Wednesday, May 20, 2015

कोडग्या कोडग्या लाज नाही



आपल्या देशात जे कोणी प्रतिष्ठीत मान्यवर आहेत, त्यांना कसलेतरी खुळ लागले आहे अशीच हल्ली शंका येते. काहीतरी विचित्र बोलून वा करून लोकांचे ध्यान आकर्षित करण्याची ही स्पर्धा बघितली, मग थक्क व्हायची पाळी येते. काही महिन्यापुर्वी थोर नाटककार लेखक गिरीश कर्नाड यांनी गोमांस खाण्याच्या सोहळ्यात हजेरी लावली होती. कारण म्हणे ते खाण्याचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे. खरेच तो अधिकार काढून घेतला गेला आहे काय? एका राज्यात गोहत्याबंदी झाली म्हणून बाकी देशात तशी कुठली बंदी लागू झालेली नाही आणि आजवर असे कित्येक प्रतिबंध लागलेले आहेत. तेव्हा कर्नाड यांना अशी नाटके करायची हौस कशाला आलेली नव्हती? त्यांना गोमांस खाण्याचा अधिकार महत्वाचा वाटत नाही वा अन्य कुणाच्या कसल्या अधिकाराची त्यांना अजिबात फ़िकीर नाही. असे काही केले, म्हणजे एक समाजघटक वा वर्ग संतापून आपल्या अंगावर येणार व प्रसिद्धी मिळणार, इतकाच त्यामागचा हेतू असतो. म्हणूनच कर्नाड यांनी लोकसभा निवडणूकीपुर्वी मोदींच्या विरोधात गरळ ओकण्याचा पराक्रम केला होता आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणवणार्‍या अमर्त्य सेन यांनीही त्याचीच पुनरावृत्ती केली होती. ज्ञानपीठ विजेते अनंतमुर्ती यांनाही तसाच झटका आलेला होता. ही अलिकडे फ़ॅशन झाली आहे. सर्वसामान्य जनतेच्या भावना व श्रद्धांना दुखावले, की बेताल माध्यमातून भरपूर प्रसिद्धी मिळते. म्हणूनच काहीबाही बोलणे लिहीणे, यांचा महापूर आलेला आहे. त्यात मग केजरीवाल व मार्कंडेय काटजू यासारखे लोक हात धुवून घेत असतील तर नवल नाही. काटजू तर प्रसिद्धीसाठी इतक्या माकडचेष्टा करतात, की कधीतरी हा माणूस देशाच्या सुप्रिम कोर्टाचा नायाधीश होता, याचाच अचंबा वाटतो. कारण त्यांच्या बोलण्या लिहीण्याला कुठलेच ताळतंत्र उरलेले नाही.

दोन वर्षापुर्वी संजय दत्त याला कोर्टाकडून शिक्षा फ़र्मावली गेल्यानंतर राष्ट्रपतींनी माफ़ी द्यावी, म्हणून उघडपणे काटजू यांनी मागणी केली होती. मग त्यावर काहूर माजले तेव्हा संजयसोबत अन्य कुणा महिला आरोपीलाही माफ़ी मिळण्याची मखलाशी त्यांनी केली होती. हा उद्योग त्यांनी कशासाठी करावा? न्यायाधीचाच्या पदावर काम करतानाही त्यांना अशाच कारणास्तव शब्द गिळावे लागले होते. एका खटल्यात शाळकरी मुस्लिम मुलाला शाळेत शिस्त म्हणून दाढी राखण्यास प्रतिबंध करण्यात आला. त्याने दाद मागितली असताना चाललेल्या सुनावणीत, दाढी वाढवण्यातून जिहादी व तालिबान तयार होतात, अशी टिप्पणी त्यांनी केली होती. त्यावर वकीलाने आक्षेप घेतल्यावर प्रतिक्रीया उमटल्या आणि काटजू यांना आपले शब्द निमूट गिळावे लागले होते. निवृत्तीनंतर प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली. तर विनाविलंब देशातील नव्वद टक्के लोक मुर्ख असल्याचा निर्वाळा त्यांनी देऊन टाकला होता आणि राशीभविष्य सांगणार्‍या वा दाखवणार्‍या वाहिन्यांना गुन्हेगार ठरवण्य़ापर्यंत मजल मारली होती. कधी उजवे किंवा कधी डावे असलेल्या काटजूंनी, सतत विनाकारण प्रसिद्धीच्या झोतात रहाण्याची संधी सोडलेली नाही. उलट अशा संधी ते सतत शोधत असतात, म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अशा माणसांची एक अडचण असते. त्यांच्या बेताल वागण्याबोलण्यात नेहमीचा तोचतोचपणा येत गेला, मग लोक दुर्लक्ष करू लागतात. सहाजिकच पुन्हा लोकांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांना अधिक मुर्खपणा वा बेतालपणा करावा लागतो. दोनचार वर्षातल्या मुर्खपणाने काटजू यांचे आकर्षण संपलेले आहे. सहाजिकच त्यांनी अधिक बेछूटपणा करण्याला गत्यंतर नव्हते. यावेळी त्यांनी नव्या मर्यादेचे उल्लंघन केलेले आहे. देशातल्या तीन मोठ्या नेत्यांना व राजकारण्यांना लक्ष्य केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी व मनमोहन सिंग यांच्यावर कमी टिका झालेली नाही. वाटेल तसे आरोपही झालेले आहेत. पण म्हणून कोणी त्यांना ठार मारावे असे मत व्यक्त केलेले नाही. काटजू यांनी आपल्या ताज्या ब्लॉगमध्ये तशी थेट हिंसेची भाषा वापरली आहे. मोदी, सोनिया व मनमोहन हे हरामखोर असून त्यांना जगण्याचाही अधिकार नाही, असा महान शोध या माजी न्यायमुर्तींनी लावला आहे. तर देशातले तमाम राजकारणी गोळ्या झाडून ठार मारण्यायोग्य असल्याचा साक्षात्कार त्यांना झालेला आहे. कोरियाच्या दौर्‍यावर गेलेल्या पंतप्रधानांनी केलेल्या एका विधानाने विचलीत झालेल्या काटजूंना अकस्मात मायभूमीच्या प्रेमाचे भरते आलेले असून, देशप्रेमाने भारावून त्यांना राजकारण्याच्या हत्येचे वेध लागलेले आहेत. देशातली गरीबी, कुपोषण वा बेरोजगारी इत्यादीसाठी राजकीय पक्षच जबाबदार धरले जातात. तर त्यांना भामटे व हरामखोर म्हणण्यापर्यंत जायला बुद्धीची गरज नाही. त्यासाठी न्यायपालिकेत उच्चपदावर कामाचा अनुभव घेण्याचीही गरज नाही. आज काटजू ज्या गोष्टी बोलत आहेत, त्या त्यांना अशिक्षित राहूनही बोलता आल्या असत्या. त्यांना तर नुसत्या गरीबी व कुपोषण बघून इतका संताप आलेला आहे. मग ज्यांना अनेक पिढ्या त्याच अवस्थेतून यातना-वेदना सोसाव्या लागल्या त्यांचे काय? नक्षलवादी तोच युक्तीवाद करीत असतात. म्हणून ते कायद्याचे राज्य व सरकारचा अधिकार नाकारून हिंसाचार माजवत असतात. काटजूंनी त्यांना सहभागी व्हायला काय हरकत आहे? खरे तर सरकारच्या व तथाकथित राजकारण्याच्या अन्यायाशी झुंजणार्‍या नक्षलवाद्यांना काटजूंची ‘न्याय’बुद्दी मोठीच मदतगार ठरू शकते. अधिक तेच नक्षलवादी काटजूंच्या इच्छा वेगाने पुर्ण करू शकतील. ब्लॉगवर पांडित्य सांगण्यापेक्षा काटजू नक्षलवादी कशाला होत नाहीत?

माणसे किती ढोंगी व पाखंडी असतात, त्याचा हा नमूना आहे. प्रस्थापित व्यवस्थेचे तमाम लाभ उठवायचे आणि त्याच व्यवस्थेने नेमणूक केलेल्या अधिकाराचे फ़ायदेही घ्यायचे. मात्र त्याच व्यवस्थेला लाथा मारून आपले पावित्र्य सिद्ध करायचे. देशात इतकी गरीबी, कुपोषण व अन्याय, अत्याचार, लूटमार असल्याचा शोध या काटजूंना कधी लागला? हजारो लाखो अन्यायपिडीत न्यायपालिकेचे दार ठोठावत कित्येक वर्षे व पिढ्या ताटकळत उभे असताना, हेच गृहस्थ न्यायाधीश म्हणून कार्यरत होते ना? तेव्हा त्यांनी आपल्या अधिकारात गरीबांच्या न्यायासाठी काय केले? अगदी सरकारही त्यांना न्यायमुर्ती असल्याने लगाम लावू शकत नव्हते. त्यावेळी साक्षात्कारी काटजू गप्प कशाला होते? पदावर आणि त्यामुळे मिळणार्‍या विविध लाभांवर लाथ मारून अन्यायाला वाचा फ़ोडायला त्यांना कोणी रोखले होते? सोनियांसहीत मनमोहन व मोदी खरेच भामटे होते तर काटजू त्यांच्या न्यायदानाच्या कारकिर्दीत किती कारवाई करू शकले? न्यायाधीशांना स्वयंभूपणे कुठल्याही बातमी व माहितीचा रीटअर्ज म्हणून कारवाई सुरू करायचा अधिकार होता व आहे. जे आरोप व थयथयाट काटजू आज करीत आहेत, त्यापैकी एका बाबतीत तरी त्यांनी राजकारण्यांना धडा देण्यासाठी पाऊल उचलले होते काय? नसेल तर त्यांना तेव्हा डोळे नव्हते, की न्यायाधीश म्हणून डोळ्यवर पट्टी बांधून त्यांनी न्यायदानाचे काम केले? माणसाला जनाची नाही तरी मनाची लाज असावी म्हणतात. काटजू कुठल्याच गटातले नाहीत. त्यांना जनाची लाज नाहीच, पण मनाचीही लाज नसावी. अन्यथा त्यांनी इतक्या बेछूटपणे बेताल बोलण्या लिहीण्याची हिंमत केली नसती. ज्या व्यवस्थेने त्यांना उच्चपदे दिली व त्याचे लाभ त्यांनी आजवर घेतले, त्यातच पाप सामावलेले आहे. मग बाकीच्या भामटेगिरीत त्यांचाही तितकाच सहभाग आहे आणि इतर हरामखोरांसोबत आपल्यालाही गोळ्या घाला, असे आवाहन त्यांनी केले असते. पण म्हणतात ना, कोडग्या कोडग्या लाज नाही, कालचे बोलणे आज नाही.

No comments:

Post a Comment