Wednesday, April 1, 2015

बाई गेला राहुल कुणीकडे



 यावेळचे संसद अधिवेशन सुरू होण्याच्या आधीच कॉग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी बेपत्ता झालेले आहेत. अर्थात हे शब्द टिंगल करण्यासाठी वापरलेले नाहीत, किंवा मुद्दाम कॉग्रेसला डिवचण्यासाठीही वापरलेले नाहीत. कदाचित एकवेळ कॉग्रेसजनही तशी टिंगल करतील आणि भाजपावाले तर खिल्ली उडवायला टपलेलेच आहेत. पण कुठलीही माता आपल्या लेकराची खिल्ली उडवणार नाही ना? सोनिया गांधी राहुलची टवाळी करतील काय? पण आता आपला लाडका पुत्र दिर्घकाळ बेपत्ता आहे, याची त्यांनाही जाणिव झाली आहे आणि त्याचा गवगवा खुप झाल्याने, त्यांनाच हस्तक्षेप करावा लागला आहे. अमेठी या आपल्या पिढीजात मतदारसंघातून राहुल दुसर्‍यांना लोकसभेवर निवडून आलेले आहेत आणि तिथेच त्यांच्या गायब होण्याची चर्चा चालू झाल्याने, मातोश्रींना तिकडे धाव घ्यावी लागली. अमेठीतील वयोवृद्ध नेते आणि कॉग्रेसचे निष्ठावंत महंमद आयुब यांचे निधन झाले. त्याच्याही आधीपासून काही खोडसाळ लोकांनी त्या भागात राहुलच्या छायाचित्रासह पोस्टर्स लावली. ‘हरवले आहेत, शोधून देणार्‍यास बक्षिस मिळेल.’ असा चावटपणा हल्ली अनेक नेत्यांच्या बाबतीत होऊ शकतो. म्हणूनच सोनियांसह कोणी त्याची दखल घेतली नव्हती. संसदेचे अधिवेशन चालू असताना व तिथे हमरातुमरी चालू असताना, पक्षाचा नेमलेला सेनापतीच गायब असेल तर चर्चा व्हायचीच ना? म्हणूनच प्रत्येक कॉग्रेस प्रवक्ता वा नेता भेटल्यावर पत्रकारही तोच प्रश्न विचारू लागले, राहुल कुठे आहेत आणि संसदेत कधी येणार? दोन्ही प्रश्नांची कुठलीच अधिकृत माहिती नसल्याने नेते-प्रवक्ते यावर संतापू लागले, तर नवल नव्हते. कारण त्यापैकी कोणी सोनियांना म्हणजे पक्षश्रेष्ठींनाही माहिती विचारू शकत नाही. मग असे प्रश्न पत्रकारांनी विचारावेतच कशाला? पण गवगवा इतका झाला, की सोनियांनाच खुलासा करावा लागला.

मागल्या महिनाभरात राहुल गांधी कोणाला दिसलेले नाहीत आणि अमेठी या आपल्या मतदारसंघात महंमद आयुब यांच्या मृत्यूनंतर तरी सौजन्य म्हणून तिथे सांत्वनाला जाणे आवश्यक होते. त्यासाठी पुत्र नाहीतर सोनिया स्वत:च पोहोचल्या. मग त्यांनाच तो प्रश्न विचारला जाणे स्वाभाविक होते. अर्थात तिथे तरी प्रश्नाचे उत्तर टाळणे सोनियांना शक्य नव्हते. म्हणून त्यांनी प्रश्नकर्त्यांना उत्रर दिले. ‘राहुल लौकरच सक्रिय होतील.’ राजकारणात आल्यापासून गेल्या दिड दशकात सोनिया एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत. त्या उगाच फ़ापटपसारा मांडत नाहीत. लंबीचवडी भाषणे देत नाहीत. लिहीलेले असेल ते वाचून दाखवतात आणि प्रश्न विचारले तर मोजक्या शब्दातच उत्तर देतात. म्हणून त्या परंपरेला शोभेल असे त्यांनी चार शब्दात उत्तर दिले. त्याचा गहन अर्थ कुठल्या पत्रकाराला उमगला नाही, की शोधावासाही वाटला नाही. सत्ता गेल्याने सोनियाजींवर किती अन्याय माध्यमे करू लागलीत, त्याचाच हा पुरावा म्हणावा लागेल. चारच शब्द सोनिया बोललेल्या असतील, पण किती आशयघन बोलल्या आहेत. कोणीतरी त्याकडे बारकाईने लक्ष दिले आहे काय? ‘लौकरच राहुल सक्रिय होतील’. याचा अर्थ आज तरी राहुल निष्क्रीय आहेत, याची त्यांनी स्पष्टपणे कबुली देवून टाकली आहे. याबद्दल त्या मातेचे कौतुक करण्याचे औदार्यही माध्यमांनी दाखवलेले नाही. गेला महिनाभर पक्षासाठी राहुलनी काहीही केलेले नाही आणि संसदेत कॉग्रेस मोठी राजकीय लढाई लढत असताना त्याचा सेनापती निष्क्रीय असल्याची प्रामाणिक कबुली, कुठल्या पक्षाचा अध्यक्ष देत असतो? सोनियांच्या या प्रामाणिकपणाचे थोडे तरी कौतुक नको व्हायला? पण माध्यमे अतिशय अन्याय्य झाली आहेत आणि त्यांनी सोनियांच्या आशयघन विधानाकडे साफ़ पाठ फ़िरवली आहे. या चार शब्दातला आशय तरी काय आहे?

महिनाभर राहुल नाहीत ही एक बाजू झाली. पण दुसरी बाजू अशी, की त्याच कालखंडात पुन्हा सोनिया गांधी कमालीच्या सक्रीय झाल्या आहेत. विरोधी राजकारणाचे जोखड आपला पुत्र उचलून पक्षाचा भार वाहू शकत नाही, याची त्यांनी कृतीतून कबुली दिली, हीच ती दुसरी बाजू आहे. नव्या सत्ताधारी पक्ष म्हणजे भाजपा व मोदींकडे स्पष्ट बहुमत आहे आणि त्यांच्याशी लोकसभेत नव्हेतर राज्यसभेत लढावे लागणार आहे. तिथे कॉग्रेस एकहाती लढू शकत नाही. त्यासाठी अन्य लहानसहान पक्षांची मदत व सहकार्य घ्यावे लागणार आहे. असे पक्ष व त्याचे नेते म्हणजे दिग्विजय सिंग किंवा सलमान खुर्शीद नाहीत. म्हणजे राहुलनी काहीही हास्यास्पद करावे आणि अन्य पक्षांनी भाजपा विरोधासाठी त्याने अंध समर्थन करावे, अशी अपेक्षा बाळगता येत नाही. ही राहुलची अडचण आहे. त्यांना अंध समर्थक लागतात आणि अन्य पक्षांनी तसे आपल्या मागे दौडावे, ही त्यांची अपेक्षा आहे. ती शक्य नसल्याने आणि इतरांना विश्वासात घेऊन भाजपाला विरोध करणे भाग असल्याने, राहुलना लढाईतून बाजूला करणे अपरिहार्य आहे. राहुल जर संसद काळात सक्रीय हजर असतील, तर ते शक्य नव्हते. म्हणून त्यांना गैरहजर व राजकारणातून निष्क्रीय करणे भाग होते. सोनिया गांधींनी तेच केलेले असावे. म्हणून बाकीचे जग राहुलना बेपत्ता म्हणत असताना मातेने वेगळा शब्द वापरला आहे. त्यांनी गैरहजेरीला राजकारणात निष्क्रीय असा पर्यायी शब्द योजला आहे. ते अन्य कुणी कॉग्रेसवाला करू शकत नाही. म्हणजेच सोनियांनीच ठरवून आपल्या पुत्राला राजकारणात निष्क्रीय केले आहे. त्याचा लाभही पक्षाला मिळालेला दिसतो. लोकसभा निकालानंतर प्रथमच विरोधी पक्ष एकजुटीने सत्तेच्या विरोधात वागू लागला आहे. सोनियांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती भवनात तमाम पक्षांचे नेते गेले. ते राहुलच्या नेतॄत्वाखाली शक्य झाले असते काय?

राहिला प्रश्न राहुल कधी येणार आणि कधी सक्रीय होणार इतकाच. त्याची वेळ वा मुदत सोनियांनी दिलेली नाही. म्हणजे निदान संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन संपण्यापर्यंत तरी राहुल परतणार नाहीत, असाच त्याचा अर्थ होतो. लौकरच म्हणजे अधिवेशन संपल्यावर. ज्याला आपल्या घराण्याच्या राजकीय वारसाचा हक्कदार बनवला आहे, त्यालाच असे खड्यासारखे बाजूला करून राजकारण करणे सोपी गोष्ट नाही. मातेला काळजावर किती दगड ठेवून असे निर्णय घेऊन घ्यावे लागत असतील, त्याचा अंदाजही करणे अवघड आहे. मात्र आज आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हरकत नाही, की राहुल गांधी गायब नाहीत तर निष्क्रीय आहेत आणि राजकीय डाव यशस्वी करण्यासाठी पक्षहितार्थ त्यांना निष्क्रीय करण्यात आलेले आहे. किबहूना राहुलच्या राजकीय सक्रीय असण्याने पक्षाचे होऊ शकणारे नुकसान टाळण्यासाठी खुद्द आईला इतका मोठा निर्णय घ्यावा लागलेला आहे. आपल्या मागे हा सुपुत्र पक्षाचा गाडा ठामपणे सुखरूप पुढे घेऊन जाईल, याची खात्री सोनियांना उरलेली नाही, याची ही कबुली आहे. अन्यथा विविध पक्षांच्या नेत्यांना राष्ट्रपतींकडे नेण्यापासून अमेठीची वारी करण्यापर्यंत सोनियांना या वयात धावपळ करावी लागली नसती. मनमोहन सिंग यांना निवृत्तीच्या अडगळीतून बाहेर काढून सोबत घ्यावे लागले नसते. पक्षात अजून जाणते नेते राहुलच्या हाताखाली काम करायला राजी नाहीत आणि विरोधातले पक्ष सोबत घेऊन जाण्याची संयमी समजदार वृत्ती राहुलपाशी नाही, ही मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे वारस ठरला आहे, बाकीची सज्जता झालेली आहे. पण त्यावर अंमलबजावणी करायचा धड मुहूर्त मात्र मिळत नाही. एकत्रित घटना बघितल्या तर इतकेच म्हणता येईल, संसद चालू असेपर्यंत राहुल परतणार नाहीत आणि राहुलना असेच निष्क्रीय ठेवले जाणार आहे.

No comments:

Post a Comment