Wednesday, February 25, 2015

पुरोगामी-प्रतिगामी: एकूण झुंडशाहीचBertrand Russell — 'Collective fear stimulates herd instinct, and tends to produce ferocity toward those who are not regarded as members of the herd.'

माणूस हा मुळातच कळपात जगणारा प्राणी आहे. विविध विषयात तसा उल्लेख मुद्दाम केला जातो. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, असे म्हणायचा वास्तविक अर्थ काय? समाज म्हणजे तरी काय? इतर प्राणी जसे थव्याने वा कळपाने एकत्र जगतात, तसाच माणुसही कळपात वावरतो. जो भित्रा प्राणी असतो, तोच कळपाने जगतो. माणूस त्याला अपवाद नाही. आपण एकटेच आपले संरक्षण करू शकत नाही आणि समूहशक्तीनेच आपण सुरक्षित राहू शकू, अशा भयापोटी समाज नावाचा कळप माणसाने स्विकारलेला असतो. त्याही कळपात लहानमोठे समूह वा झुंडी असतात. जोवर बाहेरच्या कुठल्या धोक्याचे सावट असते, तोवर अशा समुहांची एकजिवता पक्की असते आणि जेव्हा हा बाहेरचा धोका संपुष्टात येतो, तेव्हा कळपाच्या अंतर्गत समुहातील उपजत हेवेदावे उफ़ाळून येतात. अर्थात अशा लहान समुहातही एकजीवता नसते. त्यातही व्यक्तीगत स्वरूपाचे वाद वितुष्ट असतातच. पण परस्पर गरजेपोटी एकरूपता स्विकारलेली असते. एकूण काय माणुस हा मुळातच झुंडीने जगतो आणि झुंडीसारखाच वागतो. अगदी आपल्या पांढरपेशा चेहर्‍याचे सभ्यपण मिरवणारेही त्यातलेच असतात. त्यामुळेच आधुनिक जगात ज्या काही विचारसरणी तत्वज्ञानाच्या गप्पा चालतात, त्याही झुंडीचे प्रतिक झालेले आहे. विचारांची लढाई शेवटी त्याच झुंडीपर्यंत येऊन थांबते. म्हणूनच झुंडीची मानसिकता समजून घेतली, तर आजच्याही युगातल्या वैचारिक लढाईची ढोंगबाजी उमजू शकेल. जोवर तुमच्यापाशी प्रतिकाराची शक्ती नसते, तोवर विचारांचा ढोल वाजवला जात असतो आणि तितकी हिंसक ताकद गोळा झाली, की वैचारिक झुंडीचे साम्राज्य उदयास येत असते. पण व्यवहारात सगळीकडे झुंडीनेच लोक जगत असतात आणि त्यातले मुठभर आपापल्या हेतू वा भूमिकेसाठी तत्वज्ञानाचे मुखवटे लावत असतात.

कालपरवा कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येनंतर अंत्ययात्रेत जी गर्दी उसळली होती, तिथे लाल झेंड्यासह लाल टोप्यांचा जमावडा दिसत होता. लाल सलामच्या घोषणा दिल्या जात होत्या. दाभोळकर यांच्याही संदर्भात तसेच म्हणता येईल. पण दुसरीकडे शिवसेनेच्या, बजरंगदल वा भाजपाच्या मेळाव्यातही त़सेच चित्र दिसते. सोहळा वा प्रसंग कुठलाही असो, त्यात सहभागी होणार्‍यांना प्रतिकाचे आकर्षण असलेले दिसेल. अगत्याने टोप्या, झेंडे वा ठराविक फ़लक वा वस्त्रेप्रावरणे परिधान केलेली दिसतात. अशी प्रतिके झुंडीसाठी अगत्याची असतात. कारण ती भूमिका वा विचारांचे प्रतिनिधीत्व करत असतातच. पण त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे सामान्य व्यक्तीला अतिरीक्त उर्जा देत असतात. अंगी नसलेल्या सामर्थ्य व शक्तीची अनुभूती त्या व्यक्तीला अशा प्रतिकांमधून मिळत असते. एक तगडा गुंड असतो आणि त्याच्या तुलनेत हाडकुळा असलेला पोलिस शिपाई सुद्धा गुर्मीत बोलताना आपल्याला दिसतो. एका ठोश्यात गुंड अशा पोलिसाला झोपवू शकतो. पण त्याच्या अंगातले ते धाडस पोलिसाच्या गणवेशामुळे पांगळे पडत असते. ही प्रतिकांची किमया असते. त्या गणवेशामुळे पोलिस एकटा उरत नाही. त्याच्यामागे संपुर्ण सरकारची ताकद उभी असल्याचे भय गुंडाला गप्प ठेवीत असते. अगदी तीच बाब सार्वजनिक जीवनात बहुतांश प्रतिकांची असते. झुंडीत जगणारा माणूस म्हणूनच अशा प्रतिकांच्या आहारी जातो. त्याच्या अंगभूत नसलेल्या गोष्टी त्याला अशी प्रतिके काही काळापुरती बहाल करीत असतात. संघाच्या शाखेत गणवेशात जाणारा स्वयंसेवक आणि लाल टोपी घालून गर्जणारा कम्युनिस्ट यांची अवस्था वेगळी नसते. त्यांना विचारांपेक्षा ती प्रतिके शक्ती देत असतात. त्याच प्रतिकांच्या स्वरूपात त्यांच्या बुद्धीचे नियंत्रणही होत असते. त्यांना कार्यान्वीतही केले जात असते.

मोदींच्या विषयी काहीही लिहा वा बोला, त्यांचा भक्तगण विनाविलंब तुमच्यावर तुटून पडतो. विविध भिन्न जागी असलेला हा अनुयायी सारखाच व्यक्त होताना दिसेल. भाजपा विरोधकांचीही अवस्था त्यापेक्षा वेगळी आढळणार नाही. पानसरे यांची हत्या झाल्यावर हिंदूत्ववाद्यांच्या विरोधात असलेल्या सर्वच झुंडीतले लोक समान भाषेत सारखीच प्रतिक्रिया देताना आढळले ना? कालपरवा विधानसभेत एकमेकांचे गळे धरणार्‍या शिवसेना भाजपाच्या अनुयायांची इथे एकजीवता दिसून येईल. कारण पुरोगामी व प्रतिगामी असे दोन तट पडले, मग अंतर्गत झुंडी विरघळून एकजीव होऊन जातात. पानसरे यांच्या हत्येनंतर असेच अनेक गट एकसुरात बोलताना दिसतील, इतर प्रसंगी त्यांचे सूर परस्पर विरोधात दिसतील. झुंडीत जगणार्‍यांना स्वयंभूपणे विचार करण्याची मोकळीक नसते. त्यांना प्रसंगानुसार वहावत जावेच लागते. पुरोगामी असले मग हिंदू संघटनांच्या विरोधात काहीही असले, मग एकत्र येऊन बोलावेच लागते. विषय मदर तेरेसाचा असो किंवा बाबरीचा असो. नेमके तेच हिंदू संघटनांच्या बाबतीत आपल्याला बघता येईल. झुंडीत रहायचे तर झुंडीच्या प्रतिकांना व ओळखीला जपावे लागत असते. सहाजिकच कुठल्या झुंडीचे प्रतिनिधीत्व करता, त्यानुसार तुमची भूमिका ठरत असते. तिथे विवेकाला स्थान नसते. पुरोगामी ओळख असलेल्यांवर हल्ला झाला, मग विनाविलंब प्रतिगामी मानल्या गेलेल्यांनीच तो केल्याचा ओरडा सुरू करायचा असतो. तेच प्रतिगामी उलट परिस्थितीत करताना दिसतील. त्यात योग्य अयोग्य असला भेदभाव करायला वाव नसतो. तसा विवेक दाखवायला गेल्यास तात्काळ तुम्ही गद्दार असल्याचा आरोप तुमच्याच झुंडीतले लोक एकमुखाने करू लागतात. किंबहूना त्याचीच भिती असते, म्हणून झुंडीत जगावे लागते. आज विवेकाची भाषा केली आणि उद्या एकटे पडलो तर आपलेच सहकारी मदतीला येणार नाहीत, याची भिती असते ना?

म्हणून तर झुंडीतले लोक एका झुंडीतून दुसर्‍या झुंडीतही जातात आणि मग आपल्याच जुन्या झुंडीवर बेछूट आरोपही करू लागतात. कारण अशा सर्वांना एकटेपणाची असुरक्षितता भेडसावत असते. विचार, धर्म, जात, संघटना वा तत्सम विविध झुंडी म्हणूनच मानवी जीवनाचे यशस्वी नियंत्रण करत असतात. त्यातले काही गट वा झुंडी आपण झुंड नसल्याचे दावेही करतात. विवेकाचे मुखवटेही लावतात. पण वास्तवात तेही झुंडीनेच जगत असतात आणि झुंडीसारखेच वागत असतात. त्यांच्यातला वाद चर्चेने कधीच संपत नाही की निकाली लागत नाही. त्याचा निचरा शेवटी कुठली झुंड अधिक शक्तीशाली असते, त्यानुसारच होत असतो. मग त्याच शक्तीच्या बळावर सत्याचा विजय झाल्याचा डांगोरा पिटला जात असतो. भिन्न विचारांची कत्तल होत असल्याचा दावा करणार्‍या कम्युनिस्टांची जिथे सत्ता आली, त्यांनी कुठल्या दुसर्‍या राजकीय विचार वा तत्वज्ञानाला डोके वर काढू दिले काय? फ़ॅसिस्ट लोकांच्या सत्तेत मतभिन्नतेला स्थान असू शकते काय? भारतातल्या कुठल्या लोकशाही पक्षात नेत्यांच्या विरोधात बोलून वा भूमिका घेऊन पक्षसदस्य रहाणे शक्य आहे? सोमनाथ चॅटर्जी कशाचा बळी होते? विचारांचा की विवेकाचा? तेही झुंडीचाच बळी नव्हते का? शरद पवारांना वेगळी चुल कशाला मांडावी लागली? रा. स्व. संघात त्यापेक्षा वेगळी स्थिती नाही. मग ते फ़ॅसिस्ट आणि बाकीचे लोकशाहीनिष्ठ कसे? सगळ्याच झुंडी असतात. मात्र आपण झुंड आहोत, हे मान्य करायची कोणाची तयारी नसते. हजारो वर्षापुर्वी आपले पुर्वज झुंडी व कळपाने जगले आणि आपणही आज तसेच जगतो. पुर्वजांपेक्षा आजचे आपण अधिक पाखंडी व ढोंगी आहोत इतकेच. बाकी आपल्यात त्यांचेच सारे गुणदोष तसेच ठासून भरलेले आहेत. आजही इतक्या वैज्ञानिक भौतिक प्रगतीनंतर आपण आपल्यातल्या ‘समाजप्रिय’ जनावरावर मात करू शकलेलो नाही. आजही आपण कळपातले जनावरच आहोत.

1 comment:

  1. भाऊ, तुम्ही खरोखरीचे लोकशाहीचे जाणकार आहात. आपल्या देशात लोकशाहीचे शिक्षण मिळत नाही.अशा लेखांमुळे ह्या कामाची सुरवात व्हावी.

    ReplyDelete