Tuesday, July 7, 2015

मोदींच्या सेल्फ़ी विथ डॉटरची ‘श्रॄती’का



मतभिन्नता आणि हेटाळणी यात फ़रक असतो. नरेंद्र मोदी हा माणूस या देशातील तथाकथीत उदारमतवाद्यांना कधीच आवडला नाही. आवडणे दूरची गोष्ट, ज्याला प्रत्येक संधी साधून संपवायला कुठल्याही थराला जायचे ज्यांनी मागेपुढे बघितले नाही, अशांना मोदी विरोधक म्हणून ओळखले जाते. मग त्यात जसे विविध पक्षातले राजकारणी आहेत, तसेच बुद्धीवाद म्हणूनही मोदींचा द्वेष करणारे समाविष्ट आहेत. इतक्या लोकांनी आपापली सर्व साधने पणाला लावून त्याला खच्ची करण्याची मोहिम चालविल्यानंतरही त्यानेच बाजी मारली असेल, तर ही वस्तुस्थिती अशा लोकांच्या गळी उतरणे अवघडच नाही का? सहाजिकच मोदींना उमेदवार होण्यापासून निवडणूकीत उतरण्यापर्यंत झालेला कडवा विरोध समजून घेण्यासारखा होता. पण आता निकाल येऊन एक वर्ष लोटले आहे आणि तोच नकोसा माणूस देशाचा पंतप्रधान म्हणून बहुमतासह विराजमान झालेला आहे. मात्र हे वास्तव कित्येकांना अजूनही पचनी पडलेले नाही. त्याचे प्रतिबिंब मग त्यांच्या आताच्याही विधाने व कृतीमध्ये दिसत असते. नावडता असला मग त्याची कुठलीही कृती चुकच असते. मोदी तरी या नियमाला अपवाद कसे असतील? ज्यांना मोदी पंतप्रधान झालेला सहन करणेच अशक्य आहे, त्यांनी मोदींच्या कुठल्याही कृतीचे समर्थन कसे करावे? त्यातली गुणवत्ता बघण्यापेक्षा त्यांना त्यातल्या चुका दिसल्या तर नवल कुठले? मग विषय डिजीटल इंडीयाचा असो किंवा सेल्फ़ी विथ डॉटरचा असो. त्यातून काहीच कसे साधले जाणार नाही अशी जपमाळ ओढली जाणारच. म्हणूनच मग सेल्फ़ी बाबत इतके काहूर माजले आहे. मात्र मोदींवर असे कुठल्याही थराला जाऊन आक्षेप घेणार्‍यांच्या बाबतीत अन्य लोकांनी संयम पाळून सभ्यपणे प्रतिक्रीया दिल्या पाहिजेत असा आग्रह आहे. अन्यथा कुणा श्रृती नामक अभिनेत्रीला इतकी प्रसिद्धी कशाला मिळाली असती?

मोदींचे विरोधक आहेत तसेच त्यांचे भक्तही आहेत. जेव्हा मोदींवर टिका होते, तेव्हा त्यांचे भक्त अंगावर धावून गेल्यासारख्या प्रतिक्रीया देत असतात. मग त्या भक्तांचे कृत्य म्हणजे मोदींचेच पाप म्हणून पुन्हा ओरडा सुरू होतो. कविता कृष्णन या महिलेले अश्लाघ्य पातळीवर जाऊन मोदींवर दोषारोप केले. त्याबद्दल माध्यमात बातम्या आल्या. पण चर्चा कुठे झाली नाही. पण श्रॄती नामक अभिनेत्रीवर तशाच अश्लाघ्य भाषेत प्रतिक्रीया आल्यावर चर्चेला ऊत आला. श्रॄतीवर प्रतिक्रीया आल्या त्याचे कोणी समर्थन करणार नाही. पण ज्या देशात कविता कृष्णनसारख्या बुद्धीजिवी महिला खालच्या थराला जात असतील, तर खालच्याच थरावर बौदधीक जीवन कंठणार्‍यांकडून कुठली उच्चपातळी अपेक्षित असू शकते? ज्यांनी श्रृतीवर घाणेरड्या प्रतिक्रीया दिल्या, त्यांची गणना बुद्धीजिवी गटात होत नाही. त्यांना कोणी कविता कृष्णनप्रमाणे टिव्हीच्या चर्चेत आमंत्रित करीत नाही वा त्यांच्या मताला प्रसिद्धी देत नाही. ज्यांची मते वा प्रतिक्रीया इतक्या दुर्लक्षणिय असतात, त्यांची नेमक्या अशावेळीच कशी दखल घेतली जाते? खरे तर श्रृतीवरल्या प्रतिक्रीयांसाठी कविताला जबाबदार धरायला हवे. कारण तिनेच किती खालच्या थराला जाता येईल त्याचे मार्गदर्शन केलेले होते. बाकीच्यांनी श्रृतीच्या बाबतीत कविताचे अनुकरण केले. पण मुद्दा असा, की श्रृतीचे जे पांडित्य आहे त्यात तरी नवे काय आहे? सेल्फ़ीने मुलींना सुरक्षा मिळणार नाही हे खरे असले, तरी अमिर खानच्या सत्यमेव जयतेनंतरही काहीच साधले गेलेले नाही. मग नुसत्या घोषणा व मालिकेसाठी आमिर खानचे तेव्हा सार्वत्रिक कौतुक कशाला चालले होते? तेव्हा श्रृतीने त्याच समव्यावसायिक आमिरबद्दल अशी प्रतिक्रीया व्यक्त केली होती काय? नसेल तर तिचे आजचे पांडित्य निव्वळ भंपकपणा नाही काय? प्रसिद्धीची केविलवाणी धडपड नाही काय?

पंतप्रधान वा मोठमोठ्या नेत्यांनी आजवर शेकडो घोषणा केल्या व जनतेला शेकडो आवाहने केलेली आहेत. त्यातून तरी काय साधले? श्रृतीच्या जन्मापुर्वी या देशामध्ये भूदान नावाची एक चळवळ झाली. विनोबा भावे नावाचे साधूवृत्तीचे गांधीवादी त्यासाठी पायपीट करीत देशभर फ़िरले. हजारोच नव्हे तर लाखो लोकांनी जमिनदारांनी आपली कोट्यवधी एकर जमिन विनोबाजींना दान म्हणून देऊन टाकली. ‘सब भूमी गोपालकी’ अशी घोषणा करीत विनोबा देशभर फ़िरले. त्यामुळे भूमीसुधार होऊ शकला काय? किती अशी जमीन गरीबांना भूमीहिनांना मिळाली? गावोगावी जमिनदार विनोबांना जमिनी दान करत होते आणि विनोबा घेत होते. आज पंतप्रधानांना लाखो लोकांनी सेल्फ़ीचे फ़ोटो पाठवले, तसेच तेव्हा लाखो लोकांनी जमिनी विनोबांना दिल्या होत्या. म्हणून गरीबाला जमिन मिळाली नव्हती. तर विनोबांना काय म्हणावे? श्रृती तेव्हाच्या पिढीत असती तर तिने विनोबांनाही मुर्खातच काढले असते ना? तेव्हाचे सोडून द्या. आज इतकी वर्षे उलटून गेल्यावर कोणी भूदान चळवळीचे मूल्यमापन केले आहे काय? काय साधले त्यातून? नसेल, तर विनोबांवर खडसावणारी टिका कशाला होत नाही? त्याच संबंधीचा एक किस्सा मोठा मनोरंजक आहे. त्या भूदानात सहभागी होऊन जुने संस्थानिक असलेल्या ‘विश्वनाथ प्रताप सिंग’ नावाच्या उत्तर प्रदेशातील एका राजाने आपली हजारो एकर जमिन दान करून टाकली. मग त्या जमिनीचा ताबा द्यायची घ्यायची वेळ आली, तेव्हा त्याच राजाच्या आप्तस्वकीयांनी राजाचे डोके फ़िरलेले असल्याचे प्रतिज्ञापत्र देऊन आपली जमिन आपल्यापाशीच कायम राखली होती. भूदानाची चळवळ निव्वळ देखावा झाला आणि आजही भूहीनांच्या चळवळी जमिनीचा तुकडा मागत झुंजत आहेत. मग विनोबांना कोणी फ़ैलावर घ्यायचे? नशीब त्या विनोबांचे की तेव्हा प्रसारमाध्यमांची गर्दी नव्हती की श्रृतीसारखे बुद्धीजिवी जन्मलेले नव्हते.

पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान होते आणि अतिशय लोकप्रिय नेता होते. त्यांनीही आपल्या कार्यकाळात डझनावारी अशाच घोषणा व संकल्पना लोकांपुढे मांडल्या होत्या. ‘आराम हराम है’ ही त्यापैकीच एक. देशातल्या प्रत्येक नागरिकाने कामाला जुंपून घ्यावे, आळशीपणा सोडावा असे त्यामागचे आवाहन होते. पण त्यातून काय साधले गेले? इतक्या वर्षांनी कुठल्याही सरकारी कचेरीत गेल्यास लोक बिनकामाचे फ़िरताना वा आराम फ़र्मावताना दिसतील. काम नाही आणि भरपूर पगार ही सरकारी नोकरीची व्याख्या होऊन बसली. त्यासाठी काय मग नेहरूंना गुन्हेगार म्हणायचे? कारण घोषणा त्यांची होती. त्यातून काहीही साध्य झाले नाही, तेच इंदिराजींच्या गरीबी हटावबद्दल म्हणता येईल. अर्थात अशा प्रत्येक नेता वा पंतप्रधानाच्या घोषणा व संकल्पनांवर तेव्हाही टिका झाली. पण टिका करणारेच शहाणे आणि नेहरू वा इंदिराभक्त मुर्ख अतिरेकी, असा आक्षेप घेतला जात नव्हता. कारण नेहरू वा इंदिरा किंवा विनोबाजी भावे यांच्यावर कुठलाही फ़ुटकळ माणूस वा अभिनेता उठून बाष्कळ टिका करीत नव्हता. किंबहूना त्या कालखंडात कलावंत, नाटककार, अन्य कुठल्याही मार्गाने नावारूपाला आलेल्या लोकांना बुद्धीजिवी म्हणून पेश केले जात नसे आणि माध्यमांनाही तितकी अक्कल होती. नेहरूंवर टिका केली की लगेच प्रसिद्धी, अशी माध्यमांची घसरण झालेली नव्हती. म्हणूनच असे वाद होत नसत की त्याची पातळी घसरल्याची चिंता व्यक्त होत नसते. किंबहूना अशा अश्लाघ्य टिकेची शब्दाची दखल घ्यायची नसते; इतकी माध्यमांची अक्कल शाबुत होती. परिणामी कुठल्याही बाजूने खालच्य थराला जाणार्‍या टिका शब्दांना प्रसिद्धी अभावी पायबंद घातला जात होता. आज त्यातूनच प्रसिद्धी मिळत असल्याने दिवसेदिवस बुद्धीच खालावत गेलेली आहे. मोदींच्या जागी नेहरू असते तरी अशीच मुक्ताफ़ळे आज उधळली गेली असती.



2 comments:

  1. उत्तम लेख. पण मला वाटते दुट्टपीपणा आपल्या रक्तातच भिनला आहे की काय देव जाणे

    ReplyDelete