Monday, August 17, 2015

कॉग्रेस, सोनिया-राहुलचा ‘वाघेला’ होतोय



‘मी जर भारतीय जनता पक्षामध्येच राहिलो असतो, तर कदाचित नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान होऊच शकले नसते‘ असा दावा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकर सिंह वाघेला यांनी केला आहे. वाघेला नव्वदच्या दशकात भारतीय जनता पक्षातून बाहेर पडले होते. आज कॉग्रेसचे गुजरात प्रदेश अध्यक्ष असलेले नेते शंकरसिंह वाघेला यांचे हे विधान वास्तववादी आहे. नरेंद्र मोदींना देशाचे पंतप्रधान बनवण्यातले त्यांचे योगदान खरेच अपुर्व आहे. कारण त्यांनी योग्यवेळी नेमक्या मुहूर्तावर चुक केली नसती, तर नरेंद्र मोदी हे भाजपाचे एक प्रचारक नेते म्हणून इतिहासात बुडून गेले असते. बाकीच्या जगाला त्यांचे नावही कधी कळू शकले नसते. राजकारण असेच सतत प्रवाहित असते आणि राजकीय नेते वा त्यांचे समुह त्यात ओंडक्याप्रमाणे गटांगळ्या खात असतात. एका ओंडक्याला दुसर्‍याचा अकस्मात धक्का बसतो आणि ज्या दिशेने तो वहात असतो त्याची दिशा बदलते. मग पुढे खडक वा अन्य ओंडक्यावर धक्का बसला, की पुन्हा दिशा बदलते. त्यात त्याला फ़ार कमी आवडनिवड करायची मोकळीक असते. राजकीय घडामोडीत तसेच काहीसे असते. पण इथे राजकीय नेते माणसे असतात आणि समोरून वा बाजूने येणारे धोके वा धक्के यातून थोडीफ़ार निवड करीत आपली दिशा ठरवू शकतात. त्यांच्यापाशी संयम व इच्छाशक्ती मात्र असावी लागते. अन्यथा असे नेते आपलाच कपाळमोक्ष करून घेतात. वाघेला त्याचीच साक्ष देत आहेत. १९८० नंतरच्या काळात एका मोटरसायकलवर बसून गुजरातमध्ये संघ व भाजपाचा प्रचार व प्रसार करणारे मोदी व वाघेला हे निकटचे सहकारी होते. पण वाघेला निवडणूकीत भाग घेणारे तर मोदी संघटनात्मक कामात रमलेले. म्हणूनच कुठल्याही सत्तास्पर्धेपासून मोदी दूर तर वाघेला हमरातुमरीवर उतरणारे उतावळे नेता होते. त्याच उतावळेपणाने त्यांना मागे पडावे लागले.

१९९५ सालात गुजरातमध्ये भाजपाने स्वबळावर बहुमत मिळवले आणि मुख्यमंत्रीपदाची माळ केशूभाई पटेल यांच्या गळ्यात पडल्याने वाघेला बेचैन होते. त्यांनी आपल्या गटतर्फ़े केशूभाईंना संपवण्याचे डावपेच खेळले. त्यातून लौकरच भाजपाचे सरकार डळमळीत झाले आणि वाघेलांनी उतावळेपणाने बाहेर पडून मुख्यंत्रीपदाची माळ आपल्या गळ्यात घालून घेतली. पण त्यासाठी त्यांना कॉग्रेसच्या हातचे खेळणे व्हावे लागले आणि अखेरीस कॉग्रेसच्या अडगळीत जमा व्हावे लागले. पण त्यांच्या अशा धरसोडवृत्तीने केशूभाई यांची गुजरात भाजपावरील पकड मात्र कायमची ढिली करून टाकली. त्याच्या परिणामी वाघेला पक्षात नसतानाही केशूभाईंना वयोमनानुसार राज्यकारभार जमेना, की पक्षावरही हुकूमत ठेवता आली नाही. पण तेव्हा म्हणजे एकविसाव्या शतकाच्या आरंभी पक्षाकडे बहुमत असूनही गुजरातला मुख्यमंत्री म्हणून कोणी खमक्या नेता शिल्लक राहिला नव्हता. अशावेळी या दोन्ही बड्या नेत्यांच्या भांडणात गुजरातबाहेर फ़ेकला गेलेला नेता पुन्हा राज्यात आणला गेला. त्याचे नाव नरेंद्र मोदी. संघटनात्मक काम करूनही कधी कुठलीच निवडणूक न लढवलेले नरेंद्र मोदी प्रशासकीय कामासाठी अगदीच नवखे होते. तर समोर विरोधातला खमक्या नेता म्हणून वाघेलाच त्यांना आव्हान द्यायला उभे होते. अशा परिस्थितीत गुजरात पेटला आणि मोदींना नामोहरम करायला वाघेला यांनी अपप्रचाराचे रान पेटवले. संपुर्ण देशात गुजरातच्या दंगलीने मोदींना बदनाम करून संपवायचा खेळ सुरू झाला. त्या प्रतिकुल अवस्थेत पक्षाचेही ज्येष्ठ नेते मोदींच्या समर्थनाला उभे राहिले नाहीत. तेव्हा मोदींनी एकट्याने गुजरातचा किल्ला लढवला आणि सत्ता टिकवली. मध्यावधी निवडणूका घेऊन तिसर्‍यांदा पक्षाला प्रचंड बहूमत मिळवून दिले. हा इतिहास सर्वश्रूत आहे. पण त्यापेक्षा त्यातला आशय समजून घेणे आवश्यक आहे.

वाघेलांनी असे विधान करण्याचा आशय मोलाचा आहे. राजकारणात मोदींनी आज जितकी उंची गाठली आहे, तितके स्वप्नही वाघेलांनी कधी बघितले नव्हते की त्या काळात मोदींचेही तसे काही स्वप्न नव्हते. पण वाघेलांच्या चुका व उतावळेपणाने मोदींना एका महान संधीची दारे सताड उघडी करून दिली. मग मोदींनी मागे वळून बघितले नाही. पण त्या काळात वय वाढणार्‍या केशूभाईंना सत्ता उपभोगू देवून आपला नंबर लागण्याचा व योग्य वेळ येण्याचा संयम वाघेलांनी दाखवला असतातर? तर मोदी कधीच निवडणूकीच्या राजकारणात आले नसते, की पुढे देशाचे पंतप्रधान बनले नसते. कारण ती त्याच्या राजकीय सामाजिक जीवनाची दिशाच नव्हती. वाघेलांची चुक मोदींना इथे घेऊन आली. पण तीच एकमेव चुक नव्हती. एकट्या वाघेलांचीही ती चुक नव्हती. पुढल्या घटनाक्रमात प्रत्येक प्रतिस्पर्धी वा विरोधाक अनवधानाने असेल, अशा चुका करत गेले, की त्यातून मोदींसाठी नवनव्या संधीची दारे उघडत गेली आणि मोदी सत्तेची शिडी चढत गेले. वाघेलांमुळे गुजरात भाजपात पोकळी निर्माण झाली असेल, पण पुढल्या दंगलीचे अनावश्यक भांडवल माध्यमे, सेक्युलर बुद्धीमंत व विरोधकांनी वाघेलांच्या इशार्‍यावर केलेले नव्हते. पण त्यांनीच मोदींना देशाच्या राजकीय क्षितीजावर आणून ठेवले. राष्ट्रीय राजकारणात पोकळी असताना खमक्या नेता म्हणून जी प्रतिमा मोदींची मागल्या पाच वर्षात झाली, ती मोदींपेक्षा त्यांच्याच विरोधकांनी केलेली आहे. तिचा लाभ आधी पक्षांतर्गत राजकारणात व नंतर राष्ट्रीय राजकारणात मोदींनी अतिशय धुर्तपणे करून घेतला. अतिरिक्त अपप्रचाराने संघ व भाजपाला आणून मोदींच्या पाठीशी उभे केले आणि पुढल्या काळात भरकटलेल्या सेक्युलर थोतांडाने मतदाराला मोदींच्या मागे उभे केले. भणजे दुसर्‍यांच्या चुकांनी मोदी जितके यश मिळावू शकले, त्यापेक्षा त्यांची व्यक्तीगत प्रयास कमीच होते.

मोदींच्या या वाटचालीत त्यांनी काय प्रयास केले, त्यापेक्षा इतरांनी काय चुका केल्या त्याची पडताळणी करू गेल्यास, तीनचार डझन अशी महत्वाची माणसे मिळतील की ज्यांना वाघेला यांच्यासारखेच कबुलीजबाब द्यावे लागतील. गुजरातच्या विधानसभा प्रचारात सोनियांनी मोदींना ‘मौत का सौदागर’ म्हणायची केलेली चुक. दंगलपिडीतांना न्याय देण्याच्या नावावर विविध सेक्युलर पक्ष व संघटनांनी स्वत:ला हिंदूविरोधी असल्याप्रमाणे पेश करण्याचा नाकर्तेपणा. मनमोहन सिंग यांचे बुजगावणे सरकार आणि भ्रष्टाचाराने माखलेल्या राजकारणात कर्तृत्वहीन पुत्राला सोनियांनी नेता म्हणून पेश करण्याचा केलेला अट्टाहास. अशा प्रमुख चुका आहेत. या प्रत्येकाने आपल्या परीने थोडा जरी शहाणपणा केला असता, तरी मोदी पंतप्रधान होऊ शकले असते काय? हा माणूस आपल्या मर्यादित कुवतीची पुर्ण जाणिव बाळगून आहे. म्हणूनच इतराच्या चुका शोधून त्याचे भांडवल करण्यावर त्याने आजवरचे राजकारण केले व यश मिळवले आहे. आपण चुका करू नयेत आणि दुसर्‍यांच्या चुकांचा लाभ नेमका उठवणे, ही मोदींच्या राजकारणाची रणनिती वा शैली राहिलेली आहे. पण माणसाचे सुदैव किती असावे, यालाही मर्यादा असतात. पण मोदींच्या नशिबाला मर्यादा नसाव्यात वाटते. अन्यथा इतक्या दारूण पराभवानंतरही त्यांच्या विरोधकांनी व प्रतिस्पर्ध्यांनी नवनव्या चुका करण्याचा सपाटा कशाला कायम राखला असता? आताच संसदेचे पावसाळी अधिवेशन पाण्यात गेले, त्यात मोदींच्या चुका दाखवण्यात अनेक बुद्धीमंत गर्क आहेत. पण ती कॉग्रेसने केलेली घोडचुक आहे आणि पुन्हा त्याचा राजकीय लाभ मोदी कसा उठवतात, ते लौकरच दिसेल. जोपर्यंत भारतीय राजकारणात वाघेला सारख्यांची कमतरता नाही, तोवर मोदींना यशाची चिंता करण्याचे कारण नाही. ताज्या घटनाच घ्या. निवडणूकांच्या पुर्वसंध्येला जी हातघाईची लढाई करायची असते, ती सोनियांसह विरोधकांनी तीन वर्षे आधीच खेळून झालेली आहे. २०१९ येईपर्यंत त्यांच्यात कितीसे बळ शिल्लक असू शकेल? हे पावसाळी अधिवेशन उधळण्यात काय चुक झाली, हे तेव्हा कळेल. पण तेव्हा सोनियांसह राहुलचा ‘वाघेला’ झालेला असेल ना?

2 comments:

  1. वाघेलाच काय कुत्रेलाही होईल त्या दोघांचा!!:-P :-P

    ReplyDelete
  2. टेनिस या खेळा मध्ये अनफ़ोर्सेड एरर सारखा हां प्रकार आहे आपले निरीक्षण एकदम बरोबर आहे। तसेच मोदी फार चतुर आहेत ते नेहमी विश्वासातील तदन्यांचा सल्ला घेतात, आणी गृहपाठ करतात दुसऱ्या मीटिंग मध्ये त्यांची तयारी तदन्यांच्या मार्गदर्शनमुळे भेटणाऱ्या व्यक्ति पेक्षा ज्यास्त असते. ते अचूक आणी प्रॅक्टिकल प्रश्न विचारतात।

    ReplyDelete