Wednesday, April 8, 2015

राणेंना राष्ट्रवादीत येण्याचे आमंत्रण?



सध्या सगळीकडे चर्चा आहे की बांद्रा-पुर्व येथे होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीची. तिथे नारायण राणे यांच्या प्रचारासाठी खुद्द शरद पवार यांनीही हजेरी लावली. वास्तविक राज्यात कुठेही आता दोन कॉग्रेसमध्ये आघाडी वा साधी मैत्री शिल्लक उरलेली नाही. असे असतानाही पवार यांनी राणे यांच्यासाठी येऊन त्यांच्यावर जी स्तुतीसुमने उधळली, त्याने अनेकांना धक्का बसलेला असू शकतो. खुद्द राणे यांनाही तो बसला असावा. म्हणूनच आधी राणे यांनीच साहेबांचे गुणगान केले होते. पवारसाहेब पोटनिवडणूकीत प्रचार करत नाहीत, पण आपल्यासाठी बांद्रा येथे आल्याचे राणेनीच सांगून टाकले. मग त्याची तिथल्या तिथे परतफ़ेड करणे आलेच ना? म्हणून साहेबांनी लगेच राणे यांना महान कर्तबगार असल्याचे प्रमाणपत्र, खुद्द शिवसेनाप्रमुखांच्या वतीने त्यांच्या अनुपस्थितीत देऊन टाकले. बाळासाहेबांना राणे यांची गुणवत्ता कळली होती, म्हणूनच मनोहरपंतांना बाजूला करून राणे यांना मुख्यमंत्रीपदी बसवले, असा गौप्यस्फ़ोट साहेबांनी इथे बोलताना केला. दोन ज्येष्ठ नेत्यांची मैत्री जाहिर असल्याने त्याबदल शंका घेण्याचे कारण नाही. पण तितकीच पवार साहेबांची मैत्री मनोहरपंतांशी देखील होती. मग आपल्या एका जिवलग मित्राला हटवून गुणी कार्यकर्त्याला शिवसेनाप्रमुखांनी मुख्यमंत्रीपदी कशाला आणले, ते साहेबांनी सेनाप्रमुखांना विचारलेले असेलच. अन्यथा त्यांना इतकी गुप्त माहिती कशाला मिळाली असती? राणे यांची ही गुणवत्ता सेनेच्या नव्या पिढीतील नेतृत्वाला मात्र कळलेली नाही, याची वेदना साहेबांना सध्या सतावते आहे. याचा गंभीर शोध म्हणूनच आवश्यक होतो. सेनाप्रमुखांना आपल्या अनेक गुणी कार्यकर्त्यांची जाण होती. म्हणूनच त्यांनी बहुधा छगन भुजवळांना पवारांकडे पाठवले असावे आणि साहेबांनी त्याच्या गुणांचा पुर्णपणे उपयोग करून घेत राष्ट्रवादी पक्षाचा भार छगनरावांवर सोपवला असावा.

दुर्दैव असे, की साहेबांच्याही पुढल्या पिढीला भुजबळ यांची महत्ता उमगली नाही आणि त्यांची अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदावरून उचलबांगडी केली होती. खरे तर तेव्हाच शरदरावांनी आपल्या पुतण्याचे कान उपटायला हवे होते. पण अशा गोपनीय गोष्टी केवळ पोटनिवडणूक प्रचारातच सांगायच्या असल्याने, तेव्हा साहेब गप्प बसले असावेत आणि त्यांनी भुजबळांची गुणवत्ता मातीमोल होऊ दिलेली असावी. पण त्याहीपेक्षा मोठी एक गोष्ट विचारणे भाग आहे. सेनेची सत्ता गेली, तेव्हाही नारायण राणे मुख्यमंत्रीपदी होते आणि त्यांनी सेनेला जय महाराष्ट्र केला तेव्हाही तेच विरोधी पक्ष नेतापदी होते. मग नव्या सेना नेतृत्वाने राणे यांची गुणवत्ता नाकारली, म्हणजे काय केले? उलट मागली दहा वर्षे तरी राणे कॉग्रेस पक्षात आहेत आणि तिथे मुख्यमंत्री होण्याच्याच अटीवर गेलेले होते. पण आधी विलासराव देशमुख आणि नंतर अशोक चव्हाण यांनी ती खुर्ची रिकामी केल्यावर, कोणी राणेंच्या गुणवत्तेची कदर केली नाही? ती कदर सेनेच्या नव्या नेतृत्वाला असून उपयोग नव्हता. कारण त्यावेळी मुख्यमंत्री पदाची निवड सोनिया गांधी करत होत्या आणि शरद पवारच त्यांचे राज्यातील निकटचे सहकारी होते. म्हणजेच राणे यांच्या गुणवत्तेची पायमल्ली झाली असेल, तर ती कॉग्रेसश्रेष्ठींनी केलेली आहे. अधिक त्या गुणवत्तेची आठवण श्रेष्ठींना पवारांनी करून दिली नाही, म्हणूनच राणेंची गुणवत्ता मातीमोल झाली ना? त्याचा दोष उद्धव किंवा सेनेच्या नव्या पिढीवर कसा टाकता येईल? अर्थात हा हलगर्जीपणा खुद्द पवारांकडूनच झाला आहे, त्याची किंमत सेनेला नव्हेतर राष्ट्रवादी व कॉग्रेस अशा दोन्ही पक्षांना मोजावी लागली आहे. पवारसाहेब म्हणतात त्याप्रमाणे राणे यांच्या गुणवत्तेची आघाडी सरकारमध्ये कदर होऊन तेच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असते, तर मागल्या दोन निवडणूकात आघाडीला इतका जबर फ़टका बसला असता काय?

पहिली गोष्ट म्हणजे लोकसभा विधानसभेत परस्पर विरोधी लढूनही सेना भाजपाला इतके यश मिळाले नसते आणि आघाडीत फ़ुटही पडली नसती. पर्यायाने राष्ट्रवादी पक्षाला आज विरोधात बसावे लागते आहे, तशीही वेळ आली नसती. पण ते टाळण्याची जबाबदारी सेनेच्या नव्या पिढीतील नेतृत्वाची नव्हती. कारण राणे शिवसेनेत नव्हतेच. मित्र पक्षातही नव्हते. राणे यांच्यासारखा गुणी नेता पवारांच्या मित्रपक्षात होता. पण त्याची कदर व्हावी असे तेव्हाही पवारांनाच वाटले नाही. अर्थात साहेबांची मैत्री केवळ सेनाप्रमुखांशीच होती असे नाही. माजी शिवसैनिकांशी पवारांची मोठीच जवळीक. म्हणून की काय, जो सेनेतून फ़ुटला तो प्रत्येकजण पवारांच्याच वळचणीला गेलेला होता. अपवाद एकमेव नारायण राणे यांचा. त्यांनी कॉग्रेसची वाट धरली. मग एका बाजूला राणे कोकणात शिवसेनेला खच्ची करीत होते, तर दुसरीकडे राणे यांना तिथेच खच्ची करायला माजी शिवसैनिक भास्कर जाधव राष्ट्रवादीची सर्व शक्ती पणाला लावत होते. त्यासाठी पवारांनी जाधवांना बळ दिलेले होते. राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांना पराभूत करण्यासाठी जाधवांनी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचा आरोप राणेपुत्रानेच केलेला होता. त्यानंतरही आपला अनुयायी केसरकर शिवसेनेत कोणी पाठवला होता? राणे यांचे दिर्घकालीन निकटवर्ति राजन तेली यांना राष्ट्रवादीत आणुन राणे विरोधात उभे कोणी केले होते? मागल्या वर्षभरात राष्ट्रवादी पक्षातर्फ़े नारायण राणे यांच्या गुणवत्तेची झालेली ही कदर बघितली, तर शिवसेनेला दोष देण्याला जागा तरी शिल्लक उरते काय? किंबहूना राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांनी कोकणात आपले पाय रोवून उभे रहाण्यासाठी प्रयास करताना राणे विरोधात कारवाया केल्या नसत्या, तर राणे यांना मागल्या विधानसभा निवडणूकीत पराभूत व्हावेच लागले नसते आणि बांद्रा येथे पोटनिवडणूक लढवायची वेळही आली नसती ना?

असो, या निमीत्ताने राणे यांनी अधिक सावध झालेले बरे. कारण मागल्या पाच वर्षात पवार साहेब सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर सरबत्ती करून मनसेचे राज ठाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत होते. उद्धवला वारश्यात आयता पक्ष मिळाला आणि राजला स्वत:च्या हिंमतीवर पक्ष निर्माण करावा लागला आहे. खरे तर पवारांच्या अशा कौतुकाने राजही अस्वस्थ झालेले होते. पवार गुणगान करतात, तेव्हा भिती वाटते; असेच राज यांनी तेव्हा म्हटलेले होते. त्यातली भिती काय होती ते लोकसभा विधानसभा निकालांनी दाखवून दिली. दोन्ही निवडणूकीत मनसेचा धुव्वा उडाला. आज तेच पवार साहेब तोंड भरून राणे यांचे गुणगान करीत आहेत. त्यामुळे राणे यांच्या मतात किती भर पडेल ठाऊक नाही. पण इतिहास बघता, साहेबांनी कौतुक केलेल्याचे भले झालेले नाही. त्याचेही उदाहरण उद्धव ठाकरेच आहेत. ज्यांच्या नेतृत्व किंवा गुणवत्तेबद्दल पवारांनी सतत शंका घेतल्या, त्यांनी दोन्ही निवडणूकीत मोठे यश मिळवून दाखवले. मग राणे यांची पाठ थोपटल्याचे कोणते परिणाम संभवतात? नारायण राणे आधीच राजकीय कोंडीत सापडलेले आहेत. अशावेळी पवारांचे कौतुकाचे शब्द त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह लावणारे आहेत. पोटनिवडणूक तशी महत्वाची नाही. राणे यांचे राजकीय भवितव्य त्यापेक्षा मोलाचे आहे. की कॉग्रेसमध्ये कोंडमारा झाल्याने वैतागलेल्या राणे यांना पवार स्वपक्षात येण्य़ाचे आमंत्रणच देत आहेत? सेनाप्रमुखांनंतर तुमची गुणवत्ता केवळ मलाच उमगली आहे. त्या गुणवत्तेचे राष्ट्रवादीतच चीज होईल, असे पवारांना म्हणायचे असेल काय? अशोक चव्हाण व निरूपम यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्षपदी झाल्यावर उघड नाराज असलेल्या नारायण राणे यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष करण्याचा मनसुबा घेऊनच पवारांनी अशी विधाने केली असतील काय? म्हणतात ना; ‘मन’ चिंती ते वैरी न चिंती.

2 comments:

  1. भाऊराव, राण्यांनी काँग्रेसवर 'चुकून' केलेल्या टीकेचा अन्वयार्थ तुमच्या लेखातून समजला. संबंधित बातमी : maharashtratimes.indiatimes.com/articleshow/46741908.cms
    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  2. Vidhan aajchya nikalane satya zale!

    ReplyDelete