Monday, June 1, 2015

मिसबाह काद्रीचा मिसकॉल



(लेखांक पहिला)

कोणीतरी विनोदाने म्हटलेले आहे की मोबाईल फ़ोनचा शोध कुठल्याही देशाने लावलेला असो, मिसकॉलचा शोध मात्र भारताने लावलेला आहे. बहुधा सोशल मीडियातला हा विनोद असावा. अनेक चतूर लोक त्याचा तंत्र म्हणून वापर करतात. कारण मिसकॉल असेल तर त्याचे पैसे भरावे लागत नाहीत. म्हणून काही शहाणे मुद्दाम आपल्याला हवा असलेला क्रमांक फ़िरवतात आणि एकदोन रिंग वाजल्या मग तोडून टाकतात. ज्याच्या मोबाईलवर असा मिसकॉल दिसतो, त्याला समोरची व्यक्ती ठाऊक नसेल तर तो उतावळेपणाने उलटा फ़ोन लावतो आणि होणार्‍या संभाषणाचे पैसे त्याच्या खात्यात लागू होतात. म्हणजे काम ज्याचे असते त्याला फ़ुकटात तुमच्या खर्चाने संभाषण करता येते. अनेकदा तर नको असलेल्या जागी तुम्ही फ़ोन करून गोत्यात येऊ शकता. समोरची व्यक्ती तुमच्यावर फ़ोनवरून धमक्या दिल्याचाही आरोप करू शकते. मिसबाह काद्री नावाच्या मुलीने नेमका तसाच प्रकार भारतीय माध्यमांच्या बाबतीत केला म्हणायला हरकत नाही. आपल्याला मुस्लिम असल्यानेच मुंबईत जागा नाकारली गेल्याची हुल या चलाख मुलीने दिली आणि बघता बघता माध्यमातले शहाणे मिसबाहला डोक्यावर घेऊन नाचू लागले. जगाच्या पाठीवर भारतातल्या टिव्ही पत्रकारांइतके नंबरी मुर्ख कुठे नसावेत. अन्यथा इतका भयंकर विकृत मुर्खपणा मुख्य प्रवाहातील माध्यमांकडून कशाला झाला असता? सगळीकडून काहूर माजवण्यात आले आणि जणू मुंबईत मुस्लिमांवर केवळ धर्माच्या नावाने कसा बहिष्कार घातला जातो व भाजपाची सत्ता आल्यापासून तमाम हिंदू कसे धर्मांध होत चालले आहेत, त्याचे प्रदर्शन मांडण्याची शर्यत सुरू झाली. पण यापैकी कोणीही मिसबाहने जो मिसकॉल दिला, त्यातले तथ्य शोधण्याचा जराही प्रयत्न केला नाही. चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात, त्याचा हा आधुनिक अविष्कार होता.

दोनचार दिवस आधी झीशान खान नावाच्या एका मुस्लिम तरूणाला धर्माच्या नावाखाली नोकरी नाकारण्यात आली. त्यावरून काहूर माजले होते. त्यात नक्कीच तथ्य होते. पण जितका गदारोळ चालू होता, तितका तो प्रकार गंभीर होता काय? असे अनेक ठिकाणी होत असते आणि केवळ मुस्लिमांच्याच बाबतीत होते असे नाही, अगदी हिंदूंनाही तशी वागणूक याच भारतात मिळत असते. पिढ्यानु पिढ्या या देशात जन्मलेल्या काश्मिरी पंडितांना सामुहिकरित्या तो सापत्नभाव अनुभवावा लागत आहे. मिसबाहला तरी कोणी तिच्या मालकी हक्काच्या घरातून पळवून लावलेले नाही. अन्य कोणाच्या घरात तिला भाड्याने वास्तव्य करता आले नाही, अशी तिची तक्रार आहे. पण मागल्या पाव शतकात काश्मिरच्या खोर्‍यातून लाखो हिंदू पंडीतांना धर्माच्या नाहीतर कुठल्या कारणास्तव रहात्या पिढीजात घरातून जीव मुठीत धरून पळावे लागले आहे? या संदर्भात कुठल्या माध्यमांनी कधी सेक्युलर विचारांची हत्या म्हणून गदारोळ केला आहे काय? की हिंदूंवरील अन्याय अत्याचार अशा सेक्युलर विचारात अन्याय नसतात? की मुस्लिम बहुसंख्य असतील अशा भारतीय प्रदेशातही हिंदूंवर धर्माच्या कारणास्तव अन्याय करण्याची मुभा राज्यघटनेने दिलेली आहे? धर्मासाठी मुस्लिमांवर अन्याय होता कामा नये आणि हिंदूवर मात्र व्हायला हरकत नाही, असे घटनेच्या कुठल्या कलमात नमूद केलेले आहे? असेल तर माध्यमातल्या दिवट्या विचारवंतांनी त्याचे स्पष्टीकरण करावे. नसेल, तर त्यांनी काश्मिरी हिंदू पंडितांवर धार्मिक अन्याय म्हणून कधी गळा काढला होता, त्याचाही तपशील द्यावा. पण तो दिला जाणार नाही. कारण अशा उथळ बिनबुडाच्या सेक्युलर विचारवंतांच्या लेखी बहुसंख्य असल्याने भारतात हिंदूंना कुठलाही धार्मिक वा अन्य अधिकारच नसतो. मग त्यांच्यावर अन्याय झाल्याचे त्यांच्या चर्मचक्षूंना दिसेल तरी कसे?

सेक्युलर असणे म्हणजे मुस्लिम धर्मांध असणे वा किमान हिंदू विरोधी असणे; अशी आता एक समजूत व व्याख्या तयार झालेली आहे. सहाजिकच मिसबाहवर अन्याय झालेला नसला आणि तिने निव्वळ कांगावा केला, तरी तो अन्याय असतो आणि तिचा कांगावा हाच त्या अन्यायाचा पुरावा असतो. सहाजिकच काश्मिरी पंडीतांवर धर्माच्या कारणास्तव अन्याय होऊनही डोळ्यावर कातडे ओढून घेणार्‍यांना मिसबाहच्या कांगाव्याने खडबडून जाग येते आणि गदारोळ सुरू केला जातो. मग सेक्युलर भंपकपणाच्या अंगवळणी पडलेल्या सवयीनुसार कुठलेही सत्य तपासल्याशिवाय बोंबाबोंब सुरू केली जाते. जसा काश्मिरी पंडितावरचा अन्याय बघायचा नसतो तसाच मग मिसबाहच्या कांगाव्यातला खरेखोटेपणाही शोधायचा नसतो. अंधश्रद्धा किती भक्कम असतात हे अंधश्रद्धा निर्मूलनात रममाण झालेल्या या सेक्युलर शहाण्याच्या वागण्यातून आपल्या लक्षात येऊ शकते. अन्यथा मिसबाहने बोंब ठोकल्यावर देशातल्या शेकडो टिव्ही पत्रकारापैकी एकाने तरी वास्तव शोधण्याचे कष्ट घेतले असते ना? पण कोणीही सत्याकडे फ़िरकले नाही. बिचार्‍या मिसबाहलाही काही क्षण शंका आली असेल, आपण मुस्लिम आहोत, की टिव्हीवरचे एन्कर मुस्लिम आहेत? इतक्या पोटतिडकीने तमाम वाहिन्यांवर मातम सुरू झाला होता. पण जागा कुठली, तिथे कोण रहातो, खरे घडले काय, याकडे कोणी ढुंकून कोणी बघितले नाही. जन्मदाता बाप मेला तरी जितका टाहो फ़ोडणार नाहीत, असा आक्रोश वाहिन्या करू लागल्या होत्या. पण यातली दुसरी बाजू होती, त्या इमारतीतले रहिवासी, त्याचा बिल्डर आणि जागा नाकारणारा सदनिका मालक. त्यांचीही काही बाजू असते की नाही? ती समोर आणायचे कष्ट कोणी घ्यायचे? की त्याची काही गरज नाही. मिसबाह आरोप करते आहे आणि तिचा धर्म मुस्लिम असल्याने तिचा शब्द प्रमाण मानून कोणालाही फ़ाशी देण्याला सेक्युलॅरीझम म्हणतात? सगळ्या प्रकरणाचा आधार दुसरा काय होता? मिसबाह मुस्लिम असल्याने तिला भारतात विशेष अधिकार आहेत, यापेक्षा काही वेगळा अनुभव आहे काय?

सुदैव म्हणायचे, की आपल्या देशात आजही छपाई माध्यमे अस्तित्वात आहेत आणि त्यातल्या मोजक्या पत्रकारांना अजून दुसरी बाजू तपासून बघण्याची नैतिक गरज वाटते. म्हणून मग मिड-डे नावाच्या सांध्यदैनिकाच्या प्रतिनिधीने मिसबाहला जागा नाकारलेल्या इमारतीला भेट दिली. तिने आरोप केलेल्या व्यक्तीची बाजू समजून घेतली. इतर गोष्टी तपासून सत्याचा शोध घेण्याचा प्रयास केला. मग काय, कालपर्यंत अन्यायाचे प्रतिक बनलेल्या गरीब बिचार्‍या मिसबाहला पळता भूई थोडी झाली. तिची अगदी तीस्ता सेटलवाड होऊन गेली. आपण कुठल्याही राजकीय हेतूने हा विषय जगापुढे आणला नव्हता, अशी पळवाट मिसबाहने काढली. पण मिसबाहला तरी दोषी कशाला मानायचे? ती सेक्युलर बदमाशीचा बळी आहे. ज्यांना मोदी वा भाजपा यांना हिंदूत्वाच्या नावाखाली झोडपून घ्यायचे असते, अशा सेक्युलरांना खराखोटा कुठलाही पुरावा त्यासाठी हवा असतो. मग त्यातून अशी कुभांडे रचली जातात आणि त्याचा बळी जसा घरमालक हिंदू असतो, तशीच मिसबाह सुद्धा बळीच असते. तिला आमिषे दाखवून अशा कुभांडासाठी वापरले जात असते. खरे गुन्हेगार स्वत:ला सेक्युलर म्हणून हिंदूंना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करायला सवकलेले काही बदमाश आहेत. तेच असल्या कुभांडातून दोन्ही बाजूंना झुंजवण्याचे पाताळयंत्री डावपेच खेळत असतात आणि त्यात उपरोक्त इमारतीचे रहिवासी व मिसबाह, सारखेच बळी असतात. कारण अशा सेक्युलर राजकारणाचा खेळ होतो आणि निरपराध दोन्ही बाजूचे धर्माचे लोक त्यात हकनाक बळी जात असतात. जाहिरा शेख अशाच कुभांडाचा बळी होता आणि मिसबाहही तशीच यात बळी घेतली गेली आहे. खरे गुन्हेगार माध्यमातले सेक्युलर आहेत, ज्यांना आगीत तेल ओतायचे असते आणि आग नसेल, तर मिळेल त्या ठिणगीतून आगडोंब निर्माण करायचा असतो. म्हणूनच या निमीत्ताने धार्मिक तेढ निर्माण करणार्‍यांचा नव्याने सविस्तर समाचार घेणे अगत्याचे झाले आहे. (अपुर्ण)

4 comments:

  1. भाऊ! लोकांच्या आता मिडियाचे हे कुभांड लक्षात यायला लागले आहे. त्यांची विश्वासार्हता पूर्णतः संपली आहे. दिवसेंदिवस ते उघडे पडत आहेत.

    ReplyDelete
  2. सेक्युलर असणे म्हणजे मुस्लिम धर्मांध असणे वा किमान हिंदू विरोधी असणे; अशी आता एक समजूत "व व्याख्या तयार झालेली "


    100 % sahamat

    ReplyDelete