Tuesday, July 21, 2015

माननिय शरद पवार यांना अनावृत्त पत्र



माननिय शरदरावजी पवार यांच्या सेवेशी,

बुधवारच्या वर्तमानपत्रात आपण मुख्यमंत्र्यांना लिहीलेले पत्र वाचले आणि वात्रटिकाकार रामदास फ़ुटाणे यांचे स्मरण झाले. श्रीयुत फ़ुटाणे आपले चहाते म्हणून ओळखले जातात. पण आम्ही त्यांना वात्रट समजण्याची घोडचुक केली होती. अर्थात त्याला खुद्द फ़ुटाणेच जबाबदार आहेत. कारण त्यांनीच कायम आपल्या नावामागे वात्रटिकाकार अशी बिरूदावली मिरवलेली आहे. त्यामुळे आमच्यासारखे बहुतांश लोक त्यांना वात्रट समजून कधी गंभीरपणे त्यांच्याकडे पाहू शकले नाहीत. पण वास्तवात त्यांच्या तथाकथित वात्रटिका म्हणजेच पुरोगामी वेदमंत्र असल्याचे आपल्या पत्रामुळे लक्षात येऊ शकले. आपण देवेंद्र या तरूण मुख्यमंत्र्याला तसा दृष्टांत दिल्याबद्दल तुमचे खरे तर त्यांनी आभारच मानायला हवेत. आगामी राज्यकारभार चालवताना फ़डणवीस सरकार कुठल्याही घटनात्मक व कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करण्यापेक्षा आधी फ़ुटाण्य़ांच्या वात्रटिकांचा सखोल अभ्यास करतील अशी खात्री वाटते. हा फ़ुटाणे मध्येच कुठून आणला, अशी आपल्या मनात शंका येऊ नये म्हणून थोडे विस्ताराने सांगणे भाग आहे. फ़ुटाणे त्यांच्या एका वात्रटिकेने लोकाच्या अधिक लक्षात राहिले, ती म्हणजे पाठ्यपुस्तकातील शपथेवर केलेल्या भाष्यामुळे. ‘भारत हा माझा देश आहे आणि सर्व भारतीय माझे बांधव आहेत’, अशी ती शपथ आहे. त्यावर भाष्य करताना फ़ुटाणे म्हणतात, ‘भारत हा कधीकधी माझा देश आहे’. देशाचा वा महाराष्ट्राचा कारभार करताना तोच निकष असल्याचे आपण देवेंद्रना पत्र पाठवून कळवले नाहीत का? महाराष्ट्र हा कधीमधी शाहु, फ़ुले, आंबेडकरांचा असतो आणि अन्य प्रसंगी तो भलत्याच कुणाचा तरी महाराष्ट्र असतो, असाच आपल्या पत्राचा गोषवारा नाही का?

आपल्याला दंडवत घालणे प्रशस्त वाटत नाही. उभ्या महाराष्ट्रात कोण आपल्यापुढे नतमस्तक होत नाही? मागल्या चार दशकातले राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून आपल्याला मान्यता असल्याने आपले शब्द व मार्गदर्शन खुद्द देशाचे नवे पंतप्रधानच घेत असतात. म्हणूनच आपण जे काही बोलता वा सांगता, त्याकडे गंभीरपणे बघणे भाग आहे. किंबहूना आपण मार्गदर्शन केले नाही तर राज्याचे व देशाचे फ़ार मोठे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊनच, आपण वेळोवेळी संबंधितांना त्यांच्या कर्तव्याची जाणिव करून देत असता, याची पुर्ण कल्पना आहे. अन्यथा आपण नवखे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांना पत्र कशाला लिहीले असते? कदाचित महाराष्ट्र हा शाहू फ़ुले आंबेडकरांचा असल्याचे फ़डणवीसांना ठाऊक नसल्याने आपण त्यांना समजावण्याचे काम केलेले असावे. तेही योग्यच आहे. कारण महाराष्ट्र कधी शाहू फ़ुले आंबेडकरांचा असतो आणि कधी तो अशा विभूतींचा नसतो, याबद्दल आपल्या इतकी जाण कदाचित अन्य कोणालाच नसावी. अन्यथा आपण आजच असे पत्र कशाला लिहीले असते? सध्या महाराष्ट्र फ़ुले आंबेडकरांचा आहे किंवा नाही, यानुसारच सरकारचा कारभार चालायला हवा असेल, तर वेळोवेळी ते सांगणारा कोणीतरी हवाच ना? तसे नसते तर असेच पत्र आपण डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाल्यावर तात्काळ तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लिहीलेच असते. पण बहुधा तेव्हा दोन वर्षापुर्वी ऑगस्ट २०१३ मध्ये महाराष्ट्र शाहू फ़ुले आंबेडकरांचा नसावा. असताच तर असेच पत्र चव्हाण यांना पाठवण्यात आपण कशाला हलगर्जीपणा केला असता? तेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याही बाबतीत म्हणता येईल. त्याही वेळेस आजचेच मुख्यमंत्री सत्तेत होते. पण महाराष्ट्र तेव्हाही बहुधा शाहू फ़ुले आंबेडकरांचा नव्हता. म्हणून आपण पत्र लिहीण्याचा उतावळेपणा केलेला नसावा. त्यासाठी आपण दाखवलेला संयम वाखाणण्याजोगा आहे.

कदाचित आमच्या अल्पमतीला यातला फ़रक समजत नसावा. पानसरे किंवा दाभोळकर भले पुरोगामी विचाराचे असतील आणि अत्यंत संयमी पद्धतीने आपले विचार मांडत असतील. पण त्यांची हत्या होऊनही आपल्याला पत्र लिहीण्याइतकी परिस्थिती गंभीर वाटली नव्हती. तितकी आज आपले पुत्रतुल्य जितेंद्र आव्हाड यांना नुसत्या धमक्या आल्यावर परिस्थिती चिंताजनक झालेली आहे. म्हणून आपण तातडी दाखवून देवेंद्रना पत्र लिहीले असणार. त्याचेही कारण समजून घ्यायचा आम्ही प्रयास करीत आहोत. आव्हाड त्यासाठी उंच उंच हंड्या उभारतात आणि त्यातून पुरोगामी विचार मांडण्याचे कष्ट घेतात, हे उमजण्यासाठी आवश्यक असलेली बारा-मती आमच्यापाशी नाही, त्याचा हा परिणाम. दाभोळकर वा पानसरे यांनी कधी अशा उंच हंड्या बांधल्या नाहीत किंवा त्याचे समारंभ थाटामाटात पार पाडण्यासाठी अभिनेते व कलावंताचा मेळा भरवला नाही. त्यांना पुरोगामी विचार मांडण्याची कला आत्मसात करता आलेली नसावी. शाहू फ़ुले आंबेडकरांच्या विचारांत दहीहंडी खेळणे, त्याच्या स्पर्धा योजणे वा त्यावर करोडो रुपयांचा चुराडा करणे; याच्या महत्तेचा थांगपत्ता पानसरे दाभोळकरांना लागला नव्हता. सहाजिकच ते पुरोगामी असले तरी त्यांच्या हत्येने बहुधा पुरोगामी विचार मागे पडण्याचे भय आपल्याला जाणवले नसावे. मग आपण त्यासाठी पत्र लिहीण्याचे कष्ट कशाला घेणार? पण ज्यांच्या खात्यात उंच दहीहंडी व करोडो रुपयांची बक्षीसे ठेवण्याचे कर्तृत्व जमा आहे, त्यांना नुसत्या धमक्या आल्याने आपण इतके हळवे व घायाळ झालात. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांना व उभ्या महाराष्ट्राला पुरोगामी विचार कसे कमीअधिक दर्जाचे असतात, ते समजू शकले. दाभोळकर पानसरे यांच्यापेक्षाही जितेंद्र आव्हाड हे किती अधिक प्रभावी पुरोगामी आहेत, त्याचा साक्षात्कार व्हायला मदत झालेली आहे. अन्यथा बहुतांश पुरोगामी मंडळी दहीहंडी म्हणजे पोरकट धार्मिक थोतांड समजून बसली होती.

शाहू फ़ुले आंबेडकराच्या महाराष्ट्रातच खैरलांजी वा जवखेडे नावाची गावे आहेत काहो शरदराव? कारण तिथे दलितांच्या अतिशय क्रुर हत्या झाल्या. त्यांना जिवानिशी मारणारे आणि त्यावर पांघरूण घालणारे कोणी पुरोगामी विचाराने प्रवृत्त होऊन इतके हिडीस कृत्य करीत होते काय? अवघ्या दलित समाजात त्यामुळे संतापाची लाट उठली होती आणि जागोजागी निदर्शने व रास्ता-रोको झालेला होता. पण तेव्हा आपल्याला दोन शब्द लिहून फ़ुले आंबेडकरांचे स्मरण करायची बुद्धी झालेली नव्हती. याचा एकच अर्थ निघू शकतो, की जवखेडा व खैरलांजी ही गावे पुरोगामी महाराष्ट्रातली नसावीत. किंवा तिथे झालेली हत्याकांडे पुरोगामी पराक्रम असावा. आव्हाडना मिळालेल्या धमक्यांपेक्षा तिथे मारले गेलेले सामान्य जीव नगण्य किंमतीचे असावेत. की आपल्याला अभिप्रेत असलेल्या शाहू फ़ुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात असे खेड्यापाड्यातले दलित पुरोगामीत्वाची किंमत आपल्या हत्येतून मोजायलाच जन्माला येतात असे म्हणायचे? कारण त्यांच्या हत्या, विटंबना व अत्याचार होऊन दिर्घकाळ उलटून गेला आहे. पण चार ओळीचे पत्र कुठल्या मंत्र्याला वा मुख्यमंत्र्याला लिहायची इच्छा आपल्याला झाल्याचे कुणाला दिसले नाही, शरदराव? म्हणून तर वाटते की हा महाराष्ट्र कायम स्वरूपी म्हणजे बारा महिने तेरा काळ पुरोगामी नसावा. कधी अधुनमधून तो पुरोगामी व अकस्मात कधीतरी प्रतिगामी असावा. त्यात मुहूर्त शोधून पुरोगामी काळात कार्यभार उरकला पाहिजे काय? पानसरे दाभोळकर यांच्या हत्या चुकीच्या ग्रहकाळात झाल्या काय? जवखेडा व खैरलांजीच्या घटना पुरोगामी ग्रह वक्री असताना झालेल्या होत्या काय? की त्या अत्याचार हत्याकांडे घडताना महाराष्ट्र पुरोगामी नव्हता? पुरोगामी व प्रतिगामी ह्या गोष्टी सोयीनुसार बदलणार्‍या असतात काय शरदराव? जरा उलगडून स्पष्ट शब्दात एकदा लोकांना समजावून सांगाल का?

बरे पुरोगामी प्रतिगामी बाजुला ठेवूया,. धमकी या शब्दाचा अर्थ तरी कसा घ्यायचा? कोणीतरी आव्हाडांना चार शब्दांचा इशारा दिला, मग त्याला धमकी म्हणायचे? तर मध्यंतरी सर्व वाहिन्यांवर खुद्द जितेंद्र आव्हाड ठाण्यातल्या पोलिस वरीष्ठांना जे प्रेमाने समजावताना दिसत होते, त्याला धमकी म्हणायचे की कसे? मुंब्रा कळवा भागातल्या अनधिकृत बांधकामांना पाडायला जे सरकारी पथक गेले होते, त्याला संरक्षण देणार्‍या पोलिसांना आव्हाड काय समजावत होते? ‘तुम़ची नोकरी घालवू शकतो’ हेच शब्द होते ना? वाहिन्यांवर ते शब्द स्पष्टपणे ऐकू येत होते आणि त्यातली धमकी जगाला ऐकू आली. मग आपले कान का ऐकू शकले नाहीत? आपण त्याबद्दल आव्हाडांना चार खडे बोल ऐकवले आहेत का? नसतील तर काही कारण असेलच ना? बहुधा आव्हाड पोलिसांना शाहू फ़ुले आंबेडकरांचे विचार समजावत असतील ना? आपणच तर मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात म्हणता, आव्हाड महाराष्ट्रात पुरोगामी विचार प्रसाराचे काम करतात. त्याचे प्रात्यक्षिक पोलिसांच्या नोकर्‍या घालवण्याच्या धमकीतून मिळू शकते. पोलिसांनाच धमकी देण्यापर्यंत ज्याची मजल जाते, तो किती शांततावादी माणूस असेल ना? असे काम कधी दाभोळकर पानसरेंना जमले नाही. म्हणून तर आपण त्यांची हत्या होऊनही विचलीत झाला नाहीत, की पत्र लिहीण्याचा प्रपंच केला नाहीत. बहुधा आपल्याला आव्हांडांच्या कामातून शाहू फ़ुले आंबेडकरांचे पुरोगामी विचार अवगत झाले असावेत. जे कधी पानसरे वा तत्सम कार्यकर्त्यांना ऐकायलाही मिळाले नाहीत. अन्यथा त्यांनी हकनाक नुसत्या चर्चा भाषणात कालापव्यय करण्यापेक्षा आव्हाडांप्रमाणेच पुरोगामी दहीहंड्या बांधून किती महान कार्य केले असते ना? जरा सविस्तर लिहा शरदराव. शक्य झाल्यास आव्हाडांची वाहिन्यांवर प्रक्षेपण करून पुरोगामीत्वाची व्याख्याने व प्रवचने जारी करा. वेगाने महाराष्ट्र पुरोगामी होईल आणि दाभोळकर पानसरे यांच्या अनुयायांसहीत जवखेडा खैरलांजीच्या अन्यायाला न्याय मिळवू बघणारेही आव्हाडांच्या नेतृत्वाखाली क्रांतीची ध्वजा उंच फ़डकवू लागतील. जरा महाराष्ट्र कधी पुरोगामी व शाहू फ़ुले आंबेडकरांचा असतो व नसतो त्याचे पंचांगही बनवायचे काम त्वरेने हाती घ्यावे. ही आग्रहाची विनंती.

19 comments:

 1. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
 2. Ha ha ha ....jyanni he patra lihila ahe tyanni ka nahi lihili asa patara cm la ya adhi asa patra jas ataa lihila ka yaadhi mood navata tyanchaa...

  ReplyDelete
 3. आव्हाड आगदी पहिलीतल्या मुलासारखे बोलतात.
  खेळातला (राजकारणातला) कच्चा लिंबू समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अतिउत्तम.
  गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजींच्या नखाची जरी सर आव्हाडांना आली असती तरी त्यांच जीवन पावन झाल असत.
  हल्ली यांच्यासारखी प्यादी राजकारणाच्या सारीपाटावर मातांच राजकारण करण्यासाठी वापरली जातात.

  ReplyDelete
 4. Abhijit KulkarniJuly 22, 2015 at 9:29 AM

  Khup sunder!!!

  ReplyDelete
 5. छान लिहीलेत भाऊ, पण हे कधीच सुधारणार नाहीत, अगदी पालथ्या घड्यावरचे पाणी. असले नेते या महाराष्ट्राला लाभावेत हे तुमचे आमचे दुर्दैव.

  धन्यवाद.

  विनोद

  ReplyDelete
 6. One of d Masterpiece (or shud I say 'Master stroke'?) By Hon.Bhau Torsekar.

  ReplyDelete
 7. Khoop Chan Bhau.

  ReplyDelete
 8. भाऊ, आपला जागता पहारा कितीही कडक ठेवलात तरी कधी आणि किती शांत बसायचे हे पुरोगामी उत्तम जाणतात. आपण वेळ अचूक(?) साधलीत. सगळ्या लक्षवेधी घटना एकत्र मांडण्याचा प्रयत्न केलात मात्र विचारांच्या संघर्षात धमक्या देणे किंवा हत्या घडवणे हे कितपत उचित ठरते ? असो, आपल्या लेखणीला वेळप्रसंगी जाब विचारण्याचा अधिकार आहे पण त्यामुळे पवारसाहेबांचे पत्र काळजीपूर्वक वाचणाऱ्या मुख्यमंत्री देवेन्द्रांचे लक्ष विचलित होण्याची शक्यता अधिक आहे आपण एकत्रित मांडलेल्या लक्षवेधी घटनांचे त्यांना पुन्हा विश्लेषण, वर्गवारी करून गांभीर्याने लक्ष घालावे लागेल. शेवटी काय देवांचे इंद्र असोत किवा जातीचे इंद्र असोत . लहान मुखी मोठा घास घेतला असावा तर, शब्द, मजकूर चुकला असल्यास विशाल अंतकरणाने माफ करावे, आपण ज्येष्ठ विचारवंत आहात, आपला अधिकार आहे.

  ReplyDelete
 9. मी शेअर करू शकतो का ?

  ReplyDelete
 10. यालाच म्हणतात निर्भिङ पत्रकार आणी हे भाऊ सारखे लोकच करु शकतात

  ReplyDelete
 11. भाऊ एकदम perfect hats off

  ReplyDelete
 12. गोवर्‍या मसणात गेल्यात तरी सत्तेची हाव सुटत नाही त्याची..... शरद पवार हा कुटील कारस्थानी हलकट माणूस असून तो मरे पर्यंत देशाचे भले होणार नाही. त्याच्या कुटील कारस्थानांचा मी वैयक्तिक पातळीवर अनुभव घेतलेला आहे. त्या मुळे मला तरी पुराव्यांची गरज नाही.

  ReplyDelete
 13. He ata Avadana parmar suiside case madhye adaklelya Najib mullane transfer kelelyac1.7 cr pasun vachavne chalu ahe

  ReplyDelete
 14. Sharad Pawar is not `Purogami', he is `powergami'.It means following the path which leads to power or say chair.

  ReplyDelete