Sunday, April 5, 2015

उद्धवचे काम सोपे करून ठेवले



आणखी चार दिवस प्रचाराचे शिल्लक आहेत आणि शनिवारी बांद्रा-पुर्व येथील पोटनिवडणूकीसाठी मतदान व्हायचे आहे. त्यात खुप अटीतटीची लढत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. कारण मतदारसंघातच मातोश्री हे उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान आणि समोर उद्धवचे खंदे विरोधक म्हणण्यापेक्षा कट्टर वैरी झालेले माजी शिवसैनिक नारायण राणे. मात्र प्रत्यक्षात अपेक्षाभंग व्हायची पाळी आलेली आहे. कारण राणे यांना अपेक्षित असा कडवा विरोध करीत तिथे त्यांच्या अंगावर कोणी शिवसैनिक आलेला नाही आणि सेनेतर्फ़े राणे यांची फ़ारशी दखलही घेतली गेलेली दिसत नाही. त्यापेक्षा तिथल्या मुस्लिम मतावर वर्चस्व प्रस्थापित करायला आलेल्या असाउद्दीन ओवायसी यांच्या एम आय एम पक्षाने़च राणे यांची प्रामुख्याने दखल घेतली आहे. तिथे प्रचाराचा आरंभ करताना ओवायसी व त्यांच्या पक्षाने शिवसेनेच्या पालिकेतील भ्रष्ट्राचारावर झोड उठवली होती. पण त्याचा फ़ारसा उपयोग नसल्याचे ओवायसी यांच्या लक्षात आलेले असावे. कारण आरंभी सेनेवर केलेल्या कडव्या टिकेनंतर ओवायसी यांची जी भाषणे वाहिन्यावर दाखवली जात आहेत, त्यात सातत्याने राणे व कॉग्रेस यांनाच लक्ष्य केलेले दिसते आहे. सहाजिकच ओवायसी कोणाला पराभूत करायला तिथे रिंगणात उतरले याची शंका येते. जागा शिवसेनेची आहे म्हणजे समोर उभा ठाकणार्‍याने सेनेलाच आव्हान द्यायला हवे ना? मग ओवायसीनी  राणे यांना कशाला लक्ष्य करावे? त्याचे उत्तर मागल्या विधानसभेच्या मतविभागणीत आढळून येते. तिसर्‍या क्रमांकावर ओवायसींचा उमेदवार होता आणि त्यामागे कॉग्रेस व राष्ट्रवादी होते. त्या तिघांची बेरीज सेनेच्या प्रकाश सावंत यांच्या मताइतकी होती. म्हणूनच मुस्लिम मतांच्या सोबतच दोन्ही कॉग्रेसची मते आपल्याकडे यावीत असा ओवायसी यांचा प्रयत्न आहे.

अर्थात त्यामुळे ओवायची यांचा उमेदवार जिंकण्याची अजिबात शक्यता नाही. पण यानिमीत्ताने त्या परिसरातील मुस्लिम मतांचा गठ्ठा आजवर विविध पक्षात विभागला जातो, त्याला एकगठ्ठा आपल्या पक्षाच्या मागे उभा करणे; हेच ओवायसी यांचे खरे लक्ष्य आहे. म्हणून त्यांच्या भाषणे व प्रचाराचा रोख सेनेच्या विरोधात असण्यापेक्षा नारायण राणे व त्यांच्या कॉग्रेस विरोधात आहे. त्याचा अर्थ साफ़ आहे, ओवायसी मुस्लिमांच्या मनात एक गोष्ट भरवत आहेत. सेना भाजपा हा आपला उघड शत्रू आहे. पण त्यांचा बागुलबुवा करून आपली मते उकळणारे कॉग्रेस व इतर सेक्युलर पक्ष कामाचे नाहीत. आपल्याला आपलाच मुस्लिमांच्या मतांचा भक्कम एकमेव पक्ष उभा करून लढणे भाग आहे. त्यात तशाच भ्रमनिरास झालेल्या पण विखुरलेल्या दलीत पिछड्यांना सोबत घेवून वाटचाल करावी लागणार आहे. म्हणून ओवायसी सेना, भाजपा विरोधात कमी बोलताना मुद्दाम कॉग्रेस व सेक्युलर पक्षांच्या खोट्या मुस्लिम प्रेमावर अगत्याने हल्ले चढात असतात. इथे बांद्रा-पुर्व मतदारसंघात त्याचेच प्रात्यक्षिक चालू आहे. लगेच मोठे यश मिळत नाही. पण क्रमाक्रमाने एक-एक पाऊल टाकले, तर खुप मोठा टप्पा नक्की गाठता येत असतो. ओवायसी तेच करीत आहेत. त्यांना मुंबईतल्या मुस्लिम भागात आपले हातपाय पसरायचे आहेत, जिथे मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मुस्लिमांच्या वस्त्या आहेत. एकदा तिथे जम बसवला, मग उत्तरेत घुसण्य़ाचा मार्ग मोकळा होणार आहे. आगामी काळात बिहार व उत्तर प्रदेशसह बंगालच्या विधानसभा निवडणूका व्हायच्या आहेत. तिथे मोठ्या संख्येने असलेल्या मुस्लिम मतदारापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मुंबईतल्या मुस्लिम वस्त्यांमधून जातो. त्यातली मोठी अडचण कॉग्रेस व सेक्युलर राजकीय पक्ष आहेत. म्हणूनच मुंबईत सेना-भाजपा यांच्यापेक्षा कॉग्रेसला मुस्लिम वस्त्यात नामोहरम करणे हे ओवायचींचे उद्दीष्ट आहे.

ओवायसी यांच्या भाषणाचा व टिकेचा अर्थ समजून घेतला, तर राणे यांच्यासाठी बांद्रा-पुर्वची लढत किती अवघड आहे ते लक्षात येऊ शकेल. कॉग्रेससाठी हुकूमी असलेली मुस्लिम मते ओवायसी खाणार आणि दुसरीकडे त्याच्याच उपस्थितीमुळे हिंदू अमराठी मतेही सेनेकडे झुकणार, अशी राणे यांची दुहेरी समस्या आहे. ओवायसी यांनी मुंबईत एक जागा विधानसभेला जिंकलेली होती आणि अनेक जागी चांगली मते मिळवली होती. त्याचा मुंबईकरांवर झालेला परिणाम विसरता येणार नाही. मुस्लिम मतांचा प्रभाव विखुरलेल्या वा विभागणी झालेल्या हिंदू मतांवर होतोच. त्याचा लाभ आपोआप शिवसेनेला इथे मिळू शकणार आहे. म्हणजेच केवळ मराठी मतांवर आज सेना तिथे अवलंबून नाही. ही एक बाजू झाली आणि दुसरी बाजू खुद्द राणे यांच्या उमेदवारीची आहे. नारायण राणे यांच्याविषयी आरंभीच्या काळात दुखावलेल्या शिवसैनिकांची सहानुभूती होती. पण पुढल्या काळात राणे यांच्या वागण्याने बोलण्य़ाने शिवसैनिकच दुखावत गेले. सहाजिकच उद्धवविषयीची नाराजी कमी होऊन राणे हा शिवसैनिकांसाठी तिरस्काराचा विषय होऊन गेला. राणे जितके सेनेच्या विरोधात अकारण बोलत गेले, त्यातून त्यांनी दुखावलेल्या पण मनाने शिवसैनिक असलेल्यांना उद्धवकडे ढकलण्याचेच काम केले. अशा तमाम शिवसैनिकांना एकत्र आणायला राणे यांची उमेदवारी उपयुक्त ठरते. राणे यांच्याऐवजी दुसरा कुणी कॉग्रेस उमेदवार असता, तर शिवसैनिक जितक्या पोटतिडकीने लढले नसते, तितके आता लढतील. म्हणजे शिवसैनिकांना ताकदीने लढायची प्रेरणा राणे यांच्या उमेदवारीने दिली म्हटले तर वावगे होऊ नये. अशा दोन्ही बाजू लक्षात घेतल्या, तर ही पोटनिवडणूक शिवसेनेला कधी नव्हे इतकी सोपी होऊन गेली आहे. खरे तर सेनेपेक्षा हा बाळा सावंत यांचा करिष्मा होता. सेनेसाठी जागा सोपी नव्हती. राणे-ओवायसींनी ते काम सोपे केले.

सेनेसमोर दोन प्रतिस्पर्धी आहेत. त्यापैकी एकाचे उद्दीष्ट साफ़ आहे. ओवायसी यांना विजय मिळाला तर हवाच आहे. कारण त्यातून मुंबईसह महाराष्ट्रात विखुरलेल्या मुस्लिमांचे अनभिषिक्त नेता होण्याचा सन्मान त्यांना लाभणार आहे. आणि तसे झाले नाही, तरी दुसरे उद्दीष्ट सोपे आहे. दुसर्‍या क्रमांकाची मते घेवून ओवायसींचा उमेदवार पराभूत झाला, तरी एकगठ्ठा मुस्लिम मते आपल्याच मागे आहेत, हा सिद्धांत निर्माण करण्यात ओवायसी यशस्वी होतात. त्यातले कॉग्रेससह समाजवादी अबू आझमी यांची सद्दी संपुष्टात येते. सेक्युलर पक्षांना मुस्लिम मतांची अपेक्षा बाळगता येणार नाही. राणे यांचे तसे नाही. आपले राजकारणातील अस्तित्व कायम राखण्यासाठी त्यांची झुंज आहे. तब्बल तीस वर्षानंतर राणे मुंबईत मतदाराला सामोरे जात आहेत. १९८५ सालात प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या राणे यांनी त्यानंतर मुंबईत कधीच निवडणूक लढवलेली नाही. जिथून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली, तिथेच मुंबईत ते अखेरची झुंज द्यायला येऊन पोहोचले आहेत. इतकी नाजूक वेळ असताना सुरक्षित जागा शोधण्याला महत्व होते. त्याचे भान असते तर राणे यांनी हा धोका पत्करला नसता. कारण त्यांना पराभूत करायला सेना एकवटली आहेच. पण ओवायसी त्यांना तिसर्‍या क्रमांकावर फ़ेकून द्यायला सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. अटीतटीची निवडणूक व पराभव एकवेळ चालू शकला असता. पण त्यात राणे तिसर्‍या क्रमांकावर फ़ेकले गेले, तर त्यांचे राजकारणातील भवितव्य काय असेल? कपील सिब्बल, सलमान खुर्शीद, सुशीलकुमार शिंदे इत्यादी नेत्यांची आज काय अवस्था आहे? बांद्रा-पुर्व येथे राणे तिसर्‍या क्रमांकावर पराभूत झाले, तर त्यांचे भवितव्य काय असेल? कधीपासून उद्धवना तेच बघायचे असेल, तर त्याचे काम कोणी सोपे करून ठेवले म्हणणार?

1 comment:

  1. लातूर जिल्ह्यातील औसा या गाव चे ते औसी.ओवायसी नव्हे .पक्का मराठी माणूस .हैद्राबादला स्थायिक झाला आहे.ओवैसी असा विचित्र उच्चार तेलुगुत होतो .

    ReplyDelete