Saturday, August 22, 2015

‘जाणत्या राजा’च्या तोतया इतिहासाचे काय?



शेवटी कोर्टानेच अपशकुनी मामांना फ़टकारल्याने बुधवारी शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा सोहळा यथासांग पार पडला. पण त्या निमीत्ताने अनेकांचे बुरखे व मुखवटे पुरते फ़ाटून गेले. काहींचे तर आजवर विश्वासार्ह वाटलेले चेहरेही टरटरा फ़ाटले. जाहिर आरोप आक्षेपापासून कोर्टात दाद मागण्यापर्यंतचा एकच प्रमुख मुद्दा असा होता, की पुरंदरे हे इतिहास संशोधक नाहीत. म्हणूनच त्यांनी लिहीलेले व सांगितलेले शिवचरित्र विश्वासार्ह नाही. पण म्हणून ते शिवरायाची बदनामी करणारे ठरते, हा कुठला तर्क होता? आणि त्याचा आधार कुठला होता? माध्यमातून सामान्य माणसांची दिशाभूल करणे सोपे असते आणि तथाकथित पुरोगामी म्हणवणार्‍यांनी सहा दशके त्याच हत्याराने धुळफ़ेक चालवली आहे. पण न्यायालयात नीरक्षीर विवेकाने काम चालते आणि प्रत्येक आरोप साक्षी पुराव्यानिशी तपासून बघितला जातो. तिथे अशा बोगस आरोपाचे पितळ संपुर्ण उघडे पडले. नुसता आक्षेप फ़ेटाळून कोर्ट थांबले नाही, तर कोर्टाने याचिकाकर्त्यांवर आक्षेपाच्या संदर्भात प्रश्नांचा भडीमार केला. तेव्हा त्यांच्यापाशी कुठलेही तर्कसंगत उत्तर नव्हते. तर केवळ वेळकाढूपणा व अपशकुनी वृत्ती याचाच प्रत्यय आला. मग बचाव पक्षाच्या वकीलांनी केलेली मागणी कोर्टाने मान्य करून, याचिकाकर्त्यांना दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. पण यानिमीत्ताने एक महत्वाचा प्रश्न विचारणे भाग आहे. शिवशाहीर म्हणवणार्‍या बाबासाहेबांनी कधी आपण इतिहास संशोधक असल्याचा दावा केलेला नाही. तर शिवकालीन इतिहासाचे संदर्भ घेऊन शिवरायांचे गुणगान करणारा शाहीर, अशीच बिरूदावली मिरवली आहे. तर त्यांच्याकडून इतिहासाचे दाखले मागणेच गैरलागु होते आणि मागल्या अर्धशतकाच्या भारतीय इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍यांना जाब विचारण्याचे कर्तव्य विसरलेलेच, ते पाप करीत होते. आजकाल ‘जाणता राजा’ अशी बिरूदावली मिरवणार्‍या शरद पवार यांच्या नावावर, खात्यावर जो खोटा इतिहास संशोधन व अभ्यासपुर्वक लिहीला जातो, त्यावरच्या आक्षेपांना कोणी उत्तरे द्यायची?

जनमानसात खोटे कसे रुजवावे आणि त्याचेच आभासी वटवृक्ष कसे तयार करावेत, याचे कौशल्य आजकालच्या तोतया पुरोगामी इतिहासकारांपाशी ठासून भरलेले असते. म्हणूनच पुण्याच्या विद्यापिठातले राज्यशास्त्राचे दोन प्राध्यापक शरद पवारांना व त्यांच्या ‘मराठाप्रधान’ राजकारणाला पुरोगामी वाटचाल ठरवून ‘जाणता राजा’ बनवण्याचे उद्योग करतात. त्यासाठी खोट्यानाट्या गोष्टी व घटना भरलेला इतिहास लिहून काढतात आणि ग्रंथालीसारखी ख्यातनाम संस्था तो दिशाभूल करणारा ग्रंथ प्रकाशित करते. त्यातला खोटेपणा जगाला ओरडून सांगण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याचे पोस्टमार्टेमही पुस्तक रुपाने प्रसिद्ध झालेले आहे. पण आजही विद्यार्थ्यांना तेच फ़सव्या इतिहासाचे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून सक्तीने अभ्यासायला भाग पाडले जाते. तेव्हा इतिहासाची चाड असलेल्यांना सत्याची किती चाड उरली आहे, त्याची प्रचिती येते. ग्रंथालीने केवळ शरद पवार यांना चव्हांणांनंतरच्या महाराष्ट्राचा एकमेव जाणता राजकारणी ठरवण्यासाठी ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ नावाचा ग्रंथरूप भ्रष्टाचार केला आहे. त्याची पुर्ण तपशीलवार लक्तरे मी एका पुस्तकाद्वारे काढलेली आहेत. बाबासाहेबांच्या इतिहासज्ञानाला आव्हान देणार्‍या एकाही सह्याजीरावाने त्यावर प्रतिक्रिया कशाला दिलेली नाही? आजही त्याच माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची बुद्धी भ्रष्ट केली जात आहे. त्याची यापैकी एकालाही फ़िकीर कशाला नाही? ज्या राजकारणाचे आजच्या पिढीला भयंकर दुष्परिणाम भोगावे लागत आहेत, त्यालाच महाराष्ट्राचे उज्ज्वल भवितव्य ठरवणारी ऐतिहासिक अफ़रातफ़र मी समोर आणली. त्यावर चिडीचूप मुग गिळून गप्प बसणार्‍यांचा भूषण-विरोधी तमाशा म्हणूनच निव्वळ कांगावा असतो. म्हणूनच असल्या कांगाव्याला आशीर्वाद दिल्याप्रमाणे खुद्द शरद पवार त्यामध्ये लुडबुड करतात, तेव्हा खरोखरच संताप येतो.

शिवकाळाचे कोणी प्रत्यक्षदर्शी साक्षिदार आज सापडू शकत नाहीत. म्हणून बाबासाहेब असोत की शरद पवार असोत, त्यांचे तेव्हाच्या इतिहासाबद्दल एकमत होऊ शकत नाही, वाद होणारच. पण मागल्या अर्धशतकातल्या घटनांचे खुद्द शरद पवार साक्षिदार आहेत. म्हणूनच राजेंद्र व्होरा व सुहास पळशीकर या दोघा प्राध्यापकांनी ग्रंथाली प्रकाशित जी पवार गौरवगाथा गायली आहे, त्यातला खरेखोटेपणा खुद्द पवारच सांगू शकतील ना? ज्यांना ‘जाणता राजा’ संबोधलेले आजही आवडते, त्याच पवारांनी आपल्याच नावावर खपवला जाणारा खराखोटा इतिहास तपासून बघितला आहे काय? त्यांच्या राजकारणातील वडाची साल पिंपळाला लावून सरड्याला हत्ती ठरवण्याचा उद्योग उपरोक्त प्राध्यापकद्वयांनी केलेला आहे. त्याबद्दल हा जाणता राजा ‘अजाणता’ आहे, असे कोणी मान्य करावे? बाबासाहेबांच्या डझनावारी पुस्तकांचे ‘वाचन’ करणारा माणुस आपल्याच गुणगान करणार्‍या ग्रंथाविषयी अजाणता असेल काय? मग त्यातल्या खोट्या घुसडलेल्या गोष्टी व घटनांविषयी त्याने कधीतरी ह्या प्राध्यापक व प्रकाशकांकडे तक्रार केली होती काय? नसेल तर मग आज त्याला बाबासाहेबांच्या इतिहास ज्ञानाविषयी शंका विचारण्याचा नैतिक अधिकार उरतो काय? स्वत:विषयी खोटा व विकृत इतिहास आजच्या पिढीला सत्यकथन म्हणून गळी मारला जाण्याची चिंता पवारांना कशाला नसते? तर खोटाच इतिहास लोकांच्या गळी मारणे हाच अजेंडा आहे. म्हणून यातला कोणी सह्याजीराव बुद्धीमंत व्होरा-पळशीकरांच्या फ़सव्या इतिहास ग्रंथाला विद्यापिठीय अभ्यासात स्थान देण्यावर आक्षेप घेत नाही. पण व्याख्यानातून खेडोपाडी गेलेल्या बाबासाहेबांच्या इतिहासावर काहुर माजवले जाते. मी असे छातीठोकपणे सांगू शकतो. कारण मान्यवर अशा बहुतेक लेखक संपादकांच्या नजरेस हाच विकृत इतिहास व अभ्यास मी कित्येक वर्षापुर्वी आणून दिला आहे. पण उपयोग नाही.

व्होरा-पळशीकर किंवा ग्रंथालीचे मुखंड पुरोगामी असतात आणि मग जातीसाठी खावी माती, याच तत्वानुसार बाकीचे पुरोगामी आपल्याच ‘जातभाईंच्या’ अब्रुला तडा जाईल म्हणून त्याबद्दल मौन धारण करून बसतात. त्यालाही हरकत नाही. ग्रंथाली वा तत्सम लोकांनी पवारांची शाहिरी करायला माझा आक्षेप असण्याचे कारण नाही. पण जेव्हा तोच खरा इतिहास म्हणून विद्यापीठीय अभ्यासात संदर्भग्रंथ म्हणून गळी मारला जातो, तेव्हा चिंतेचा विषय बनतो. खोटे पुरावे कसे निर्माण करावेत आणि तर्कबुद्धीने युक्तीवाद करत अमावास्येला पौर्णिमा कसे ठरवावे, याचा उत्तम नमूना म्हणून व्होरा-पळशीकरांच्या मुळ पुस्तकाचे परिशीलन करावे आणि मगच त्यातला धडधडीत खोटेपणा म्हणून त्याचे पोस्टमार्टेम असलेले माझे पुस्तक `कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ अभ्यासावे.  ते पोस्टमार्टेम करून एकोणिस वर्षे उलटली आहेत आणि अजून आपल्या खोटेपणाचा अभ्यासपुर्ण खुलासा हे पुरोगामी लेखक-प्रकाशक देवू शकलेले नाहीत. पण आता तर ते खर्‍या इतिहास व अभ्यासालाही आव्हान देण्यापर्यंत मुजोर झालेत. म्हणूनच त्याच्या पुरोगामी खोटेपणाचे मुखवटे संधी मिळेल तिथे व तेव्हाच फ़ाडणे अगत्याचे होऊन बसले आहे. ह्यात विलंब झाला तर उद्या शिवराय हाच स्वराज्याला धोका व अफ़जलखान वा औरंगजेब हेच स्वराज्याचे प्रणेते असल्याचाही इतिहास आपल्या गळी उतरवण्यापर्यंत मजल जाऊ शकते. अब्दुल कलामांच्या जागी दाऊद इब्राहीम आदरणिय व्यक्तीमत्व म्हणून आपल्या माथी मारला जाऊ शकतो. तोतया पुरोगाम्यांना वेळीच बाजूला करण्यात खरे प्रामाणिक पुरोगामी तोकडे पडल्याचा हा दुष्परिणाम आहे. आता प्रतिगामी अशा तोतया पुरोगाम्यांच्या मुजोरीला वेळीच थोपवू शकले नाहीत, तर हा देशही इतिहासजमा होऊ शकणार नाही. कारण आपल्याला इतिहासच उरलेला नसेल.

बाबासाहेब पुरंदरे पुरस्काराच्या निमीत्ताने जे तोतयांचे बंड झाले, त्याची पार्श्वभूमी समजून घ्यायची असेल तर ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ या पुस्तकात तपशीलाने मांडलेली पुरोगामी तोतयेगिरी सविस्तर उपलब्ध आहे. ज्यांना ते पुस्तक हवे असेल त्यांनी चपराक प्रकाशन यांच्याशी संपर्क साधावा.

http://www.chaprak.com/contact-chaprak/

'चपराक'चे कोणतेही पुस्तक घरपोहच हवे असल्यास संपर्क साधा- 020 24460909 / 7057292092

5 comments:

  1. B M Purandare prakaramule ek Goshta matra prakarshane janawali ti mhanaje tumhi mandali jyanna mi changale vicharwant manat hoto kinwa jyanche lekh vichar mala patayache, te suddha JATI chya vilakhyat adakun aahet. Sarv chya sarv B M Purandare che jatbhai asalyamule tyanchi baju ghet aahet. Tyanni ek goshta lakshyat ghyavi B M purandare yancha jatibaddal virodh nahi nahi nahi , tyanchya likhana baddal aahe, He tumhala kitihi Thankavun sangitale tar te 'zopech song karnaryala uthwanya sarkha tharel' karan tumhala he patat asle tari tumhi kadhi manya karnar nahi. Karan mulat jatiywad tumha lokannach karaychay.
    Jar aakshep jaticha asta tar ya agodar kiti Bramhan lokanna Maharashtra Bhushan dila tevha asach virodh ka??
    Bhau, tumchya sarkhya lokanna Ase Jatiywadi hovun chalnar nahi. Tumhi "Bharatiy" hich 'Jat ' aani 'Dharma ' yas protsahan dile pahije.
    Aso. Shewti vichar aaple aaple

    ReplyDelete
    Replies
    1. Sandipji, zopech song tar awvad samarthakanni ghetla aahe. anni Fadanweesanna target karnyachya nadat tumhi, babasahebansarkhya jeshtha vyaktinna balicha bakra banwu pahta, hi kilaswani goshta aahe.

      Delete
  2. जे तोतया पुरोगाम्यांबद्दल म्हटले आहे तेच सेक्युलर या शब्दाला ही लागू होऊ शकते . कृपया पहावे http://tinyurl.com/pos36gb

    ReplyDelete
  3. Babasaheb Purandare has done tremendous work to keep alive Faith and memories of Chhatrapati Shivaji
    In cores of people. Hats off to Him.

    ReplyDelete
  4. Sandipji, zopech song tar awvad samarthakanni ghetla aahe. anni Fadanweesanna target karnyachya nadat tumhi, babasahebansarkhya jeshtha vyaktinna balicha bakra banwu pahta, hi kilaswani goshta aahe.

    ReplyDelete