Tuesday, July 21, 2015

‘म्हारो गुजरात’ची पुंगी कोण वाजवत होता?



गेल्या काही दिवसात दहिसरच्या घटनेनंतर अनेकजण आपले मोदीप्रेम विसरून ‘शहा’बादी फ़रशी इतके संवेदनाशून्य झालेले आहेत. आपल्या त्याच पोरकटपणाच्या आहारी जाऊन वाटेल तसे युक्तीवाद करताना मराठी अस्मितेची पुंगी वाजवणे वा नाकर्तेपणाची मराठी भाषिकांवर चिखलफ़ेक करण्यापर्यंत पोहोचले आहेत. सेक्युलर समजले जाणारे लोक जेव्हा हिंदू असूनही हिंदूंच्या चुकांवर बोट ठेवतात वा विरोधात बोलतात, तेव्हा त्यांच्या हिंदूत्वाची तपासणी करणार्‍यांच्या हातात कुठली पुंगी असते? ज्यांना हिंदुत्वाचा अभिमान असतो, त्याला पुंगी म्हटलेले चालेल काय? इथे धर्माची वा हिंदुत्वाची पुंगी वाजवायची आणि तिकडे श्रीनगरच्या लाल चौकात पाकचे किंवा इसिसचे झेंडे फ़डकावले, तरी मंत्रीपदाला चिकटून बसायचे, त्याला कसली पुंगी म्हणतात? गाजराची की लाचाराची? सत्तेची नशा असतेच आणि ती अन्य कुठल्याही नशेपेक्षा भयंकर असते. या नशेत माणूस मरून गेला तरी त्याला थांगपत्ता लागत नाही. कॉग्रेसला तशी अवस्था गाठायला सहा दशकांचा कालावधी तरी लागला. पण भाजपा नेते व समर्थकांना सहा महिन्याचाही कालावधी बहकायला पुरेसा ठरताना दिसतो आहे. अन्यथा दहिसरच्या घटनेनंतर वा अन्य तत्सम बेताल वर्तनाच्या घटना समोर आल्या असताना, भाजपाच्या समर्थकांकडून बेछूट बोलणे वागण्याची अपेक्षा कोणी केली असती? ज्या मुंबईसाठी १०५ लोकांचे बलिदान देण्यात आले व त्यातूनच संयुक्त महाराष्ट्राचे राज्य स्थापित झाले, त्यामा्गे मराठी अस्मिता हीच प्रेरणा होती त्या प्रेरणेची पुंगी वाजवली जातेय, असली भाषा मस्तीशिवाय जन्माला येत नाही. औट घटकेच्या सत्तेने इतकी नशा चढत असेल, तर दोनतीन वर्षे सत्ता टिकली, तर काय परिस्थिती येईल याचीच भिती वाटते. सत्तेत बसलेले परवडले, त्यापेक्षा सोशल माध्यमे वापरणारे भाजपाई अधिक भरकटले आहेत.

सुदैवाची गोष्ट अशी, की अजून इतका मोठा विजय व बहुमत मिळवून देणारा नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता डोके ताळ्यावर ठेवून आहे. म्हणूनच आपल्या समर्थकांना त्यांनी ताळतंत्र सोडू नका, असे जाहिर आवाहन केले आहे. त्यातूनच लक्षात येते, की सत्तेचा रोग किती झपाटयाने भाजपा समर्थकांच्या रक्तात भिनतोय. त्याकडे पाहुन खुद्द मोदीच भयभीत झाले आहेत. अन्यथा त्यांनी असे खुले आवाहन कशाला केले असते? म्हणतात ना हत्ती हौदभर दारू पिवूनही मस्त आपल्या पायावर चालतो. पण त्याच्या पाठीवर बसलेल्या माहुताला नुसत्या दारूचा वास इतका धुंद करतो, की हा बेटा माहुत आपल्याच मांडीवर अंकुश मारून स्वत:ला रक्तबंबाळ करून घेतो. दिवसेदिवस भाजपाच्या कार्यकर्ते व नेत्यांची अवस्था तशी होत चालली आहे. अन्यथा त्यांना नरेंद्र मोदी नावाचा जादूगार अस्मितेची पुंगी वाजवूनच सत्तेची जादू आत्मसात करू शकला, याचे भान राहिले असते. मराठी अस्मितेची हेटाळणी करणार्‍यांना तेरा वर्षापुर्वी नरेंद्र मोदी ठाऊक होता काय? आणि असेल तर त्याची अवस्था काय होती, त्याचे तरी स्मरण आहे काय? कोणी भाजपाचा प्रवक्ता वा नेता त्याच्या समर्थनाला दिल्लीत उभा रहात नव्हता. उलट २००४ सालात मोदीमुळेच एनडीएची व वाजपेयींची सत्ता गेली, असे याच मोदीच्या डोक्यावर खापर फ़ोडण्यात भाजपा नेत्यांची बुद्धी खर्ची पडत होती. कोणी या माणसाला पक्षाच्या संसदीय मंडळात जागा द्यायला तयार नव्हता आणि वाजपेयी तर त्याला मुख्यमंत्री पदावरून हटवायला सिद्ध झालेले होते. दोनच गोष्टींनी मोदींना जीवदान दिले तेव्हा. त्यातली एक गोष्ट होती, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. ज्यांनी मुंबईच्या महापौर बंगल्यात अडवाणींनी विषय काढला, तेव्हा मोदींना हटवण्यास साफ़ विरोध केला होता. प्रसंगी मोदीसाठी एनडीएतून बाहेर पडायची धमकी दिली होती. ती हिंदूत्वाची अस्मिता होती.

आज मोदींचे नाव घेऊन मिरवणार्‍या कितीजणांनी तेव्हा मोदींच्या समर्थनाची हिंमत केली होती? किती दिल्लीकर वा महाराष्ट्रातील भाजपा नेते ठामपणे मोदींच्या पाठी उभे राहिले होते? अस्मिता हिंदूत्वाची असो किंवा मराठीची असो, कुठल्या बाबतीत भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी हिंमत दाखवली होती? आज मोदी हे चलनी नाणे झाले तेव्हा त्यांच्या समर्थक भक्तांचा महापुर आलेला आहे. जेव्हा खुद्द मोदीच कोंडीत होते, तेव्हा यातला कुठला भक्त आपल्या देवाला संकटातून बाहेर काढायला पुढे सरसावला होता? अवघ्या जगात सैतान वा मारेकरी अशी मोदींची बदनामी झाली, तेव्हा त्यांना पाठींब्याची गरज होती. तेव्हा आपल्या पक्षाचा नसून मोदींची पाठराखण करायला एकच बिगरभाजपा नेता ठामपणे उभा राहिला, त्याचे नाव होते बाळासाहेब ठाकरे. त्यातून मोदींच्या मुख्यमंत्रीपदाला जीवदान मिळाले. म्हणजेच मराठीच्या अस्मितेची ‘पुंगी’ वाजवणार्‍याने अडचणीच्या व संकटकाळी मोदींना मदतीचा हात दिला होता. पुढल्या काळात पुन्हा दुसर्‍या अस्मितेने मोदींना खरी शक्ती दिली. तिला ‘गर्वी गुजरात’ म्हणतात. पक्ष आपल्या मागे उभा रहाणार नाही याची खात्री पटल्यावर मोदींनी भरवसा मुंबईतल्या वा दिल्लीतल्या भाजपावाल्यांवर नाही ठेवला. त्यांनी आश्रय घेतला तो गुजराती अस्मितेचा. मागल्या दहा बारा वर्षात मोदींनी गुजरातला नावारूपाला आणले, त्यामागची खरी शक्ती त्यांनी गुजरातच्या जनतेमध्ये जागवली  ती प्रांतिक अस्मिता होती. ती गुजराती अस्मिता मोदींच्या मागे ठाम उभी राहिली, म्हणून त्यांना अवघ्या देशात ताठ मानेने उभे रहाता आले, अन्यथा राष्ट्रीय भुमिका मांडणारे कोणीही भाजपा नेते मोदींच्या मागे ठामपणे उभे राहिले नाहीत. उलट गुजराती अस्मितेवर पाय रोवून मोदी उभे राहिले आणि त्यांना देशभर मान्यता मिळू लागली. तेव्हा तिचे लाभ उठवायला जे पक्षातले व बाहेरचे संधीसाधू पुढे सरसावले, ते आज अस्मितेला पुंगी म्हणत आहेत. काय बेशरमपणा आहे ना?

मराठी अस्मितेची पुंगी म्हणून हेटाळणी करणार्‍यापैकी कितीजणांनी वर्षभर आधी गुजरातचे कौतुक सांगत देशाच्या कानाकोपर्‍यात फ़िरणार्‍या ‘पुंगीवाल्याला’ जाब विचारला होता? आपण गुजरातमध्ये अमुक केले तमूक केले, असे अभिमानाने सांगणारा नरेंद्र मोदी ‘छे करोड गुजराती’ असे म्हणायचा, तेव्हा संकुचित नव्हता काय? आम्ही मराठी म्हटले की संकुचित होतो, असे बोलणार्‍यांची जीभ तेव्हा कुठे टाळूला चिकटली होती? अस्मिता अशीच असते. कोणी बापाचे-आईचे नाव सांगतो, तेव्हा आजोबा आजीचे महत्व नाकारत नसतो. कारण बाप त्याच पितरांकडून आलेले असतात. त्यांचाच वारसा बापाकडून येत असतो. बापाचे नाव सांगणे म्हणजे अस्मिता असते. गुजरातची कौतुके इथे मुंबईत वा महाराष्ट्रात मोदींच्या तोंडून ऐकताना, आम्ही मराठी कधी विचलीत झालो नाही. किंवा मोदींना ‘पुंगी’ वाजवू नका असे ऐकवले नव्हते ना? पण त्याच्याच संधीसाधू भाटांना आता अस्मिता ही पुंगी वाटू लागली आहे. ज्यांना यशस्वी मोदी हवा असतो आणि त्याने कष्टाने मिळवलेल्या कमाईतला फ़क्त हिस्सा हवा असतो, ते वाल्याकोळ्याचे कुटुंबिय असतात. त्यांना कष्टात वा जबाबदारीत भागी नको असते, फ़क्त त्यातून आलेल्या लाभाचे भागिदार व्हायचे असते. त्यांना अस्मिता काय आणि अभिमान काय, कशाचे सोयरसुतक नसते. म्हणून मग मराठीच्या अस्मितेची हेटाळणी करण्यात त्यांची आघाडी असते. अर्थात त्यात नवे काही नाही. २००४ नंतर भाजपा सपाटून मार खात असताना यापैकी कितीजण पक्षात होते आणि पक्षासाठी कष्ट उपसत होते? त्याचा ताळेबंद मांडला तरी वाल्याचे कुटुंबिय कोण ते सहजगत्या लक्षात येऊ शकेल. कदाचित लौकरच मोदींना असल्या ‘शहा’ण्यांचा धोका लक्षात येईल आणि तेच पद्धतशीर अशा लोकंना ‘रस्ता’ दाखवतील. तेव्हा यातले किती भक्त आरत्या ओवाळत बसतील ते दिसेलच.

1 comment:

  1. भाऊराव,

    मोदी गुजराती आहेत म्हणून बेशरमपणे इतरांना दुखावणारे गुजराती पहिले की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. मराठी सत्ताधारी पूर्ण भारतभर पसरले, पण त्यांनी स्थानिक अस्मितेची अशी टर कधीच उडवली नव्हती. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांनी न्यायदानाची भाषा मुद्दाम गुजराती ठेवली होती. सरफोजी महाराजांनी मराठीसोबत स्थानिक तामिळ व तेलुगु सुद्धा तितक्याच आदरणीय मानल्या होत्या. आज तंजावरचा सरस्वतीमहाल त्याचीच साक्ष देतो आहे. अजमेर, अंबर (जयपूर), बुंदी (कोटा), इथल्या संस्थानांनी ग्वाल्हेरच्या शिंद्यांचे आधिपत्य मान्य केलेले असले तरी शिंदे मांडलिकांना यथोचित सन्मानाने वागवीत. पन्नासेक वर्षांपूर्वी बुंदेलखंडात पंडित (म्हणजे मराठी) जहागीरदार न्यायी समजला जात असे.

    मराठी सत्ताधाऱ्यांनी परप्रांती सदिच्छाच पेरल्या. कुठल्या सदिच्छा केव्हा उपयोगी पडतील नेम नसतो. शहाजी महाराजांनी बंगळुराच्या आसपास ज्या सदिच्छा पेरल्या त्यांचा शिवाजी महाराजांना दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला उपयोग झाला. दक्षिण दिग्विजय केला तरी शिवाजी महाराज उन्मत्त झाले नव्हते. त्यांनीही परत सदिच्छाच पेरल्या. त्यांची लाभदायी फळे पुढे राजाराम महाराज जिंजीस गेले तेव्हा मिळाली. या इतिहासापासून काहीतरी शिकायचं असतं. अन्यथा नाश अटळ आहे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete