Thursday, July 16, 2015

शाहू-फ़ुले-आंबेडकर असले संस्कार देतात काय?



महिनाभरापुर्वी कुणा अनिरुध्द जोशी नावाच्या व्यक्तीला निखील वागळे सतत आपल्यावर शाहू-फ़ुले-आंबेडकरांचे संस्कार झाल्याचे हवाले देत असल्याचे अनेकांनी ऐकले आहे. सोशल मीडियात ते संभाषण व्हायरल झाले होते. त्याबद्दल कोणी शंका विचारली नाही, अगदी जे कोणी शाहू-फ़ुले-आंबेडकरांच्या नावाची सातत्याने जपमाळ ओढत असतात, त्यापैकी कोणालाही त्यांना पूजनीय वाटत असलेल्या अशा विभूतींच्या नावाने चाललेला व्याभिचार रोखण्य़ासाठी निखीलला जाब विचारण्याची बुद्धी झाली नाही. यातच अशा पाखंडी पुरोगाम्यांचे शाहू फ़ुले वा आंबेडकरप्रेम उघडे पडले. कारण निखीलचाच एक महानगरी सुविचार आहे, ‘चारित्र्यवान माणसांपाठी लपून बदमाश नेहमीच आपले धंदे करत असतात.’ इथेही त्य अनिरुध्दला धमकावताना निखील त्या विभूतींच्या मागे लपून आपली बदमाशी करीत होता. आजवर प्रत्येक वेळी आपल्या बदमाशीवर पांघरूण घालण्यासाठी निखीलने अशाच अनेक विभूती व चारित्र्यवान व्यक्तींच्या मागे आश्रय घेतलेला आहे. आज पत्रकारिता म्हणून जे काही निखील करीत असतो, त्याचीच एकेकाळी व्याभिचार वा भ्रष्टाचार अशी प्रदिर्घ प्रबंध लिहून व्याख्या त्यानेच केलेली आहे. त्याने सदाचारी असावे किंवा वैचारिक बौद्धीक व्याभिचारी असावे; हा त्याच्या निवडीचा विषय आहे. पण आपल्या अशा व्याभिचारी कृती वा वागण्यासाठी शाहु-फ़ुले-आंबेडकरांचे नाव वापरणे कितपत योग्य आहे? ‘मी मराठी’ वाहिनी कुठल्या पैशावर उभी आहे? त्याचा तपशील इथे वेगळा देण्याची गरज नाही. पण निखीलच्याच व्याख्येनुसार त्यात सहभागी होणे वा तिथून मिळणार्‍या पैशावर मौजमजा करणे, हा चक्क व्याभिचार आहे. तो त्याने जरूर करावा. पण त्याला विभूतीचे संस्कार म्हणून पापाचे उदात्तीकरण करणे आक्षेपार्ह आहे. पण त्याबद्दल कोणीही फ़ुलेवादी, आंबेडकरवादी वा शाहूसमर्थक जाब विचारायला पुढे येत नाही, तेव्हा त्यांच्याही निष्ठेवर ‘पॉईंट ब्लॅन्क’ प्रश्नचिन्ह लावणे भाग होऊन जाते. निखीलची बौद्धिक बदमाशी वा पत्रकारी व्याभिचाराची व्याख्या काय आहे? त्याला तरी आठवते काय?

एका सायंदैनिकाचा मृत्यू !

‘आज दिनांक’च्या मृत्यूमागची राजकारणं आणि नाटकं तशी अनेक सांगता येतील. पण खरी गोष्ट ही, की आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे हे सायंदैनिक बंद पडलं. ठाकरेंची धमकी, रमेश किणी प्रकरण वगैरे केवळ निमीत्त आहेत. स्वत:चा चेहरा आणि भूमिका नसल्याने हे सायंदैनिक कधीही ठोस पायावर उभं राहू शकलं नाही. अलिकडल्या काळात तर त्याचा खपही वेगाने घसरत चालला होता. वृत्तपत्र विक्रेत्यांशी बोलून कुणीही वाचक याची खात्री करू शकेल. आवश्यक तेवढ्या जाहिरातीही या वृत्तपत्राला नव्हत्या. बाहेरून आयत्या मिळणार्‍या पैशामुळे खर्च प्रमाणाबाहेर वाढले होते. सुरूवातीच्या काळात हा तोटा मुकेश पटेल भरून काढायचे. पण त्यांचा हेतू साध्य झाल्यानंतर त्यांनी पैशाबाबत आखडता हात घेतला होता. या सायंदैनिकातल्या कर्मचार्‍याच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपुर्वी त्यांचे अडीच महिन्यांचे पगारही थकले होते. छोट्या वृत्तपत्रात अशा अडचणी येतात, पण त्यावेळी त्यांचा व्यवहार पारदर्शक असेल तर वाचक त्यांच्या बाजूने उभा रहातो. ‘आज दिनांक’च्या बाबतीत नेमका हाच विश्वास वाचकांना वाटला नाही. मुकेश पटेल यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे, की हे सायंदैनिक फ़ायद्यात होतं. लगेच दुसर्‍या दिवशी ‘सामना’’मध्ये आलेल्या मुलाखतीत त्यांनी उलटं विधान केलं आहे. याचा अर्थ खरं काय ते सांगायची संपादक आणि मालक दोघांचीही तयारी नाही. दैनिक फ़ायद्यात असेल तर बंद करण्याचा मुर्खपणा कोणताही व्यापारी करणार नाही. या दैनिकाचं तीस टक्के शेअरहोल्डींग संपादकांकडे होतं. उरलेलं सत्तर टक्के पटेल आणि राठोड यांच्याकडून विकत घेऊन ते दैनिक पुढे चालवू शकले असते. नवं दैनिक काढायची भाषा त्यांनी केली आहे. हाच पैसा ‘आज दिनांक’साठी वापरून भागभाडवलाचं स्वरूप बदलून हा अकाली मृत्यू टाळता आला नसता काय? पुन्हा नव्या सायंदैनिकासाठी या संपादकांना पैसे कोण पुरवणार हेही स्पष्ट झालेलं नाही. छगन भुजबळ हा पैसा उभारणार असल्याची चर्चा बाजारात आहे. ते खरं असेल तर आणखी एक दुर्दैव हे संपादक ओढवून घेणार आहेत. कारण या आधीच भुजबळांनी ‘प्रभंजन’ नावाचं एक साप्ताहिक निवडणूकीपुरतं काढलं आणि नंतर बंद केलं आहे. त्याचे संपादक नारायण आठवले पुढे शिवसेनेत गेले आणि खासदार झाले. अशा भुजबळांच्या संगतीने नवं सायंदैनिक कसं काय तगू शकेल? पटेल-राठोड यांच्यापेक्षाही मोठी राजकीय महत्वाकांक्षा भुजबळांच्या मनात आहे. आपल्या सोयीनुसार ते या सायंदैनिकाचा उपयोग करतील आणि यथावकाश मोडून खातील. म्हणूनच नव्या सायंदैनिकाच्या जन्मापुर्वीच सावधगिरीची सूचना देणं भाग आहे.

‘आज दिनांक’च्या मृत्यूच्या निमीत्ताने वृत्तपत्रसृष्टीला लागलेल्या एका रोगाकडे मला सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे. भ्रष्ट पैशावर उभं रहाणारं ‘आज दिनांक’ हे काही एकमेव वृत्तपत्र नाही. आज संपुर्ण देशात अशा वृत्तपत्रांची लाट आली आहे. उद्योगपती, व्यापारी, राजकारणी, दारूवाले, ट्रकवाले, हॉटेलवाले यांच्याकडे वाममार्गाने मिळवलेला पैसा मुबलक आहे. हा पैसा वृत्तपत्रात घालून प्रतिष्ठा किंवा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न यापैकी अनेकजण करत आहेत. उत्तरेतल्या राज्यात तर अशा दैनिकांचं थैमान चालू आहे. एकट्या दिल्लीत उदाहरणादाखल तीन-चार नावं सांगता येतील. राष्ट्रीय सहारा, कुबेर टाईम्स, जेव्हीजी टाईम्स ही अलिकडच्या काळात जन्माला आलेली काही वृत्तपत्रं. यामागे चिटफ़ंडवाल्यांचा पैसा आहे. गरीब जनतेकडून मोठ्या लाभाचं गाजर दाखवून पैसा मिळवायचा आणि चिटफ़ंड निर्माण करायचे. नंतर हा पैसा वेगवेगळ्या धंद्यात गुंतवून स्वत:चं उखळ पांढरं करून घ्यायचं. हा उद्योग अनेकांनी आरंभला आहे. गरीबाला आवाज नसतो यावर यापैकी बहुतेकजणांचा विश्वास आहे. म्हणूनच पैसे परत मागणार्‍यांना ते न देण्याची हिंमत ही मंडळी दाखवतात. वृत्तपत्राच्या जोरावर मिळवलेल्या ताकदीचा उपयोग सरकारी अधिकार्‍यांना दाबण्यासाठी आणि आपले गैरव्यवहार झाकण्यासाठी ते करून घेतात. हजारो रुपये पगार देवून पत्रकारांना नोकर्‍या द्यायच्या, त्यांना गाड्या पुरवायच्या आणि छानछोकीच्या आयुष्याची चटक लावायची, असाही प्रकार ही मंडळी करतात. पत्रकार अचानक झालेल्या सुखप्राप्तीने खुश होतो आणि आपलं लेखन स्वातंत्र्य गमावून बसतो. हळूहळू राजकीय दलालीसाठी त्याचा वापर केला जातो. आपण कुणासाठी काम करतो आहोत, कशासाठी वापरले जात आहोत, याचं भान त्याला रहात नाही. वृत्तपत्राच्या जोरावर अनेक गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाया ही मालक मंडळी करतात. राष्ट्रीय सहारा हे वृत्तपत्र याचं जळजळीत उदाहरण आहे. वृत्तपत्रसृष्टीत येणारा हा भ्रष्ट पैसा वेळीच रोखला नाही तर आपल्या सगळ्या स्वातंत्र्या़हा बळी देण्याची पाळी पत्रकारांवर येईल. याचा पहिला फ़टका छोट्या वृत्तपत्रांना बसेल. देशातल्या बड्या वृत्तपत्रांची सुत्रं पत्रकारांच्या हातात कधीच नव्हती. त्यात आता छोट्या वृत्तपत्रांचाही बळी गेला तर सगळीच आशा संपून जाईल. युरोप अमेरिकेत रुपर्ट मर्डोकासारख्या बदमाशाने घातलेल हैदोस वृत्तपत्रसृष्टी अनुभवते आहे. आपल्याकडे सध्या दिसताहेत त्या याच मर्डोकच्या गावठी आवृत्त्या. म्हणूनच वृत्तपत्र स्वच्छ पैशावर कशी उभी रहातील याचा विचार झाला पाहिजे. सर्वसाधारणपणे आर्थिक संस्था वृत्तपत्रात गुंतवणूक करत नाहीत. त्या दृष्टीनेही प्रयत्न करायला हरकत नाही. अर्थात आर्थिक संस्थांचा किंवा जनतेच्या भागभांडवलाचा पैसा आला तर हे वृत्तपत्र एक आर्थिक शिस्तीने चालवावं लागेल. संपादकांच्या आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याची रखवाली या भागधारकांना डोळ्यात तेल घालून करावी लागेल. वृत्तपत्राचं धोरण हे भागधारक ठरवू लागले तर नवा अनर्थ निर्माण होईल. म्हणून धोरण ठरवण्याचे अधिकार संपादक मंडळालाच असले पाहिजेत.

‘आज दिनांक’च्या मृत्यूच्या निमीत्ताने या गोष्टींचा गंभीरपणे विचार झाला तर बरंच काही साध्य होईल. नाहीतर नाटकं होतील, तमाशे होतील, हौतात्म्याचा आव आणला जाईल, पण वृत्तपत्रसृष्टीच्या पदरात काही पडणार नाही. म्हणून अंतर्मुख होऊन हा मृत्यू तपासायला हवा. असा मृत्यू आणखी कुणाच्याही नशिबी येऊ नये, या दिशेने ठोस प्रयत्न व्हायला हवेत. इमारत बांधण्यापुर्वी तिचा पाया मजबूत करणं शहाणपणाचं नाही काय?

(निखील वागळे, कॅलिडोस्कोप, ‘आपलं महानगर’ शुक्रवार २५ आक्टोबर १९९६)

5 comments:

  1. अगदी बरोबर सर..आज पहिल्यांदा या विषयावर काहीतरी ठोस आणि विचार करायला लावणार वाचायला मिळाल.

    ReplyDelete
  2. ह्या वेड्या माणसाला प्रसिद्धीची हौस आहे, हे सर्वाना माहित आहे! ह्या प्राण्याला दुर्लक्षित करणेच योग्य आहे... मला नाही वाटत आता हा एखादा चांगला मालक ह्याला संधी देईल..शेवटी हाही वळचनिलाच जाणार...

    ReplyDelete
  3. फारशी वैचारिक क्षमता नसलेला आपला समाज ज्या गोष्टीने प्रभावित होतो त्यात प्रसारमाध्यमांचे स्थान फार वरचे आहे. मग चार चांगले पत्रकार एकत्र येऊन एखादे वृत्तपत्र, वृत्तवाहिनी सहकारी तत्वावर का सुरु करीत नाहीत. असाच प्रयोग आज इस्पितळांच्या बाबत, शिक्षणक्षेत्राबाबत व्हायला नको का? सरकार तर आहे नाही ते विकून खायलाच बसले आहे. मग गरीब रुग्ण, विद्यार्थी, वाचक यांनी कुणाकडे पाहावे ? की टाईम्ससारख्या वेश्याच्या सार्वजनिक ठिकाणच्या अशोभनीय चाळ्यांनाच कला, ज्ञान, प्रबोधन म्हणून स्वीकारावे? टग्या शिक्षणसम्राटांचे खिसे भरावेत आणि 'भस्म्या-टू'
    रोगाची लागण झालेल्या डॉक्टरांचे बंगले बांधून देताना मरून जावे ?

    ReplyDelete
  4. भाऊ , एक मिखाईल अडकलाय तिकडे ...
    आता या बिचाऱ्या निखाईलला पण अडकवता की काय ?
    हा माणूस डेंजर आहे हं !
    तुम्हाला स्टुडीओतून बाहेर काढेल आणि म्हणेल "हा माझा स्टुडीओ आहे , भाऊ आणि मी इथे प्रतिगामी विचारांना वाव देणार नाही , लक्षात ठेवा ...."

    ReplyDelete
  5. https://www.facebook.com/drsubramanianswamy/photos/a.118146701658320.18858.107229389416718/639638886175763/?type=1&theater

    ReplyDelete