Thursday, July 9, 2015

महात्मा गांधींचे मोठे कार्य कोणते?



कुठल्याही घटना वा धोरणाविषयी आपले मतप्रदर्शन करायचा अधिकार प्रत्येक नागरिकाला लोकशाहीत मिळालेला आहे. पण तो वापरताना तारतम्य असावे, अशीही अपेक्षा असते. पण जर त्याकडे आपल्या ठरलेल्या भूमिका वा पुर्वग्रहानेच बघितले, तर खरे मूल्यमापन होऊ शकत नाही. बहुतांशी प्रदर्शित होणारी मते तशीच असतात. कारण जे काही समोर येईल, त्यात आपल्याला काय हवे आहे आणि काय नको आहे, यानुसारच बघितले जाते. परिणाम असा, की नको असलेले त्यात असेल, तर घटना वा धोरण चुकीचे ठरवण्याकडे आपला कल असतो. याच्या उलट हवे असलेले त्यात आढळले, तर त्यालाच उत्तम ठरवण्याची पराकोटी आपण करतो. त्यामागचा हेतू वा परिणामांशी आपल्याला कर्तव्य नसते. आणखी एक भाग असा, की घटना वा धोरण कोणाचे आहे, त्याचाही आपले मत बनण्यावर प्रभाव पडत असतो. आपले मत त्या व्यक्ती वा संस्थेविषयी चांगले नसेल, त्याच्या प्रत्येक बाबतीत दोष शोधले जातात आणि आवडती व्यक्ती वा संस्था असेल, तर नसलेले गुणही चिकटवण्याचा हव्यास रहातो. बहुतांशी अशाच लोकांची जाहिरपणे मते येत असल्याने सर्वसामान्य माणसाच्या मनाचे व मताचे त्यात प्रतिबिंब पडत नाही. त्यामुळेच पुढले परिणामही आधी व्यक्त झालेल्या मतांच्या विपरित अनुभवाला येत असतात. कारण भक्त-अनुयायी असोत की कट्टर विरोधक असोत, त्यांना मुद्दा वा विषयाशी कर्तव्य नसते. त्यांना विरोधासाठी वा समर्थनासाठी निमीत्त हवे असते. यात जितके सामान्य बुद्धीचे लोक असतात, तितकेच कुशाग्र बुद्धीचेही लोक सहभागी असतात. असे लोक अलिप्तपणे कुठलेही मूल्यमापन करू शकत नाहीत. हे सार्वजनिक जीवनातील एक वास्तव आहे. एकदा ते समजून घेतले, मग नित्यनेमाने आपल्या समोर मांडले जाते त्या विश्लेषणातील त्रुटी लक्षात येऊ शकतील.

उदाहरणार्थ नथूराम व महात्मा गांधी यांच्याविषयी व्यक्त होणारी उथळ मते आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील व समर्थनार्थ व्यक्त होणारी मते, यांच्याकडे आपण बघू शकतो. अनेक कडवे गांधी समर्थक आहेत, त्यांना खर्‍या गांधीशी अजिबात कर्तव्य नसते, इतके ते नथूराम द्वेषी असतात. उलट काही लोक इतके गांधीद्वेष्टे असतात, की त्याचसाठी त्यांना नथूराम आवडत असतो. अशा दोन्ही बाजूंची मते लक्षात घेऊन चालत नाही. त्यात नथूरामचे वा गांधीजींचे योग्य मूल्यमापन झालेले नसते. तशीच कहाणी मागल्या दशकात नरेंद्र मोदी यांची झाली आहे. देशातला सामान्य माणूस सोडला, तर बुद्धी वापरणारा बहुसंख्य समाज दोन गटात विभागला गेला आहे. एका बाजूला मोदी समर्थक तर दुसर्‍या बाजूला मोदीविरोधक अशी विभागणी झालेली आहे. मग कुठलीही घटना घडली, म्हणजे या दोन्ही बाजू एकमेकांवर तुटून पडत असतात. त्यांना कशाचेही कर्तव्य नसते. आपापले रागलोभ व्यक्त करण्याची संधी शोधणारे असे हे आत्मे त्या संधीवर तुटून पडताना दिसतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यापासून डझनावारी परदेश दौरे केले आहेत. ते पर्यटनासाठी केलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. यापुर्वी अनेक राष्ट्रीय नेत्यांनी परदेश वार्‍या करून त्याचा बोजा सरकारी तिजोरीवर टाकलेला आहे. त्याची तुलना मोदींच्या परदेशवारीशी करता येणार नाही. कारण हे बहुतांश राष्ट्रीय नेते आपल्या सोबत नातलग परिवाराचा लवाजमा घेऊन जात असत. मोदी त्याला अपवाद आहेत. पण दुसरीकडे देशात जे सत्ता परिवर्तन झाले आहे, त्यानुसार देशाचे परराष्ट्र धोरणही बदलते आहे. त्याचा प्रभाव अन्य देशांच्या भारतविषयक भूमिकेत पडायचा असेल, तर देशाच्या नेत्याला तिथे जाऊन त्यासाठी भेटीगाठी कराव्याच लागतील. मोदी त्यासाठीच परदेशी जात असतात. पण त्यांना अनिवासी भारतीय म्हणून हेटाळले जाते.

प्रतिभा पाटील आपल्या कारकिर्दीत आफ़्रिकेच्या दौर्‍यावर मुले नातवंडांना घेऊन गेल्या होत्या. त्याची कोणी किती टवाळी केली नसेल, इतकी मोदींच्या मुत्सदेगिरीसाठी केलेल्या परदेशवारीची हेटाळणी चालू असते. यातून एक लक्षात येते, की ज्यांना हेटाळणी करायची आहे, त्यांना त्या वारीतून काय साधले गेले याच्याशी कर्तव्य नाही. तर दुसरीकडे मोदी समर्थकांचीही तीच कथा आहे. त्यांनाही त्यातून काय साध्य झाले, त्याचा विचार सुचत नाही. त्याच्याकडून नसत्या गोष्टीचे कौतुक होताना दिसेल. म्हणजे ओबामांनी व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले, किंवा चिनी पंतप्रधानांनी चहा पाजला वगैरे. परराष्ट्रनितीत कोणता मूलगामी बदल झाला, त्याचा नामोल्लेखही अशा मतप्रदर्शनात आढळणार नाही. कारण दोन्ही बाजूंना मोदी समजून घ्यायचा नसतो, की त्यातले हेतू उमजून घ्यायचे नसतात. परिणामांशी तर कोणालाच कर्तव्य नसते. लोकसभेच्या प्रचार मोहिमेत मोदी एक गोष्ट अनेकदा सांगत होते. किती समर्थकांनी वा विरोधकांनी तिच्याकडे बारीक लक्ष दिले? ज्याला नथुरामवादी असे हिणवण्यात गांधीप्रेमींना धन्यता वाटते असा नरेंद्र मोदी; सरकार चालवताना गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीचे अनुकरण करण्याची भाषा बोलत होता. चळवळीत आपले सर्वस्व पणाला लावून सगळेच उतरू शकत नाहीत. पण नित्यजीवनात किरकोळ गोष्ट करूनही लोकांना स्वातंत्र्य चळवळीशी महात्म्याने कसे जोडले, त्याचा बारकावा मोदींनी सातत्याने कथन केला होता. सफ़ाई करणार्‍याने वा शिक्षकाने आपले काम देशाच्या उद्धारासाठी प्रामाणिकपणे करावे, तरी स्वातंत्र्याच्या चळवळीला मोठा हातभार लागेल, अशीच शिकवण गांधीजींनी दिली आणि त्यातून स्वातंत्र्याच्या चळवळीला तळागाळापर्यंत नेलेले होते. त्यातल्या कुणा शिक्षक वा सफ़ाई कामगाराच्या कामाने स्वातंत्र्य मिळाले काय? असाही सवाल आज कोणी विचारू शकतो. जसा सेल्फ़ी विथ डॉटरच्या निमीत्ताने विचारला गेला.

मुठभर लोकांची चरखा चालवला किंवा सुत कातून टकळी चालवल्याने स्वातंत्र्य कसे मिळणार, असाही सवाल तेव्हा विचारला गेलाच होता. आजही विचारला जातोच. त्यातून स्वातंत्र्य मिळणार नाही, पण लोकमताचा एक दबाव निर्माण होतो, हे गांधी ओळखून होते. मुठभर बुद्धीमंतांच्या डबक्यात अडकून पडलेल्या स्वातंत्र्याच्या चळवळीला त्यातून महात्मा गांधींनी समाजाच्या मुख्यप्रवाहात आणले. आपले जगणे व नित्यजीवन याच्याशी चळवळीची नाळ जोडली, तेच आजच्या बुद्धीमान गांधी समर्थकांना उलगडलेले नाही. ते गांधीभक्त असतात आणि तसेच मोदीभक्तही असतात. त्यांना आपल्या प्रिय व्यक्तीने काय सांगितले वा शिकवले, त्याच्याशी कसलेही सोयरसुतक नसते. आपापले रागलोभ व्यक्त करण्यासाठी त्यांना मोदी-गांधी उपयुक्त असतात. गांधींनी सुतकताई वा चरखा सामान्य माणसापर्यंत नेला आणि त्यातून जे काही साधले गेले, त्याच्याशी सेल्फ़ीचे नाते जोडता येईल. मग किती लोकांकडे स्मार्टफ़ोन आहे असला प्रश्न डोक्यात येणार नाही. कारण स्वातंत्र्यपुर्व काळात किती लोकांकडे चरखा होता? की टकळी घेऊन किती लोक सूतकताई करू शकले होते? पण ज्यांनी तेवढे केले त्यातून कोट्यवधी लोकांपर्यंत काही संदेश व संकेत जाऊ शकले होते. त्याच संदेशाचे इशारे बलदंड ब्रिटिश सत्तेला जाणवले आणि त्यातून स्वातंत्र्याच्या चळवळीला उधाण आले. गांधीबाबा मुठभर बुद्धीमंतांना योग्य व पटणार्‍या गोष्टी करीत राहिले असते, तर आजच्या विद्वानांना मोकाट निर्बुद्धतेचे प्रदर्शन करण्याचा घटनात्मक अधिकारही मिळू शकला नसता. कारण स्वातंत्र्याची चळवळ त्यांच्याच डबक्यात रुतून बसली असती आणि भारत स्वतंत्र होऊ शकला नसता. की त्याची स्वतंत्र राज्यघटनाच आकार घेऊ शकली नसती. गांधींनी केलेले मोठे कार्य म्हणजे त्यांनी आपल्या कल्पना सोडल्या नाहीत, त्यापेक्षा मुठभर बुद्धीमंताकडे काणाडोळा केला.

6 comments:

  1. Atyant suchak ani yogya vishleshan..!!

    ReplyDelete
  2. bhau the great!! achuk timing!!yogya veli yogya dose !! pachel ruchel samjel ase likhan!! thanks bhau

    ReplyDelete
  3. Nathuram Godse te Devendra Fadnavis - Bramhan dweshtya sarkar var kahitari lihave!
    Kaustubh Vaze

    ReplyDelete