Saturday, March 28, 2015

केजरीवालांचे भवितव्य काय असेल?सध्या आम आदमी पक्षात मोठे वादळ घोंगावते आहे. पण त्यामुळे फ़ार काही मोठी राजकीय उलथापालथ घडण्याची शक्यता नाही. जेव्हा माणसे सतत कारस्थानी मानसिकतेत रमतात, तेव्हा त्यांना सर्वसाधारण मनाने जगणेच अशक्य होऊन जाते. एखाद्या अट्टल जुगार्‍याप्रमाणे त्यांना त्याची नशा लागते आणि सुखनैव काही करण्याच्या अवस्थेत अशी माणसे रहात नाहीत. कुठलेही काम नीटनेटके होत असेल, तर त्यात गफ़लत उभी करण्याचा हव्यास त्यांना आवरता येत नाही. आताही आम आदमी पक्षात जे रणकंदन माजले आहे, त्यामागे तीच मानसिकता आहे. सतत कुणावर आरोप वा शंका व्यक्त करूनच राजकीय सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा पावलेल्या या टोळीला, राजकीय पक्षाची नोंदणी झाली आहे, म्हणून पक्ष संबोधावे लागते इतकेच. अन्यथा आपसात झुंजणार्‍या कळपासारखी त्यातल्या लोकांची स्थिती आहे. जोवर बाहेरच्या कोणावर ओरडायची खेकसायची संधी होती, तोवर तसा कारभार झाला. आता ती संधी संपली आहे, तर त्यांनी एकमेकांवर दुगाण्या झाडायचा पवित्रा घेतला आहे. अनेक राजकीय पक्षात आजवर दुफ़ळी माजलेली होती. पण त्यामुळे पक्षाचे तुकडे झाले आणि अनेक पक्ष आकारास आले. पण त्यातले विवाद या पक्षात चालू आहेत, तसे कधीच झाले नाहीत. एकाने दुसर्‍याची हाकालपट्टी करावी किंवा एका गटाने आपणच साथ सोडावी. मग बाहेर फ़ेकलेल्या वा बाहेर पडलेल्याने वेगळी चुल मांडावी, तसा नवा पक्ष अस्तित्वात यायचा. इथे मोठी गंमतीशीर स्थिती तयार झालेली आहे. ज्यांना हाकलायचे आहे, त्यांनी आपणच निघून जावे, ही केजरीवाल यांची अपेक्षा आहे. ते जणार नसतील, तर पक्षाने त्यांना हाकलावे, अशीही अपेक्षा आहे. पण ते नकोसे झालेले लोक मात्र बाहेर पडायला राजी नाहीत. तर हाकलून लावावे म्हणून अट्टाहास धरून बसले आहेत.

“An appeaser is one who feeds a crocodile - hoping it will eat him last” -Winston Churchill

तसे बघितल्यास पहिल्यापासून आम आदमी पक्ष हा कधीच संघटनात्मक पक्ष नव्हता, किंवा त्यात लोकशाही पद्धतीने कारभार चालला नाही. अगदी आरंभीच्या काळात उमेदवार निवडणे वा नंतर सरकार स्थापनेसाठी मतदारांचा कल विचारणे, ही समस्त नाटके होती. प्रत्यक्षात गर्दीमध्ये आपलेच हस्तक बसवून ओरड्याने जनतेचा कल घेतल्याचे नाटक रंगवण्यात आलेले होते. अगदी मोदी विरोधात वाराणशी येथील निवडणूक लढवताना केजरीवाल यांनी तोच तमाशा केलेला होता. तेव्हाही चारपाच हजार लोक दिल्लीहूनच नेलेले होते. मुंबई-बंगलोर वा गुजरातचे दौरेही अशाच आयातीत गर्दीच्या देखाव्यातून रंगवले गेले. आपण कसे थेट जनतेच्या इच्छेने चालतो आणि सामान्य माणसाच्या मताला किंमत देतो, हे दाखवण्याचे ते निव्वळ नाटक होते. पण त्याचा राजकीय लाभ पक्षाला होत असल्याने, प्रशांत भूषण, योगेंद्र यादव इत्यादींनी त्याचेही जाहिरपणे कौतुक चालविले होते. आज त्याच दोघांवर खोटेपणाने हल्ला झाला, तेव्हा सत्य सांगण्याची हिंमत त्यांनी केली आहे. पहिल्यापासून केजरीवाल कुणाचे मत घेत नाहीत व स्वत:चे निर्णय लादतात, असे यादव आज सांगत आहेत. मग जेव्हा अशाच एकारलेपणाचे बळी जात होते, तेव्हा यांनीच कुणाची तळी उचलून धरली होती? शाझिया इल्मी, उपाध्याय, विनोदकुमार बिन्नी अशा एकामागून एक सहकार्‍यांचा बळी केजरीवाल बेमुर्वतपणे घेत चालले होते. त्यांना रोखण्याचा एक तरी प्रयत्न यादव-भूषण यांनी केला होता काय? काल पक्षात आलेल्या व आज पक्षाचे दिल्लीतील लोकसभा उमेदवार झालेल्या खेतान-आशुतोष अशा लोकांविषयी इल्मींनी तक्रार केली होती. त्यांना याच दोघांनी तेव्हा कशाला साथ दिलेली नव्हती? कुणालाही पक्षात घेऊन नेता उमेदवार बनवण्यापर्यंत केजरीवाल मनमानी करीत होते, त्यांना कोण रोखू शकणार होते? यादव-भूषण यांनीच ज्येष्ठ म्हणून ते करायला नको होते काय?

सत्तेची व अधिकाराची हाव नेहमी श्वापदासारखी असते. ती भूक जितके खात जाल, तितकी वाढतच जाते. जेव्हा बिन्नी-इल्मी यांची शिकार पचून गेली, तेव्हा केजरीवाल आणखी मोठी शिकार करायला सवकले तर नवल कुठले? हा माणुस पहिल्यापासून कारस्थानी व कुटील डावपेच खेळणारा आहे. त्याची देहबोली त्याची साक्ष देते. गेल्या दोनतीन वर्षात अखंड वाहिन्यांवर चमकलेला हा माणुस, शेकडो तास तुम्ही बघितलेला असेल. पण त्यापैकी कधीच त्याने कॅमेरात थेट नजर भिडवून कुठले विधान केलेले सापडणार नाही. ज्याच्याशी केजरीवाल बोलतात, तेव्हाही त्याच्या नजरेला नजर भिडवून ते बोलताना दिसणार नाहीत. व्यासपीठावरून भाषण करताना सातत्याने हा माणूस चुळबुळ करताना दिसेल. कायम मनातली चलबिचल त्याच्या भिरभिरणार्‍या नजरेतून लक्षात येऊ शकते. हे अस्थीर मानसिकतेचे लक्षण आहे. कुठल्याही गोष्टीत लक्ष केंद्रित करणे वा एका विषय कामावर ठाम रहाणे; त्याच्या स्वभावात नाही. सातत्याने मनात कमालीची अस्वस्थता दिसेल. आणि कुठल्याही बारीकसारीक बाबतीत हट्टीपणाने आपलेच खरे करण्याचा आग्रह असतो. लहान मुले जशी आपल्याला फ़लंदाजी मिळत नसेल, तर बॅट चेंडू घेऊन जाण्याच्या हट्टाला पेटतात, तसे केजरीवाल बोलताना वागताना दिसतील. सहाजिकच त्याचे प्रत्यंतर स्थैर्य आल्यानंतरच मिळू शकते. मागल्या खेपेस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना उत्तम कारभार करून देण्याची संधी मिळालेली होती. पण त्यांनी तडकाफ़डकी जनलोकपाल विधेयकाचा अवैध आग्रह धरून राजिनामा दिला. तेव्हाही सहकार्‍यांना विश्वासात घेतले नव्हेत. थेट जमलेल्या घोळक्यासमोर राजिनामा दिल्याची घोषणा करून टाकली. आता इतके मोठे बहूमत मिळाल्यावर पक्षात कोण कुठल्या पदावर असण्याच्या हट्टापायी पक्षाचीच धुळधाण करायचा हट्ट कशासाठी? आपल्या शब्दाबाहेर पक्ष नाही हे ठाऊक असूनही, ते दर्शवण्याचा ह्ट्ट कशाला?

कुठूनही सतत वादग्रस्त रहायचे आणि लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे, हा केजरीवाल यांचा मानसिक आजार आहे. सहाजिकच सर्वकाही सुरळीत चालू असेल, तर कुरापत वा खुसपट काढून वादाला ते आमंत्रण देतात. दिल्लीत दिलेली आश्वासने पुर्ण करणे सोपे काम नाही, त्याकडे लक्ष पुरवले आणि बाकीच्यांना पक्षाचे काम करायची मुभा दिली, तर काय बिघडणार आहे? यादव वा भूषण यांना तितकी लोकप्रियता आजही गाठता आलेली नाही. म्हणूनच ते पक्षात राहून व केजरीवाल यांच्याच नेतृत्वाखाली काम करू शकतील. नव्हे, त्यांना ते करावेच लागेल. पण त्यांनी एकत्र रहावे व केजरीवालचे नेतृत्व मानावे, त्यासाठी पक्ष शाबुत असायला हवा. तोच रसातळाला गेला तर केजरीवाल किंवा यादव यापैकी कोणालाही कवडीची किंमत रहाणार नाही. तसे झाले तर यादव-भूषण यांचे फ़ारसे बिघडणार नाही. पक्षाचे अस्तित्व आणि लोकप्रियता यावर केजरीवाल यांचे भवितव्य अवलंबून आहे. कारण सत्तापदावर ते आहेत आणि कामाच्याच आधारावर त्यांना राजकीय भवितव्य असू शकणार आहे. पक्षात अशी दुफ़ळी माजली आणि त्याचे  तुकडे पडले, तर आज सगळे आमदार केजरीवाल सोबत रहातील. पण दरम्यान ज्या सदिच्छा या पक्षाला दिल्लीकरांनी मतातून दिलेल्या आहेत, त्या मातीमोल झाल्या, तर केजरीवाल यांचे भवितव्य काय असेल? सत्तापद मिळाल्यावर मोठी जबाबदारी असते आणि ते टिकवणे ही पहिली जबाबदारी असते. या माणसाचा सत्तेचा हव्यास व त्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याचे लोकसभा पराभवानंतरचे प्रयास दिसले आणि आता उघडपणे यादव-भूषण यांनी कबुल केले आहेत. मग पदाचा हव्यास असलेल्याने किती संयम दाखवायला हवा? केजरीवाल तसे वागताना दिसत नाहीत, कारण त्यांची मनस्थिती स्थीर नाही अस्थीर आहे. उभे करायचे आणि लाथ मारून मोडायचे, ह्या स्वभावाला कोणते भवितव्य असते?


insane का insane से हो भाईचारा
यही पैगाम हमारा, यही पैगाम हमारा
=========================
insane (in a state of mind which prevents normal perception, behaviour, or social interaction; seriously mentally ill.)

No comments:

Post a Comment