अर्थ असू शकतो? ज्या चे गव्हेराचे मुखवटा छापलेले टीशर्ट मोठ्या अभिमानाने मिरवले जातात, त्याच्या भूतदयेच्या कहाण्य़ा काय सांगतात? आपल्या विरोधकांवर नुसते आरोप ठेवून त्यांचे शिरकाण करणार्‍या कॅस्ट्रो वा गव्हेराने कोणती वैचारिक लढाई हत्याराशिवाय लढवली होती? नथूरामच्या नामजपाची जपमाळ अहोरात्र ओढत बसलेल्या पुरोगामी संतमहंतांना आपलाच इतिहास कसा आठवत नाही? त्यांच्याच मागे हुरळलेल्या त्यांच्या सावत्र वा अनौरस समाजवादी बांधवांना आपल्या पुर्वजांच्या शब्दांचेही स्मरण उरलेले नाही. अशा सगळ्या उपटसुंभांनी किती खोटेपणा करावा यालाही मर्यादा असतात. सभ्यपणा म्हणून कोणी गप्प बसत असेल वा मौन बाळगत असेल, तर त्यालाच दुबळेपणा मानला जाणे चुकीचे आहे. कम्युनिस्टांचा भारतातला व जगातला इतिहास हिटलर वा तालिबानांपेक्षाही भीषण रक्तलांच्छित आहे. त्यांनी गांधीच्या वारश्याची उसनवारी करून भोळसट समाजवादी वंशजांना बगलेत मारून किती नाटक रंगवावे याला मर्यादा आहेत. आज जे आरोप दाभोळकर व पानसरे यांच्या हत्याकांडानंतर हिंदूत्ववाद्यांवर चालू आहेत. त्यापेक्षा अधिक गंभीर आरोप १९५०-६० च्या दशकात कम्युनिस्टांवर समाजवाद्यांनी केलेले होते. त्यावरून राजकारणही केलेले होते. १९४८ चा नथूराम आठवणार्‍यांना त्यानंतर बारा वर्षांचा इतिहास कसा आठवत नाही? इतिहासाचा तो कोळसा उगाळण्याची इच्छा नव्हती. पण शेफ़ारलेल्यांना शुद्धीवर आणण्यासाठी तोच कोळसा उगाळणे भाग आहे. मोठ्या तोंडांची दातखिळी बसली असेल, तर लहान तोंडी मोठा घास घेणेही भाग आहे. (अपुर्ण)

8 comments:

 1. भाऊराव,

  अगदी साधी गोष्ट आहे. दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्यांच्या आडून जे हिंदू संघटनांवर चिखलफेक करतात त्यांच्या विशिष्ट अवयवात अणुमात्र चरबी नाही. गेल्या आठवड्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या देशद्रोही संघटनेने शिवमोग्गा (कर्नाटक) येथे सलग ३ दिवस दंगल घडवली होती. गिरीश कर्नाड अशा वेळेस मूग गिळून गप्प बसणार. केरळातल्या जोसेफ नामे प्राध्यापकाचा हात तोडणारी हीच ती संघटना बरंका. मुस्लिमांविरुद्ध ब्र काढायची हिंमत नाही या पुरोगाम्यांत! हिंदुत्ववादी लोक ऐकून घेतात म्हणून त्यांच्याविरुद्ध गरळ ओकायचं. जमीन मऊ लागली तरी कोपराने खणू नये. ही अक्कल कधी येणार पुरोगाम्यांना देव (हो, देवच) जाणे!

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  ReplyDelete
 2. वर्तमानातला थोडासा संदर्भ घेऊन तो इतिहासाच्या चिखलात बुचकळून झणझणित रक्त उसळवणारं लिखाण आहे हे! भाउ तुम्ही जे सांगत आहेत ते सगळं ऐतहासिक सत्य आहे. तुम्ही सांगत नसलेलं पण खूप काही सत्य आहे - म्हणजे कम्युनिस्ट कृष्णा देसाईच्या खुनाचा आरोप कसा शिवसेनेवर होता आणि त्यांने मुंबईचं राजकारण कसं बदललं वगैरे. असो - मुद्दा तो नाही. मुद्दा आज काय चाललय त्याचा आहे. दंगल झाली की विशिष्ठ धर्माच्या पोरांना आत टाकणं हे आजच सत्य. नथुरामचं मंदिर बांधण्य़ाच्या वल्गना करणारे विहिप हे आजचं सत्य, आणि पानसरेंचा उल्लेख आहे म्हणून सांगावसं वाटतं - एवढा जनसागर लोटला त्यांना निरोप द्यायला पण एकही सरकारी मंत्री वा अधिकारी नव्हता airport वर की कोल्हापुरात. भाजप आणि सेना एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढण्यात रमले होते - या रापलेल्या म्हाताऱ्याच्या मृत्युचं त्यांना काही फारसं पडलेलं नव्हतं. पानसरेंनीही इतिहासावर लिहिलं. का? कारण आज इतिहास विकृत करण चाललं आहे, ते थांबावं म्हणून - इतिहास वापरून कोणाचा काटा काढायचा म्हणून नव्हे.

  ReplyDelete
  Replies
  1. १) त्यांच्याच पक्षाचे दिल्लीकर नेते किती फ़िरकले कोल्हापूरला?
   २) वास्तवाची दुर्गंधी नाकातोंडात गेली मग इतिहास चिखल होणारच. बाकी तुम्ही उगाळता ती इतिहासाची बासुंदी असते काय?

   Delete
  2. कृष्णा देसाई बद्दल तर बोलू नका. तुम्ही त्याला बघितलेला सुद्धा नाही. मी त्याला चार हात अंतरावरून बघितले व त्याचे उपदव्याप अनुभवलेत बालपणी.

   Delete
  3. http://bhautorsekar.blogspot.in/2012/12/blog-post_5.html

   Delete
 3. मी मूळ लेखाशी सहमत आहे... कोणीतरी माझ्या सारखा विचार करतो तर ?

  ReplyDelete
 4. भाऊ,
  तो टांगा उलटा झाला आणि घोडा फरार झाला तुमच्या उत्तरांनी
  - आभिमन्यू यशवंत अळतेकर
  ता.क.
  आता एक हॅंडबील ची प्रत नेटवरून मिळाली आहे..... लंगडे चालू लागले .... आंधळे बघू लागले ... इमेल करतो
  हे हॅंड्बिल आले की सगळे अंधश्रध्दा निर्मूलन वाले व धर्म, देव, आत्मा न मानणारे सगळे साम्यवादी कुठे जातात ते कळत नाही ?

  ReplyDelete
 5. असेच काहीसे पेरियार वाल्यांचे आहे. टिव्हीवर सकाळी ओरडून सांगत होते की, पेरीयारवाले सामाजिक कार्य करतात. किती खोटे बोलावे याला काही मर्यादा नाही. का हे टीव्हीवाल्यांचे अज्ञान असते ?

  ReplyDelete