Thursday, July 2, 2015

गडबडीचे मुद्दे आणि अनुत्तरीत प्रश्न



+ ललित मोदी भारतीयांना ठाऊक झाला तो आयपीएलमुळे.
+ आयपीएल म्हणजे इंडियन प्रिमीयर लीग.
+ शरद पवार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष असताना ही स्पर्धा किंवा तिचा तमाशा सुरू झाला.
+ तेव्हा अत्यंत विश्वासू किंवा निकटवर्ति म्हणून पवारांच्याच आशीर्वादाने ललितची आयपीएल कमिशनर म्हणून नियुक्ती होऊ शकली.
+ २००८ ची स्पर्धा गाजली आणि २००९ मध्ये लोकांना उत्सुकता असतानाही इथे भारतात ती स्पर्धा खेळली जाऊ शकली नाही. कारण लोकसभा निवडणूका असल्याने स्पर्धेला सुरक्षा पुरवण्यास गृहमंत्री चिदंबरम यांनी असमर्थता व्यक्त केली होती.
+ विनविलंब ललित मोदीने दक्षिण आफ़्रिकेत संपुर्ण स्पर्धा घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथेही धंद्यासह स्पर्धा यशस्वी करून दाखवली होती.
+ २०१० मध्ये भारतात व्हायच्या स्पर्धेत काही गोंधळ झाला आणि ललित मोदीचे ‘बुरे दिन’ सुरू झाले. स्पर्धेचा अंतिम सामना संपला, त्याच रात्री त्याची कमिशनर पदावरून उचलबांगडी झाली.
+ त्यानंतर त्याच्यामागे सक्तवसुली संचालनायलाचा ससेमिरा लागला. केंद्रात वजनदार मंत्री असूनही पवारांनी ललितला वाचवले नाही. किंबहूना त्याच्या उचलबांगडीमागे पवारच होते असे मानले गेले.
+ स्पर्धेत आणखी दोन संघांचा समावेश करायचे ठरले, त्यात पुणे व कोची होते. त्यापैकी कोची संघाच्या मालकीचा गौप्यस्फ़ोट होऊन त्यात सुनंदा पुष्कर हे नाव पुढे आले.
+ सुनंदा ही केंद्रिय मंत्री शशी थरूर यांची पत्नी होती आणि त्यांना आयपीएलमुळे राजिनामा द्यावा लागला.
+ आयपीएलच्या यशामुळे ललितच्या मागे दाऊद टोळीचा ससेमिरा लागला होता. त्यातच सक्तवसुली संचालनालयाने वक्रदृष्टी केल्यावर ललितचे पोलिस संरक्षण काढून घेण्याचा प्रयास झाला.
+ मग जीवाच्या भयाने ललितने भारतातून पळ काढला. त्याला जीवाचे भय असल्यामुळे ब्रिटीश कोर्टाने लंडनमध्ये आश्रय देण्याची विनंती मान्य केली.
+ त्या कोर्टाला ते पटवण्यासाठी ज्यांच्या साक्षी विचारात घेतल्या गेल्या, त्यात मुख्यमंत्री वसुंधरा व प्रभू चावला या पत्रकारासह अनेकांचा समावेश आहे.
+ मुंबईचे तात्कालीन ज्येष्ठ पोलिस अधिकारी राकेश मारियांनी सुद्धा ललितला दाऊद टोळीच्या धमक्या असल्याची साक्ष दिलेली आहे.
+ सध्या ललित मोदीवर इतका गाजावाजा होत असतानाही त्याला ‘नावारुपाला’ आणणारे शरद पवार त्याबाबत अवाक्षर बोललेले नाहीत.
+ पाच महिन्यापुर्वी फ़ेब्रुवारी महिन्यात बारामती येथील एका समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली. तेव्हा लोकांच्या भुवया ताणल्या गेल्या होत्या. पण आज ललित प्रकरण गाजत असताना मोदी-पवार अशा दोघांचे ‘संयुक्तीक’ मौन नवलाई नाही काय?
+ युपीए सरकारच्या काळात ललितवर सक्तवसुली खात्याने बडगा उगारला होता. पण कुठलीही कारवाई केली नाही. आज त्याला भगोडा म्हणायला प्रत्येक कॉग्रेस प्रवक्ता उतावळा आहे. पण मग त्यांच्याच सरकारने २०१० ते २०१४ इतक्या चार वर्षात ललितला भारतात आणण्यासाठी काहीच हालचाली कशाला केल्या नाहीत?
+ विरोधी नेता असताना वा परराष्ट्रमंत्री असताना सुषमा स्वराज यांनी ललितला मदत केल्याचा आक्षेप ग्राह्य धरला, तरी चार वर्षे त्याच्यावर कुठलीच कठोर कारवाई होण्यात टाळाटाळ युपीए सरकार कोणाच्या इशार्‍यावर करत राहिले?
+ युपीए सरकार सोनियांच्या तालावर नाचत होते. त्यांच्याच भगिनीशी संपर्क साधून भानगड मिटावता येईल, असा सल्ला वरूण गांधींनी ललितला दिल्याचे त्याने ट्वीट केले आहे.
+ ललितवर आर्थिक घोटाळ्याची कारवाई हा युपीएचा अजेंडा होता. त्यांनी त्यावर कुठली कारवाई चार वर्षे होऊ दिली नाही. मग त्यासाठी आता मोदी वा एनडीए सरकारवर दबाव कशाला? सौदा करायची ‘भगिनी’ला असलेली शक्ती संपल्यामुळे कॉग्रेसला घाई झाली आहे काय?
+ याच प्रकारे आंध्रातील कॉग्रेस नेता व माजी मुख्यमंत्री राजशेखर रेड्डींचा पुत्र जगमोहन रेड्डी याला सक्तवसुली खात्याने दिर्घकाळ तुरूंगात डांबून खटल्यांचे नाटक रंगवले होते. पुढे काय झाले? त्या खटल्यांचा कुठला निकाल लागू शकला आहे?
+ जगमोहन रेड्डी व ललित मोदी यांच्यावर बेहिशोबी मालमत्तेचे सारखेच आरोप असावेत आणि दोघेही सोनियांच्य मर्जीतून उतरलेले व्यक्ती असावेत, हा योगयोग मानता येईल काय?
+ जगमोहनला तुरूंगात डांबून त्याचा पासपोर्ट जप्त करण्यापर्यंत ज्या काळात मजल मारली गेली, त्याच कालावधीत ललित प्रकरण चिघळले होते. मग पळून जाण्याआधी त्यालाही तुरूंगात डांबण्यात हयगय कशाला झाली? इटालीतल्या बहिणीशी संपर्क साधण्याची सवड मिळावी म्हणून का?
+ ललित गुन्हेगार होता, तर त्याच्या विरोधात जगमोहनप्रमाणे खटले कशाला दाखल होऊ शकले नाहीत? इंटरपोल मार्फ़त त्याला मायदेशी फ़रफ़टत आणायची काही हालचाल युपीएच्या चार वर्षात कशाला होऊ नये? की त्याचे विशेषाधिकार इटालीतल्या भगिनीला दिलेले होते?
+ करोडो रुपये किंमत मोजून संघाची खरेदी व स्पर्धेवर खर्च करणार्‍या संघमालकांना धमक्या देण्याऐवजी दाऊद टोळी सर्व अधिकार गमावलेल्या ललितला कशाला धमक्या देते? त्या धमक्यांचा बोलविता धनी कोण आहे?
+ ३६० कोटी जर भगिनी ‘मांडवली’साठी मागत असेल, तर आयपीएल हा किती अब्जावधी कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीचा खेळ आहे? तीन वर्षात बाजूला सारलेल्या ललितकडे इतकी खंडणी मागितली जात असेल, तर हडपलेल्या पैशाचा आकडा किती मोठा असेल?
+ ललितच्या काळात हेराफ़ेरी झाली, तर नंतरच्या चार वर्षातल्या स्पर्धा व त्यातली उलाढाल शुभ्र पांढर्‍या पैशाने झाली, असे कोणाला म्हणायचे आहे काय?
+ ललित मोदी हा गळाला लागलेला मासा आहे, की गळाला मोठमोठे मासे लागवेत म्हणून डकवलेले आमिष आहे?
+ ललितने अकस्मात पुढे केलेली सोनियांची इटालीतली ही भगिनी कोण? तिचे नाव काय? आजवर तिचा कुठेच कसा उल्लेख आलेला नाही?

+++ किती म्हणून अनुत्तरीत प्रश्न व मुद्दे आहेत ना? मागल्या दोन आठवड्यापासून ललित आख्यान रंगलेले आहे. पण त्यात अशा किती गंभीर प्रश्नांचे उत्तर मिळाले आहे? किती विषयांना बगल देण्यात आलेली आहे? काय उघड करण्याचा आटापिटा चालू असताना, काय झाकण्याची तारांबळ चालू आहे? कोण आहे नाटकाचा पटकथाकार? कुछ तो गडबड है भय्या. +++

3 comments:

  1. भाऊराव,

    मध्यंतरी पररीकरांनी अतिशय समर्पक विधान केलं होतं. दहशतवाद्यांचा काटा दहशतवाद्यांचीच मदत घेऊन काढता येतो. असा काहीसा अर्थ होता. या विधानाची रंगीत तालीम तर चालू नाहीये? फक्त दहशतवाद्याच्या जागी भ्रष्टाचाऱ्याचं नाव टाका.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  2. ललीत मोदी न समजनार कोड

    ReplyDelete