Sunday, July 5, 2015

मुनगंटीवार, बिभीषण कोणाला हवा होता?



लागोपाठ भाजपा मंत्र्यांच्या विरोधात गदारोळ सुरू झाल्यावर काहींच्या मनात शंका येणे स्वाभाविक आहे. पण जे पक्ष चालवतात किंवा कालपरवा कोअर कमिटी म्हणून मिरवत होते, त्यांना शंका येण्याचे कारण काय? आधी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बाबतीत तीन मंत्र्यांनी एकत्रित येऊन खुलासा केला. त्यात अर्थातच पंकजा मुंडे यांच्या बाबतीत काही खुलासा झालेला नव्हता. मग ग्रामिण विकासमंत्री पंकजाताई परदेशातून आल्या आणि त्यांनी स्वत:च पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. त्यावर त्यांना एकाकी पाडले जाते आहे, असा गवगवा झाला. कोणी म्हणू लागले, की नेमके बहुजन घटकातले मंत्री घेऊन त्यांना बदनाम करण्याचा डाव खेळला जातो आहे. प्रत्येकजण आपापली बुद्धी पणाला लावून घडामोडींचा अर्थ लावत होता. त्यात मग बोलघेवड्या भाजपा नेत्यांनी मागे कशाला रहावे? अर्थामंत्री सुधीर मुनगंटीवार मग पुढे सरसावले आणि त्यांनी घरभेदीपणा होतोय, असा आरोप करून टाकला. त्यांच्या बोलण्यात तथ्य नक्कीच असावे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेल्या गोष्टी वा सरकारचे आतले गोपनीय निर्णय बाहेर कोण काढतोय, त्याचा आम्ही शोध घेतोय असे मुनगंटीवार यांनी सांगितले. याचा अर्थ असा, की भाजपामध्ये दोनतीन गट कार्यरत आहेत आणि ते एकमेकांच्या विरोधात कुरघोडीचे राजकारण खेळत असावेत. तसे नसते तर अर्थमंत्र्याच्या अधिकाराचा माणूस अशी वाच्यता करणार नाही. तशी बातचित नेत्यांमध्ये झालेली असणार. अन्यथा सुधीरभाऊ जाहिरपणे कशाला बोलतील? त्यांनी इशारा दिला म्हणजे त्या घरभेद्याचा संयुक्तपणे शोध चालू झाला आहे. जो कोणी विरोधकांना अशा आतल्या बातम्या देतो आहे, त्यालाच हा इशारा देण्यात आला, म्हणायला हवे. घरभेद्याला आणखी एक शब्द वापरला जातो. त्याला बिभीषण असेही म्हणातात. ते रामायण नव्याने सांगण्याची गरज नाही.

पण बिभीषण पुराण मात्र भाजपाचे राज्यातील नेते विसरलेले दिसतात. ऐन विधानसभेच्या निवडणूकीचा मोसम सुरू झाला आणि मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी कॉग्रेसचे अनेक नेते स्वपक्षाला सोडून भाजपात दाखल होऊ लागले होते. ज्यांच्यावर विरोधात बसून भाजपानेच आरोपांची सरबत्ती लावली होती, त्यांनाच निवडणूकीत उमेदवारी देण्यासाठी सन्मानपुर्वक भाजपात घेण्याचा सपाटा लागला होता. त्यावेळी विद्यमान मुख्यमंत्री राज्य भाजपाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी अशा पक्षांतराला कुठले खास विशेषण दिले होते, ते कुणा भाजपा नेत्याला आठवते काय? भ्रष्टाचाराची लंका जाळण्यासाठी बिभीषणाला सोबत घ्यावे लागते, असेच देवेंद्र फ़डणवीस तेव्हा म्हणाले नव्हते का? त्यांना स्वपक्षाशी दगाबाजी करून आपल्याच नेत्यांना बुडवायला प्रोत्साहन कोणी दिले होते? मग जो पक्ष अशा बिभीषणांना आमंत्रित करतो, त्याला आपल्याच पक्षात बिभीषण निर्माण होऊ नयेत, याची काळजी घ्यायला नको काय? सुधीर मुनगंटीवार ते बिभीषण पुराण विसरून गेले की काय? इतरांच्या किंवा राष्ट्रवादीच्या गोटात तुम्ही बिभीषण निर्माण करत असाल, तर तुमच्या पक्षात त्यांनी बिभीषण कशाला निर्माण करू नयेत? खरे तर कुठल्याही पक्षात बिभीषण निर्माण करण्यात शरद पवार यांचा हातखंडा आहे. मग त्यांच्या हातातली सत्ता काढून घेण्यासाठी तुम्ही गायलेल्या बिभीषण पुराणाला ते चोख उत्तर देणार नाहीत काय? पंकजा मुंडे यांच्यावर झालेला आरोप त्यांचाच चुलत भाऊ धनंजय मुंडे याने केलेला आहे. तोच मुळात जुना बिभीषण नाही काय? मुंडे यांना शह देण्यासाठी त्यालाच चुलत्याच्या विरोधात उभा करण्याची किमया कोणाची होती? आज त्याला राष्ट्रवादीने विधान परिषदेत विरोधी नेतेपदावर कशाला बसवले आहे? त्यानेच चिक्की प्रकरण चव्हाट्यावर आणले नाही काय? बिभीषण कुठे शोधताय मुनगंटीवार?

सवाल शोधण्य़ाचा नाही, बिभीषण असण्याचा आहे. बिभीषण शोधायला राम लंकेत गेला नव्हता. किंवा श्रीरामाने त्याला निर्माण केला नव्हता. बिभीषण रावणाच्या अतिरेकी वा बेभान वर्तनाने निर्माण झालेला होता. जेव्हा सत्तेच्या मस्तीने लोकांना दुखावले जाते आणि त्याच्या जखमेवर मीठ चोळले जाते, त्यातून बिभीषण निर्माण होत असतात. ते स्वत:च जाऊन श्रीरामाला मिळत असतात. कारण त्यांना श्रीरामाच्या भक्तीपेक्षा रावणाच्या रागाने पछाडलेले असते. रावणाला संपवण्यात अशा बिभीषणांना अधिक रस असतो. त्याचा लाभ श्रीरामाला मिळत असतो. अशा वेळी बिभीषण शोधायच्या गमजा करण्यापेक्षा आपण कोणाकोणाला दुखावले आहे, त्याचा राज्य भाजपा नेतृत्वाने विचार केला तर बरे होईल. अगदी लोकसभा यशानंतर आपण कसे वागलो, त्याचेही थोडे आत्मपरिक्षण करायला हरकत नसावी. युतीला तिलांजली देऊन जे राजकारण सुरू झाले, तिथून मग आपले-परके, दूरचे विश्वासातले याचे भान रहात नाही. तीच खरी आज राज्य भाजपाला सतावणारी खरी जखम आहे. तेव्हाच आम्ही लिहीले होते, की ‘मित्रांमध्ये शत्रू शोधायला धावणार्‍यांना शत्रू असावे लागत नाहीत, असे बेभान लोक स्वत:च स्वत:चे शत्रू जन्माला घालतात.’ आज त्याचा अर्थ अनेक भाजपा नेत्यांना व समर्थकांना कळू शकेल. २५ वर्षाची युती मुठभर जागांच्या हट्टापायी मोडता येत असेल, तर मंत्रीपदे वा सत्तापदे यासाठी पक्षाची निष्ठाही पायदळी तुडवायला काही हरकत नसते. नेत्यांनी घालून दिलेला आदर्श अनुयायी पाळत असतात. आज भाजपाच्याच आतल्या गोटातून शत्रूपक्षाला काही मुद्दे वा माहिती पुरवली जात असेल, तर त्यामागे कोणी व्यक्ती असण्यापेक्षा मानसिकता आहे. धोरण व निती यापेक्षा सत्तापदांची लालसा मोठी ठरवली गेली, तिथे भाजपाला अशा मतलबी वृत्तीने ग्रासायला सुरूवात केली. दिसतो तो त्याचाच परिणाम आहे.

रामायण असो किंवा बिभीषणाची कथा असो, ती आपल्य सोयीनुसार बदलता किंवा वाकवता येत नसते. त्यात युद्ध जिंकण्यासाठी बिभीषणाला सोबत घेतले इतकेच नाही. त्याला सोबत घेण्यासाठी आपल्या विश्वासू हमुनंताला श्रीरामाने बाजूला टाकले नव्हते. मारूतीचा बळी देऊन बिभीषणाला सोबत घेण्याचे रामायण कोणी ऐकलेले नाही. युती मोडून राष्ट्रवादीतले बिभीषण सामावून घेणारे रामायण कुठले होते? किंबहूना बिभीषणांना सामावून घेण्यासाठी २५ वर्षे जुन्या हनुमंताला टांग मारण्यापर्यंत भाजपाच्या रामाने मजल मारली; तिथेच निष्ठेचा बळी पडला होता. आपल्या तमाम कार्यकर्ते व दुय्यम कनिष्ठ नेत्यांना कोणता संदेश भाजपाने पाठवला? सत्तेचा वाटा मिळवण्यासाठी व मोठा हिस्सा पदरात पाडण्यासाठी कुठलीही दगाबाजी करावी. कोणाशीही दगाबाजी करावी. हीच निती आठ महिन्यापुर्वी राबवली गेली आणि आता तिचेच परिणाम त्या पक्षाला भोगावे लागत आहेत. तेव्हा आपल्यात कोण बिभीषण झालेत, त्याचा शोध घेण्याची गरज नाही, तर बिभीषणाची कथा सांगण्यात कुठली चुक झाली, तिचे परिमार्जन करण्याची गरज आहे. आताही विनोद तावडे यांच्यापेक्षा कोवळ्य़ा वयातल्या पंकजा मुंडे हिला कोंडीत सापडली असताना सहकार्याची फ़रज होती. त्या मुलीला पत्रकारांच्या तोंडी एकाकी सोडण्यात आले. मुख्यमंत्री पादेशी गेले असताना ज्येष्ठ मंत्र्यांनी पंकजाच्या पाठींब्याला हजर रहायला नको काय? परदेश वारी संपवून माघारी आलेल्या पंकजावर प्रश्नांचा भडीमार होणार हे उघड होते, त्याची तयारी अन्य ज्येष्ठांनी आधीपासून करायला हवी होती. पण तिच्या समर्थनाला उपस्थितीही लावण्याचे सौजन्य कोणी दाखवले नाही. मग भिंग घेऊन घरभेदी शोधण्याची गरज आहे काय? तुकड्यात विस्कटलेल्या पक्षात प्रत्येकजण दुसर्‍यासाठी घरभेदीच असतो. बिभीषण हवा होता ना? भोगा त्याचे परिणाम.

3 comments:

  1. इति बिभीषण पुराणं समाप्तम

    ReplyDelete
  2. भाजपला योग्य धडा मिळाला आहे. आपले विश्लेषण अगदी तंतोतंत खरे आहे. युती तोडल्यापासून भाजपची जी काही फरफट चालू आहे, त्यातून काही धडा घेतला तरच भाजपला फायदा आहे. अन्यथा भाजपला काँग्रस -राष्ट्रवादीच्या मार्गाने जाण्यास वेळ लागणार नाही.

    ReplyDelete
  3. भाजपा भ्रष्टाचारी होत आहे

    ReplyDelete