Wednesday, July 8, 2015

नवी मुंबई आणि विरार-वसईनंतर गोंदिया-भंडारा



एक वर्षापुर्वी लोकसभा थेट जिंकून भाजपाने जोरदार मुसंडी मारली होती. त्यानंतर वरपासून खालपर्यंत प्रत्येक भाजप समर्थक कार्यकर्ता शत-प्रतिशत भाजपाची भाषा बोलू लागला होता. यशाची नशाच और असते. म्हणूनच त्या आरंभीच्या उत्साहाला दोष देता येणार नाही. पण विजयाचा उधळलेल्ला गुलाल व निकालांचा धुरळा खाली बसला, मग वास्तवाचे भान यावे लागते. अन्यथा कपाळमोक्ष ठरलेला असतो. त्याची प्रचिती आता भाजपाच्या अनेक बोलघेवड्यांना येऊ लागली असेल. कारण ज्या विदर्भाने भाजपाला राज्यातील सर्वात मोठा पक्ष व्हायचा मान दिला होता, तिथलीच जमिन ढासळू लागली आहे. गोंदिया आणि भंडारा हे भाजपाचे विदर्भातील गड मानले जातात. तिथेच त्यांच्या हातात मागली पाच वर्षे असलेल्या जिल्हा परिषदांची सत्ता गेलेली आहे. विरोधात असताना तिथे ज्येष्ठ नेता नितीन गडकरी आणि देवेंद्र फ़डणविस यांच्यासह सुधीर मुनगंटीवार यांनी आपली किमया करून दाखवली होती. त्याच्याच परिणामी त्यांना राज्याची सत्ता मिळावी, असे मतदाराला नक्कीच वाटले असेल. त्याचाच परिपाक लोकसभा व विधानसभेच्या मतदानात दिसला होता. त्याला मतदाराच्या सदिच्छा म्हणतात. तिला पक्षाची ताकद समजून मस्तवालपणा केलेला चालत नाही. भाजपाच्या नेत्यांची तिथेच चुक झाली. त्यांना आता आपण अजिंक्य झालो आणि राज्यातील जनतेला आता आपल्याखेरीज अन्य पर्याय उरला नाही; असे वाटू लागले. त्यांनी प्रतिस्पर्धी वा विरोधक सोडाच मित्रांमध्येच शत्रू शोधायचा उद्योग हाती घेतला. तिथून मग पारडे फ़िरू लागले होते. त्याची प्रचिती विधानसभेत थोडीशी आली आणि बहुमत हुकले होते. तोच मतदाराने दिलेला इशारा होता. पण यशाची नशा चढली, मग इशारे समजेनासे होतात. थेट महापालिका व सर्वत्रच एकहाती सत्तेच्या गमजा भाजपा करू लागला. त्याला मतदाराने दिलेले हे उत्तर आहे.

राज्यातील सर्वच सत्तास्थानी आपल्याला बसवायला जनता उतावळी झाली आहे, अशा भ्रमात वागणार्‍यांना वास्तवाचे इतक्याने भान यायला हरकत नसावी. मात्र ते भान येईल याची कोणी खात्री देवू शकत नाही. कारण हा मतदाराचा पहिलाच इशारा नाही. नव्या मुंबईसह औरंगाबादच्या पालिका निवडणूकीत युती करूनही भाजपाला मोठा दणका मतदाराने दिला होता. नव्या मुंबईत तर युतीने ज्या जागा जिंकल्या, त्यातही भाजपाचा हिस्सा नगण्य होता. जिथे सेनेचा आमदारही निवडून येऊ शकला नाही, तिथे सेनेने दुसर्‍या क्रमांकाच्या जागा मिळवल्या आणि भाजपाच्या ‘राष्ट्रवादी’ आमदार भाजपाला अर्धा डझनही नगरसेवक मिळवून देवू शकल्या नव्हत्या. त्याच्यानंतर विरार वसई पालिकेची निवडणूक कालपरवाच संपली. तिथे तर एकहाती हितेंद्र ठाकूर यांना मतदाराने कौल दिला. जिथे खासदार भाजपाचा तिथे अवघा एक नगरसेवक निवडून आणता आला. पण त्याहीपेक्षा तिथल्या मतदानातील घसरलेला मतदानाचा टक्का लक्षणिय आहे. लोकसभेला भाजपा उमेदवार त्याच क्षेत्रात दोन लाखाहून अधिक मतांनी जिंकला होता, तिथे विधानसभेला भाजपाची मतदारसंख्या सव्वा लाख इतकी खाली आलेली होती. पण परवाच्या महापालिका क्षेत्रात भाजपाचा एकमेव नगरसेवक जिंकताना मिळालेली एकूण मते अवघी १८ हजाराच्या घरात आहेत. म्हणजेच लोकसभेपासून नुसती गळती चालू आहे. देशव्यापी राजकारण करू इच्छिणार्‍या पक्षाला अशा मतातील घटीचा गंभीर विचार करणे भाग असते. मतदार इतका रुष्ट कशाला व्हावा? अजून फ़डणवीस सरकारला एक वर्ष पुर्ण व्हायचे आहे. म्हणजेच त्याच्या कारभारावर लोक नाराज आहेत असे म्हणता येणार नाही. मग मताची टक्केवारी भाजपा कशामुळे गमावतो आहे? सदिच्छा गमावल्या, मग मतांमध्ये घट सुरू होत असते. लोकसभेच्या यशानंतरची भाजपाची मस्ती त्याचे खरे कारण आहे.

मोदी ह्या नावावर आणि चेहर्‍यावर भाजपा लोकसभा जिंकू शकला होता. त्यातून जनमानसात भाजपाविषयी ज्या सदिच्छा निर्माण झाल्या, त्याचे आपल्या कायमच्या पाठीराख्यात रुपांतर करणे हे मोठे आव्हान असते. एका बाजूला निवडून आलेल्यांनी आपल्या कामातून लोकांना प्रभावित करायचे असते, तर दुसरीकडे पक्ष कार्यकर्त्यांनी जनसंपर्कातून आपल्या विषयीच्या सदिच्छा अधिक विस्तारीत करायच्या असतात. दुर्दैव असे, की भाजपाचे मोदी व्यतिरीक्त असलेले दुय्यम व स्थानिक नेतृत्व झिंग चढल्यासारखे वागत गेलेले आहे. सहाजिकच मोदींनी वा त्यांच्या सरकारने केलेल्या चांगल्या कामापेक्षा वा उत्तम निर्णयांच्या प्रभावापेक्षा, पक्षाच्या दुय्यम नेत्यांच्या उथळ व उद्दाम वर्तनाने लोकांच्या सदिच्छा पायदळी तुडवल्या गेल्या आहेत व जात आहेत. गोंदिया भंडारा जिल्ह्यातील निकाल त्याचेच प्रतिबिंब आहेत. तिथल्या सत्ताधारी भाजपाचे काम वाईट असते, तर लोकांनी त्याच पक्षाला लोकसभा विधानसभेत भरभरून मते दिली नसती. ती दिली म्हणजेच दोन्ही जिल्हयातील पक्षाच्या कामकाजावर स्थानिक मतदार नाराज नव्हता. पण दिल्ली व राज्यातील सत्ता मिळाल्यापासून स्थानिक व राज्यातील नेते ज्या पद्धतीने वागू लागले, त्याने मतदार सावध व्हायला लागला. दुसरी कॉग्रेस वा राष्ट्रवादी लोकांना नको होती आणि भाजपा तसाच वागणार असेल, तर मुळचे कॉग्रेस राष्ट्रवादी परवडले. लोकांचा ताजा कौल त्याचीच ग्वाही देतो आहे. लोकांनी भाजपाला विधानसभेत निवडल्यापासून त्याच पक्षाचे वर्तन राष्ट्रवादी सारखे होत असेल, तर डुप्लीकेट राष्ट्रवादीपेक्षा ओरिजीनल राष्ट्रवादी मतदाराला भावणार ना? दोन्ही जिल्ह्यातील निकाल त्याचेच द्योतक आहेत. आणि आपला सर्वात मोठा बालेकिल्ला म्हणून भाजपा जिथे बघतो, त्या विदर्भातले हे निकाल डोळे उघडणारे आहेत. अर्थात डोळे उघडण्याची इच्छा असेल तर.

खरे तर त्याची सुरूवात विधानसभेच्या मतदानापासून झाली आहे. लोकसभेला मिळालेल्या यशानंतर युती मोडण्याचा धुर्तपणा लोकांना आवडला नव्हता आणि त्याचेच प्रतिबिंब भाजपाच्या मतातही पडलेले होते. राष्ट्रवादीच्या पाऊणशे उमेदवारांना आयात करूनही भाजपाला एक टक्काही मतात वाढ करता आलेली नव्हती. म्हणजेच मोदी करिष्मा तिथेच संपू लागला होता. पण ते अपयश जिंकलेल्या आमदारांच्या संख्येपुढे झाकले गेले होते. सेनेला बाजूला करून व सेनेने मोदी विरोधात अश्लाघ्य टिका करूनही सेनेला इतकी मते व जागा कशाला मिळाल्या; त्याचा भाजपाने अभ्यास करायला हवा होता. त्याचवेळी इतके आयात उमेदवार असून आपण बहूमत का मिळवू शकलो नाही वा आपल्या लोकसभा मतात किंचितही वाढ कशामुळे होऊ शकली नाही, त्याचे आत्मपरिक्षण करायला हवे होते. पण त्याकडे काणाडोळा करून शिवसेनेला खिजवण्यात व लपंडाव खेळण्यात कालापव्यय करण्यात आला. मस्ती दाखवण्यात धन्यता मानली गेली. सत्ता जनतेला सुखावण्यासाठी राबवण्यापेक्षा सेनेला व पक्षातील  प्रतिस्पर्ध्यांना गोत्यात आणायला प्राधान्य दिले गेले. त्यातून जनमानसात पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याची कोणाला फ़िकीर होती? आजही कुठे कोणाला फ़िकीर आहे? २००४ मध्ये भाजपाला हरवल्याच्या गमजा जितक्या बेफ़िकीरीने कॉग्रेसवाले २०१४मध्ये करीत होते, तशीच भाषा आजकाल भाजपाच्या कार्यकर्ते नेत्यांच्या तोंडात दिसत नाही काय? तिथेच मग लोकांचा भ्रमनिरास चालू होतो आणि सदिच्छा पायदळी तुडवल्या जातात. पुढल्या प्रत्येक मतदानात मग त्याचे प्रतिबिंब पडू लागते. आज भंडारा गोंदिया जिल्ह्यातील निकालावर भाजपाकडून सारवासारव होईल. कॉग्रेसही मागल्या चार वर्षात तेच करत राहिली. त्याचा हिशोब मे २०१४ मध्ये स्पष्ट झाला. भाजपाच्या नेत्यांना काय हवे आहे?

2 comments:

  1. भाजपाच्या अस्तास सुरुवात झाली

    ReplyDelete