Friday, July 10, 2015

पवारांनी नारायण राणेंचे नेतृत्व स्विकारले?



मालवण : बाळासाहेब असताना शिवसेनेत स्वाभिमान होता. आताच्या नेतृत्वाकडे तो आहे की नाही हे मला माहीत नाही. मात्र, जर स्वाभिमान असेल, तर त्यांनी सत्तेपासून दूर व्हायला हवे, असे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मालवण तारकर्ली येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.  राज्यात एकहाती सत्ता आणा असे आवाहन करणाऱ्या भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी एकप्रकारे सेनेलाच इशारा दिला आहे. अमित शहा यांचे कालचे विधान हे भाजपसाठी नसून सेनेसाठी केलेले आहे. सेनेच्या मदतीने त्यांनी राज्यात सत्ता स्थापन केल्याने त्यांनी खंत व्यक्त केली. शहानी केलेल्या मार्गदर्शनातून सेनेने आता तरी शिकावे. असा सल्ला देत जर सेनेचा स्वाभिमान जागृत झाला तर राज्यात मध्यावधी निवडणुका लागू शकतात असे पुन्हा एकदा सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सेनेला डिवचले आहे.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलेले हे ताजे विधान आहे. त्यामुळे अर्थातच शिवसैनिकांना संताप आल्यास नवल नाही. प्रामुख्याने निष्ठावान कार्यकर्ता असलेले शिवसैनिक त्यामुळे चवताळतील यात शंका नाही. तशा काही प्रतिक्रीया ऐकूही येऊ लागल्या आहेत. पण पवारसाहेब उर्फ़ शरदबाबू थोरल्या साहेबांचे निकटवर्ति मित्र होते. म्हणूनच आपल्या दिवंगत मित्राच्या वडिलधार्‍या अधिकारात पवारांनी उपरोक्त उपदेश केलेला आहे. त्याचे भान राखूनच शिवसैनिकांनी प्रतिक्रीया द्यायला हव्या. पण तसे खचितच होणार नाही. शिवसैनिक व तिचे नेते पवारांच्या विधानावर तुटून पडल्याशिवाय रहाणार नाहीत. कुठलाही मागचापुढचा विचार न करता धावून जाणे, हाच शिवसैनिकाचा बाणा आहे. मग पवारांच्या या विधानाचे गर्भितार्थ शोधण्याचे कष्ट कशाला घेतले जातील? पण म्हणून शरदबाबूंचे विधान फ़ालतू ठरत नाही. त्यांच्या कुठल्याही वक्तव्यामध्ये गहन अर्थ नसला, तरी गुढ हेतू नक्की सामावलेला नक्कीच असतो. त्याचा वेध घेण्याची गरज असते. त्यासाठी मग अनेक संदर्भांना सोबत घेऊनच विधान तपासावे लागते. उदाहरणार्थ पवार कुठे बोलले? कधी बोलले? कुणाच्या संदर्भात बोलले आणि काय बोलले, अशा अनेक कोनाड्यातून विधानाचा विचार करणे भाग असते.

पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे साहेबांचे हे विधान मालवण सिंधूदुर्गातले आहे. त्याचा अर्थ त्याचा कुठेतरी नारायण राणे यांच्याशी संबंध असू शकतो. कारण मालवणचा आणि ‘स्वाभिमान’ शब्दाचा गहन संबंध आहे. यापुर्वी महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपर्‍यात पवारसाहेबांनी अनेक महत्वपुर्ण विधाने केलेली आहेत. पण चुकूनही त्यांनी स्वाभिमान शब्दाला हात लावलेला नव्हता. नेमके मालवणात गेल्यावरच त्यांना ‘स्वाभिमान’ शब्द कशाला आठवला? आणि ते म्हणालेत तरी काय? शिवसेनेत पुर्वी स्वाभिमान होता आणि आता राहिला नाही. म्हणजे सामान्य लोक ‘स्वाभिमान’ शब्द ज्या अर्थाने वापरतात, तो पवारसाहेबांना अभिप्रेत नाही. शिवसेनेत ‘स्वाभिमान’ राहिला नाही, म्हणजे नारायण राणे आता शिवसेनेत नाहीत, असे शरदबाबूंना म्हणायचे आहे. ते वास्तविक आहे ना? ते वास्तव विसरून पवार किती स्वाभिमानी आहेत असला उफ़राटा सवाल विचारणे गैर नाही काय? म्हणूनच म्हटले साहेब काय म्हणतात ते शांत चित्ताने समजून घेण्याची गरज आहे. स्वत:च्या स्वाभिमानाचीच गोष्ट असती, तर मग पवारांनी पाच दशकात अनेक पक्ष बदलताना शिवसेनेत प्रवेश केला नसता काय? त्यांना स्वाभिमान इतकाच मोलाचा वाटला असता, तर बाळासाहेबांनी स्वत: पवारांना सेनेत आमंत्रित करून महत्वाचे पद दिले नसते काय? पण ते शक्य झाले नाही, कारण शिवसेनेत व्यक्तीगत व संघटनात्मक स्वाभिमान आवश्यक होता आणि शरदबाबूंना त्याचेच तर वावडे होते. ही बाब नेमकी ठाऊक असल्याने बाळासाहेबांनी आपल्या या निकट मित्राला कधी पक्षात बोलावले नाही, की मैत्री टिकवताना पवारांनी कधी वाट वाकडी करून शिवसेनेत प्रवेश केला नाही. म्हणून तर त्यांना ‘जाणता’ राजकारणी म्हणतात. जितके इतरांचे गुणदोष पवारांना कळतात तितकेच स्वत:चेही गुणदोष पवार चांगले ओळखून आहेत.

म्हणून तर कधी उर्वरीत महाराष्ट्रात फ़िरताना त्यांनी स्वाभिमान शब्द तोंडातून येऊ दिला नाही. अगदी १९९९ सालात पुन्हा कॉग्रेस सोडल्यावर नवा तंबू राष्ट्रवादी अशा नावाने ठोकला. तेव्हाही त्यांनी स्वाभिमान शब्दाला जवळ घेतले नव्हते. राष्ट्रवादी संबोधण्यापेक्षा त्यांना स्वाभिमानी कॉग्रेस असेही पक्षाचे नाव ठेवता आले असते. पण सगळे घोडे तिथेच येऊन फ़सते ना? म्हणून त्यांनी राष्ट्रवादी असे विशेषण आपल्या पक्षाला लावले. त्यातली दूरदृष्टी अवघ्या सहा महिन्यातच जगाला अनुभवता आली. सोनियांवर परदेशी नागरिक असल्याचा आक्षेप घेत कॉग्रेसशी काडीमोड घेणार्‍या पवारांनी १९९९ अखेरीस महाराष्ट्रात आपल्याच बगबच्च्यांसाठी सत्तापदे मिळवताना किती स्वाभिमान जोपासला होता? सोनियांनी तर विलासरावांना विरोधी पक्षनेता म्हणून निवडले होते. पण स्वाभिमानापेक्षा सेक्युलर विचारांची महता सांगत पवारांनी राज्यात आघाडीची सता आणली आणि त्यात स्वाभिमानाचा बळी दिला नव्हता काय? पण तेव्हाही मुंडे-महाजन पवारांना सोबत घेऊन महायुतीचे सरकार आणायला उतावळे होते. पण बाळासाहेबांनी त्याला साफ़ नकार दिला. त्याला स्वाभिमान म्हणतात. मित्र शरदबाबूंच्याच पक्षासोबत सत्तेत सहभागी व्हायला शिवसेनाप्रमुखांचा नकार म्हणजे स्वाभिमान असतो. असे पवार सुचवत आहेत, सांगत आहेत. म्हणूनच त्यांनी अमित शहांच्या विधानाचा संदर्भ घेतला आहे. सेनेशी मदत घेऊन सरकार स्थापन करावे लागले याची अमित शहांना खंत आहे. त्याचा शिवसेनेला राग येत नाही म्हणून पवार विचलीत आहेत. सेनेचा पाठींबा घ्यावा लागला म्हणून शहांच्या बेचैनीची जाण पवारांना आहे. कारण पवारांनीच बाहेरून दिलेला पाठींबा भाजपाला जाहिरपणे का होईना नाकारावा लागला. त्याची खंत शरदबाबूंना बोचते आहे. किंबहूना शहांना राष्ट्रवादीचाच पाठींबा घ्यायचा होता, असे पवारांना सुचवायचे आहे.

राज्यात तालुका पंचायतीपासून विधानसभेपर्यंत शत-प्रतिशत सत्ता स्वबळावर आणायला हवी, असे अमित शहांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पण त्यातले हे विधान भाजपासाठी नसून सेनेसाठी ‘मार्गदर्शन’ आहे, असे पवार म्हणतात. पण तितकेच खुद्द पवारांचे विधानही सुचक नाही काय? सेनेने स्वाभिमान जागवून सत्तेच्या बाहेर पडावे, म्हणजे राज्यात मध्यावधी निवडणूका संभवतील, असेही पवार पुढे म्हणाले आहेत. आणि अशा मध्यावधी निवडणूका आल्या वा तशी शक्यता दिसली तर? तर मग पवार काय करतील? १९ आक्टोबरला त्याचे उत्तर शरदबाबूंनी आधीच देवून ठेवले आहे. राज्याला वारंवार निवडणूका परवडणार्‍या नाहीत. म्हणून त्यांनी ‘तात्काळ आपली सेवा’ भाजपाच्या चरणी रुजू केली नव्हती का? ‘बिनमागे परोसे वह मॉं होती है’, या नरेंद्र मोदींच्या शब्दाचे स्मरण करून पवारांनीच बाहेरून भाजपाला पाठींबा जाहिर केला नव्हता का? आताही तशी पाळी आली तर पवार मध्यावधी होऊ देतील का? दुष्काळाचे सावट आहे. शेतकरी अवर्षणाने भरडला जातोय, अशावेळी ‘जाणता राजा’ निवडणूकीची उधळपट्टी होऊ देईल काय? तशी शक्यता दिसली, तरी पवार स्वाभिमान विसरून भाजपाचे सरकार चालवण्याची जबाबदारी घेतील. कारण शरदबाबू नेहमी स्वाभिमानापेक्षा ‘परवडणार्‍या’ निकषावर आपले राजकीय निर्णय घेतात. मग भले त्यांच्यासकट अनुयायांची ‘परवड’ झाली तरी बेहत्तर. म्हणून त्यांना शिवसेनेच्या स्वाभिमानाचे कौतुक वाटते. तोटा पत्करूनही शिवसेना स्वाभिमान जपते, याचे पवारांना कौतुक आहे. मात्र आज त्यांना स्वाभिमान आठवला आहे, तो मालवणला आणि त्यांना तोच ‘स्वाभिमान’ आपल्या पक्षात बाणवावा अशी इच्छा झालेली असावी. त्यातून स्वाभिमानाची भाषा आलेली आहे. आठवते तीन महिन्यापुर्वी बांद्रा पुर्वेला होत असलेल्या पोटनिवडणूकीत नारायण राणेंच्या प्रचाराला आलेल्या शरदबाबूंनी काय ‘गौप्यस्फ़ोट केला होता?

‘बाळासाहेबांना राणे यांची गुणवत्ता कळली होती, म्हणूनच मनोहरपंतांना बाजूला करून राणे यांना मुख्यमंत्रीपदी बसवले’. आज मालवणला गेल्यावर त्याच शरद पवारांना नारायण राणे यांचा आणखी एक गुण उमगला असावा. तो म्हणजे ‘स्वाभिमान’. तेव्हा स्वपक्षातील नाकर्त्यांना झुंजार ‘स्वाभिमानी नारायण राणे’ यांच्या नेतृत्वाखाली काम करायला लावायचा हेतू पवारांनी बोलून दाखवला आहे काय? अमित शहांचे विधान जसे भाजपा कार्यकर्त्यांपुढले असले तरी शिवसेनेसाठी असल्याचे पवार सांगतात, तसे त्यांचे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसमोरचे हे विधान स्वपक्षातील ‘स्वाभिमान’ हरवलेल्या भुजबळ अजितदादांसाठी नसेल कशावरून? तेव्हा उगाच शिवसैनिकंनी आदळआपट करण्याचे कारण नाही. थोरल्या साहेबांच्या जीवलग वडिलधार्‍या मित्राचे ‘जाणते’ शब्द समजून घ्यायला हवेत. पवार साहेब आता नारायण राणेंचे नेतृत्व स्विकारून बहुधा आपला पक्ष ‘स्वाभिमान’ या नितेश राणेंच्या संघटनेत विसर्जित करण्याची ही नांदी नसेल कशावरून?

1 comment:

  1. शरद पवार अलिबाबा व्हायला बघतायत!
    पण चाळीस जणांचा लिडर ही भुमिकाच सरस आहे त्यांची!

    ReplyDelete