Monday, August 24, 2015

अधू मेंदुचा मधूनरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुका जिंकल्या हा त्यांचा पराक्रम कोणी नाकारू शकत नाही. पण एकदा निवडणूका जिंकल्या, मग त्यांचे काम संपलेले होते. त्यांनी बाकीचे राजकारण सोडून मराठी शिकायला घेतले पाहिजे होते आणि शक्य तितक्या लौकर मराठीत अग्रलेख लिहून दैनिक ‘लोकसत्ता’चे गिरीश कुबेर यांना थोडी सवड द्यायला हवी होती. म्हणजे देशातील विविध समस्या व प्रश्नांची उत्तरे शोधत बसायची वेळ मोदींवर आलीच नसती. कारण जगातल्या कुठल्याही प्रश्नावर समस्येवर अक्सिर इलाज असलेला एकमेव हकिम-वैद्य आज पृथ्वीतलावर कोण असेल, ते गिरीश कुबेर होत. मग विषय याकुब मेमनला फ़ाशी वा अन्य कुठली शिक्षा देण्याचा असो किंवा पाकिस्तानशी बोलणी करण्याचा असो. तिथे काय करावे किंवा करू नये, याची योग्य माहिती व कृती फ़क्त कुबेरांनाच अवगत आहे. सहाजिकच निवडणूका जिंकल्यावर मोदींनी भारत सरकारचे कामकाज कुबेरांकडे सोपवून अग्रलेख लिहायचे काम हाती घ्यायला नको काय? पण मोदींना सत्तेचा हव्यास इतका, की पंतप्रधान पदाची शपथ घेऊन ते देशाचा कारभार हाकू लागले. आणि बिचार्‍या कुबेरांना इथे लोकसत्तेचे अग्रलेख लिहायची खर्डेघाशी करण्यात आपली बुद्धी व गुणवत्ता वाया घालवण्याचे बुरे दिन आले. अर्थात त्यामुळे कुबेरांचे कुठलेच नुकसान होणार नाही. नुकसान मोदींचेच होईल. कारण इतका कुशाग्र बुद्धीचा माणूस उपलब्ध असताना त्याच्यावर काम सोपवण्याचा विचारही मोदींनी केला नाही. अन्यथा एव्हाना पाकिस्तान कसा सुतासारखा सरळ आला असता आणि याकुबनेही दाऊदला आणून भारताच्या हवाली केले असते. कुठल्या वाटाघाटी वा अटीशर्थींची वेळही आली नसती. पण मोदींना नुसता चमकण्याचा हव्यास अधिक. त्यामुळे देशाचे भयंकर नुकसान झाले आहे. यापुढेही होणार आहे. ‘हात दाखवून’ अवलक्षण म्हणतात ते यालाच.

आता पाकिस्तानला भारताशी बोलणी वा वाटाघाटी करायला आवडत नाहीत तर त्याला तेच करायला भाग पाडणे म्हणजेच मुत्सद्देगिरी असते. हेच मोदींना ठाऊक नाही. कारण मोदी लोकसत्ता वाचत नाहीत. वाचत असते तर त्यांनी कधीच कुबेरांना आपल्या गुरूस्थानी नेमून बारामतीऐवजी लालबागच्या हनुमान गल्लीत जाण्याचे कष्ट घेतले असते आणि बारामतीच्या शरद पवारांना प्रतिमहिना फ़ोन करण्यापेक्षा कुबेरांचा दरमहा सल्ला घेतला असता ना? पण म्हणतात ना? घरकी मुर्गी दाल बराबर? कुबेरांचे तेच दुर्दैव आहे. तिकडे दूर पाकिस्तानात बसलेले राजकारणी, मुत्सद्दी कुबेरांच्या अग्रलेखाने नित्यनेमाने वाचन व परीशीलन करतात. म्हणून त्यांनाच हवे तसे जगातले राजकारण चालत असते. आपल्याला भारताशी बोलणी नकोच आहेत, हे कुबेरांना नेमके कळते हे लक्षात आल्यापासून पाकिस्तानात लोकसत्ताचा खप नि वाचक कमालीचे वाढले आहेत. किंबहूना आमच्या माहितीप्रमाणे पाकचे सुरक्षा सल्लागार सरताज अझीज कुबेरांशी नित्यनेमाने संपर्कात असतात. त्यांचा वेगवेगळ्या विषयावर सल्लाही घेत असतात. म्हणून तर उफ़ा येथील मोदी-शरीफ़ भेटीत ठरलेली बोलणी कशी बारगळावीत, त्याची योग्य पावले अझीज उचलू शकले. मोदींना तर कुठल्या शरीफ़ला भेटावे त्याचाही थांगपत्ता अजून लागलेला नाही. पाकिस्तानात जनरल राहिल शरीफ़ हा खरा सत्ताधीश आहे आणि नवाज शरीफ़ हा नामधारी सत्ताधीश पंतप्रधान म्हणून मिरवत असतो. त्यातल्या नवाजला भेटून बोलणी ठरवून काय व्हायचे होते? भेटायचे व बोलायचे तर हे राहिल शरीफ़शी बोलायला हवे. रशियात उफ़ा येथे जाण्यापुर्वी मोदींनी तशी मसलत कुबेरांशी केली असती, तर मुळात तिथे जाहिर झालेले संयुक्त निवेदन तरी कशाला प्रसिद्ध झाले असते? आणि प्रसिद्ध होऊनही त्यात कुठले मुद्दे आहेत, ते कुबेरांना कशाला दिसले नसते?त्या उफ़ा येथील भेटीत दोन देशांच्या पंतप्रधानांनी एक संयुक्त निवेदन काढले आणि त्यात कुठेही काश्मिरचा उल्लेख नाही, म्हणून पाकिस्तानी राजकारणात गदारोळ माजला होता. याचा अर्थ निवेदनातले मुद्दे ठाऊक नसतानाच तिथे गदारोळ झाला असणार ना? जे मुद्दे भारताने लपवून ठेवले व त्याविषयी कोणाला विश्वासात घेतले नाही असे कुबेर म्हणतात, त्याचा अर्थ प्रसिद्ध झालेल्या संयुक्त निवेदनाखेरीज त्यात अनेक छुपे मुद्दे असणारच. शिवाय ते कुबेरांना कळले नाहीत वा त्यांनी वाचले नसतील, म्हणजेच ते लपवलेले असणार. मग भले त्यावरून पाकिस्तानात काहुर माजलेले असो किंवा त्यामुळेच दोन्ही देशातल्या वाटाघाटी फ़िसकटलेल्या असोत. कुबेरांना ठाऊक नाहीत म्हणजे मुद्दे लपवलेलेच असणार. पण मग असा प्रश्न येतो, की पाकिस्तानातले लोकसत्ताचे चोखंदळ वाचक त्याच निवेदन व मुद्द्यावर इतके प्रक्षुब्ध कशाला झालेले होते? लपवलेले मुद्दे म्हणजे काय? कुबेर लिहीतात, ‘सोमवारपासून सुरू होणारी बैठक या उफा चर्चेच्या आधारे होणे अपेक्षित होते. परंतु उफा चर्चेत काय ठरले हेच आपण देशास सांगितलेले नसल्याने त्याबाबत आपण जे बोललो ते पाकिस्तानने खोडून काढले.’ सवाल इतकाच, की भले मोदी वा भारत सरकारने उफ़ाबद्दल कोणाला काही समजावलेले नसेल. पण मग पाकिस्तानात शरीफ़ यांनी तरी कोणाला काही समजावले की नाही? नसेल तर सीमेच्या अलिकडे व पलिकडे मागला महिनाभर या चर्चेविषयी धुमाकुळ कशाविषयी चालला होता? नवाज शरीफ़ यांच्यावर तिथले लष्करवादी व जिहादी कशाला तुटून पडले होते? शेवटच्या दिवसात पाक पत्रकार मायदेशीच्या सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांची खिल्ली कशाला उडवत होते? आणि कुबेरांना फ़डतूस वाटतात त्या भारतीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल यांचे पकिस्तानात कौतुक कशाला चालले होते?

सगळा नरेंद्र मोदींचा मुर्खपणा आहे. पहिली चुक म्हणजे निवडणूका जिंकल्यावर त्यांनी कुबेरांना पंतप्रधानपदी नेमायला हवे होते. पुढे मुत्सद्देगिरीने पाकिस्तानला बोलणी करायला भाग पाडण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयही कुबेरांच्याच हाती असायला हवे होते आणि सुरक्षेचा मुद्दा महत्वाचा असल्याने पंतप्रधान व त्याचा सल्लागार अशी दोन्ही पदे कुबेरांपाशीच असायला हवी होती. मग मुत्सद्देगिरीच्या नुसत्या शब्द व फ़टकार्‍यांनीच पाकिस्तानची इतकी घुसमट कुबेरांनी करून टाकली असती, की इथे सरताज व नवाजसह राहिल शरीफ़ही प्राणवायूच्या नळकांड्या शोधत गयावया करीत आले असते. कुबेरांनी दाऊदचा पत्ता वा पत्नीचे फ़ोटो दाखवण्यापेक्षा फ़ाशी झालेला याकुब मेमन इस्लामाबादला पाठवून भारत सरकार किती सशक्त आहे, त्याचाच पुरावा जगाला दाखवला असता. मग बिचारा दाऊद नाक मुठीत धरून शरीफ़ सरताज यांच्यासोबत प्राणवायु मिळावा म्हणून भारताला शरण आला असता. पण भाजपासह मोदींनी एकामागून एक मुर्खपणाचा सपाटा लावला. निवडणूकात बहुमत मिळवून पंतप्रधान होण्याचा हव्यास केला आणि पुढे परराष्ट्र खात्याचे निर्णय घेण्याचाही हव्यास मोदींनी केला. पाकिस्तानला भारताशी बोलणी नकोत तर त्याची इच्छा पुर्ण व्हावी अशीही चुक मोदींनी केली. खरे तर पाकिस्तानशी वाटाघाटी करण्यापेक्षा क्रिकेट खेळावे इतकी साधी गोष्ट मोदींना कळत नाही. त्यांना मुत्सद्देगिरी कशी उमजणार? ‘सर्व सूत्रे होती ती आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या हाती. ते थेट पंतप्रधान मोदी यांना उत्तरदायी आहेत. डोवल हे हेरगिरी व्यवस्थेत माहीर असतील. परंतु म्हणून त्यांना मुत्सद्देगिरी जमते असे मानणे दूधखुळेपणाचे. मुत्सद्देगिरीची पहिली अट म्हणजे आपण किती शूर आहोत याची छाती पिटायची नसते आणि शत्रुपक्षाची चौर्यकृत्ये कशी पकडली ते मिरवायचे नसते.’ इति कुबेर.

परराष्ट्र व्यवहार वा मुत्सद्देगिरीच नव्हेतर हेरगिरीतही कुबेर माहिर आहेत. म्हणूनच त्यांना स्वत:चा हा सशक्तपणा इतका सतावत असतो, की जगातले उर्वरीत सगळेच त्यांना अधूनमधून अशक्त वाटू लागतात. कधी फ़ासाची दोरी ओढणारा वा फ़ाशीची तारीख पक्की करणारा त्यांना अशक्त वाटतो. तर कधी फ़ाशी जाणारा व त्याला फ़ाशी देणाराही अशक्त वाटतो. आता कुबेरांना पाकिस्तानची कोंडी करणेही अशक्तपणाचे लक्षण वाटू लागले आहे. शौर्यासाठी मिरवायचे नसते असा नवा शोध त्यांनी लावला आहे. मग शौर्य गाजवले तर काय तोंड काळे करून दडी मारून बसायचे असते? मुत्सद्देगिरीत बहुधा तसे असावे. याचा अर्थ सहज उलगडणार नाही म्हणून आपण उदाहरण घेऊ. पाकिस्तानचे अवघे दहा ‘लढवय्ये’ समुद्र मार्गे मुंबईत आले आणि त्यांनी खुलेआम शेकडो लोकांची कत्तल केली. केवढे शौर्य गाजवले ना? परंतु पाकिस्तानने ते कधी मिरवले आहे काय? उलट त्याचे ‘श्रेय’ त्यांना भारत देत असतानाही पाकिस्तानने ते शौर्य नाकारलेले आहे. कसाब किंवा त्याच्या टोळीने केलेला पराक्रम पाकिस्तान आपले शौर्य म्हणून कायम नाकारत राहिला. याला ‘कुबेरी मुत्सद्देगिरी’ म्हणतात. नाहीतर आमचे मोदी नाहीतर डोबाल. मुत्सद्देगिरीच्या नावाने नुसता शिमगा. साधा दाऊदचा पत्ता मिळवला किंवा त्याच्या बायकोचे फ़ोनवरील संभाषण मुद्रीत केले, तर किती छाती फ़ुगवायची? बहुधा एवढ्यासाठीच पाकिस्तानचे जाणते राजकारणी व मुत्सद्दी हेर लोकसत्ताचे नित्यनेमाने वाचन करत असावेत. अन्यथा त्यांना कुठे मिरवावे आणि कुठे तोंड काळे करून बसावे, त्याचा अंदाज कशाला आला असता? असो, कुबेरांची सोमवारी जे काही पांडित्य, मुत्सद्देगिरी व बुद्धीमत्तेचे कौशल्य दाखवले, ते वाचून सहा दशकापुर्वी दैनिक ‘मराठा’त आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहीलेल्या एका सणसणित अग्रलेखाचे शीर्षक आठवले.

अधू मेंदुचा मधू

11 comments:

 1. भाऊ अप्रतिम आणि मार्मिक.....!

  ReplyDelete
 2. एखाद्याच्या कानाखाली जाळ काढणे म्हणजे काय??
  त्याचे उत्तर म्हणजे हा लेख..

  भाऊ, दहा हजार वर्षात असा लेख होणे नाही!! असे बहुधा अत्रे हा लेख वाचून म्हणाले असते. :D

  ReplyDelete
 3. सडेतोड उत्तर. पण तरीसुद्धा अक्कल नाही आली तर शंका आशी आहे की हे पाकीस्तान चे deep assets तर नाहीना.

  ReplyDelete
 4. कितना धो- धोया

  ReplyDelete
 5. रजनीकांत कुबेरांचा शिष्य आहे म्हणे.........
  खरे की काय???

  ReplyDelete
 6. hahaha.... bhau, apratim lekh...!!!
  sansanit galaat basel pan awaz yenar nahi hyachi kalji ghetlit

  ReplyDelete
 7. Kuber yanchya Agralekhala farach barakaine vachale jate ase disat aahe.
  Ka
  ajun dusara kunachya lekhavar mat mandale jat nahi?

  ReplyDelete
 8. Wonderful ! yaanna he ka kalat nahee ki apalyala lihanyache kaam dile ahe mhanoon kahihi lihayche ka? ugach..uthathev..

  ReplyDelete