Monday, July 13, 2015

‘मागचे दोर’ कापणारे ‘शेलारमामा’



विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या मुहूर्तावरच सत्ताधारी शिवसेना आणि भाजपा युतीमध्ये तुंबळ जुगलबंदी जुंपली आहे. एका बाजूला सभागृहत विरोधकांना समर्थपणे तोंड देऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस म्हणत आहेत आणि दुसरीकडे त्यांच्याच गोटातून आपल्या मित्र पक्षावर हल्ले करायची संधी शोधली जात आहे. अर्थात शिवसेनाही त्यात मागे नाही. दोन्ही मित्रपक्ष मैत्री कशी नसावी, याचा वस्तुपाठ महाराष्ट्रापुढे मांडण्यासाठी आपली बुद्धी व शक्ती पणाला लावत आहेत. तसे बघितले तर मागल्या वर्षी याच दरम्यान ही जुगलबंदी सुरू झाली होती. भाजपाचे नवे पक्षाध्यक्ष अमित शहा यांची नेमणूक झाल्यावर त्यांनी मातोश्रीवर पायधुळ झाडावी, यासाठी पहिला हल्ला शिवसेनेच्या काही उतावळ्यांनी किंवा ‘शहा’ण्यांनी सुरू केला होता. त्याची काहीही गरज नव्हती. मग त्याला भाजपानेही तितक्याच उतावळेपणाने उत्तर देण्याचा ‘शहा’णपणा सुरू केला. त्याच्या परिणामी पाव शतकापासून चालत आलेली युती तुटण्यापर्यंत मजल गेली. मात्र अजून त्यातून सावरण्याची बुद्धी दोन्ही बाजूंना झालेली नाही. यात थोरला भाऊ कोण अशी स्पर्धा आहे. मतदानातून आपल्याला थोरला भाऊ सिद्ध करण्यात भाजपा यशस्वी झाला, तरी त्याला थोरल्याचा आब राखता येत नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. शिवसेना आरंभापासून युतीतला थोरला भाऊ होता, तेव्हा धाकट्या भाजपाला संभाळून घेण्याचा मोठेपणा बाळासाहेब सेनाप्रमुख म्हणून दाखवत होते. म्हणून कितीही वादविवाद झाले तरी युती टिकून राहिली होती. तितका मोठेपणा भाजपाला आज दाखवता आलेली आहे काय, याचाही विचार आजच्या त्या पक्षाच्या नेतृत्वाने करायला हरकत नाही. अन्यथा दिर्घकाळानंतर देशाचे नेतृत्व हाती आलेले आहे, त्याच्यावर गदा यायलाही विलंब होणार नाही. किंबहूना दिल्ली विधानसभेच्या निकालांनी तोच इशारा दिलेला आहे.

बांद्रा बुरूजावरून गर्जना करणार्‍या ‘शेलारमामां’ना त्याची जाण नसली तरी देवेंद्र फ़डणवीस व विनोद तावडे यांच्यासारख्या अभ्यासू नेत्यांनी परिस्थितीचा विचार करून असल्या जुगलबंदीला आवर घातला पाहिजे. अमित शहा यांना पक्षाध्यक्ष झाल्यापासून झिंग आलेली आहे. उत्तर प्रदेशातील यश शहांपेक्षा मोदींच्या लोकप्रियतेचे होते. तितकेच दिल्लीतल्या सातही जागा जिंकण्यात मोदी नावाची जादू सामावलेली होती. पण त्याच जादूची अवघ्या नऊ महिन्यात त्याच अमित शहांनी माती करून दाखवली, हे सुद्धा एक वास्तव आहे. दिल्लीत आयुष्य घालवलेल्या भाजपाच्या अनुभवी व तळागाळातील नेत्यांना बाजूला टाकून, उथळ उनाड नेत्यांना हाताशी धरून शहांनी जी रणनिती आखली; त्यानेच भाजपाचे फ़ेब्रुवारीत पुरते पानिपत करून टाकले. फ़ुटकळ केजरीवाल यांच्या पक्षाने संपुर्ण दिल्ली विधानसभा खिशात टाकताना मोदी लाट म्हणजे वावटळ असल्याचे सिद्ध करून दाखवले. तो मोदींचा पराभव नव्हता, की केजरीवाल यांचाही विजय नव्हता. इतका दिल्लीचा पराभव अमित शहांच्या उथळ रणनितीचा दारूण पराभव होता. कृतीपेक्षा नुसत्या शब्दातून लोकांना घायाळ करण्यातून शहा आपल्या मित्रांनाही शत्रू बनवण्यात कुशल आहेत. त्याचे परिणाम महाराष्ट्रातही दिसले आहेत. सहा महिन्यापुर्वी ज्या मोदींना डोक्यावर घेतलेले होते, त्यांनाच अफ़जलखान म्हणून हिणवल्यानंतरही एक कोटी मते शिवसेनेने मिळवली हा भाजपाचा नव्हेतर शहांचा पराभव होता. तितकाच तो शेलार व तत्सम तोंडाळ नेत्यांना पराभव होता. तो जिंकलेल्या जागांच्या संख्येने झाकला गेला होता. परंतु महापालिका व जिल्हा परिषदेच्या मतदानातून शहानितीचा तो पराभवच चव्हाट्यावर येऊ लागला आहे. मागल्या तेरा वर्षात नरेंद्र मोदींनी राजकारणात एकही चुक न करता आपल्या विरोधकांना धुळ चारली. मात्र शहांना पक्षाध्यक्ष करण्यात त्यांनी पहिली ऐतिहासिक चुक केली असेच आता म्हणावे लागते आहे.

दिडदोन वर्षापुर्वी राहुल गांधी ज्या बेफ़िकीरीने आपल्याच पक्षाच्या जागोजागी होत असलेल्या पराभवानंतर मुक्ताफ़ळे उधळत होते, त्याची परिणती पुढे लोकसभेच्या अफ़ाट मोठ्या परभवात झाली. होत असलेल्या चुका राहुल तेव्हाच सुधारू शकले असते. किंवा कॉग्रेसने राहुलना बाजूला करून त्या चुका सुधारल्या असत्या, तर पक्षाला इतक्या हास्यास्पद पराभवाला सामोरे जावे लागले नसते. पण इतके होऊनही राहुल गांधींना अजून त्याचा स्परर्श झालेला नाही. काहीशी तशीच अमित शहांची मनस्थिती दिसते. महाराष्ट्रात कालपरवा शहा आले आणि त्यांनी क्षेत्रिय कार्यकर्त्यांच्य शिबीरात मार्गदर्शन केले. पुन्हा त्यांनी शत-प्रतिशतची टेप वाजवली. माणसाला दोन दिवस आधी हाती आलेले गोंदिया-भंडार्‍याचे निकाल ठाऊक नव्हते काय? मागली पाच वर्षे तिथे भाजपाचा झेंडा फ़डकत होता आणि शत-प्रतिशत भाजपाचीच सत्ता होती, हे शहांना ठाऊक नव्हते काय? असेल तर ती सत्ता कशामुळे गमावण्याची वेळ आली, याचा पक्षध्यक्ष म्हणून त्यांनी विचार करायला हवा होता. त्यानुसारच मार्गदर्शन करायला हवे होते. पण महाराष्ट्रात कुठे कसले वारे वहात आहेत, त्याचा थांगपत्ता नसलेला हा माणूस इथे येऊन काय बोलला? विधानसभेत जी आयात करून संख्या हाती लागली, त्याचीच पुनरावृत्ती दिल्लीत करताना असलेली लोकमान्यताही गमावण्याची पाळी आली. याचेही भान नाही. अशा माणसाच्या हाती भाजपची सुत्रे असतील, तर मोदी त्या पक्षाला यापुढे किती वाचवू शकतील, याचीच शंका आहे. मग असा माणूस इथे येऊन वायफ़ळ बडबड करतो आणि बांद्रा येथील शेलारमामा त्याचेच तोरण बांधून तानाजीचा मामा असल्यासारखे ‘मागले दोर’ कापल्याच्या गर्जना करू लागतात. त्यांना एक आठवत नाही, की तानाजी धारातिर्थी पडल्यावर पळत सुटले त्या मराठ्य़ांना थोपवण्यासाठी तेव्हाच्या शेलारमामाने मागचे दोर कापले होते.

अजून शिवसेना भाजपा यांची युती सत्तेत एकत्र आहे आणि सेनेच्या पाठींब्याची गरज आहे. म्हणूनच तिला सोबत घेतांना मुख्यमंत्र्यांनी पुढल्या सर्व निवडणूका युतीनेच लढू, अशी ग्वाही दिलेली होती. औरंगाबाद, नवी मुंबई आणि विरार वसईच्या निवडणूकांना तसेच सामोरे जाऊनही भाजपाला लोकसभेचे यश टिकवता आलेले नाही. विधानसभेत छोटा भाऊ ठरलेल्या शिवसेनेने त्यात बाजी मारली. भंडारा-गोंदियात असलेली सत्ताही भाजपाला गमावण्याची पाळी आलेली आहे. म्हणजेच आहे ती सत्ता टिकवायची तर सेनेची गरज आहे. अर्थात पवारांच्या खांद्यावर बसून मुंबई क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष झालेल्या ‘शेलारमामां’ना ते कळायला वेळ लागेल. सेना गेली तरी पवारांच्या बाहेरील पाठींब्यावर देवेंद्र सरकार चालवू. अशा वल्गना शेलार करत असतील, तर त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांना पंधरवड्यासाठी कसे सत्तेला वंचित रहावे लागले त्याची आठवण करणे लाभदायक ठरेल. आघाडी मोडल्यावर राज्यपालांना भेटून राष्ट्रवादीने पाठींबा काढून घेतला आणि पृथ्वीराजांना मतदानाच्या पंधरा दिवस आधी मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. त्याला ‘राष्ट्रवादीचा पाठींबा’ असे म्हणतात. मागचे दोर कापले, म्हणून गर्जना करणे सोपे असते. पण समोर कशाच्या आधाराने लटकत रहायचे, याचेही भान असावे लागते. शिवसेनेच्या कोपरखळ्यांकडे दुर्लक्ष करण्याने जितके नुकसान होणार नाही, तितके त्याला उत्तर देण्यातून होते आहे. माध्यमे व बातम्यातून हिशोब चुकते होतील. पण कसोटीचा प्रसंग आला तेव्हा मग नैसर्गिक मित्राचा धावा करावा लागला, हेही विसरून चालत नाही. अर्थात त्यामुळे बिघडलेली युती पुन्हा सांधली गेलेली नाही आणि तिचे परिणाम पवार किंवा त्यांच्या राष्ट्रवादीला भोगावे लागत नाहीत, की लागणार नाहीत. देवेंद्र सरकार त्याचे परिणाम भोगते आहे. तेव्हा आशिष शेलार यांनी शेलारमामाच्या भूमिकेतून बाहेर पडावे आणि सेनेकडे दुर्लक्ष करायला शिकावे. प्रत्येक टिप्पणीला उत्तर देत बसले असते, तर बारा वर्षांनी मोदी पंतप्रधान पदावर झेपावू शकले नसते. मोदींच्या चहात्यांचे रुपांतर शहाभक्तांमध्ये होताना दिसते आहे, तोच भाजपासाठी सर्वात मोठा धोका आहे.


3 comments:

  1. महाराष्ट्रात भा ज प ला जो लोकाश्रय मिळाला आणि जी साथ मिळत आहे ही फक्त शिवसेना बरोबर आहे म्हनून, आणि हेच सत्य भाजपा विसरली आहे,

    ReplyDelete
  2. विचार करायला लावणारा लेख आहे . मांडलेल्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष्य करून चालणार नाही . सत्ता हि देशहितासाठी वापरावी , वैक्तिक हेवेदावे करत राहिलो तर परत काही खरा नही .

    भाऊ जरा शिवसेनेला अपेक्षित असलेल्या गणेशोत्सवाबद्दल जाणून घ्यायला आवडेल

    ReplyDelete
  3. भाजपाची अस्ताकडे वाटचाल

    ReplyDelete