Wednesday, July 15, 2015

अवघी मुंबईच गटार झालीय ना?



१९८० च्या आसपासची गोष्ट आहे. तेव्हा साप्ताहिक ‘लोकप्रभा’मध्ये डॉक्टर सुखटणकर आरोग्य विषयक लिखाण करीत असत. विविध आजार व आरोग्यचे प्रश्न त्यांनी वाचकाला समजावण्याचा प्रयास त्यातून केलेला होता. त्याच साप्ताहिकाच्या काही पत्रकारांनी एकदा डॉक्टरांशी गप्पा केल्या होत्या. त्या अर्थात आरोग्यविषयक नव्हत्या. टाईमपास करताना डॉक्टर आपल्या वैद्यकीय शिक्षण काळात डोकावले आणि त्यांनी समोरच्या पत्रकारांना एक मजेशीर किस्सा कथन केला. एके दिवशी रात्रपाळीला असताना त्यांना एका कोवळ्या वयातल्या मुलावर उपचार करावे लागले होते. त्या नुसत्या आठवणीने सुखटणकर उत्तेजित झाले होते. कारण आजवरच्या आयुष्यातील सर्वात अपुर्व असा प्रसंग ते मित्र पत्रकारांना कथन करीत होते. हा मुलगा बारातेरा वर्षाचा असावा आणि त्याला असाध्य आजार झालेला होता. कुठला स्थानिक डॉक्टर त्यावर उपाय करू न शकल्याने त्याला सार्वजनिक रुग्णालयात आणलेले होते. त्याची सर्व लक्षणे तपासली, तेव्हा सुखटणकर कमालीचे थक्क झाले. एखाद्याला लॉटरी लागावी तसा त्यांना त्या रोग्याला भेटून आनंद झाला होता. याचे कारण स्पष्ट होते. त्याला ज्या रोगाची बाधा झालेली होती, त्याचे वर्णन व तपशील वैद्यकशास्त्राच्या पुस्तकात उपलब्ध होते आणि वर्गात शिकवलेही जात होते. मात्र तसा रोगी मुंबईत सापडणे दुरापास्त होते. म्हणूनच इस्पितळाच्या रुग्ण विभागात प्रत्यक्षात आजाराची लक्षणे वा रोगी बघताही येत नसे. त्या रात्री या विद्यार्थी डॉक्टरला पुस्तकातला तो काल्पनिक रुग्ण भेटला, हा अलभ्य लाभच वाटला. मग आपल्या पुस्तकी ज्ञानाच्या  आधारे सुखटणकर यांनी त्याच्यावर उपचार केले आणि औषधेही दिली. मात्र रात्रभर त्यांना झोप लागली नाही. सकाळी पहिल्यांदा जाऊन त्यांनी आपल्याला लागलेल्या त्या लॉटरीची माहिती प्राध्यापकांना दिली आणि त्या वॉर्डाकडे तमाम विद्यार्थ्यांची झुंबड उडाली. तो रोगी एलीयन होता काय?



तो बारातेरा वर्षाचा रुग्ण दुर्मिळ होता. कारण त्याला लेप्टोस्पायरोसिस नावाच्या आजाराची बाधा झालेली होती. डॉ. सुखटणकर ही घटना १९८० च्या आसपास कथन करत होते, तरी तो त्यांचा अनुभव १९६०च्या दशकातला विद्यार्थी दशेतला होता. त्यांनी सांगितलेला तपशील आजही तितकाच मोलाचा आहे. जितका आम्ही ऐकला तेव्हा होता. कारण त्यांच्याच तोंडून आम्ही प्रथम लेप्टोस्पायरोसिस नावाच्या रोगाचे नाव ऐकले. पत्रकारांची ही स्थिती असेल, तर मुंबईकरांसाठी असा रोगी ही खरोखरच कोणी परग्रहावरून आलेला प्राणी, अशीच त्या रोग्याची ओळख नाही काय? पण तो भाग दुय्यम आहे. इतका दुर्मिळ रोगी मुंबईच्या सार्वजनिक रुग्णालयात आला कुठून? आणि त्याला ही दुर्मिळ रोगबाधा झाली तरी कुठे, तो तपशील खुप महत्वाचा आहे. आज जे राजकीय वितंडवाद चालू आहेत, त्या पार्श्वभूमीवर त्याला अधिकच महत्व आहे. तेव्हा मुंबईच्या गटारांची सफ़ाई करण्यासाठी मेनहोलचे जे चिंचोळे उभे भुयार असायचे, त्यात धडधाकट सफ़ाई कामगार उतरू शकत नव्हते. म्हणून अगदी सडपातळ बांध्याची कोवळ्या वयातली मुले दोरीच्या सहाय्याने त्यात उतरवली जात. हा रुग्ण त्यापैकीच एक होता. तिथे खोल गटारात उतरल्याने असा रोग होत नाही. तिथे जे प्राणी वावरतात त्यांच्याशी संपर्क आल्याने रोगबाधा होते. तेव्हा मुंबईच्या भुयारी गटारात उंदरांचा खुप वावर असायचा, जसा आजही असतो. त्यापैकी कुठल्याही उंदराच्या अंगावर या आजाराचे विषाणू असतात. त्याचा प्रसार त्याच उंदरांच्या मलमूत्रातून होऊ शकतो. मात्र ते विषाणू जखमेतून मानवी शरीरात घुसतात. गटारात वा त्या उंदरांच्या संपर्कात आल्याने तशी बाधा होऊ शकत नाही. म्हणून तशी रोगबाधा दुर्मिळ असते, अशी त्या डॉक्टर सुखटणकरांनी आमच्या ज्ञानात घातलेली भर होती. चिंचोळ्या भुयारात उतरताना व वावरताना ज्या किरकोळ जखमा झाल्या, त्यातून या मुलाला ती बाधा होऊ शकली होती.

मुद्दा असा, की तेव्हाही मुंबईच्या वस्त्या, चाळी वा गटारात उंदरांचे वास्तव्य होतेच. पण आजच्या प्रमाणे उंदिर इतक्या निर्धास्तपणे गटाराबाहेर उघड्यावर बागडायचे नाहीत. अल्पकाळ पृष्टभागावर येऊन मिळेल ते अन्नपदार्थ उचलून बिळात वा गटारात त्यांचे वास्तव्य अधिक असायचे. कारण पृष्टभागावर कचरा उकिरडे माजलेले नसायचे. निदान नित्यनेमाने सफ़ाई होत असे आणि उंदरांना मुंबईच्या पृष्ठभागावर कमी वावरण्याची मोकळीक असायची. जितके उंदिर कमी तितका, मग यासारख्या रोगबाधीत उंदरांचा वावर कमी. सहाजिकच तितक्या प्रमाणात लेप्टोस्पायरोसिस रोगबाधा माणसाला होण्याची शक्यता कमी वा नगण्य असायची. इतकी कमी असायची की वैद्यकशात्र शिकणार्‍या विद्यार्थ्यांनाही असा रोगी दुर्लभ असायचा. त्याही काळात रोज निदान डझनभर भुयारी गटारात अशी मुले सफ़ाईसाठी उतरायची. पण तरीही तसा रोगी दुर्लभ असायचा. त्याचे कारण अर्थातच उंदरांची संख्याही त्या भुमिगत गटारात कमी होती. पर्यायाने त्यातल्या रोगबाधीत उंदरांची संख्याही नगण्यच असणार. मग लेप्टोस्पायरोसिस या रोगाला मुंबईत येण्यास मार्गच कुठून मिळणार? पुढल्या काळात काय झाले? तर मुंबईची लोकसंख्या तिप्पट चौपट होऊन गेली आहे. तितक्या प्रमाणात सफ़ाई, गटारे वा कचरा नियोजन व्यवस्था विस्तारू शकली आहे काय? कचरा निर्माण करणारी व त्यात उंदरांना पोसणार्‍या शिळ्यापाक्या अन्नाचा पुरवठा करणारी मानवी संख्या मात्र सतत विस्तारते आहे. परिणामी उंदिर पोसले जातात आणि त्यांची संख्या वाढत गेली. त्याच प्रमाणात लेप्टोबाधीत उंदिर वाढत गेलेत. पृष्टभागावर जागोजागी इतके नवे उकिरडे तयार करण्यात आलेले आहेत, की भुयार, गटार वा बिळात जाण्याची गरजच उरलेली नाही. उंदरांचा वावर पृष्टभागावर वाढला आहे. त्यातून ल्रेप्टो कसा पसरू शकतो?

जेव्हा कुठे पाणी साचते, पाऊस अधिक पडतो. त्यातच असे उंदिर वावरत असतात. त्यांना ‘सिव्हीक सेन्स’ नसतो ना? मग ते उघड्यावर जे मलमुत्र विसर्जन करतात, त्यातून लेप्टोच्या विषाणूंना टाकून जात असतात. अशा कचरा, पाणी वा डबक्यातून निम्मे मुंबईकर रोजच्या रोज येजा करीत असतात. त्यांच्या पायाला इवली जखम असली तरी लेप्टोला विनाविलंब त्या शरीरात घुसायचा व्हिसा मिळत असतो. लेप्टोस्पायरोसिस नामक रोगाचा मुंबईतला प्रादुर्भाव असा नित्यनेमाचा होऊन बसला आहे. भारतीय राज्यघटनेने कुणाही भारतीयाला मुंबईत येऊन वास्तव्य करायची मोकळीक दिली आहे. म्हणून जी मुंबई मागल्या अर्धशतकात बकाल वस्त्या, झोपडपट्ट्या व
अनधिकृत बांधकामातून विस्तारली, त्याचा हा परिणाम आहे. जे कोणी अशा वस्त्या वा मुंबईत येणार्‍या लोंढ्यांचे समर्थन करायला युक्तीवाद करतात, त्यांनीच मुंबईला उघडे गटार करून टाकले आहे. कारण येणारे लोंढे उपलब्ध नागरी सुविधांवर बोजा बनत गेले. त्यातून अशा समस्या जन्माला आल्या व बोकाळत गेलेल्या आहेत. त्यावर नाले गटारांची सफ़ाई असा उपाय नसून, मुळात मुंबईतील कचरा नियोजन करून आपणच आपला परिसर स्वच्छ ठेवण्यात पालिकेला कसे सहाय्य करावे, यात लक्ष घालण्याची गरज आहे. आम्ही घाण करणार, आम्ही उंदरांना प्रोत्साहन देण्यासाठी उकिरडे निर्माण करणार आणि पालिकेने मात्र सफ़ाई केली पाहिजे, असल्या भांडणात निदान लेपटो घेऊन येणार्‍या उंदरांना स्वारस्य नसते. तुम्ही फ़ेकलेल्या शिळ्यापाक्या अन्नाचे विसर्जन व विघटन करणे, ही निसर्गाने उंदरावर सोपवलेली एक जबाबदारी आहे आणि पर्यावरणाला जपण्यास माणूस विसरत असेल, तर त्याला उंदिर जबाबदार नाही. तुम्ही कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावा. उंदिर तुमच्या वाट्याला कशाला येईल? पण तुम्हीच मुंबईचा उकिरडा व गटार केलेत, तर मात्र त्यावर पहिला अधिकार उंदराचा व पर्यायाने लेप्टोस्पायरोसिसचा असणार आहे.

No comments:

Post a Comment