Monday, March 9, 2015

कल्पनेतला भारत, वास्तवातला भारत

अनेकदा वाहिन्यांवरील चर्चा ऐकताना एक इंग्रजी शब्दावली आपल्या कानावर येऊन आदळत असते. आपल्याला त्याचा अर्थ सहसा उमगत नाही. पण काहीतरी मोठी गोष्ट असावी अशी समजूत करून आपण दुर्लक्ष करतो. ती शब्दावली आहे ‘आयडीया ऑफ़ इंडीया’ अशी. ही काय भनगड आहे? तर भारत नावाची एक कल्पना आहे असे हे बुद्धीमंत मानतात आणि तिच्या अनुषंगाने त्यांचे आकलन व विश्लेषण चालू असते. त्याचा नेमका अर्थ घ्यायचा, तर कल्पनेतील भारत असा घेता येईल. मग कल्पनेतील भारत हा वास्तवातील नाही, असेच त्यांचे गृहीत नाही काय? असेल तर ते ज्याविषयी बोलत असतात, ते वास्तवाशी निगडीत नसते, तरी वास्तव भारताविषयी त्यांच्या मनात जी काही कल्पना असते, तिच्या आधारावर हे लोक घटना घडामोडीचे विश्लेषण करत असतात. थोडक्यात ते आपल्याच कल्पनाविश्वात भ्रमण करीत असतात. मात्र संदर्भासाठी घेतलेली घटना त्या कल्पनेतली नसते, तर वास्तवातील असते. सहाजिकच त्यांच्या चर्चा व विश्लेषण विरोधाभासी बनत जाते. त्यात क्रमाक्रमाने अधिक विसंगती येत जाते. कुठल्याही कल्पनेला आकार द्यायचा असेल, ती वास्तवात आणायची असेल, तर कल्पनेला व्यवहाराची जोड द्यावीच लागते. म्हणजे वास्तवात तशी परिस्थिती निर्माण करावी लागते. आपला बंगला असायला हवा आणि तो असाच अमूक राजमहालासारखा असावा, ही कल्पना झाली. तो उभा करायचा तर त्यासाठी योग्य असा भूखंड आवश्यक आहे. मग त्याचा परिपुर्ण आराखडा बनवायला हवा आणि त्यानंतर हाताशी तितके बांधकाम साहित्य तयार असायला हवे. यापैकी काहीच नसेल, तर तसा बंगला उभा राहू शकत नाही. पण तुम्ही कल्पनेतच अशा बंगल्यात वास्तव्य करू लागलात, मग ती भ्रमिष्टावस्था असते. कुठतरी ठेच लागण्याची शक्यता आपणच निर्माण करत असतो.

म्हणजे असे, की तुम़चे स्वप्न आहे बंगल्याचे आणि तो प्रत्यक्षात उभा केलेला नसताना, तुम्ही त्यातच वावरू लागलात, तर वास्तवात तुम्ही स्वत:ला अपघात करून घेऊ शकता. म्हणजे बंगल्याच्या गच्चीवर वा बागेत फ़िरण्याच्या भ्रमात रस्त्यावर गाडीखाली सापडून अपघात करून घेऊ शकता. तळ्यात बुडू शकता. कारण कल्पना हे वास्तव नसते, वास्तवात तुम्ही रस्त्यावर किंवा तळ्यानजिक असता. मग झालेल्या अपघातासाठी कुणाला दोष द्यायचा? वास्तवातल्या रस्त्याला, त्यावरून धावणार्‍या गाडीला, की तुडुंब भरलेल्या तळ्यातल्या पाण्याला गुन्हेगार मानायचे? सगळ्या चर्चा तशाच होताना दिसतील. शाहू फ़ुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, अशी जपमाळ ओढून किंवा लेखातून व्याख्यानातून मारा करून सामान्य लोकांची मानसिकता बदलत नसते. आपण कितीही अशी जपमाळ ओढली तरी वास्तवात बहुसंख्य जनता मध्ययुगीन मानसिकतेमध्ये जगत आहे. मग तिचे व्यवहार पुरोगामी असू शकत नाहीत. ते प्रतिगामीच असू शकतात. बहुसंख्य जनता प्रतिगामी असते आणि तिच्यावर पुरोगामी असे लेबल डकवले, म्हणून ती पुढारल्यासारखी वागू शकत नाही, वागतही नाही. पण तसेच असल्याच्या भ्रमात जो कोणी वागतो, बोलतो त्याचे वर्तनच भ्रमिष्ट असते. मग जेव्हा वास्तवात प्रतिगामी घटनांचे अनुभव येतात, तेव्हा असे शहाणे शुद्धीवर तरी यावेत ना? पण तसेही होत नाही. ते अस्वस्थ होऊन जातात. चिडतात आणि म्हणतात, पुरोगामी महाराष्ट्रात असे घडलेच कसे? इथे एक गोष्ट लक्षात येते, की महाराष्ट्र म्हणजे काय आणि तो कसा कुठे आहे, त्याचाही अशा शहाण्यांना थांगपत्ता नसतो. वास्तव जग आणि कल्पनेतले जग, अशी या शहाण्यांची ओढाताण झालेली असते. आपल्या कल्पनेतला महाराष्ट्र पुरोगामी असला आणि लिखाण व्याख्यानातून त्याला पुरोगामी म्हटले मग तो बदललाच; अशा भ्रमात ही मंडळी जगत असल्याचा तो परिणाम असतो.

कुठलीही उदात्त वा पुरोगामी कल्पना गैरलागू अजिबात नसते. तिचा हेतूही वाईट नसतो. पण त्या कल्पनेला साकार करणे अतिशय कठीण काम असते. त्यासाठी खुप कष्ट उपसावे लागतात. कल्पनेत रममाण होणा‍र्‍यांची त्यासाठी तयारी नसते. हे लोक मस्त मस्त कल्पना मांडतात आणि त्या साकार झाल्याच्या भ्रमात वास्तवातल्या जगालाही विसरून जातात. मग त्यांच्या कल्पनाविलासाने भारावलेल्या सामान्य माणसाला त्यांच्या वागण्याचे आकलन होत नाही. कल्पना म्हणून त्यांच्या विद्वत्तेला सलाम करणारा माणूस वास्तवात जगत असतो. म्हणूनच तिकडे विद्वत्तेला सलाम करणारा माणूस, वास्तवातल्या प्रतिगामी जीवनाला शरणही जात असतो. बदलासाठी आवश्यक प्रयत्न करायला त्याला सवड नसते. ते काम सुधारकांना आयुष्य खर्ची घालून करावे लागते. कर्वे, फ़ुले, आगरकर, गाडगेबाबा इत्यादींनी आपल्या परीने आयुष्य खर्ची घातले. त्यांनी कल्पनाविलासात रममाण होण्यापेक्षा कल्पनेला वास्तवात आणण्यासाठी प्रचंड कष्ट उपसले. त्याच्या परिणामी आज काही प्रमाणात भारत प्रगत होऊ शकला आहे. पुढल्या काळात त्यांना देवत्व देऊन त्यांच्या विचारांचे पौरोहित्य करणार्‍यांनी पुरोगामीत्वाचे दुकान मांडले आणि सुधारणांची चळवळ कल्पनेत नेऊन गायब केली. सहाजिकच जिथेपर्यंत ते सुधारणेचे प्रयत्न होऊ शकले, तिथेच येऊन ती चळवळ कुंठीत झाली. वास्तव जग तिथे येऊन थांबले आहे. कारण नंतरचे सुधारक मिरवणारे व कल्पनाविश्वात हरवलेले निपजले. परिणामी सुधारणेचा प्रवाह वास्तव आणि कल्पना यात विभागला गेला. त्यातले सुधारणावादी कल्पनाविश्वात व समाज वास्तव जगात, अशी विभागणी होऊन गेली आहे. आपण आज समाजात जो विरोधाभास अनुभवत असतो, तो याच विभागणीतून आलेला आहे. त्यामुळेच विविध विषयात बुद्धीमंत आणि समाज यांच्यात दरी अनुभवायला मिळत असते.

जेव्हा केव्हा सुधारक अशा कामाला लागतो, तेव्हा समाज प्रतिगामी कर्मातच गुरफ़टलेला असतो. मग त्या त्या सुधारकांनी अशा समाजाची निर्भत्सना केलेली नाही. तर त्याच समाजात जाऊन त्याच्या प्रतिगामीत्वात सामावलेली निरर्थकता त्याला समजावण्याचे कष्ट घेतलेले दिसतील. उलट आजचे विद्वान ज्या समाजाला सुधारायचे आहे, त्याचीच अवहेलना करण्यात धन्यता मानताना दिसतील. ज्याला बदलायचे आहे त्याची निर्भत्सना करण्यापेक्षा त्याला विश्वासात घेऊन बदलण्याची प्रक्रिया सुरू होत असते. अर्थात त्यासाठी वास्तव जगात जगावे लागते. दुर्दैवाने आज आपल्या देशातील व समाजातील सुधारणावादी विचारवंत वास्तव जगापासून दुरावले आहेत आणि कल्पनाविश्वात रममाण झालेले आहेत. सहाजिकच त्यांना कल्पना हेच वास्तव जग वाटते आणि त्याप्रमाणे वास्तव जगात घडत नसेल, तर ते वास्तव जगच त्यांना खोटे गैरलागू वाटू लागते. सगळ्या वादविवादाचे मुळ इथेच असलेले दिसेल. मग विषय अंधश्रद्धा निर्मूलनाचा असो किंवा निर्भयाकांड बलत्काराविषयीच्या भुमिका घेण्याचा असो. लाखातला एक शहाणा उर्वरीत नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव लोकांना गुन्हेगार ठरवताना दिसेल. आणि मग त्या बाकीच्यांनी ह्या एकाचे निमूटपणे मान्य करावे, अशी काहीशी अफ़लातून भूमिका पुरोगामी घेताना दिसतील. तिथेच त्यांचा पराभव होत असतो आणि तो पराभव त्यांच्यापुरता नसतो. त्यातून पुरोगामी चळवळ व विचार अधिक मागे ढकलले जात असतात. कल्पनेला वास्तवात आणायचे दूर रहाते आणि वास्तवात आलेल्या काही सुधारणाही मग मागे पडू लागतात. हे पाप कुणा प्रतिगाम्यापेक्षा भ्रमिष्टावस्थेत वावरणार्‍या शहाण्यांचे पाप असते. वास्तवाची पुरोगामीत्वाशी नाळ तोडण्यातून चळवळी नाकर्तेपणाकडे ढकलल्या जातात. त्याचे एकमेव कारण कल्पना व वास्तव यांची फ़ारकत इतकेच असते.

1 comment: