Tuesday, August 25, 2015

दाऊदच्या गौप्यस्फ़ोटामागचा गर्भित डाव?भारताच्या गुप्तहेर संस्थेने दाऊद कुठे रहातो याचे पुरावे गोळा केल्यावर त्याचा गवगवा केल्याने खेळी फ़सली आणि अशा गोष्टी उघड करायच्या नसतात. त्यासाठी मिरवायचे नसते, असे आपल्याकडल्या अनेक बुद्धीमंतांना वाटते. म्हणूनच दाऊदचा नवा फ़ोटो वा त्याच्या पत्नीशी झालेल्या संवादाचे मुद्रण ऐकवण्यात भारतीय हेरखात्याने कसा मुर्खपणा केला, त्याचे पांडित्य सांगितले गेले. पण ज्यांनी अशी बातमी देताना आपणच दाऊदच्या पत्नीशी संपर्क साधल्याचे कौतुक करून घेतले त्यांनाही अशा गोष्टी कशासाठी होत असतात, त्याचा पत्ता लागलेला नसावा. पहिली गोष्ट म्हणजे गुप्तहेर खाते वा त्याच्या कारवाया राजकारण व मुत्सद्देगिरीच्या पलिकडचा विषय असतो. व्यापक राजकारणातली व्युहरचना गुप्तहेरांच्या कारवाईतून होत असते. त्यामध्ये काही छुप्या खेळी असतात, तर काही उघड खेळी असतात. दाऊदचा नवा फ़ोटो वा त्याच्या पत्नीशी झालेल्या संवादाला प्रसिद्धी देण्यामागे अशीच काही खेळी असू शकते. मात्र त्याचा विचार करायचीही अनेकांना गरज वाटत नाही. आपल्या समजुती वा भूमिका याच्या पलिकडे जग चालते, त्याचाही अशा लोकांना गंध नसतो. म्हणूनच ऐन मोक्याच्या वेळीच दाऊदविषयी हा गौप्यस्फ़ोट कशाला करण्यात आला, ते त्यांना उमगतही नाही. किंबहूना त्यामागची रणनिती सरकार वा गुप्तहेर खात्याने पत्रकार परिषद घेऊन जाहिर करावी, अशी त्यांची अपेक्षा असावी. अन्यथा त्याच्या परिणामांचा विचार झाला असता. त्यावर वायफ़ळ पांडित्य सांगायची हौस भागवली गेली नसती. मात्र हे पांडित्य सांगून संपण्यापुर्वीच पाकिस्तानात पळापळ सुरू झाली आणि दाऊदला कराचीतील घरातून कुटुंबासह उत्तर पाकिस्तानात सुरक्षित जागी हलवण्यात आल्याची बातमी आली. त्यातून अशा खेळीमागचा डाव लक्षात येऊ शकतो. पण ज्यांना तो समजून घ्यायचा असेल, त्यांनाच तो बघावा असे वाटणार ना?

कुठल्याही गुतहेर खात्याच्या कामात नुसती माहिती काढणे वा घातपात करणे इतकेच काम नसते. मित्र व शत्रू देशातील गुप्तहेर खाती आपापल्या सरकारच्या धोरणाला पुरक ठरेल अशा खेळी करीत असतात आणि त्यानुसार हवी असलेली माहिती व साधनांचा उपयोग करून घेत असतात. सध्या भारताने पाकिस्तानला कोंडीत पकडण्याचे धोरण आखलेले आहे. त्याला पुरक होईल अशाच खेळी मुत्सद्देगिरी व गुप्तचर खात्याकडून खेळल्या जाणार ना? मग त्यात ठरलेली बोलणी फ़िसकटणे. पाकिस्तानने त्यातून माघार घेणे वा पाकिस्तानच्या अंतर्गत गोटात परस्पर शंका-संशयाचे वातावरण निर्माण होणे; अशा अनेक खेळी संभवतात. दाऊदची माहिती उघड करणे त्याचाच एक भाग असू शकतो. नुसता दाऊदचा पत्ता ठाऊक असल्याने त्याला तिथे जाऊन उडवणार असा होत नाही. तर तुम्ही ज्याला लपवून सुरक्षित जागी ठेवला असा दावा आहे. तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो, असे भासवून शत्रूची तारांबळ उडवून देण्य़ाचाही त्यामागे डाव असू शकतो. दाऊदच्या पत्नीचा फ़ोनवर बोलतानाचा व्हीडीओ त्यातला सूचक इशारा असू शकतो. कोणीतरी आतला माणूस फ़ितूर असल्याचे त्यातून भासवले जात असते. कडेकोट बंदोबस्तामध्ये असलेल्या व्यक्तीचे असले चित्रण तिथल्या बंदोबस्तातील त्रुटी सिद्ध करत असते. म्हणून तिथपर्यंत कोणी मारेकरी सहज पोचणे शक्य असते, असे अजिबात नाही. पण बंदोबस्त करणार्‍यांचा आत्मविश्वास खच्ची करायला अशी माहिती वापरण्याचा प्रयास असू शकतो. ती माहिती दाऊदपर्यंत पोहोचण्यासाठी अजिबात निरूपयोगी असली, तरी आत्मविश्वासाला खिळखिळा करायला उपयुक्त असते. नेमका तोच डाव साधला गेला आहे काय? कारण दोनच दिवसात दाऊदला कराचीतून अन्यत्र सुरक्षित जागी हलवण्याची बातमी आलेली आहे. ती बातमी खरी असेल तर ह्या गौप्यस्फ़ोटाचा हेतू सफ़ल झाला असेच म्हणावे लागेल.

दुसरी बाब अशी, की दाऊदला कराचीत आपण सुरक्षित ठेवू शकत नाही, हे पकिस्तानने कृतीतून मान्य केले, असाही या बातमीचा अर्थ होतो. पुन्हा अशा बातम्या खर्‍या असतील तर शत्रूच्या गोटात आणखी खळबळ उडवून देण्यास पुरेशा असतात. गुप्तहेर खात्याच्या कामात हिंसा वा धमाक्यापेक्षा संशयाची पेरणी अधिक स्फ़ोटक व घातक असते. कारण एकाच संस्था संघटनेतील लोकांमध्ये परस्परांविषयी संशय वाढवण्यास ती बातमी कारण होते. दाऊदला कराचीतून हलवल्याची बातमी खरी असेल, तर तो डाव यशस्वी झाला असेच मानावे लागेल. आणि अशी ही पहिलीच खेळी नाही. गेल्या वर्षाच्या अखेरीस वेदप्रकाश वैदिक नावाच्या तोंडपाटिलकी करणार्‍या ज्येष्ठ पत्रकाराच्या बाबतीत हेच घडले होते. एका पत्रकार पथकासोबत पाकिस्तानात सेमिनारला गेलेला हा वैदिक नावाचा पत्रकार, थेट तोयबाचा प्रणेता सईद हाफ़ीज याच्या घरापर्यंत जाऊन बोहोचला होता. सईदची भेट घेऊन त्याला भारतात येण्याचे आमंत्रण त्याने दिले होते आणि त्याबाबतीत त्याच्या सोबत पाकिस्तानात गेलेले बहुतांश पत्रकार अनभिज्ञ होते. किंबहूना ते अनेकदा तिथल्या आमंत्रणावरून पाकिस्तानला भेट दिलेले व तिथे अनेक मित्र असलेले मुरब्बी पत्रकार होते आणि त्यांनीच वैदिकला तिथे सोबत नेलेले होते. पण त्यांना अंधारात ठेवून वैदिकने केलेल्या कारवायांनी त्याच ‘मुरब्बी’ भारतीय पत्रकारांना चकीत व्हायची पाळी आलेली होती. पण वैदिकच्या त्या पराक्रमाला प्रसिद्धी मिळाली आणि इथल्या पाक-मित्र पत्रकारांची बोबडी वळली होती. तर तिकडे सईद हाफ़ीज पुढले दोन महिने कुठल्या कुठे गायब झालेला होता. मग अशा प्रसिद्धी व गाजावाजा करण्यामागची खेळी समजून घ्यायची असते. त्यामागे शत्रूच्या बालेकिल्ल्यात पुरेशी सुरक्षा नसल्याचे दाखवून खळबळ माजवच्याचा हेतू असतो. तो हेतू समजला तरच अशा खेळीची मजा लक्षात येऊ शकते.

दाऊद विषयीचा मागल्या आठवड्यातील गौप्यस्फ़ोट हा दोन देशातील बोलण्यांवर प्रभाव पाडण्याची खेळी नव्हती. तर पाकिस्तानला विचलीत करण्याची धुर्त खेळी होती. त्यात मग अर्णब वा टाईम्स नाऊ वाहिनीला साळसूदपणे वापरून घेतले जाते. त्याचे श्रेय त्यांना दिले जाते. त्यांना आपणच धक्कादायक बातमी दिल्याची मर्दुमकी गाजवल्याचे समाधान मिळते. पण दुसरीकडे शत्रूला त्याच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडणे किती सोपे आहे, त्याचा साक्षात्कार घडवून भयभीत करता येते. यात दाऊदचा नवा वयस्कर झालेला फ़ोटो कोणा निकटवर्तियाने घेतलेला असू शकतो. त्याचप्रमाणे घरात बंदिस्त असलेल्या दाऊदच्या पत्नीचा असा व्हीडिओही तिच्यापर्यंत पोहोचणे शक्य असल्याचे दाखवून देतो. पण तिथेच गोष्ट संपत नाही. असे चित्रण करणारा बाहेरचा कोणी असण्यापेक्षा आसपास वावरणार्‍यांपैकी असल्याचा संशय बळावतो. मग तिथे परस्परांना संशयाने बघणे सुरू होते. दुसरी गोष्ट नजरकैदेत असलेल्या दाऊदला हलवताना कितीही काळजी घेतली, तरी थोडीफ़ार माहिती फ़ुटतेच. आताही नुरी या जागी त्याला हलवल्याची बातमी खरी असेल, तर त्यातून आणखी संशयकल्लोळ उठणार आहे. त्यामुळे एकुण दाऊद प्रकरणातला गवगवा दोन देशातील बोलण्यांशी संबंधित नाही, हे लक्षात येऊ शकेल. त्या निमीत्ताने माजवलेला तो संशयकल्लोळ आहे. मुत्सद्देगिरी व गुप्तचर कार्य यातला हा फ़रक आहे. पण ते समजून घेण्यासाठी मुळात त्याचा अभ्यास करावा लागतो. त्यातले परस्पर पुरक काम आणि फ़रक दोन्ही लक्षात आले तर त्यामागचे हेतू उमजू शकतात. निव्वळ पुस्तकी पांडित्य त्यात कामाचे नसते. आपली यंत्रणा व सुरक्षा आतून किती पोखरली गेली आहे, याविषयी पाकच्या मनात शंका निर्माण करण्याचा तो डाव असू शकतो. त्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन सांगितली जात नाही, की धुर्त मुत्सद्देगिरीचे हेतूही जाहिरपणे सांगितले जात नाहीत.

No comments:

Post a Comment