Saturday, August 1, 2015

पाकिस्तानी सेनानीचे भारतीय अनुयायी



   ‘दहशत माजवा, पण दहशतीखाली दबू नका. जिहादी युद्धाची व्याप्ती अखेरीस मानवी हृदय, मन, आत्मा व श्रद्धा यांच्यापुरती असते. जर शत्रूची श्रद्धा ढासळून टाकली, तरच त्याच्या काळजात धडकी भरवता येते. म्हणजेच त्याला दहशतीच्या प्रभावाखाली आणता येतो. म्हणूनच अंतिमत: शत्रूची धर्मश्रद्धा डळमळीत करण्यालाच सर्वाधिक महत्व असते. ज्यांच्या धार्मिक श्रद्धा पक्क्या व भक्कम असतात, त्यांच्यावर दहशतीचा कुठलाही परिणाम होत नाही. म्हणूनच दुबळी धर्मश्रद्धा दहशतीला आमंत्रण देत असते. त्यामुळेच जिहादच्या पुर्वतयारीसाठी मुस्लिमेतर शत्रूच्या धर्मश्रद्धा डळमळीत करणे अत्यावश्यक असते. पण त्याचवेळी मुस्लिमांच्या धर्मश्रद्धा कडव्या करण्याचीही गरज असते. मानसिक दुबळेपणा तात्पुरता असतो, पण धार्मिक श्रद्धेचा दुबळेपणा कायमस्वरूपी असतो. मानवी आत्म्याला फ़क्त दहशतच स्पर्श करू शकते.’

उपरोक्त उतारा पकिस्तानी ब्रिगेडीयर एस. के. मलिक यांच्या पुस्तकातून घेतला आहे. कोण्या एका पाकिस्तानी सेनाधिकार्‍याचे मत वा पुस्तक अशी समजून करून घेण्याचे कारण नाही. मलिक हे शेकडो पाकिस्तानी निवृत्त अधिकार्‍यांपैकी एक नव्हेत. सोवियत युनियनने अफ़गाणिस्तान बळकावल्यानंतर तिथे मुक्तीयुद्ध आरंभले गेले त्याची प्रेरणा पाकिस्तानात होती व अमेरिकन चिथावणीने त्या गमिनी युद्धाच्या झळा अफ़गाण सोवियत सत्तेला सोसाव्या लागत होत्या, अफ़गाण ही इस्लामची भूमी आहे आणि ती बिगरमुस्लिमांच्या तावडीतून मुक्त करणे, हे पृथ्वीतलावरच्या प्रत्येक मुस्लिमाची धार्मिक कर्तव्य आहे, अशी त्यामागची मूळ संकल्पना होती. त्याला अमेरिकेने खतपाणी घातले की आणखी कोणी ते पाप केले, हा विषय अलाहिदा आहे. त्याचे परिणाम कोणाला भोगावे लागत आहेत, त्याला प्राधान्य व महत्व आहे. म्हणूनच याकुब मेमन वा आज जगाला भेडसावणार्‍या इस्लामी दहशतवादाचे विश्लेषण करताना, मलिक यांचे पुस्तक महत्वाचे आहे. कारण अफ़गाण जिहादसाठी जी वैचारिक व धार्मिक भूमिका मांडली गेली, तिचे निरूपण याच पुस्तकात आलेले आहे. म्हणूनच मलिक यांच्या ‘कोरनिक कन्सेप्ट ऑफ़ वॉर’ या पुस्तकाला तेव्हाचे पाक लष्करशहा व सेनाप्रमुख जनरल झिला उल हक यांची प्रस्तावना लाभलेली आहे. याकुबच्या निमीत्ताने जो तमाशा मागले आठदहा दिवस चालला, त्यातले अनेक हेतू त्या पुस्तकात आढळतात व त्यापैकीच एक दाखला उपरोक्त परिच्छेदात आहे. जिहाद ही शस्त्राने जिंकण्याची लढाई नाही. जिहाद हे हिंसाचार माजवून जिंकायचे युद्ध नाही. शारिरीक वा शस्त्रास्त्रांच्या बळावर भूमी पादाक्रांत करण्याचा संघर्ष म्हणजे जिहाद नव्हे. तर मानवाच्या मानसिक व भावनिक भूमीवर दहशतीचे राज्य उभे करणे, म्हणजे जिहाद होय. विजय पराभव मानवी श्रद्धांचा होत असतो, याचे इतके नेमके विवेचन क्वचितच कुणा सेनापतीने केलेले असेल. याकुबने काय केले ते अगदीच नगण्य आहे. पण त्याला फ़ाशीच्या दोरापासून वाचवण्याचा जो तमाशा चालला होता, तो जिहादपेक्षाही भयंकर आहे. त्यात कुणी मुस्लिम मुल्ला मौलवी अथवा जिहादी मानसिकतेचा आढळत नाही, हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे.

याकुबला मूळ खटला चालवणार्‍या कोर्टाने फ़ाशी फ़र्मावून काही वर्षे उलटली आहेत. तेव्हापासून आजपर्यंत त्याने व त्याच्या आप्तस्वकीयांनी सुटकेचे डझनावारी प्रयास केलेले होते. पण शेवटच्या क्षणी त्याच्या मदतीला जी फ़ौज येऊन उभी राहिली, त्यापैकी कोणीच इतकी वर्षे त्यासाठी कशाला पुढे आले नाहीत? आणि नसतील तर मग आजच त्यांना याकुबविषयी इतका मायेचा पान्हा कशाला फ़ुटलेला आहे? मग हिंदूत्ववाद्यांना त्यात मुस्लिम लांगुलचालन दिसेल किंवा अन्य कुणाला सेक्युलर भूमिका दिसेल. पण वस्तुनिष्ठ मूल्यमापन केले तर यापैकी कोणाला कुठल्याच धर्माचे वा कुठल्याही राष्ट्राविषयी आत्मियता नसल्याचे दिसून येईल. त्यांना याकुबविषयी सुद्धा आत्मियता नाही. त्यांची लढाई वेगळीच आहे. ते कुठल्या हिंदू श्रद्धेच्या विरोधात उभे ठाकलेले नाहीत. त्यांना हिंदू विरोधी मानणेही चुक आहे. कारण हिंदूंमध्ये कोणीही आपल्या धर्मासाठी वा श्रद्देसाठी लढायला पुढे सरसावणार नाही, याची सर्वांना खात्री आहे. कितीही तोंडाळपणा केला तरी शेकड्यांनी हिंदूत्ववादी साध्वी प्रज्ञा वा कर्नल पुरोहित यांच्या समर्थनाला मैदानात उतरले, असे एकदाही दिसलेले नाही. कारण हिंदू कधीच धार्मिक श्रद्धेसाठी लढत नाहीत हा इतिहास आहे. पण तेच बहुतांश हिंदू कायदा, संविधान व राष्ट्रीय एकात्मता यासाठी मात्र प्राणाची बाजी लावायला धावून येतील, याची तितकीच खात्री देता येते. थोडक्यात आज ज्यांना हिंदू म्हणून ओळखले जाते, त्यांच्यासाठी धर्मापेक्षा राष्ट्र, त्याची एकत्मता वा राष्ट्रीय स्वाभिमान हीच प्रभावी श्रद्धा झालेली आहे. तोच एक धर्म बनला आहे. मग त्यासाठी लढायची त्यांची हिंमत खच्ची केल्याशिवाय त्या राष्ट्राला पराभूत करणे शक्य आहे काय? सीमेवर लढणारा सैनिक असो किंवा कसाबला थेट जाऊन भिडलेला तुकाराम ओंबळे असो, त्यांची श्रद्धा आपल्या धर्मापेक्षा संविधान, कायदा वा राष्ट्र या संकल्पनेशी निगडीत दिसेल. तीच श्रद्धा भारताचे खरे बळ आहे. तीच श्रद्धा खच्ची करायची म्हणून याकुबच्या निमीत्ताने कायदा, न्याय याविषयीच्या श्रद्धेवर आघात करायला जे समोर आले, त्याला जिहादचे नवे रूप म्हणून बघायला हवे. या तमाम लोकांनी कुठे हिंदूंना शिव्या घातल्या नाहीत की इस्लामचा गौरव केला नाही. पण त्यांनी न्यायप्रिय भारताची विटंबना करण्याचा अट्टाहास केला आहे.

आज जगभर ज्याला भारत म्हणून ओळखले जाते, त्याला मुठभर पुरोगाम्यांनी हिंदूत्वाचा रंग भले दिलेला असो, पण या उपखंडाचा धर्म नेहमी व आजही ‘राष्ट्र’ हाच राहिला आहे. त्याच ‘धर्म’श्रद्धेने इस्लाम वा अन्य कुठल्या आक्रमणाला दाद दिली नाही. परक्यांशी झुंज धर्माच्या आधारे दिली नाही. इथल्या बहुसंख्यांचा व्यक्तीगत जीवनातील हिंदू हे कर्मकांड राहिले असेल. पण त्यांचा सामुहिक धर्म कायम राष्ट्र हाच राहिला आहे. आणि तीच ‘राष्ट्र’धर्मश्रद्धा कुणाला पराभूत करता येत नाही. जोवर ती श्रद्धा भक्कम आहे, तोवर पाकिस्तान काय किंवा अन्य कोणीही या खंडप्राय राष्ट्राला पराभूत करू शकत नाही. शतकानुशतके आक्रमणे पचवून इथे राष्ट्रीय श्रद्धा टिकून राहिली, ती हिंदू नामक धर्मश्रद्धा नव्हती व नाही. तीच राष्ट्रश्रद्धा होती. आणि ती जितकी भक्कम आहे तितके भीषण हल्ले पचवण्याशी कुवत अधिक आहे. दहशतीला आपण भीक घालत नाही, त्याचे तेच एकमेव कारण आहे. ती श्रद्धा व्यक्त करण्याचा आजचा मार्ग पूजापाठ नसून कायदा, घटना व न्यायाचा आदर होय. याकुबच्या निमीत्ताने कशावर हल्ला झाला? त्याच न्याय व कायद्याच्या श्रद्धेवर हल्ला झालेला आहे. कारण ती भारतीयांची धर्मश्रद्धा बनलेली आहे. इतके गुन्हे सिद्ध होऊनही याकुबच्या अंत्ययात्रेला हजारो मुस्लिमांनी गर्दी केली, त्याला इस्लामवरची श्रद्धा म्हणता येईल. उलट साध्वी वा पुरोहित यांच्याविरोधात कुठलाही गुन्हा अजून सिद्ध झालेला नसला, तरी त्यांच्या समर्थनासाठी मुठभरही हिंदूलोक पुढे येत नाहीत. कारण ती त्यांची धर्मश्रद्धा नाही. तो धर्म त्यांच्या व्यक्तीगत श्रद्धेचा भाग आहे. उलट राष्ट्र हा धर्म आहे. म्हणून पुरोगामी हल्ला कुठे केला जातोय? न्याय, कायदा व राज्यघटनेवर. आणि चवताळून प्रतिक्रिया त्याचसाठी उमटल्या आहेत. साध्वी वा कर्नलसाठी उठत नाहीत, इतक्या संतप्त प्रतिक्रिया न्यायपालिकेविषयी शंका घेतल्यावर उमटल्या. आणि त्याच श्रद्धा खच्ची केल्यास दहशत माजवता येईल, असे ब्रिगेडियर मलिक सांगतात. मग याकुबला वाचवायला सरसावले तो पुरोगामी जिहाद नाही काय? त्यांना इथली राष्ट्रभावना, राष्ट्राभिमान खच्ची करायचा आहे? हा विषय हिंदू मुस्लिम असा नाहीच. तो राष्ट्र विरुद्ध पुरोगामी जिहाद असा आहे. म्हणून हल्ले सतत तुमच्या राष्ट्रप्रेम, राष्ट्रवाद अशा संकल्पनांवर होत आहेत आणि होणार आहेत. त्यात याकुब वा कसाब, अफ़जल यांचे मुडदे प्यादे-मोहरे म्हणून वापरले जात असतात.


9 comments:

  1. Agadi mojakya shabdat yogya vishleshan- Supreme Courtcha ya purogamyana avar ghalu shakel- Ghatanet yavishayi kahi tartud aselach-

    ReplyDelete
  2. Pan mag hindutva hech rashtriytva ya ghoshnech kay. Tumchi mate malahi patatat pan hi ghoshna hindutvalach rashtritva mhante, te vegle nahit asa mandate. BJP ne adhichya kalat ti aanli hoti

    ReplyDelete
  3. अप्रतिम लेख.

    ReplyDelete
  4. अप्रतिम जबरदस्त भाऊ,,.
    आजवर मी तुमच्या वाचलेल्या लेखांपैकी सर्वोत्तम...

    ReplyDelete
  5. भाऊराव,

    लेखातलं शेवटून दुसरं वाक्य महत्त्वाचं वाटलं :

    >> हल्ले सतत तुमच्या राष्ट्रप्रेम, राष्ट्रवाद अशा संकल्पनांवर होत आहेत आणि होणार आहेत.


    हिंदू धर्मावरही हल्ले होताहेत. मात्र त्यांचं स्वरूप छुपं आहे. एमेफ हुसेनने हिदू देवतांची नग्न चित्रे काढणे हा हिंदू धर्मावर झालेला हल्ला आहे. देवतांची विडंबने हे हिंदू धर्मावरचे हल्लेच आहेत. मात्र तितकीशी जनजागृती नसल्याने ते लक्षात येत नव्हते. मात्र आता हिंदू जागे होत आहेत.

    आजच्या घडीला हिंदूंना एकत्र आणण्यासाठी धर्म पुरेसा नाही. त्यांना राष्ट्र, घटना, न्याय, इत्यादी प्रतीके लागतात. पण उद्या परिस्थिती वेगळी असणार आहे. कारण या सगळ्या प्रतीकांतून वाहणारं समान सूत्रं धर्म हेच आहे. हे हळूहळू स्पष्ट होत जाईल. ते झालं की हिंदुराष्ट्र दूर नाही.

    साहजिकंच ज्या शक्तींना हिंदूंचा उत्कर्ष सहन होत नाही त्या काहीतरी करून हिंदूंच्या एकीस सुरुंग लावायचा प्रयत्न करणार. याकूब मेमनसाठी मातम माजवणं याचाच भाग आहे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  6. मला सगळ्यात पहिले आवडले ते म्हणजे तुमचा लेख वाचण्यापूर्वीचा 'वैधानिक ईशारा'.
    परंतु मला असे वाटते की वेगवेगळ्या दावण्यांना बांधलेल्या भारतीय बुद्धांसाठी हा लेख जास्त कामी येईल कारण त्यांना त्यांच्या दावणीच्या बंदनाबाहेर येण्यास या लेखाने मदत होऊ शकते. आणि त्या दावणीच्या बंधनातून जेवढ्या लवकर हे मुक्त होतील तेवढ्या लवकर आपन एक सशक्त राष्ट्र म्हणून तयार होऊ शकतो.

    ReplyDelete
  7. मनापासून आवडला हा लेख...

    ReplyDelete
  8. khupach chhan va marmik asa lekh.

    ReplyDelete
  9. अप्रतिम विश्लेशन...

    ReplyDelete