Sunday, April 5, 2015

खोटारडेपणा करण्याचा सेक्युलर वस्तुपाठ ( लेखांक ४ )

\\

(गणेश टॉकीजजवळून घेतलेला विसर्जनाला निघालेल्या भव्य गणेशाच्या मिरवणूकीचा फ़ोटो)

बाजारात, रेल्वेगाडीत, बसस्टॉपवर वा कुठे वर्दळीत सराईतपणे कोणीतरी आपले पाकीट मारतो, खिसा कापतो. हा अनुभव बहुतांशी शहरी जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला कधीतरी येतोच. तेव्हा आपले वा सहकार्‍यांचे निदान काय असते? मोठा चतुर चलाख पाकिटमार असणार. कधी खिसा कापला त्याचा पत्ताच लागला नाही. पण खरेच पाकिटमार चलाख असतो की आपण बेसावध असतो? वास्तव असे, की आपण गाफ़ील असतो आणि त्याच गाफ़ील क्षणाची असा पाकिटमार डोळ्यात तेल घालून वाट बघत असतो. आपण ती संधी त्याला देतो आणि आपल्या नालायकीचे श्रेय त्याला देण्यासाठी त्याला चतूर कुशल वगैरे संबोधून मोकळे होतो. वस्तुस्थिती नेमकी उलटी असते. अनेक बाबतीत आपण अतिशय बेसावध व गाफ़ील असतो. अगदी आवडीने वर्तमानपत्र वाचताना किंवा टिव्हीवरल्या बातम्या चर्चा ऐकतानाही आपण तितकेच बेफ़िकीर बेसावध असतो. म्हणून चक्क थापा मारल्या तरी नि:शंक मनाने ऐकत असतो. आपल्या ठरलेल्या भूमिकेच्या विरोधातले असले, मग आपण प्रत्यारोप करतो. पण काय खोटेपणा आहे, त्याकडे आपले काडीमात्र लक्ष नसते. साक्षी सप्तसागर यांच्या पोस्टमधील पहिलेच वाक्य म्हणूनच तपासा. अगोदर वाचलेले असले तरी पुन्हा काळजीपुर्वक वाचा. किती सहजगत्या त्यात खोटेपणा डोकावतो आहे बघा. त्या आरंभीच लिहीतात, ‘१९९२-९३ चा काळ ..नऊ-दहा वर्षाची असेन मी..’ पुन्हा पुन्हा वाचून बघा. त्यात काही खटकण्यासारखे आहे काय? साधेसुधे विधान आहे. असे वाक्य आपण अनेकदा कुठेतरी वाचलेले असते. वर्षाचे आकडे व वयाचे आकडे वेगळे असतील. पण वाक्य असेच अनेकदा कुणाच्याही लिखाणात आलेले असते. मग या वाक्यात खोटेपणा कुठे दडला आहे? काही लक्षात येते काय? हेच वाक्य मी कसे लिहीले असते? तुम्ही कसे लिहाल?

१९९२-९३ चा काळ... मी तेव्हा ४५ वर्षाचा होतो. मी असे लिहीन. कारण माझा जन्म १९४८ सालचा आहे. ४४-४५ वर्षाचा असेन असे मी अंदाजे लिहीणार नाही. आजकाल प्रत्येकाला आपली जन्मतारीख नक्की ठाऊक असते. जेव्हा आजच्या जमान्यातला माणुस लिहीता-वाचता व सुक्षिक्षीत असतो, तेव्हा त्याला आपली जन्मतारीख नेमकी आठवत असते. शाळेचे तोंड बघितलेले नव्हते ते लोक पुर्वी असे अंदाजे वय सांगत. किंवा दुसर्‍या कुणाचे वय त्या वर्षाच्या संदर्भात सांगायचे असेल, तर अशाप्रकारे अंदाजे वय सांगितले जाईल. मन्या परब या पात्राचे वय अंदाजे आले तर समजू शकते. पण दंगलीचा काळ व वर्ष आठवते, (तिशीतल्या साक्षीताई खर्‍या असतील) तर त्यांना तेव्हा आपण नेमक्या किती वयाच्या होतो, ते अंदाजे सांगण्याचे कारण काय? तिथेच त्या लेखनातला खोटेपणा सुरू होतो. हे लिहीणारा आपला व्यक्तीगत अनुभव लिहीत नसून कोणाकडून तरी ऐकलेले वा कोणी मुद्दे दिलेत त्यावरून लिहीत असल्याचे येते. कारण आपली जन्मतारीख आजच्या सुशिक्षीत माणसाला जागोजागी नमूदद करावी लागते, म्हणूनच तोंडपाठ असते. प्रामुख्याने इंटरनेट वापरणारे तर जन्मतारीख आयडी वा पासवर्ड यासाठी वापरतात. मात्र साक्षीताईना अनेक गोष्टी आठवतात आणि आपलेच नेमके वय आठवत नाही.

आता पुढल्याच वाक्याचा खोटेपणा लक्षात घ्या. नऊ-दहा वर्षाच्या साक्षीताई कुठे रहात होत्या? ‘त्यावेळी आमचे वास्तव्य लालबागच्या बावला कंपाउंडमध्ये होते..’ बावला कंपाऊंड जिथे वसले आहे त्याला चिंचपोकळी असे म्हटले जाते. कारण ती वस्ती चिंचपोकळी रेल्वेस्थानकाच्या लगतची आहे. परिसराला लालबाग म्हटले जात असले तरी बावला कंपाऊंडमधले रहिवासी नेहमी आपण चिंचपोकळीला रहातो असेच कुठेही सांगायचे आणि आजही सांगतात. याचा अर्थच बावला कंपाऊंड कुठे वसले आहे आणि त्या परिसराला काय संबोधले जाते, तेच लेखन करणार्‍याला माहिती नाही. गणेश टॉकीजच्या दिशेने या कंपाऊंडची हद्द संपते, त्याला लालबाग म्हणतात. म्हणूनच तिथे वास्तव्य करणार्‍यांच्या तोंडी लालबाग हा शब्द येत नाही. पण त्याच्या पुढे साक्षीताई आणखी कडी करतात. चिंचपोकळीतले बावला कंपाऊंड त्या उचलून लालबाग परिसरातही आणून ठेवतात. तिसर्‍या वाक्यात म्हणतात, ‘गणेश टॉकीज मागचे आमचे बावला कंपाउंड म्हंजे सगळी कामगार वस्ती..’ इथे लिहीणार्‍याला गणेश टॉकीज, वा बावला कंपाऊंड नेमके कुठे आहे, त्याचा थांगपत्ता नसल्याची खात्री पटते. त्याने कधीही या कंपाऊंडला भेटही दिलेली नसावी, याची मी पैज लावायला तयार आहे. कारण हवे? लालबागचा राजा जिथे बसतो त्या गरमखाडा मार्केटच्या समोर डॉ. आंबेडकर रोडला पश्चिमेकडे एक फ़ाटा फ़ुटतो. तो गणेश टॉकीज वरून पुल चढून चिंचपोकळी स्थानकाकडे जातो. गणेश टॉकीज मागे टाकून त्या जुन्या दगडी पुलावर चढू लागलात, की डाव्या बाजूला सुरूवातीला कामगार कल्याण मंडळाची बैठी इमारत आहे. ती मागे टाकली, की पुलाच्या कठड्याखाली डाव्या हाताला जी तीन मजली चाळ लागते ती बावला बिल्डींग. तिच्या दक्षिण बाजूला जो मोकळा परिसर आहे, त्याला बावला कंपाऊंड असे नाव आहे. त्यात पत्राच्या शेडस, बैठ्या कच्च्या इमारती असा पसारा आहे.

आता मला सांगा गणेश टॉकीजच्या पुढे दूर बावला कंपाऊंड आहे, की साक्षीताई सांगतात तसे गणेश टॉकीजच्या मागे बावला कंपाऊंड आहे? खरेखोटे करायचे तर गुगल मॅपवर जाऊन तुम्ही स्वत: खातरजमा (जगात कुठे असाल तिथून) करून घेऊ शकता (लिन्क पुढे दिली आहे). साधारण सोळा सतरा वर्षे बावला कंपाऊंडमध्ये वास्तव्य केलेल्या व्यक्तीला आपण गणेश टॉकीजच्या मागे रहातो की त्याच्याही पुढे चिंचपोकळी पुलाच्या मागे रहातो हे ठाऊक नसेल काय? त्याला त्या परिसराचा भूगोल तरी माहिती असेल, अशी शक्यता आहे काय? कारण पुढे साक्षीताईंचा कौतुकाचा हिरो मन्या परब जिथे सचिन-विराट यांना लाजवणारे तुफ़ान क्रिकेट खेळतो, ते लाल मैदान नेमके गणेश टॉकीजच्या मागे पसरलेले आहे. गुगल मॅपवर गेलात तर सुदाम भुवन, अनंत निवास अशा इमारतीचे चित्र मिळेल. त्यांच्या मधोमध मोकळी जमीन दिसेल, त्याला लाल मैदान म्हणून शतकभर ओळखले जाते. त्याच अनंत निवासला लागून लालबागच्या दिशेने असलेली लांबट इमारत म्हणजे गणेश टॉकीज. अलिकडून मागे आंबेडकर रोडला जोडणारा अनंत मालवणकर पथही गुगलमध्ये दिसेल. सुदाम भुवन व अनंत निवासला जोडणारा हा रस्ता म्हणजे मालवणकर पथ. मैदानाच्या समोर साक्षीताई म्हणतात, ते सदगुरू सदन आणि त्या सुदाम भुवन इमारतीत मी वयाची पन्नाशी काढलेली आहे. त्यामुळे तो परिसर पायाखालचा अंगवळणी पडलेला. कितीही अंधारात अजून नेवून मला सोडले, तर कुठूनही कुठेही चाचपडत जाऊ शकेन. मात्र दिवसाउजेडी तिथे वावरणार्‍या साक्षीताईंना अलिकडल्या काळातल्या तिथल्या रहिवाशी असूनही कशातले काही आठवत नाही. लाल मैदानाच्या जागी त्या बावला कंपाऊंड आणून ठेवतात आणि पुन्हा सोयीनुसार तिथले कंपाऊंड उठवून मन्याच्या क्रिकेट सामन्यासाठी लाल मैदान मोकळेही करतात. याला सेक्युलर बुद्धीमत्तेचा पुरोगामी चमत्कार म्हणतात मिस्टर.

जन्मतारखेचा मुद्दा सोडला तर इतर भौगोलिक गोष्टी लालबागला वास्तव्य केलेले नाही, त्यांच्या लक्षात येणार्‍या नाहीत हे मला मान्य आहे. पण तर्काने व वास्तविकतेचा फ़ज्जा उडवणार्‍या वाक्याला, वर्णनालाही कोणा टिकाकाराने आक्षेप घेतला नाही याचे मला वैषम्य वाटते. आधीच्या लेखात मी ढोबळ मानाने माझ्या शंका काढलेल्या होत्याच. त्याच्या प्रत्येक तपशीलात जाण्याचे इथे कारण नाही. पण चाणाक्ष वाचक व चिकित्सक नजर असेल तर साक्षीताईंच्या एकूण लेखामध्ये कितीतरी तार्किक चमत्कार आढळून येतील. त्या चमत्कारांना अंनिसच्या भाषेत पुरोगामी म्हणायचे की वैज्ञानिक अपुर्वाई म्हणायची असा प्रश्न पडेल. ते ओळखण्यासाठी लालबागमध्ये वास्तव्य केलेले असण्याची अजिबात गरज नाही. शोधक नजर आणि बुद्धी शाबुत असायला हवी. ती एकट्या साक्षीताईंच्या पोस्टपुरती नव्हेतर वाचल्या जाणार्‍या व कानावर पडणार्‍या चर्चेच्या बाबतीतही असायला हवी. अन्यथा आपण फ़क्त थापाच ऐकायच्या लायकी़चे शिल्लक राहू. अशा थापा खपतात आणि नुसत्याच दुगाण्या झाडल्या जातात म्हटक्यावर; साक्षीताईंना मोठमोठ्या थापा मारायचा मोह झाला नसता तरच नवल ना? लाल मैदानाच्या जागी बावला कंपाऊंड आणून ठेवायची मुभा मिळाल्यावर त्यांनी पृथ्वीचे अक्षांश रेखांश बदलले आणि आपल्या पुरोगामी आज्ञेनुसार सूर्याला हवे तेव्हा उगवण्यास फ़र्मावले, तर नवल कुठले? पुरोगाम्यांची सेक्युलर जादुगरी त्यांच्या विरोधकांनी पुरेशी ओळखलेली नाही. साक्षीताई त्याचा ताजा नमूना आहेत. समर खडस वा संजय आवटे त्यातले मुरलेले नमूने आहेत. मग केतकर वागळे किती पहुचे लोग असतील त्याची नुसती कल्पना करा. पुढल्या भागात पुरोगामी साक्षीताई सूर्य आणि पृथ्वीच्या कक्षा ओलांडून सेक्युलर भ्रमणपथ कसा फ़िरवू शकतात, त्याची अनुभूती तुम्हाला घडवणार आहे. हा सगळ उपदव्याप एवढ्यासाठी की नुसत्या शिव्याशाप पुरे झाले. सावध वाचक व्हा मित्रांनो. (अपुर्ण)

लालबागचा उपग्रह फ़ोटो
http://www.mapmythologies.pukar.org.in/marathipages/public/lalbaugcharajamandal.html

साक्षीताई याची मूळ पोस्ट पुढील दुव्यावर
http://jagatapahara.blogspot.in/2015/03/blog-post_30.html

2 comments: