Friday, July 24, 2015

चिदंबरम यांचे शब्द आठवावे भाजपावाल्यांनी



मागल्या आठवड्यात जे काही दहिसर प्रकरण घडले, त्यातले खरेखोटे काय, याचे खुलासे देण्यात भाजपावाले आपली शक्ती खर्ची घालत आहेत. त्यात गुजराती लोकांची मुंबईतील अरेरावी हा विषय अशा लोकांच्या डोक्यात शिरलेला दिसत नाही. या घटनेचा गवगवा झाल्यावर ज्या प्रतिक्रीया अनेक भागातून व प्रामुख्याने मराठी लोकात उमटल्या, त्याचा अर्थ समजून घेण्य़ाची गरज आहे. वास्तविक अशाच स्वरूपाची एक घटना (मिसबाह काद्री) दोन महिन्यांपुर्वी माध्यमांनी मुद्दाम हवा देवून गाजवण्याचा प्रयास केलेला होता. तुलनेने तितके महत्व दहिसरच्या बातमीला माध्यमांनी दिलेले नाही. पण उमटलेल्या प्रतिक्रीया गंभीर आहेत. कारण दहिसरची घटना नाममात्र आहे. खरे म्हणजे मागल्या वर्षभरात मुंबई परिसरातील गुजराती लोकांचे वागणे खटकण्यापर्यंत गेलेले होते. म्हणूनच त्या स्थानिक घटनेला इतके महत्व प्राप्त झाले. खरेखोटे वेगळे आणि त्याबाबतीत जनमानसात उमटणार्‍या प्रतिक्रीया वेगळ्या असतात. त्याला पुर्वग्रह कारणीभूत असतात. समजा दहिसरची घटना जशी कथन झाली अथवा भासवली गेली, तशी नसेल. पण त्या संदर्भाने उमटलेल्या प्रतिक्रीया खोट्या म्हणायच्या काय? दाट वस्तीच्या गुजराती भागात ज्या पद्धतीने आगावूपणा चालतो, त्यातून त्या प्रतिक्रीया उमटलेल्या आहेत. मराठी वा बिगरगुजराती मनातली धुसफ़ूस त्या निमीत्ताने उफ़ाळून बाहेर आली. तसे शेकडो व हजारो बिगरगुजराती अनुभव नसते, अर तितक्या प्रखर व उत्स्फ़ुर्त प्रतिक्रीया उमटल्याही नसत्या. पण त्या उमटल्या, याचा अर्थच मुंबई परिसरातील गुजराती लोकांची वागणूक जाचक झालेली आहे. त्याबाबतची नाराजी बाहेर पडायला फ़क्त निमीत्त हवे होते आणि दहिसरच्या घटनेने ते पुरवले आहे. तेव्हा तेवढ्या घटनेचा खरेखोटेपणा करीत बचाव मांडणे म्हणजे दुखावलेल्यांना आणखी मीठ चोळून चिथावणी देणे असते आणि ते नंतरच्या काळात महाग पडते.

स्पेट्रम घोटाळा, राष्ट्रकुल घोटाळा, आदर्श घोटाळा आणि पुढे कोळसाखाण घोटाळा पाठोपाठ बाहेर आलेली प्रकरणे होती. त्यात आधीच्या तीन घोटाळ्यांनी लोकमत फ़ार बिथरलेले होते. त्यातून जनमानसात शंका जागवली होती. कोळसा घोटाळा तर सुप्रिम कोर्टानेच हस्तक्षेप करून रोखला होता. त्यावर खुलासा द्ययला कॉग्रेसने अतिशय बुद्धीमान व वकीली भाषेत नेमके बोलणार्‍या अर्थमंत्री चिदंबरम यांना पुढे केलेले होते. त्यांनी काडीमात्र खोटे न बोलता शंभर टक्के सत्यच लोकांना सांगितले होते. कोळसा खाणवाटप वादग्रस्त असेल. पण घोटाळा कुठे झालाय? अजून एक किलो कोळसाही भूगर्भातून उत्खनन करून बाहेर काढला गेलेला नाही किंवा विकलाही गेलेला नाही. सगळा कोळसा जिथल्या तिथे भूगर्भात शाबुत आहे. मग घोटाळा कुठे झाला? चिदंबरम यांच्या विधानात शंभर टक्के सत्य आहे. पण सवाल कोळसा उकरून विकायचा नव्हता. त्या खाणवाटपात गैरप्रकार झाले होते. ज्यांचा खाण व्यवसायाशी काडीमात्र संबंध नाही त्यांना परवाने व अधिकार देण्यात आलेले होते. म्हणजे पुढे त्यांनी ते नुसते परवाने खर्‍या खाण व्यावसायिकांना विकायचे आणि कोळसा खणल्याशिवाय नुसत्या परवान्याच्या बळावर करोडो रुपये उकळायचे, अशी योजना होती. तिला कोर्टाच्या हस्तक्षेपाने पायबंद घातला गेला. लिलावाशिवाय परवाने दिले गेल्याने सरकारी तिजोरीत जमा होणारा रॉयल्टीचा पैसा खाजगी लोकांच्या खिशात जाणार होता, तो रोखला गेला. म्हणजेच कोळसा खणलेलाच नाही, हे सत्य असले तरी खाणवाटपाचे व्यवहार शुद्ध ठरत नाहीत. त्यामुळेच लोकांनी चिदंबरम यांचा खुलासा मानला नाही आणि त्याचे परिणाम सव्वा वर्षापुर्वी कॉग्रेसला देशभर भोगावे लागले होते. त्याला घटना वा प्रकरण कारणीभूत नव्हते, तर जनमानसातील तयार झालेली प्रतिमा कारण झाली होती.

लोकशाहीत जनमत असेच बनत असते आणि जसे त्याचे पुर्वग्रह होतात, तसे त्याचे मतात रुपांतर होत असते. मागल्या काही काळात मोदींच्या उदयामुळे मुंबईतील गुजराती लोकांच्या वागण्यात अरेरावी आलेली आहे आणि कुणाही बिगरगुजराती माणसाला ती सहज दिसू शकते. त्याचा पुर्वग्रह युती तोडण्याच्या राजकारणातून होत गेला. तसा झाला नसता, तर मुंबईत शिवसेनेला इतकी मते नक्कीच मिळाली नसती. युती तोडल्यापासून शिवसेनेने त्याच पुर्वग्रहाला मतांमध्ये परावर्तित करायचे राजकारण खेळले. किंबहूना मोदी-शहांना अफ़जलखानाची फ़ौज संबोधण्याचे प्रयोजन तेच होते. त्याची प्रादेशिक संकुचितपणा ठरवून भाजपा नेत्यांनी हेटाळणी केल्याने सेनेला अधिक लाभ होऊ शकला. तेव्हा सेनेसाठी मराठी मते पक्षाची तटबंदी झुगारून एकवटली होती, अन्यथा सेनेला इतक्या जागा मुंबईत स्वबळावर जिंकणे अशक्य होते. उलट भाजपाला एकहाती गुजराती मते मिळणार होती. त्यात सेनेच्या मराठीपणाला नाकारणारी अन्य भाषिक मतेही भाजपाकडे गेली. त्याचा भाजपालाही अधिक जागा जिंकायला लाभ झाला. तोटा कॉग्रेस व राष्ट्रवादीचा झाला. अन्यथा ही बिगरमराठी मते मोठ्या प्रमाणात कॉग्रेसच्या पारड्यात पडतात. ती आता माघारी फ़िरू लागल्याचे बांद्रा पुर्वेच्या पोटनिवडणूकीने सिद्ध केले. तसेच विरार वसई व नवी मुंबईच्या मतदानाने सिद्ध केलेले आहे. अशा मतदानाचा रोख भाजपाने समजून घेतला पाहिजे. सामान्य माणूस भाजपा आणि नरेंद्र मोदी यात फ़रक करतो. आजही पंतप्रधान पदाची लढत असेल, तर याच मुंबईतला बहुसंख्य मतदार मोदींनाच मते द्यायला पुढे येईल. पण त्याचा लाभ विधानसभेला जितका भाजपाने उठवला, तितका आता मिळू शकणार नाही. कारण मोदींच्या व शहांच्या राजकीय भूमिकेतला फ़रक लोकांना उमजू लागला आहे आणि त्याचे प्रत्यंतर पालिका व जिल्हा निवडणूकीतून आलेले आहे.

दहिसरच्या निमीत्ताने हा बेबनाव प्रकर्षाने पुढे आला. खरे तर अशावेळी भाजपाने त्यात पक्षीय भूमिकेतून उतरणे चुकीचे आहे. कारण जितका बचाव करायला जाल तितका हा पक्ष गुजराती अरेरावीचे समर्थन करतो, असा पुर्वग्रह व्हायला हातभार लागणार आहे. किंबहूना लागलेला आहे. म्हणूनच माध्यमांनी त्याला फ़ारसे स्थान दिले नाही, तरी सोशल माध्यमातून उमटलेला प्रक्षोभ अधिक घातक आहे. ज्यांना त्यामागचा रोष वा राग समजून घ्यायचा आहे, त्यांनी मुद्दाम उपनगरी रेल्वेतून मुलुंड, घाटकोपर वा पार्ले बोरीवली अशा स्थानकातले वातावरण अनुभवून यावे. मग इतक्या मोठ्या प्रमाणात प्रक्षोभाचे कारण लक्षात येऊ शकेल. वास्तविक तिथे गुजराती जसे वागतात वा अरेरावी करतात, त्याचा भाजपाचे धोरण वा राजकारणाशी काहीही संबंध नाही. भाजपाने त्यांना तसे वागायची मुभा दिलेली नाही की प्रोत्साहनही दिलेले नाही. शिवाय ते वागणे महाराष्ट्रात अन्यत्र वसलेल्या गुजरात्यांमध्येही आढळून येत नाही. मग त्याची जबाबदारी भाजपाने घेण्याचे कारणच काय? भाजपाच्या यशापुर्वीही हे लोक असेच वागत होते. पण इतक्या आक्रमकपणे वागत नव्हते. म्हणूनच त्याचा मोदींच्या पंतप्रधान पदाशी काडीमात्र संबंध नाही. पण भाजपावाले जो पोरकट खुलासा अशा बाबतीत करतात, त्यातून मात्र हा आरोप भाजपा व मोदींना चिकटायला अकारण हातभार लागतो आहे. मग शिवसेना राजकारणासाठी त्याचा वापर करीत असेल, तर दोष कुणाचा? युती तुटल्यापासून सेनेला अशा निमीत्ताचा शोध होता व आहे. तेही राजकारणात साधूसंत म्हणून अवतरलेले नाहीत. तुंबलेल्या मुंबईचा चावा आशिष शेलार घेत असतील, तर सेनाही अशी संधी कशाला सोडणार? त्यावर चिदंबरम स्टाईलचे तपशीलवार खुलासे उपयुक्त नसून अंगलट येणारे आहेत. कारण अशा बचावामुळे मुळचे अरेरावी करणारे अधिक शेफ़ारतील आणि परिणाम मात्र भाजपाला भोगावे लागणार आहेत. म्हणूनच असे खुलासे देण्यापेक्षा विरार वसई व नव्या मुंबईच्या मतदानाचे बारकाईने परिशीलन करणे योग्य ठरेल. अन्यथा ते मोदींचे दुर्दैव म्हणावे लागेल. कारण बाहेर कोणी त्यांना हरवू शकणार नाही इतकी छान राजकीय परिस्थिती असताना, पक्षातलेच असे उथळ, उतावळेच मोदींना मिळालेल्या सदिच्छा मातीमोल करायला पुरेसे आहेत.

No comments:

Post a Comment