Sunday, July 12, 2015

इफ़्तारची रफ़्तार की राहुलची माघार?



परदेश दौर्‍यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी माघारी येण्यापुर्वीच त्यांना आगामी संसद अधिवेशनात घेरण्याच्या तयारीला सोनिया गांधी व त्यांचा पक्ष लागलेला दिसतो. त्यासाठीच सर्व सेक्युलर पक्षांची बैठक घ्यायचे सोडून त्यांनी सेक्युलर पक्षांना इफ़्तार पार्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. मुळात कुठल्याही एका धर्माचा आडोसा घेऊन सेक्युलर पक्षांनी असे राजकारण करावे काय, असा एक प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट इफ़्तार या सोहळ्याचा अर्थ तरी अशा लोकांना उमगला आहे काय? मुस्लिम धर्मात रमझान हा अतिशय पवित्र महिना म्हणून पाळला जातो. त्यात प्रतिदिन कडक उपवास केला जातो. अगदी नुसते खाणेच वर्ज्य नसते, तर तहानही भागवायला प्रतिबंध असतो. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असा कडक उपवास केल्यावर तो सोडण्याचा सोहळा म्हणजे इफ़्तार होय. मग त्याच नावाने व तोच मुहूर्त साधून सोनिया इफ़्तार करणार म्हणजे काय? जे कोणी अशा सोहळ्याला येणार आहेत, ते रमझानचा उपवास करणार आणि सोडायला सोनियांकडे येणार आहेत का? नसेल तर असा भरपेट हजेरी लावणार्‍यांसाठी ती निव्वळ मेजवानी असणार आहे. अशा स्थितीत त्याच भोजनावळीला इफ़्तार सोहळा ठरवणे, हाच इस्लामचा व त्याच्या नितीनियमांचा अवमान नव्हे काय? पण मतांसाठी लाचार राजकारण्यांना कशाचाही धरबंद राहिलेला नाही. शिवाय हे आमंत्रण सेक्युलर पक्षांपुरते कशाला? सेक्युलर पक्षातले बिगर मुस्लिम धर्माचे बंदे आणि भाजपातले मुस्लिमही काफ़ीर; असे सोनिया वा कॉग्रेसला म्हणायचे आहे काय? यातून धर्माचा व राजकारणाचाही पोरखेळ होत नाही काय? मुद्दा एका वा अन्य पक्षांनी काय करावे, याचा नाही. जे कोणी इस्लामचे बंदे व कडवे आहेत, त्यांना यात धर्माची अवहेलना कशी दिसत नाही? की त्या धर्मनिष्ठांचेही मतलब धर्मापेक्षा भिन्न आहेत?

कुठेही आपल्या धर्माच्या समजूती वा प्रथा-परंपरांना धक्का लागतो असे वाटले, तरी लगेच गदारोळ करणार्‍यांना इफ़्तार पार्ट्या नावाचे राजकारण कसे उमगत नाही? तेव्हा धर्माचे पावित्र्य वा त्यातली शुद्धता कुठे बेपत्ता होते? कुठलाही राजकीय पक्ष आजकाल इफ़्तार पार्ट्यांचे आयोजन करतो, त्याला धर्माची मान्यता आहे काय? असेल तर कुठल्या धर्मग्रंथामध्ये तशी शिकवण आलेली आहे, त्याचा तरी एखाद्या धर्ममार्तंडाने खुलासा करावा. नसेल तर अन्य बाबतीत उठसुट धर्माचे पावित्र्य सांगत तरी फ़िरू नये. भाजपानेही आता इफ़्तार पार्ट्यांचे आयोजन सुरू केले आहे आणि अगदी रा. स्व. संघानेही त्याचेच अनुकरण केले आहे. त्यातला चांगुलपणा मान्य आहे. पण इतर वेळीही तसाच चांगुलपणा दाखवला जाणार आहे काय? इतरांनी इफ़्तार केलेला चालत असेल, तर योगाच्या अभ्यासाला विरोधाचे कारण काय? धर्माची शिकवण योगासाठी जितकी कठोर व काटेकोर असते, ती इफ़्तारच्या वेळी शिथील कशी होते? अशा विषयावर सदोदीत चर्चा करणार्‍या विद्वानांना असा प्रश्न कसा सतावत नाही? योगाची सक्ती वा संस्कृत गीतेचे पाठ आले, मग चर्चा जोरदार झडतात. त्याच चर्चा रंगवणार्‍यांची बुद्धी उठसुट कोणीही इफ़्तार पार्ट्यांचे आयोजन केले मग झोपा कशाला काढते? हा एकूणच ढोंगीपणा होत चालला आहे. आपापल्या राजकीय स्वार्थासाठी इस्लाम वा अन्य धर्माचे विडंबन राजरोस चालते आणि कुठला धर्ममार्तंड त्याबद्दल अवाक्षर बोलत नाही. कुठला सेक्युलर पुरोगामी विद्वानही बोलणार नाही. पण त्याहीपेक्षा नवल वाटते, ते जातियवादी म्हणून हिणवल्या जाणार्‍या हिंदूत्ववाद्यांचे. इतर वेळी मुस्लिमांच्या व पुरोगाम्यांच्या खोड्या वा चुका शोधण्यात तत्पर असलेले हिदू धर्मनिष्ठही, अशा इफ़्तार पार्ट्यांविषयी मुग गिळून गप्प कसे बसतात? राजकारणात धर्म हा फ़ुटबॉल झाला आहे, त्याचेच हे प्रत्यंतर नाही काय?

कुठल्याही धर्मातला सण हा आनंदाचा सोहळा असतो, तेव्हा त्यात असा भेदभाव करू नये आणि एकमेकांच्या आनंदात सहभागी होण्यातच सणाची महानता असते; असेही मग सांगितले जाऊ शकेल. पण तसे असेल तर मग आमंत्रणात भेदभाव कशाला असतो? सोनियांनी फ़क्त सेक्युलर पक्षांनाच आमंत्रित कशाला करावे? तर त्यांना आगामी पावसाळी संसद अधिवेशनाची रणनिती निश्चीत करायची असून, त्यात अन्य विरोधकांना जोडून घ्यायचे आहे. त्यासाठी आधी हसतखेळत सर्वांना विना अजेंडा एकत्र आणायची संधी म्हणून त्यांनी या पार्टीचे आयोजन केले असणार. याबद्दल शंका घ्यायचे कारण नाही. त्यात आगामी राजकारणाची औपचारिक भुमिका चर्चेत असेल. पर्यायाने कोण कोण मोदी विरोधात एकत्र येऊ शकतील, त्याची चाचपणी होऊ शकेल. म्हणजेच निव्वळ राजकीय हेतूने अशी पार्टी आयोजित केली आहे. त्यासाठी धर्माचे ध्वज कशाला? तर आपण मुस्लिमधार्जिणे आहोत असे दाखवण्याचा तो केविलवाणा प्रयत्न आहे. मागल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात राहुल गांधी अर्धा कार्यकाळ बेपत्ता राहिले. उरलेल्या अर्ध्या कालखंडात त्यांनी येऊन चमकण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यावरच राजकारण पक्षाने इतके केंद्रित केले, की आधीच्या अर्ध्या कालखंडात सोनियांनी जमवलेली विरोधी एकजुट विस्कटून गेली. राहुल गांधींना पुढे करताना विरोधकांची आघाडी मोडीत निघाली. अधिवेशन संपल्यावर ते लक्षात आले. म्हणून आता नव्याने सोनियांना विरोधकांना एकत्र आणायचे पाऊल टाकावे लागते आहे. राहुलचा मोहरा फ़ुसका ठरल्याची ही कबुली म्हणायची काय? अन्यथा पुन्हा एकदा मातेलाच विरोधी पक्षाच्या एकजुटीसाठी कंबर कशाला कसावी लागली असती? इफ़्तार पार्टीचा बेत त्यातून आलेला दिसतो. त्याचा दुसरा अर्थ पुन्हा एकदा राहुलनी पक्षाला तोंडघशी पाडले, असाच घ्यावा लागेल.

आधी एकामागून एक निवडणूका गमावत राहुलनी पक्षाला जवळपास सर्वच मोठ्या राज्यातून हद्दपार करून दिले होते. शेवटी वर्षभर आधी लोकसभेत कॉग्रेसचा दारूण परभव केल्यावरच राहुलनी विश्रांती घेतली. त्यानंतरचे सहा महिने पक्षाला डोके वर काढायलाही संधी मिळाली नाही. इतके झाल्यावर पक्ष व नेते नामोहरम झाले तर नवल नव्हते. अशा स्थितीतून कॉग्रेसला बाहेर काढायची संधी सोनियांना मिळाली, ती भूमी अधिग्रहण वटहुकूम व मनमोहन यांना निघालेल्या कोर्टाच्या नोटिसमुळे. त्याचा लाभ उठवित पुन्हा एकदा सोनियांनी विरोधकांची मोट बांधून राष्ट्रपती भवनापर्यंत विरोधी नेत्यांचा मोर्चा काढला. त्याच एकजुटीचे प्रतिबिंब संसदेच्या कामातही पडलेले दिसले. पण अधिवेशनाची मधली सुट्टी होईपर्यंत बेपत्ता असलेले राहुल मध्यंतरानंतर संसदेत हजर झाले आणि त्यांच्याकडे पुन्हा पक्षाचे नेतृत्व सोपवण्याच्या नादात विरोधकांची बांधलेली मोट विस्कटून गेली. कारण राहुलला पुढे करताना सोनिया संसदेच्या बाहेर राहिल्या आणि राहुल विरोधकांना हिशाबातही न धरता आपलीच टिमकी वाजवत राहिले. त्यातून स्पष्ट बहुमताचे मोदी सरकार बलवान दिसू लागले. विरोधकातील काही गटांना आपल्या बाजूला खेचण्यातही मोदी यशस्वी झाले. आता त्या माघारीतून पुन्हा मुसंडी मारायची, तर नव्याने विरोधकांना एकत्र करणे भाग आहे आणि त्याचा अजेंडा नव्याने मांडावा लागणार. त्याचीच चाचपणी करण्यासाठीच मग इफ़्तार हे नाटक व्हायचे आहे. पण त्याचा अर्थ असा, की पुन्हा सोनियांना पुढाकार घ्यावा लागणार आणि तो विरोधकांनी मान्य करायचा, तर राहुलना संसदेतील कॉग्रेसचे नेतृत्व इतक्यात सोपवण्याचा हट्ट सोडावा लागेल. विरोधकांना राहुल नव्हे तर आपण नेतृत्व देऊ, असे पटवण्यासाठीच ही इफ़्तार पार्टी असावी असे दिसते. अन्यथा इतक्या गतीने म्हणजे ‘रफ़्तार’ने सोनियांनी हे आयोजन कशाला केले असते?

No comments:

Post a Comment