Tuesday, June 2, 2015

हिंदूराष्ट्राचा सेक्युलर अजेंडा



ज्यांनी मागल्या पाव शतकात कधीही एका शब्दाने दोन लाख काश्मिरी हिंदू पंडितांसाठी टाहो फ़ोडला नाही, त्यांना धर्माच्या नावाने अन्याय म्हणजे काही कळत असेल काय? असते तर त्यांनी आजवर किमान शंभर वेळा दिल्ली वा अन्य महानगरात निर्वासित होऊन दोन पिढ्या पडलेल्या काश्मिरी पंडितांच्या अन्यायाला वाचा फ़ोडली असती. पण वाहिन्या वा मुख्य प्रवाहातील तथाकथित माध्यमांनी एकदाही तसा प्रयत्न केलेला नाही. म्हणजेच त्यांना धर्माच्या नावाने भेदभाव होतो, याविषयी कसलेही कर्तव्य नाही, हे स्पष्ट होते. मग त्यांनी झीशान खान वा मिसबाह काद्री यांच्यावर धर्मामुळेच अन्याय झाल्याचा टाहो कशाला फ़ोडावा? तर असे सेक्युलर बुद्धीमंत पत्रकार मुस्लिमधार्जिणे असल्याचा सरसकट आरोप हिंदूत्ववादी करतात. त्यातही तथ्य नाही. कारण ज्यांनी झीशान वा मिसबाहसाठी आक्रोश केला, त्यांना मुस्लिमांवर होणार्‍या अन्यायाचेही दु:ख नाही. मग त्यांनी अशा गोष्टी घटनांचे भांडवल कशाला करावे? तर त्याचे उत्तर त्यांच्या राजकीय अजेंड्यामध्ये दडलेले आहे. त्यांना भाजपा, संघ वा हिंदूत्ववादी यांना झोडण्यासाठी वा आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यासाठी काही निमीत्त हवे असते. मिसबाह वा झीशानच्या बाबतीत ते निमीत्त सापडते. मुस्लिमांवर धार्मिक भेदभाव झाल्याचा टाहो फ़ोडला, की आपोआप त्यात हिंदूत्ववादी गुन्हेगार असे गृहीत असते. मग अशा विषयाचा उहापोह करताना सहजगत्या भाजपाची सत्ता वा संघाच्या कामावर बोट ठेवले जाते आणि त्यांच्या प्रवक्त्यांना जाब विचारला जातो. तसा भेदभाव हिंदूंच्या बाबतीत झाला, तर त्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांना नेत्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे शक्य नसते ना? मग हिंदूंच्या बाबतीत धार्मिक भेदभाव झाला, तर गवगवा कशाला करायचा? उलट यासाठी मुस्लिम ख्रिश्चनांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करावे लागेल ना?

थोडक्यात अशा घटना खर्‍या असोत वा खोट्या असोत, त्यात मुस्लिम ख्रिश्चन गुंतलेला असेल, मग टाहो फ़ोडला जातो. चर्चवर दोन खडे कोणी मारले, तरी भयंकर काही घडल्याचा आक्रोश सुरू होतो आणि हिंदू मठात बॉम्ब फ़ुटला, तरी किरकोळ घटना म्हणून दुर्लक्ष केले जाते. त्यात अर्थातच मुस्लिम अतिरेकी माथेफ़िरूंना वाचवण्याचा वा मुस्लिमांची बाजू घेण्याचाही हेतू नसतो. त्यात कुठला मुस्लिम धार्जिणेपणाही नसतो. हिंदूद्वेष हा सेक्युलर अजेंडा आहे. त्यात उपयोगी म्हणून ख्रिश्चन वा मुस्लिमांना मोहरे-प्यादे म्हणून वापरले जात असते. मिसबाह, झीशान वा ज्युलिओ रिबेरो त्या़चे बळी असतात. कारण अशा गोष्टींचा गदारोळ केला, मग त्या त्या व्यक्तीच्या नावावर बिल फ़ाडले जाते. पण कंडू सेक्युलरांचा शमवून घेतला जात असतो. त्याचे जिवंत उदाहरण खुदद झीशान खानच आहे. बुधवारी ‘टाऊम्स नाऊ’ वाहिनीवरच्या कार्यक्रमात त्याचा सहभाग होता आणि त्यानेच सर्वच धर्मियांना भेदभावाची वागणूक मिळत असल्याचे ठामपणे प्रतिपादन केले होते. पण संयोजन करणार्‍या नाविका कुमारने तिकडे जाणिवपुर्वक लक्ष दिले नाही. केरळमधल्या एका कंपनीने फ़क्त ख्रिश्चन व मुस्लिमांनीच अर्ज करावेत, हिंदूंना नोकरी मिळणार नाही, अशी जाहिरात दिल्याचे झीशानने त्याच चर्चेत भाग घेताना सांगितले. पण नाविकाने तिथे कणाडोळा केला, त्यातून लक्षात येते, की सर्व धर्मियांना भेदभावाची वागणूक मिळते असे सिद्ध होते. पण त्यामुळे संघ भाजपा सरकारला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करता येत नाही ना? मग अशा चर्चा वा गदारोळाचा सरळ साधा अर्थ काय? माध्यमांचा हिंदूविरोधी वा हिंदूत्ववाद्यांना ठोकायचा अजेंडाच यामागे नाही काय? पण त्यातून बहुसंख्य हिंदू दुखावला जातो आणि तो अधिकच मुस्लिम विरोधात विचार करू लागतो. मुस्लिम द्वेषाला खतपाणी त्यातून घातले जाते.

कुठल्याही धर्मातले मुठभर लोक अशारितीने वागत असतात आणि त्यासाठी त्या धर्माच्या सर्व अनुयायांना जबाबदार धरण्याचे काही कारण नसते. पण एकाला त्या कारणास्तव आरोपी बनवले आणि दुसर्‍याच्या बाबतीत झाकपाक केली. मग पहिला दुसर्‍याचा द्वेष करू लागतो. मिसबाह व झीशानच्या निमीत्ताने तेच झाले आहे, माध्यमांनी जो बिनबुडाचा गदारोळ केला, त्यातून अधिक हिंदू लोकांमध्ये मुस्लिमांविषयी शंकेची भावना निर्माण केली गेली. संघावर किंवा हिंदूत्ववाद्यांवर तसा आरोप नेहमी होतो. पण मागल्या तीनचार दशकात सेक्युलर अजेंडामुळे हिंदूमध्ये जितकी धर्मभावना रुजवली गेली, तितकी संघाला नव्वद वर्षात साध्य झाली नव्हती. गेल्या चौदा वर्षात गुजरात दंगलीचे निमीत्त करून मोदींना मुस्लिम विरोधी व हिंदूत्ववादी ठरवण्याच्या अट्टाहासातून जितकी मते हिंदूत्ववादी होत गेली, तितकी संघाच्या प्रचारकांनाही करता आली नसती. पण चुका मान्य करून त्यापासून शहाणा होईल तो सेक्युलर बुद्धीमंत असू शकत नाही. झालेल्या चुका मान्य करायच्या नाहीत आणि त्याचीच पुनरावृत्ती करत रहाणे, हा सेक्युलर स्थायीभाव असतो. मागल्या पाव शतकात भाजपा व त्याचा हिंदूत्ववाद संपवण्याचे जे मुर्ख प्रयास झाले, त्यातून जुने सेक्युलर पक्ष नेस्तनाबुत होऊन गेले आणि तरीही त्याचीच कास धरणार्‍या कॉग्रेसचाही अखेर धुव्वा उडाला. त्याला मोदींची लोकप्रियता, भुरळ घालणारी भाषणे वा भव्यदिव्य आश्वासने कारणीभूत झालेली नाहीत; इतका सेक्युलर पुरस्कृत हिंदुत्ववाद यशस्वी झालेला आहे. आता मोदींनी ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर तरी कुठे काय चुकले त्याची मिमांसा होऊन चुका सुधारल्या जातील अशी किमान अपेक्षा होती. पण मागल्या दोनचार महिन्यात पुन्हा तेच सेक्युलर भुत बाटलीतून बाहेर काढण्यात आले आहे आणि त्यातून हिंदूराष्ट्र स्थापन होण्यापर्यंत बहुसंख्य समाजाला घेऊन जाण्याचा चंग बांधलेला दिसतो.

एखाद्या कंपनीने झीशानला मुस्लिम म्हणून नोकरी नाकारली असेल, पण त्याचवेळी त्याच्या अन्य दोन हिंदू मित्रांनी मिळालेली नोकरी मुस्लिम मित्रासाठी नाकारली, हे सुद्धा सत्य आहे. भारतातील बहुतांश हिंदू धर्मवादी नसल्याचा तो सर्वात सज्जड पुरावा आहे. तेव्हा यातली हिंदु-मुस्लिम जवळीक दाखवून दोन समाजात असलेली विभक्ती संपवण्याला प्राधान्य द्यायला हवे होते. कारण तेच वास्तव आहे. हजारो वर्षे धर्माचा अडसर न मानता दोन्ही समाज एकत्र गुण्यागोविंदाने नांदले आहेत. त्याचाच ताजा पुरावा तीन मित्रांनी दाखवला होता. पण त्याला झाकून अपवाद असलेल्या एका कंपनीचा इतका गाजावाजा करण्यात आला, की असा भेदभाव न मानणार्‍या अनेक हिंदू लोकांना अशा गदारोळाने पुनर्विचार करायला भाग पाडले आहे. त्याची प्रचिती त्यानिमीत्ताने झालेल्या चर्चेतही बघायला मिळाली. तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे. कुठल्याही संवादाची सुरूवात मतभेद असलेल्या विषयापासून होत नाही. संवाद साधायचा असतो, तेव्हा वादाचे विषय बाजूला ठेवून सामंजस्य साधले जाईल असे विषय पुढे आणायचे असतात. त्यातून जसा संवाद सरकत जातो, तसे वादाचे व मतभेदाचे विषयही सोडवायला मदत होऊ शकते. पण असे दिसेल की शक्य तो विवाद माजेल व मतभेद विकोपास जातील, अशाच दिशेने माध्यमाच्या चर्चा व बातम्या पुढे आणल्या जात असतात. त्यासाठी मग मिसबाहचा कांगावा इतका रंगवला जातो, की तो खोटा पडल्यावर अवघ्या मुस्लिम समाजाकडे संशयाने बघितले जाते. पण यातला खरा गुन्हेगार माध्यमे व त्यातले पत्रकार आहेत. खरे तर मिसबाहच्या कांगाव्याला इतके राष्ट्रीय समस्या म्हणून पेश करणार्‍या माध्यमांनी त्यासाठी माफ़ी मागायला हवी. कारण त्यांनी नुसत्या एका इमारतीच्या रहिवाश्यांना बदनाम केलेले नाही, तर अवघ्या हिंदु समाजाला अपमानित केलेले आहे. (अपुर्ण)

No comments:

Post a Comment